Mandar Mandar

Drama Horror

4.4  

Mandar Mandar

Drama Horror

वास्तू

वास्तू

13 mins
1.5K


त्या मोठ्या बंगलीसमोर एक आलिशान कार थांबली. कारमधून गुरु उतरला. काळ्या तुकतुकीत केसांची पोनी बांधलेली, pantaloonsचा केशरी शर्ट त्यावर काळी जीन्स, उजव्या हातात सोन्याच कडं, डाव्या हाताला titan चं घड्याळ, पायात rebookचे शूज..., अशा अवतारात साधारण ५० गाठलेले गुरु महाराज त्या अवाढव्य बंगलीसमोर उभे होते. त्याला तिथे सोडून त्याची कार एक झोकदार वळण घेत निघून गेली. आणि त्या भयाण शांततेला निरीक्षण करायला गुरु आयताच सापडला. डोक्याला किक बसण्यासाठी पुरुष जे साहित्य वापरतो त्यातल पहिले साहित्य म्हणजे सिगारेट. गुरूने सिगारेट शिलगावली. पत्रकार असलेला गुरु, तसा डोक्याने थोडासा सणकीच होता.. ह्या हेरीटेजबद्दल त्याने अनेक वावड्या ऐकल्या होत्या. त्यामुळे डेरिंगबाज असलेला गुरु संधी शोधतच होता. संधी दारात स्वतःहून आली होती. संपादक सरांनी स्वतःहून परवानगी देऊन एक पान, अर्ध पान आर्टिकल गुरूला लिहायला सांगितलं होतं.म्हणून मग गुरु आज त्या बंगलीच्या दारात उभा होता.


"कसलं घर आहे हे, भारीच.1 नं..कोण म्हणताय की हे घर झपाटलं आहे, कानाखाली जाळ काढायला हवाय त्याच्या."

ही वास्तू शहरातली खूप जुनी वास्तू होती, ती एक हेरीटेज म्हणून घोषित होती. पालिकेने तिची नित्य काळजी घेण्यासाठी आणि लोकांना बाहेरून ही वस्तू बघता यावी यासठी ३ केअरटेकर ठेवले होते. ह्या वास्तूच्या काळ्या बाजूबद्दल ह्या शहरातच काय आजूबाजूच्या शहरांमध्येही कुजबुज होती. कारण ही वास्तू झपाट्लेली होती... म्हणजे काय होतं हे कोणालाही माहित नाही कारण संध्याकाळनंतर तिकडे कोणीही फिरकत नसे, त्यामुळे केअरटेकरही संध्याकाळ झाली की बंगलीच्या मेनगेटला कुलूप लावून निघून जात. आधी त्यातले दोघेजण रात्रीही watchman केबिनमध्ये राहत असत, पण त्यांच्या म्हणण्यानुसार अंधार पडू लागला की इथले वातावरण बदलते. सगळीकडे शांतात पसरते, आणि सतत कोणीतरी आपल्यावर नजर ठेवून आहे असे वाटते... हे सगळं रात्रीच्या १२ पर्यंत चालू असते. १२ नंतर मात्र अचानक थंड वारा वाहायला सुरुवात होते. हालचाल जाणवते. कोणीतरी वेगळ्याच आवाजात बोलल्याचे जाणवते. ह्या सर्वांत महत्वाचे हे की हे सर्व काही बंगलीतल्या हॉलमध्ये घडते.


गुरूला हे सगळ आत्ता सिगारेट ओढताना ऐकलेलं,कुठेतरी वाचलेलं आठवत होत."लोक पण ना जरा बधिरच असतात ,कुठे काय आहेईथे?उगः बदनाम करायचे धंदे आहेत हे."मनात हे सगळ म्हणत असतानाच तिथले दोन केअर टेकर आले..

"साहेब हा तुमचा रात्रीचा डब्बा,ही बंगलीची किल्ली, प्यायचं पाणी आम्ही आत ठेऊन देतोय.तुम्हाला सगळ माहितीच असेल ह्या बंगलीबद्दल,तेंव्हा काही लागलच तर फोन करा आम्हाला..आम्ही समोरच राहतो."गोपाळ नावाच्या एका केअर टेकरने सांगितलं.

