STORYMIRROR

Anil Kute

Drama Tragedy Others

4.9  

Anil Kute

Drama Tragedy Others

उंद्री...

उंद्री...

8 mins
8.8K


           आजकालच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या जगात जगणं अवघड आणि मरण खूप सोप झाले आहे. प्रत्येकाचे आयुष्य आणि जगण्याच्या वाटा खूप वेगळ्या तसेच असहयनीय असतात. तशीच ही वेगळी जगण्याची धडपड “राजा” या नावाच्या बालमुलाची. फक्त नावातच राजा, अवस्था प्रजेपेक्षाही खडतर आणि वाईट. आई – वडील, दोन बहिणी असे कुटुंब. व्यवसाय विटा बनविणे. तसेच हाड व सांधेदुखीवर उपयोगी तेल विकणे असा जोडधंदा. कारण विटा बनवण्याच काम फक्त उन्हाळा आणि हिवाळा मधेच चालू असायचे. पावसाळा हा पूर्ण घरी बसून काढावा लागायचा त्यावेळेस जोडधंदा कुटुंबाच पोट भरण्याच साधन. त्यात लाल विटांना आता मोठ्या आणि सिमेंट ब्लॉकची स्पर्धा. सिमेंट ब्लॉकसाठी मेहनत, खर्च कमी आणि सहजासहजी मशीनद्वारे बनवता येतात पण सामान्यत: लाल विटांसाठी लागणारे सामान माती, भुसा, चिखल बनविणे आणि हातानेच विटा बनवाव्या लागतात. दिवसेंदिवस लाल विटांची मागणी घटत चालली होती.

       

    एके दिवशी मी घरात बसलेलो असताना मला अचानक चेंबर, सांडपाण्याच्या गटारावरील लादया सरकल्याचा आणि पाय दिल्यावर एका साइडने दबल्याचा खड-खड आवाज येत होता तेव्हा मी आईला विचारलं “ कुणाची गाबडी हायती ? संध्याकाळच्या सव्वाआठ वाजल्या तरी खेळत्याती, एवढ्या अंधारात गटारावरुन पळत्याती, लादया फोडणार वाटतं आता.” तेव्हा आई म्हणाली “ही चाळीतली पोरं न्हवं, ही बिगारी काम करणारी माणसं हायती, रोज अंधार पडला की बॅटरी, काठ्या घेवून सगळ्या चाळीतन फिरतात. सगळ्याची गटार, संडासचे चेंबर च्या लादया उचलून सगळी बिळं चेक करून उंद्र, घुशी, चिंचुंदर्‍या धरून घेवून जातात.” हे सगळं ऐकून मी अचंबित झालो. स्तब्ध स्थितीत असताना डोक्यात विचार आला काय करत असतील हे लोकं एवढ्या रात्री ते? आईला विचारलं तर आईने ही नकारात्मक मान हलवली. हे लोकं काय करत असतील हे जाणून घेण्यासाठी पटकन दरवाजा आणि सेफ्टी डोअरची कडी काढून घराच्या पाठीमागे जिथे गटार आणि चेंबर ची लाईन होती तिकडे जावून त्यांना शोधू लागलो. पण तिकडे कोणीच नव्हते, एव्हाना ते निघून गेले होते. त्यानंतर मी निराशेने तसाच घरात आलो आणि विचार करत बसलो. “ काय करत असतील हे लोक?” आई पण मला पाहत राहिली, का गेला हा बाहेर? तिच्या मनात हाच प्रश्न पडला असेल. मी म्हंटलं “ काय नाय, ती काय करत्याती? उंद्र, घुशी, चिचुंद्री पकडून, ते ईचारायचं होतं.” पण हे लोक काय करत असतील? त्यांना घाण वाटत नसेल का? कारण एवढ्या चाळीमध्ये लोकांच्या संडासचे चेंबर, गटार आणि त्यामधील बिळं/ होल चेक करून उंद्र, घुशी, चिचुंद्री का पकडत असतील? अशी जीवाची घालमेल चालूच होती आणि ते आता कधी परत येतील? आले की विचारेन काय करता? या सर्व विचारांनी मला अस्वस्थ करून टाकले.


