वधूसंशोधन
वधूसंशोधन


(सत्य कथेवर आधारित)
आज मिताली प्रचंड खुश होती. अखेरीस तीच्या भावाचा गुरूचा आज साखरपुडा पार पडला होता .सोहळा अगदी दिमाखदार झाला.डोळ्यात आनंदाश्रू होते आणि थोडा जिंकल्याचा उन्माद पण.गेल्या वर्षभरातील वधुसंशोधनाचा सगळा चित्रपट तिच्या डोळ्यासमोरून सरकत होता.तीला प्रकर्षाने त्या दिवसाची आठवण झाली जेंव्हा तीला अगदी हेल्पलेस फील झाले होते आणि स्वतःवरच चिडचिड होत होती.
तो दिवस...मिताली क्षणभर अवाक् झाली आणि सोफ्यावर मट्कन थोडा वेळ बसून राहिली.गेल्या काही दिवसातील गोष्टी तीला झेपतच नव्हत्या.सहा महिन्यांपूर्वी ज्या उत्साहाने तिने तिच्या सख्ख्या भावासाठी ,गुरुसाठी वधूसंशोधन करायचे मनावर घेतले होते ते तीला वरचेवर कठीण वाटू लागले.आज एका मुलीच्या प्रश्नाने तर तीची बोलतीच बंद झाली.हि मुलगी कौटुंबिक कोर्टात व्यावसायिक वकील होती .आपल्या गावाकडची म्हणून पेशा पूर्णपणे गुरूपेक्षा वेगळे असतानाही त्याने तीला निवडलं . पण हिने गुरूशी पहिल्याच भेटीत बॉम्ब टाकला...म्हणे तू आईचे ऐकून एखाद्या गोष्टीसाठी मला तडजोड करायला लावशील का?...माझ्याशी भांडशील का? गुरूला पहिल्यांदाच अशा प्रश्नाला सामोरे जावे लागले असल्याने नाही म्हटले तरी त्याला घाम फुटला असणार.
गुरु व्यक्तिमत्वाच्या बाबतीत उच्च मध्यममध्ये नक्कीच येत असेल. उंच ,देखणा ,गोरा , ,इंजिनियर , आयटी कंपनीमध्ये नोकरीला ,निर्व्यसनी,स्वतःचे घर,शेती,घरी फक्त एकटी आई,बहिणी आपल्या घरी सुखी.मुख्य म्हणजे काही जबाबदाऱ्या नाहीत.बर घरातील वातावरण देखील तसं मोकळं .सगळेच आदर्श अपेक्षांमध्ये बसणारे.
अर्थात त्याच्याही अपेक्षा त्यामुळे तशाच.दिसणे,उंची,शिक्षण नोकरी वर पुन्हा कौटुंबिक मूल्ये , प्राधान्य असलेली.कोणत्याही अपेक्षेमध्ये तडजोड नाही .आता अशी योग्य मुलगी शोधणे मितालीला जड चालले होते.मितालीला तिचा साधारण १० वर्षांपूर्वीचा काळ आठवला.कुठून तरी नातेवाईकांच्या ओळखीतले ‘चांगले’ स्थळ यायचे.मुलगा आणि त्याचे पूर्ण कुटुंब गाडी भरून मुलीला पहायला यायचे.दोघांना फार फार तर १०-१५ मिनिटे मिळायची तथाकथित एकांतात बोलायला आणि एकमेकांना पारखायला.त्यावरूनच होकार/नकार कळवायचा.नाही म्हटले तरी मुलींवर घरच्यांकडून होकारासाठी दबाव असायचाच . कि लगेच चट मंगनी पट ब्याह.लग्नाआधी जास्त भेटणे, बोलणे पण चालायचे नाही.लागला मटका तर कल्याण नाही तर आयुष्यभर तडजोडी .असो.तर दहा एक वर्षात पूर्ण चित्र बदललेले.आजकालच्या मुला मुलींच्या अपेक्षा हा तर स्वतंत्र संशोधनाचा विषय होऊ शकतो.बर मुलींच्या बाह्य रंग रूपाच्या,शिक्षण,नोकरी अशा अपेक्षा समजू शकते.पण यांच्या पुढे जाऊन आत्ताच भावनिक अपेक्षा पण असायच्या.
