वडिलांना गमावल्याचे दुःख
वडिलांना गमावल्याचे दुःख


माझं माझ्या वडिलांवर निरतिशय प्रेम होतं. अर्थात ते कळायला खूप उशीर झाला. अत्यंत आदर्श पती, आदर्श वडील आणि संत पातळीवरील एक सज्जन मनुष्य म्हणजे माझे वडील. प्रगल्भ विचाराचे ,काळाच्याही चार पावले पुढे चालणारे, अध्यात्मावर अधिकार असणारे, त्यांना आम्ही तीन मुलीच .ज्या काळात मुलगा होण्यासाठी पुरुष दुसरी बायको करत होते त्या काळात माझ्या वडिलांनी स्वतःचे फॅमिली प्लॅनिंग चे ऑपरेशन केलं.
आम्हाला त्यांचा आदरयुक्त धाक होता पण कधीच दहशत नव्हती काका यासाठी ओरडतील त्यासाठी ओरडतील अशी कधी भीती वाटत नव्हती. त्यांनी आमच्यासाठी अतिशय कष्ट केले खस्ता काढल्या व आम्हाला आमच्या पायावर उभे केले.
अध्यात्माचे अधिकारी असल्यामुळे गावातील कित्येक मंडळी आपल्या समस्या सांगण्यासाठी, सोडवण्यासाठी वडिलांकडे येत. आणि वडील त्यांना विनामूल्य सल्ला देत असत.
आयुष्यातली प्रत्येक गोष्ट त्यांच्याशी शेअर करायची सवय होती .ते गेल्यानंतर याबाबतीत फार जाणवते त्यांना आमचा प्रचंड अभिमान होता. मी माझ्या आयुष्यात त्यांचा शब्द कधीही डावलला नाही. माझ्या लग्नाच्या निर्णयापासून सगळ्याच बाबतीतले, त्यांनी घेतलेले निर्णय अतिशय योग्य होते त्याबाबत आज देखील खात्री आहे.
आता पाया पडण्यासाठी मात्र वडिलधारे पाय राहिले नाहीत मध्यंतरी चार वर्षांपूर्वी मला प्रमोशन आलं पण सांगायचे कुणाला? आपला आनंद वडीलधाऱ्या कोणापाशी व्यक्त करायचा? त्यानंतर याच वर्षी मी कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून आले त्यांना खूप आनंद झाला असता. असं वाटलं होतं एखाद्या एकांतस्थळी जावं दोन्ही दोन्ही हात वर करावेत आणि त्यांच्या नावाने लावून खच्चून ओरडावं "काका sss तुमची आशा कैलास मानसरोवर यात्रा करून आली हो"
आयुष्यातल्या कित्येक निर्णय घेताना यांचा आधार वाटायचा.
जेव्हा माझे पहिले घर घेतले तेव्हा काही अपरिहार्य कारणामुळे मिस्टर घरातच होते. त्यामुळे माझ्या एकटीच्या जीवावरच पन्नास खटपटी लटपटी करून ते घर उभे केले. त्यासाठी तीन लाखाचे लोन काढले एकूण सात लाखांचे घर घेतले, चांगल्या असणाऱ्या एकाही वडीलधाऱ्या व्यक्तीने मला पैशाबद्दल साधी चौकशी केली नाही. माझे वडील तेव्हा बिछान्यावर होते पण तशाही परिस्थितीत त्यांनी "नवरा घरात असताना एवढे सात लाख तू कुठून आणलेस? कसे उभे केलेस? याची चौकशी फक्त माझ्या वडिलांनी गेली. मला खूप गहिवरून आले होते त्यांना मी एकच वाक्य बोलले "काका तुमच्या आशीर्वादाने उभे राहिले" त्यांना जाऊनच कमीत कमी तेरा वर्षे झाली पण त्यांची उणीव भरून काढणारे कोणीही नाही त्यामुळे आयुष्यातल्या संकटसमयी तरी त्यांची खूपच आठवण येते
आपली जिवलग व्यक्ती असताना कदाचित तिची किंमत आपल्याला समजत नाही पण ती गेल्यानंतर मात्र तिची खूपच उणीव असते भासते.