           सलग दोन-तीन दिवस गेले आणि मी वाट पाहत होतो ते लोक कधी येतील याची. चौथ्या दिवशी ऑफिस मधील कामाचा त्रास आणि ट्रेनच्या प्रवासाने कंटाळून, घरी ऑफिस मधील मनस्तापाचा विचार करत बसलो असताना, मला ज्या गोष्टीची उत्सुकता लागली होती, त्याचा आवाज कानावर पडला, तो म्हणजे चाळीतील पाठीमागच्या गटारावरील लादया वाजल्या, पण यावेळेस शोधण्याचा नाही तर, त्यावरून चालत जाण्याचा. तसाच मी ताडकन उठून पळत सुटलो मला माझ्या घराच्या पाठीमागे जाईपर्यंत ते लोक निघून दुसर्‍या चाळीत गेले होते. कारण त्यांना आता माझ्या चाळीत नाही तर दुसर्‍या चाळीत शिकार करायची होती असच म्हणावं लागेल. तसाच पळत दुसर्‍या चाळीत गेलो, तेथे पण ते नाही सापडले ते लोक. दोन-तीन चाळीमागे जावून शोधले पण थांगपत्ता नाही लागला. मी धापा टाकत गुढघ्यावर हाथ टेकवून उभा होतो. तेवढ्यात एक मित्राने तिथून जात असताना मला पाहिले आणि त्याने विचारले, “ काय रे, काय करतोस ईकडे ? या अंधारात, ते पण चाळीच्या गटार लाइनजवळ ( जवळ येवून ) का एवढ्या धापा टाकतोयस. काय झालं ?”


मी त्याला उत्तरून “ काही नाही रे, ते बिगारी लोक (धापा टाकून थोडसं थांबून) हा.... हा.....

“काय झालं त्यांचं” असे मित्राने विचारले.

मी बोललो, “उंद्र, घुशी, चिचुंद्री पकडायला येतात ना त्यांना शोधत होतो. लादयांचा आवाज आला आणि...”

तो बोलला, “ जावूदे ना लेका, का त्यांच्या मागं लागतोयस, जगूदे सुखानं त्यांना.”

“तसं न्हाय रेss , त्यांना विचारायचं होतं काय करता हे पकडून?” असे मी बोललो.

तसा तो म्हणाला, “तुला काय करायचय त्याच्यानं? तुला पाहिजे का त्या उंद्र, घुशी आन चिचुंदर्‍या.”

“तू गप... तुला सांगतो नंतर, तू बघितलस का त्यांना?” असे मी विचारले.

तो म्हणाला , “आरं ते साईबालाजी चाळीत होते, जा पळ.”

मी विचारलं “ बरं कुठाय ही चाळ?

त्यावर तो म्हणाला, “ च्या आयला एवढ्या दिवस झालं राहतोयस आणि तुला माहीत न्हाय बोलतोयस.”

 मी म्हंटलं, “ आरं शेळपाटा, बोल लवकर”

तसा तो बोलला “त्या शाळेच्या पाठीमागची चाळ.” हे ऐकताच मी पळत सुटलो आणि त्याला बोललो “तुला नंतर भेटतो.”

       