"काय रे खरच इथे भुताटकी आहे? पाहिलंय काय तुम्ही?का उगाच हवा करून ठेवलीये भूत वगैरेची... काम काय असतात तुम्हाला?" हसत हसत गुरु म्हणाला..

त्या दोघांनी तोंडाचा आ वसला.

गोपाळ म्हणाला ,"आम्ही खोट बोलतोय अस वाटलं का साहेब तुम्हाला?काय गरज आहे आम्हाला खोट बोलायची?पैसा मिळतो साहेब इथे काम केल्याबद्दल.पण संध्याकाळी जादू व्हावी तसं काहीस होत आणि सगळच अजब घडत इथे.सकाळी ८.३० पासून आम्ही इथे येतो.साफसफाई,बाग स्वच्छ करणे,आता हे हेरीटेज म्हणून जाहीर झालेलं असल्याने लोक पाहायला येतात,खाऊन इथे घाण करत नाही ना?कुठल्या वस्तू चोरीला जात नाही नं?ह्या सगळ्यांवर लक्ष ठेव........"

"आणि सर्वात महत्वाच म्हणजे संध्याकाळ होताच पूर्ण बंगला फिरून कोणी राहील नाही ना आत हे पाहून मग बंगला बंद करणे."गोपाळच वाक्य राजूने पूर्ण केल.

इतका वेळ सिरीयस नसलेला गुरु एकदम सतर्क झाला."भूत वगैरे काही नसतच..पण इनकेस आलचं तर आपण सरळ ह्या समोरच्या खिडकीतन पळत सुटायचं.बर झाल खालच्याच मजल्याची खोली दिलीये आपल्याला.."गुरु मनात प्लानिंग करत होता. 

गुरूने घड्याळ पाहिल. संध्याकाळचे ६.३०वाजलेले .बंगलीच्या दारात एक मोठ्ठ आंब्याच झाड आपला अवाढव्य पसारा सांभाळत मंद वाऱ्याच्या झुळुकीसरशी डोलत होत.

गोपाळने पाणी स्वयंपाक घरात नेऊन ठेवल आणि ते दोघ निघाले.

"साहेब" घरी चाललेला गोपाळ परत मागे फिरला,"साहेब एक सांगायचं होत,खर सांगायची गरज नाही तुम्हाला.शिकलेली माणस तुम्ही..पण...तरीही..आवडलेल्या कुठल्याही वस्तूला शक्यतो हात लावूच नका..आणि जर वस्तू उचललीतच तर परत जिथल्या तिथे ठेवून द्या...आणि काही लागलच,वाटलच तर आम्हाला फोन करा...ही खालची खोली मुद्दामच दिलीये तुम्हाला..पळायला सोप्प म्हणून..येतो आता .."

 आणि ते दोघ निघून गेले.

"इथे खरोखर भूत आहे?..गुरु महाराज..कायपण आवाज आला की मानसिक आणि शारीरिक तयारी ठेवा पळायची."गुरूने स्वतालाच समजावलं.

.गुरु आणखी एक सिगारेट ओढत त्या दोघांच्या पाठमोर्या आकृतीकडे पाहत राहिला...बरंच वेळ वेडेवाकडे विचार करून मग गुरूने हातात bag उचलली आणि घरात जायला वळला...आता त्या बंगलीला दिव्यांच्या रोषणाईने "जान"आली होती..नेहमी यावेळेत अंधारात बुडून गेलेली ती बंगली आज मात्र दिव्यांनी उजळली होती...पुन्हा एकदा गुरु तिच्या प्रेमात पडला.


hallमध्ये आल्यावर गुरूने निरीक्षण करायला सुरवात केली...एकाचवेळी जवळपास 100-1 माणस एकत्र इकडेतिकडे फिरू शकतील इतका अवाढव्य असं तो hall होता.पितळेच्या मोठ्या फुलदाण्या अत्यंत आकर्षक पद्धतीने योग्य जागी ठेवल्याने hall अजूनच चं दिसत होता..झुळझुळीत पडदे त्यांच्यावरच्या डिझाईन्स आणि बारीक,कोरीव नक्षीकाम केलेला सोफा पूर्ण hallची शोभा वाढवत होता..मंद पिवळे दिवे आणि गोपालने रेकोर्डवर लावलेलं छान सतार वादन ह्यामुळे सगळा माहौल मस्तच होता..