उदा. मुलगा स्थिरस्थावर हवा पण माझ्या नोकरीसाठी त्याने माझ्या कामाच्या शहरी बदली करून घ्यावी.
मला स्वयंपाक करायला फारसा आवडत नाही.माझ्या मूड वर अवलंबूनआहे.
भविष्यात घर ,मुलं यांना प्राधान्य असले तरीही नोकरीत तडजोड नाही .
माझ्या घरी सगळे मांसाहार करतात , फक्त मी सोडून.
मला मांसाहारी पदार्थ बनवता येतात पण मी बनवणार नाही.बनवले तरी ते जबरदस्तीने असेल.
माझी सध्याची जीवनशैली सुखवस्तू आहे त्यामुळे नवऱ्याला ती सांभाळता आली पाहिजे.
आणि आज तर या सगळ्याने उंचीच गाठली ......तू लग्नानंतर आईचे ऐकून माझ्याशी भांडशील का?
देवा....काय बोलणार मिताली पामर यापुढे.....
आत्तापर्यंत खूप वेगवेगळ्या स्वभावाच्या मुली आणि त्यांच्या घरच्या मंडळींबद्दल अनुभवायला मिळाले होते
एक मुलगी तर तिची माहिती पाठवायला सुद्धा तयार नव्हती.आधी मुलाची माहिती , फोटो पाठवा मग मी माहिती द्यायची कि नाही ते ठरवेन .
कधी कधी मुलगी सगळ्या बाबतीत व्यवस्थित असली तरी तिच्या घरचे विचित्र वेळकाढूपणा करायचे.
संकेतस्थळावरून वरून किंवा वधूवर सूचक पुस्तकामधून गुरूच्या अपेक्षेमध्ये बसणाऱ्या मुली निवड ,घरच्यांशी संपर्क साधा, मग मुलामुलींची माहिती आणि फ़ोटोंची देवाणघेवाण.(अर्थात व्हॉट्सअपवर) ती सगळी माहिती गुरुला पाठवा.गुरुनी हिरवा कंदील दाखवला कि मग आईकरवी गुरुजींकडून पत्रिका जुळवा .त्या जुळल्या कि मुलीच्या घरच्यांना कळवा.दोघांचा संवाद सुरु करण्यासाठी मुलीचा नंबर मिळवण्यासाठी मिनत्या.मग मुला मुलीचे व्हॉट्सअपवर संवाद सुरु होणार.२-४ दिवसांत एकमेकांशी जुळतंय असं वाटलं तर मग बघण्याच्या कार्यक्रमासाठी सरसावणी.बघायचा कार्यक्रम उत्तम पार पडलाच तर मग दोन्ही बाजूंना हो-नाही कळवायला पुरेसा वेळ.या एवढ्या सगळ्या प्रक्रियेतून एक मुलगी जाईपर्यंत होईंपर्यंत २-३ आठवडे आरामात जायचे.बऱ्याचशा मुली या मधल्या पायऱ्यांमध्येच गारद व्हायच्या.
गुरु स्वभाव , उंची ,व्यक्तिमत्व अशा बेसिसवर नाकारायचा .याच काळात मुली सुद्धा टाईमपास करणाऱ्या असू शकतात हा नवीन शोध भाबड्या मितालीला लागला.कधी कधी काही मुलीसुद्धा गुरुला नाकारायच्या.पण त्यांच्या पालकांना नकार कळवायचे पण सौजन्य नसायचे.मिताली बिचारी वाट बघून बघून स्वतःच फोन करायची तर लोक कधी कधी ते पण टाळायचे.मितालीचा नुसता जाळ व्हायचा.
बऱ्याचदा मुलगी मनाने लग्नासाठी तयार नसायची.... नोकरी सठी किंवा अजून तिच्या अपेक्षा ठरलेल्या नसायच्या किंवा इतर कोणत्या तरी वैयक्तिक कारणामुळे असेल.पण तरीही तिचे पालक तिचे नाव नोंदवायचे . मग अगदी गोष्टी बघण्याच्या कार्यक्रमापर्यंत गेल्या कि मुलगी अचानक आजारी पडायची आणि आई वडिलांना नकार कळवायला लावायची कि अजून ६ महिने तरी मुलीला लग्न करायचे नाही.अरे मग आमचा वेळ कशाला खाल्ला एवढा ...आधीच स्पष्ट करायचे ना.... मितालीचे डोके जाम भडकायचे पण कसबीने तीला जिभेवर मध पेरावा लागायचा.