    तिथे त्यांच्याजवळ पोहचलो आणि पाहिले तर एक मुलगा आणि एक माणूस होता. त्या माणसाच्या एका हातात दहा रुपयेवाली बॅटरी होती आणि तो त्या मुलाला बॅटरीच्या उजेड दाखवत होता. तर दुसर्‍या हातात अगोदरच एक माशाएवढी घुस पकडलेली होती आणि वाकून त्या मुलाला चिचुंद्री लपलेल्याची खूण सांगत होता. मुलगा चेंबरच्या बाजूला असलेल्या बिळामध्ये काठी घुसवून आत-बाहेर, आत-बाहेर करत होता आणि आतमधून चिचुंद्री जशी काठी लागेल तशी चुईss चुईss आवाज करत होती. काही क्षणाने आवाज बंद झाला. त्या मुलाकडे पाहून किळस यावी अशी काही माझी अवस्था झाली होती. कारण तो मुलगा गटारात पोटरी ईतक्या पाण्यात उभा होता त्यात कचरा, घाण पाणी आणि त्या पाण्यावर किडे तरंगत तरंगत त्यांच्या पायावर हळूहळू वर चढत होते. ईकडे त्या माणसाच्या चेहर्‍यावर थोडसं स्मितहास्य आलेलं. कारण शिकार झाली आहे हे त्याच्या लक्षात आलं असावं. नंतर त्या मुलाने त्याचा हाथ तसाच एवढ्या लोकांच्या घरातील घाण सांडपाणी, संडास (विष्ठा) तिथून जात असलेल्या बिळात हाथ घातला आणि तो प्रसंग पाहवेना झाला. एखाद्यावर अशी परिस्थिति यावी ते पण अशा लहान तेरा-चौदा वयातील मुलावर. नंतर ते दोघेही बाहेर आले. त्यांच्या हातात त

्या गटार आणि चेंबर जवळून पकडलेली एक घुस आणि एक चिचुंद्री होती.


मी त्यांना विचारले, “ कुठे राहता तुम्ही?” त्या माणसाने जास्त दारू प्यायली होती. त्याच्या जवळ येण्याने मला कळाले. मुलाने उत्तर दिले, “तलावाजवळ ईटा बनवतात तिकड राहतो.”

मी विचारले, “ शाळेला जातोस का?” त्यानं उत्तर दिलं नाही.

परत मीच विचारलं, “मग काय करतोस?”

तो माणूस म्हणाला, “ ये मेरा पोरगा राजा ,हम उदर ईटा बनाते है, पण ईटा बिक के पेट भरता नही तो इधर उधर हात-पाय मारते है.” असे केविलवाणे बोलला. यावरून कळले की त्याला ना हिंदी ना मराठीत बोलता येत होत. खूप वाईट वाटले ऐकून मुलगा शाळेला जात जावू शकत नाही.

पुढे विचारलं “ ईताना गंदगी, अंधेरे मे, ये सब चुहा पकड के कया करते हो तुमलोग ? ”

राजा “ दादा आम्ही ईटा बनवतो. सगळ्या येळेला पुरे पैशे मिळत नाई , हलुहलू मिलतात आणि पावसाले मे काम बंद आणि काम बंद तर पैशे नाही, एकएक टेम आम्हाला खायला मिलत नाई.”

“मग हे पकडून काय करता?”

वडील “ ये आमी लेकर गये तो ईसका तेल निकालते”

मी “वो कैसे? उसका इस्तेमाल कहा होता है?”

मुलगा “आमी लेकर जाळतो आणि त्यातून तेल निघलेला आणि तो तेल तो हाड, सांधादुखीला चांगला असतो. त्याच्याने फरक पडतो, खूप बेश्ट असते. तेल काढून झाल्यावर उरते ते आमी खातो.

हे ऐकून मला धक्काच बसला.” कायsss, खाता म.. म... म्हणजे काय?”

वडील “आमी घेवून गेला की त्याला चुलीवर जाळतो, त्याचे साल काढुन त्याला पिळून जे निघल ते तेल आणि उरलेला सगळा आमी खातो. बहोत टेम हमको खाने को नही रहेता, तबी हम ये खाकर दिन निकालता है. अबी बारीश मे काम नई रहेता इसलीये ऐसे गटार मे ढुंढना पडता है.”

मी पुन्हा विचारले “हर दिन कितना मिलता है?

वडील “ रोज नाई मिलता एक-दो दिन बाद आज इज चाल मे तो दो दिन बाद दुसरे जगह वो हफ्ते मे ४ -५ मिलता है.”