'हे भूत प्रकरण निकालात लावल्यावर सगळ्या मित्रांना घेऊन इथ यायलाच हवंय,."असा विचार करतच गुरुने चौफेर नजर टाकत बंगलीचे निरीक्षण करायला सुरवात केली... वर जायला एक जिना होता.. अर्धवर्तुळाकार. गुरु जिना चढून वर गेला.. लालचुटुक रंगाचा मखमलीचा समोरच्या दालनात एक मोठा सोफा सेट ठेवलेला होता त्याच्यामागे भिंतीवर एक खूप मोठी तस्वीर लावली होती. ज्यात एक पुरुष खुर्चीत बसला होता. गळ्यात पांढऱ्याशुभ्र मोत्यांच्या माळा हातात सोन्याचं कडं, त्याने मोठा फेटा घातलेला त्यातले मोती चित्रातही खरेखुरे असल्यासारखे दिसत होते... गुरूने पुढे जाऊन ते चित्र नीट निरखून पाहिलं. त्याखाली एक छोट्या अक्षरात "श्री. दिनकरराजे शंभूराजे पाटील व सौ. सविताबाई दिनकरराजे पाटील" लिहिले होते. बाई तर मूर्तीमंत सौंदर्याची खाण होती. मोठा आंबाडा घालून त्यावर पांढऱ्या फुलांची वेणी घातली होती, हिरवकंच लुगडं, हातात सोन्याच्या पाटल्या-बांगड्या, गोठ, गळ्यात सोन्याचे दागिने, नाकात नथ, सोन्याचे बाजूबंद, आणि जीव घेणारी डाव्या गालावरची खळी... सर्वांत छान होते ते म्हणजे टप्पोरे, गहिऱ्या विहिरीसारखे, पण सुखाच्या कारंजाऐवजी दुःखाची विहीर काठोकाठ डोळ्यात भरून ठेवणारे डोळे... गुरु पुतळयागत त्या बाईंकडे पाहतच राहिला "शिट्ट टोटल गाढवपणा केलाय आपण... कॅमेरा वर न आणता. पहिल्याच भेटीत सापडलेली सुंदर गोष्ट हातून गेली... उद्याही फोटो काढता येईल पण आज पहिल्यांदा पाहतानाचं रूप उद्या मनाला जाणवेल की नाही काय माहित." गुरु चरफडत म्हणाला. गुरूने इथे आल्यापासून इतकं काही डोळ्यात, मनात साठवलं होतं की कॅमेराचं रीळ संपेल पण इथल्या गोष्टी नाही असं मनात म्हणतच तो त्या खोलीतून बाहेर आला. समोर एक खोली अजून होती. गुरूने तीही उघडून पाहिली, तिथे ओळीने चार मोठी कपाटं होती. अत्यंत उच्च लाकूड वापरून ही कपाट बनवली असावीत असा गुरूने अंदाज बांधला. "काय असेल ह्यात?" म्हणून गुरूने ती उघडून पाहायचा प्रयत्नही केला. पण ती कुलूप लावून बंद करण्यात आलेली... hallच्या मध्ये एक मोठं झुंबर लावलेलं. अक्षरशः शेकडो हिरे एकत्र येऊन त्यांचा उजेड पडावा इतका त्याचा प्रकाश पडलेला... हे झुंबर गुरु वर उभा राहून पाहत होता... डोळ्याचं पातही न लवता... बराच वेळाने गुरु भानावर आला. तो आता परत hall मध्ये आला. सोफ्याच्या मागेच किचनकडे जायला रस्ता होता. hallच्या डाव्या बाजूलाच एक खोली होती, ती गुरुने उघडून पाहिली, त्यात मोठ्ठं काचेचं डायनिंग टेबल होतं. इथे अनेक बायकांची चित्रं रेखाटून भिंतीवर लटकवली होती. त्या बायका काही ना काही काम करत होत्या. कुणी चुलीजवळ बसून फुंकणीने चुलीत जाळ करत होती, तर कुणी लुगडयाचे पीळ करत होती. कुणी सज्जात उभी राहून पिंजऱ्यातल्या पक्ष्याला खायला घालत होती, कुणी भाजी निवडत होती तर कुणी अक्षरशः पलंगावर लोळत खिडकीतून बाहेर पाहत होती. कुणी स्वतःचं रूप आरशात पाहत होती. कुणी आपला काळाभोर केशसंभार हातात घेऊन त्याकडे नवल होऊन पाहत होती. कुणी तांदूळ निवडत बसलेली... ही चित्रं पाहून गुरु हे मनातच म्हणाला.. 'आयला ह्या बायका इतक्या सुंदर आहेत, की प्रश्न पडलाय की या खरोखरीच अस्तित्वात असत्या तर?" डायनिंग टेबलला जवळपास २० जण एकावेळी बसू शकतील इतक्या खुर्च्या ओळीने नीट मांडून ठेवल्या होत्या. पूर्ण खोलीत पण सेम तशाच जवळपास १० तरी खुर्च्या होत्याच. बहुतेक इथे मिटिंग होत असाव्यात. डायनिंग टेबलवर प्रत्येक खुर्चीसमोर एक पितळी ताट, वाटी, पाणी प्यायचं भांडं पालथं घालून ठेवलं होतं." हे लोक नक्कीच राजे महाराजे नाहीतर संस्थानिक असणारेत" गुरु हे सगळं दृश्य पाहून मनात म्हणाला.