एकतर शिकलेल्या मुली खूप साऱ्या त्यामानाने मुलांची संख्या कमी तरीही चांगल्या व्यक्तिमत्त्वांच्याबाबत मुलींचं असलं वागणं पहिलं कि मितालीला समस्त लग्नेछुक मुलींची काळजी वाटायची आणि रागही यायचा.
बर गुरु आणि मिताली एवढ्या युद्धपातळीवर काम करत असताना देखील घरचे आणि अगदी दूरचे नातेवाईक पण सारखे विचारायचे अरे किती मुली बघताय ...बघा आता यावर्षी लग्नाचा बार उडवा एकदाचा.....इ.इ.अशाने दोघांना अवून नैराश्य यायचं
अताशा लव्ह मॅरेजपेक्षा अरेंज मॅरेज खूप कठीण झाले आहे हे मितालीला मनोमन पटायचे.गुरुचे कॉलेज मध्ये BE शेवटच्या वर्षीच नोकरीत निवड झाली होती त्यामुळे खरे तर गुरूची आई त्याच्या वयाच्या २५ पासून त्याच्या मागे लग्न कर म्हणून लागली होती.पण गुरुला अजून MBA करायचे होते, भविष्य घडवायचं होतं ,घर घ्यायचे होते इ.इ....त्यामुळे या काळात वधूसंशोधन फारसे झालेच नाही.गुरुचे वय ३० च्या जवळ पोहोचतानाच २५ ते २९ वयाच्या बऱ्याच चांगल्या मुली कुमारी वरून सौ झाल्या होत्या आणि वय वर्ष २१ ते २४ मधील मुलींना वयातील एवढं अंतर चालेल का याची शाश्वती नव्हती.त्यामुळे हल्ली मिताली जास्तच चिंतीत व्हायची .अजून थोडे महिने असेच गेले तर गुरूला एकतर खूप जास्त तडजोड करावी लागेल किंवा लग्न राहिलेच म्हणायचे.
शेवटी गुरूला आपल्याच गावाकडच्या दोन मुली आवडल्या.एक अतिशय लावण्यवती ..अगदी बाहुबली मधल्या देवसेने सारखीच.पण शिक्षण आणि घरच्यांचा एकंदरच मुलगी आणि तिचे लग्न याबाबतीतला स्वभाव गुरु आणि आणि मितालीला आवडला नाही. दुसरी...गुरूच्या काही अपेक्षांमध्ये शिथिलता आणली तर अगदी योग्य बसणारी.अर्थात ती मुलगी पण गुरूच्या मुलाखत प्रक्रियेमधून पास झाली होती आणि तिलाही गुरु मनापासून आवडला होता.मितालीने गुरूला समजावून, त्याची मनाची तयारी करून घेऊन होकार मिळवला.मुलामुलीची पसंती झाली कि लगेचच बैठक आणि पुढच्याच आठवड्यात साखरपुडापण पार पडली.मितालीने दोघांना हैप्पी लग्न डॉट कॉम बुक गिफ्ट केले आणि सुखी संसारासाठी शुभेच्छा दिल्या . मितालीला आज शांत झोप लागली.डोके हलके वाटत होते.नाही म्हणायला या काळात मितालीची घरात नवरा, मुलांवर पण कधी कधी चिडचिड झाली होती मनासारखे घडले नाही कि.असो शेवट गोड झाला.
गुरु थोड्या दिवसांत परदेशी जात आहे ४ महिन्यांसाठी आणि परत आला कि लग्नाचा बार.सगळे खूप खुश आहेत.
घरच्यांनी ठरवून केलेल्या लग्नाच्या बाबतीत काही भेटीत माणसं लगेच ओळखता येत नाहीत त्यामुळे मुलाबरोबरच त्याच्या जवळच्या व्यक्तींना पण नवीन येणाऱ्या माणसाविषयी असुरक्षित वाटते हे मिताली आयुष्यात प्रथमच अनुभवत आहे. पण तीला तिच्या निवडीवर विश्वास पण आहे.