मंद संगीत, उघड्या खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याची झुळूक ह्या मस्त शांत वातावरणात गुरु जेवायला बसायचा विचार करतच होता... अचानक गुरूला आपल्या घराची आठवण आली. गुरुने बायकोला फोन केला. गुरु एकटाच ह्या मिशनवर गेल्याचे

कळताच बायको चिडलीच.पण गुरुने तिची समजूत काढली. फोन झाल्यावर गुरु सोफ्यातच मान मागे टेकून डोळे मिटून बसला.


रात्रीचे १०.०० वाजून गेलेले... एका शांततेचा अंमल संपूर्ण वातावरणावर चढला होता. कशाने तरी भारल्यासारखं, कुणीतरी स्वतःचा अंकुश किंवा स्वतःची पकड वातावरणावर ठेवून एक नाट्य उभं करत असल्यासारखं वातावरण झालेलं... गुरूलाही ही शांतता कुरतडत होती. शेवटी त्याने फोनवर गाणी लावली आणि तो किचनमध्ये जेवायला घ्यायला गेला. ओट्यावर भाजीपोळीचा डब्बा गोपालने ठेवला होता... आणि... त्याला जाणवलं की hallमध्ये कसलातरी आवाज झालाय. "आपण आताच hall मधून आलोय की"...भीतीची एक लहर, अंगाअंगातून धावली.. तरीही तो हिंमत करून तसाच hallमध्ये आला... भीतीने त्याचं काळीज लक्कन हललंच, कारण सोफ्याच्या बाजूला एक पितळी नक्षीकाम केलेली खुर्ची त्याला दिसली..


"कसं शक्य आहे? पूर्ण घर फिरलोय आपण खुर्च्या तर hallच्या डाव्या बाजूला असलेल्या खोलीत होत्या... असो आपल्याला भीतीच्या जाणीवेने काहीही दिसतंय.. कदाचित ती मीच आणली असेल.. पण मी एवढा मोठा सोफा असताना खुर्ची कशाला आणेन? पण आत्ता जो आवाज झाला त्याचं काय? तो तर आपण नीट ऐकलाय..जाऊ दे. उंदीर वगैरे असेल एखादा.." अशी स्वतःच्या मनाची समजूत घालत किचनमधून डबा घेऊन hall मध्ये सोफ्यात येऊन बसतो. पण तरीही प्रश्न मन कुरतडतच होता "ही खुर्ची इथे कडमडली कशी?'


जेवण झाल्यावर गुरूने घड्याळ पाहिले, घड्याळ ११.०० वाजलेले दाखवत होतं. 'चला इतक्या तासात तर काही झालंच नाही. आता काय घंटा होतंय?' असं मनात म्हणतच त्याने सिगारेट पेटवली. पण मेंदूने त्या मगाच्या आवाजाची नोंद घेतली होतीच... मन शांत असलं तरी मेंदूने "तो आवाज कसा आला? खुर्ची कशी काय बाहेर आली?" अशा प्रश्नांची पुरचुंडी उघडली होती. 


सगळ्या खोल्यांतले दिवे बंद करून त्या खोल्या पुन्हा बंद करून गुरु झोपायला दिलेल्या आपल्या खोलीत आला. तो खोलीत इकडेतिकडे पाहात होता, समोरचा पलंग म्हणजे एक काळा तुकतुकीत शिसवी पलंग होता. अवाढव्य.. गोलाकार... एका कोपऱ्यात एक मेज आणि एक खुर्ची होती... खाली मऊमऊ डार्क निळ्या रंगाचा गालीचा अंथरलेला… ह्या खोलीतही वेगवेगळ्या प्रकारच्या ७-८ फुलदाण्या वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या जागा धरून, त्यांच्यावरच्या कोरीव आणि अर्थातच रेखीव नक्षीकामासकट स्वागताला उभ्या होत्या. ही खोली पण hall सारखीच मोठी होती. पलंगामागेच मोठी खिडकी होती, त्यातून बाग आणि मेन गेट दिसत होतं.

"ही बंगली बांधणारे पाटीलसाहेब एकदम शौकीन होते तर.. प्रत्येक गोष्टीला "सुंदर" हा शब्द म्हटल्याशिवाय तिची तारीफच पूर्ण होऊ शकत नाही.  एकूण एक खोली तिचं सौंदर्य खुलवण्यासाठी मेहनत घेऊन सजवली आहे... कम्माल आहे." गुरु मनात म्हणाला.


गुरूने खोलीच दार लावलं.. कपडे बदलले. फोन, चाकू, फायटर, battery अशी स्वसंरक्षणासाठीची शस्त्रे त्याने आपल्या उशीजवळ ठेवली..,"महाराज असंही आपल्याला चष्म्याशिवाय काही दिसत नाही. मग अंधारात काय कप्पाळ दिसणार?" त्याच्या मनात हा विचार येताच तो प्रचंड दचकला. ह्या सगळ्या आयुधांसोबत गुरूने चाकू बाजूला ठेवून चष्मा उशाजवळ ठेवला. "भूत" ही संकल्पनाच इतकी भयावह आहे ना की नुसतं भूत म्हटलं तरी मनाचे जीवघेणे खेळ सुरु होतात... त्यामुळे खोलीतला दिवा काढल्यावर गुरूच्या मनाचे खेळ सुरु झाले... न झालेले आवाजही त्याला ऐकू येऊ लागले. पण दिवसभर इथे यायचं म्हणून झालेली धावपळ आणि इथे आल्यावर मनाला व्यापून टाकणारी भीती यामुळे त्याला चटकन झोप लागली..


आणि... मध्यरात्री अचानक कुणाच्या तरी बोलण्याच्या आवाजाने गुरूला जाग आली... पाहिले तर त्याला वाटलं भासच होतायंत. पण पुन्हा काहीतरी आपटण्याचा जोरात आवाज आला... गुरु सावध झाला. ताबडतोब त्याने उशाजवळचा चष्मा लावला.. एका हाताने त्याने battery घेतली, कारण दिवे लावून चालणार नव्हते.. अचानक त्याला कोणीतरी मंजुळ हसल्याचा आवाज आला. भीतीने गुरूच्या अंगावर सर्सरून काटा आला. "संध्याकाळपासून आपण ह्या बंगलीत एकटे होतो... दार लावलेलं आहे, पण हे हसणारं जे कोण आहे ते आत आलंच कसं? की माझ डोकं फिरलंय? की....की...alredy मी यायच्या आधीपासून इथे कुणी आहे?"....चेहऱ्यावरचा घाम खसाखसा पुसत अंधारातच धडपडत गुरु मेजाजवळ पोचला. घटाघटा तांब्यातलं पाणी तो प्यायला...तेव्हा त्याच्या जीवाला जरा बरं वाटलं. कुठल्या मुहूर्तावर इथे आलोय काय माहित, गुरु म्हणाला.. त्याने हळूच दार उघडलं..

hallमधले दिवे लागले होते. गुरु चरकलाच.."बापरे! खरंच भुताटकी आहे ह्या घरात..?????"

आवंढा गिळत तो समोर आणखी काय वाढलंय हे पाहत बसला. जास्त वेळ त्याला वाट पहावी लागली नाही. हसण्याचे आवाज त्या डायनिंग टेबल ठेवलेल्या खोलीतूनच येत होते.. अचानक त्या खोलीच दार उघडलं...आणि ...आणि गुरूचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. "कसं शक्य आहे?" मनाने म्हटलं... 

डायनिंग टेबल असलेल्या खोलीत जी चित्र भिंतीवर लावलेली, त्यातल्या स्त्रिया त्याच्यासमोर त्या खोलीतून येत होत्या.. कोणी हसत होती, कुणी उड्या मारत बागडत होती... कुणी दुसरीला टाळ्या देत होती तर कोणी दुसरीला ढकलत होती...

गुरूचा श्वासोच्छवास जोरात सुरु होता.. .त्या सगळ्याजणी अत्युच्च सुंदर होत्या.. कपड्यांचे रंग, त्यांचे दागिने आणि त्यांचे काळेभोर मोठ्ठे केसं त्यांचं सौंदर्य खुलवीत होते... एकीवर नजर ठेवावी की दुसरी काहीतरी करून गुरूचं लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायची.

"स्वर्गातल्या अप्सरा अशाच असतील काय?" गुरु मनातच म्हणाला..

त्या सगळ्याजणींनी फेर धरून गोलं फिरत गाणी म्हणायला सुरवात केली.

"झिम्मड झिम, पावसाचं गाणं

आलंय दारी माझं पाव्हणं,

नाचू लागला आमचा मोत्या,

राघू संग खेळाया येई तात्या,

झिम्मड झिम, पावसाचं गाणं,

आलंय दारी आमचं मेव्हणं..."


सगळ्या आनंदात बेहोष होऊन नाचत गात होत्या. गुरूला कॅमेऱ्याची आठवण झाली.. त्याने हळूच जाऊन कॅमेरा हातात घेतला आणि ते सगळ शूट करायला सुरवात केली. कॅमेऱ्यात सगळं शूट होत होतं.. अक्षरशः स्वर्गातून अप्सरा येऊन खेळत बागडत असाव्यात इतकं सुंदर दृश्य होतं ते. सगळ्या आनंदाला अचानक गालबोट लागावं, आणि सगळ्या आनंदावर विरजण पडावं तसंच काहीसं झालं. अचानक वरच्या मजल्यावर कोणाची तरी पावलं वाजली. आणि त्या सगळ्या जणींचे चेहरे खाडकन उतरले. एका अनामिक भीतीने त्यांच्या चेहऱ्याचा ताबा घेतला. त्यांनी धरलेला फेर सोडून त्या सगळ्याजणी पळत सुटल्या... त्या सगळ्या पुन्हा hall मध्ये आल्या. आता त्यांच्या हातात काही ना काही सामान होतं. एक जण तांदूळ निवडायला बसली .. एक hallच्या खिडकीत उभी राहून कपडे पिळायला लागली. एक जण भाजी निवडायला लागली. तर एक जण आपला काळाभोर केशसंभार मोकळा सोडून त्यात प्रेमाने आपली लांबसडक बोट घालून त्या केसांचे लाड करत बसली... गुरूला हे दृश्य पाहून हे सर्व आधी कुठेतरी पहिल्याचं आठवायला लागल होत... पण कुठे ते कळेना. पायऱ्यांवरून कुणीतरी उतरून खाली येत होतं... इतक्यात गुरूने आवाजाच्या दिशेने पाहत, जिन्याकडे कॅमेरा फिरवत वळून पाहिलं... आणि तो दचकलाच... त्याचा कॅमेरा हातातून पडता पडता वाचला... समोरच्या जिन्यावर बरोबर मधेच वरच्या मजल्यावर पाहिलेल्या तस्बिरीतले दिनकर राजे... साक्षात समोर उभे होते. करडी नजर आणि कोरल्यासारख्या मिशा, स्वच्छ पोशाख, हातात तासलेली चांदीची मूठ असलेली काठी आणि शिडशिडीत शरीरयष्टी, पुरुषाला शोभेलशी उंची, आणि गळ्यात घातलेल्या माळेतले स्वच्छ, शुभ्र मोती, जे इतक्या लांबूनही गुरूला अंधारातून स्पष्टपणे दिसत होते. आणि हे सगळं नाट्य पाहणाऱ्या गुरूची झमकन ट्यूब पेटली...


"ह्या तर... ह्या तर चित्रातल्या बायका? आणि हा समोर उभा असलेला माणूसही वरच्या मजल्यावर भिंतीवर लावलेल्या चित्रातले पाटील... म्हणजे ह्या बंगलीत खरंच भुताटकी आहे तर... ओह... my god.!!!


आता hallमध्ये नीरव शांतता पसरली होती. सगळ्याजणी आपआपली कामं करत होत्या.

"काय चालू आहे?' करडा आवाज बंगलीत घुमला.

"काही नाही जी...नेमून दिलेली कामंच चालू आहेत.."तांदूळ निवडणारी ती स्त्री म्हणाली.

"बाकीच्यांना काही कामं नाहीत काय?", पुन्हा वीज कडकडावी तसे पाटील साहेब कडकडले.

"कामासाठी माझा जन्म झाला नाहीये",सोफ्यावर लोळणारी ललना म्हणाली.

सगळ्या काम करणाऱ्या बायकांचे हात थबकले. गुरूने पण बसल्या बसल्या आवंढा गिळला.

"सप सप" काठीचा आवाज झाला.. गुरु समोरचं दृश्य बघतच राहिला.

सोफ्यावर झोपलेल्या स्त्रीवर पाटलांनी हातातली काठी चालवली होती.. आणि ती कळवळली... पण कुणीच मध्ये न पडता चालू असलेला तमाशा बघत बसलं.

"माझ्या "गरजे"साठी आणलंय तुम्हाला मी तुमच्या घरांमधून... ह्या घराला "वारस" हवाय माझ्या रक्ताचा... म्हणून तुम्हाला इथे आणलंय. रात्रीला शय्या करा आणि दिवसा काम करा... कळलं का? फुकट पोसायला काय बापाची जहागिरी उतू गेलीये तुमच्या?? इतकी सुंदर रूपं राजघराण्यात जन्माला यायच्या ऐवजी रस्त्यावर आली. मी म्हणून उचलून आणलंय तुम्हाला.." रागाच्या भरात बोलल्याने दिनकरराज्यांना दम लागला होता.


"उपकार कोणाला सांगताय ? तुम्हाला गरज म्हणून शोधात आलात. आमच्या बापानं आमचं काहीपण केलं असतं..."

मगाचीच बाई म्हणाली.

संतापाने पाटलांच्या डोळ्यात अंगार फुलला आणि ते तिच्या अंगावर दातओठ खाऊन मारायला धावले. पण त्यांचा हात अधांतरीच राहिला. त्यातल्याच एकीने पुढे येऊन पाटलांचा हात धरला होता..

आता पाटील जास्तच खवळले.. "माजलात काय माझं खाऊन? माझ्याचवर दादागिरी करता काय? थांबा दाखवतोच तुम्हाला?" असं म्हणून पाटील तरातरा एका खोलीत गेले आणि रॉकेल घेऊन आले.. आणि क्षणाचाही विलंब न करता त्यांनी सगळीकडे ते ओतलंही आणि जवळच असलेल्या काडेपेटीने काडी ओढलीही..

माणसाचा राग हा एक मोठा शत्रूच असतो.. कारण ह्या ठेवलेल्या बायकांना धडा शिकवण्याच्या नादात पाटलांनी सरळ रॉकेल ओतलं होतं.. आणि एवढं करूनच थांबले नाहीत तर सरळ काडी ओढून मोकळेही झाले. आपण स्वतःही त्यात भाजू शकतो हेच त्यांना कळलं नाही.. क्षणार्धात होत्याच नव्हतं झालं. रॉकेलने पेट घेतला.. सगळ्याजणी ओरडायला लागल्या.. आता पाटलांनाही भान आलं... पण उशीरच झालेला. आरडाओरड्याने सगळी बंगली निनादली... एक क्षण... फक्त एक क्षण गुरुचं हृदय जोरातच धडकलं..


समोर जे दिसतंय ते खर आहे की खोटं हेच गुरूला समजेनासं झालेलं. गुरूचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. हा सगळा भूतकाळ की वर्तमान? की फक्त भास?? काय समजायचं..?

विचारांच्या आंदोलनात गुरु पुरता फसला होता. एक मन म्हणत होतं त्यांना वाचवायला हवंय. लगेच दुसरं मन म्हणालं, नको.. ह्यातून अजून काही लफडं झालं तर... ह्या विचारातच असा बराच वेळ गेला. डोळ्यांसमोर सगळीकडे आग लागलेली... hallचा भाग जळून गेलेला.. त्या सगळ्या व्यक्ती जळून कोळसा झालेल्या. गुरूने धावत जाऊन पाणी आणलं आणि तो ओतत सुटला... एका आवेगात... एका जोशात... आणि त्याला जाणवलं की आपण फक्त hall मध्ये पाणी ओततोय.. हो... हो आपण एका स्वच्छ पुसलेल्या फरशीवर उगाचंच पाणी ओततोय.. त्याने जमिनीवर पाहिलं. पण जमीन स्वच्छ होती... पाहिलेल्या घटनेचा मागोवाही कुठे नव्हता... कसं शक्य आहे??


गुरु घाईगडबडीने खोलीत आला.त्याने दार आतून लावून घेतलं आणि एक सिगारेट शिलगावली. आता कुठे त्याच्या

हातापायांची थरथर थांबली होती... जे झालं ते खरं की खोटं की आपल्यालाच भास होत होते की ते एक स्वप्न होतं? गुरु विचार करत होता. इतक्यात मेन दार वाजलं.. धावत जाऊन गुरूने दार उघडलं तर दारात गोपाळ चहा घेऊन उभा होता...

"साहेब, झोप लागली का नीट? आ?" गोपाळने विचारलं..

"हम्म, चहा दे तू आधी पटकन.. मला नितांत गरज आहे." गुरु जास्त संभाषण न वाढवता म्हणाला.

ह्या सगळ्या गडबडीत सकाळ कधी झाली हे ही आपल्याला कळलंच नाही. गुरूला नवल वाटलं.. गोपाळ आणि राजू साफसफाईच्या कामाला लागले, गुरूने चहा घेताच विचार करायला सुरवात केली. आपण जे काल डोळ्यांनी पाहिलं ते खरंच होतं, म्हणजे ह्या बंगलीत भुताटकी आहे हे नक्की. आणि गुरूने कॅमेरा चालू केला... अजूनही ह्या बंगलीतले धक्का तंत्र संपलेच नव्हते, कारण कॅमेऱ्यात काहीही शूट झालंच नाही... हे ...हे कसं शक्य आहे?? गुरु मनातच म्हणाला.

संपादक साहेबांनी विचारलं तर काय सांगायचं?" मी ही घटना प्रत्यक्ष पाहिलीये" असं म्हणून कोणी विश्वास ठेवणार नाही.. कारण आजकाल सगळ्याला पुरावा लागतो... आणि माझ्याजवळ पुरावा सध्यातरी नाहीच... नाही... काय करू??

गुरूची निघायची वेळ झाली. गुरूने बंगलीचा आणि गोपाळ, राजू यांचा निरोप घेतला." अवघं करून हाती काहीच न लागल्याने गुरु फारच निराश झालेला. जड अंत:करणाने तो गाडीच्या दिशेने निघाला. इतक्यात तो गेटजवळ येताच एक कागद त्याच्या पायाशी आला. त्याने तो उघडून पाहिला तर त्यात लिहिलेलं,

"जे काल पाहिलंत ते विसरून जा .हे एक हेरीटेज आहे, तसंच राहील. भूताच्या वावड्या तुम्ही जाऊन उठवू नका. तशी इथे कोणी राहायला येतंच नाही. त्यामुळे असलं काही करू नका. समजदार आहात. समजलं ही माफक अपेक्षा.


घरमालक,


दिनकर राजे पाटील 


गुरूने ती चिठ्ठी आपल्यासोबत ठेवली.. जेणेकरून हा मजकूरच संपादकांना दाखवता येईल... असं म्हणून गुरु गाडीत बसला... संपादकांना त्याने फोन केला.. हातातल्या चिठ्ठीशी खेळत त्याने इथली बातमी त्यांना सांगायला सुरवात केली... सहजच त्याचं लक्ष त्या चिठ्ठीकडे गेलं...

ती चिठ्ठी कोरी होती...


Rate this content
Log in

More marathi story from Mandar Mandar

Similar marathi story from Drama