मी “ तेल बेचता किधर, और कोन बेचता?”

राजा “ आता आमी बारीश मे घरी-घरी जावून बेचतो आणि जेवा ईटा बनवतो त्यावेळेस लोक ढुंढते ढुंढते येतात.” 

वडील “ दादा जानेदो ना, बहोत टेम हो गया.” असे बोलून ते निघून गेले.        

          

    दुसर्‍या दिवशी शनिवार होता, मला सुट्टी होती. मनात विचार आला जाव त्यांना एकदा परत भेटाव . आपल्याला जमेल तेवढी मदत करावी, तसेच त्यांच्याकडून अजून काही माहिती मिळते का? तेल कस काढतात? याची आतुरता होती. मी तसाच घरातून निघालो, जात असताना मधेच वाटेत लोकांची गर्दी जमा झालेली दिसली मी त्याकडे दुर्लक्ष केले कारण माझ लक्ष आणि ओढ दुसरीकडेच होती, तेवढ्यात त्यातील एकजण “साला चोर, चोरी करता है?“,


दुसरी स्त्री “या लोकांना गरीब मनून रात्री चाली मदून फिरू दिलन तर ये लोक, दिवसा चोरी करायला लागलान.” हे ऐकताच मी त्याच्याकडे निघालो, त्याच गर्दीतून कोणीतरी म्हणाला “यो हाय केवडा, आणि चोरी करतो, या लोकांच फिरणंच बंद केल पाहिजे.” गर्दी बाजूला सारून पाहिले तर, खाली राजा पडला होता. लोकांनी त्याला खूप मारले होते, अंगावरचे कपडे फाटलेले, अंगावर आणि गालावर हाथाचे व्रण, गुडघ्यातून रक्त येत होते, हाताच्या मुठीत भाकरीचा तुकडा होता त्या हातावर पाय दिल्यामुळे तो तुकडा मातीमय झाला होता. मी लोकांपासून अडवत “का मारताय त्याला?” 

त्या पैकी एकजण “माझ्या घरात घुसलेला काय करतोय? थांब बोललो तर काहीतरी घेऊन पळत सुटला, कस सुचत? कसले आई-बाप असतात मुलांना चोरी करायला शिकवतात”

मी “थांबा.. चोरी नाही करणार हा, मला माहीत आहे. मी ओळखतो त्याला.“

तेवढ्यात एक जण बोलला “५-६ वर्षे झाले लोक तुला चाळीतले लोक माहीत नाहीत आणि तू सांगतो की, मी याला चांगला ओळखतो.”

मी विचारले “काय चोरले त्याने?” असे म्हणताच अचानक भयाण शांतता दुपारी 12.30 ची वेळ सर्वांची आळी-मिळी गुपचिळी. कोणालाच काही माहीत नाही.

राजा बोलला “दादा भाकरी चोरली” आणि गुडघ्यावर रांगत तो मातीमधील भाकरीचा तुकडा शोधू लागला.

जमलेली गर्दी एकदम डोळे वाटारून पाहू लागली त्याने तुकडा शोधून “हे बग दादा.”

हे ऐकताच सर्व लोक इकडे-तिकडे पसार झाले. त्याचे घर तिथून काही अंतरावरच होते त्यांची छोटीशी झोपडीसारखी घर लाकुड, बारदान आणि पत्रा ने बनवले होते. तेव्हा त्याचे वडील तेल विकण्यासाठी गेले होते. घरी आई आणि बहीण होती. आई तेलाच्या बाटल्या भरत होती. बाजूलाच उंदीर, घुशीच्या जवळ जवळ ८ ते १० शेपूट पडलेल्या होत्या. राजाला बघताच आई खूप भावनिक झाली आणि त्याला त्या अवस्थेत पाहताच झटकन तिच्या डोळ्यातून पाणी आले. मी पूर्ण सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांना काहीच समजत नव्हते. त्यांच्या भाषेमध्ये आणि माझ्या भाषेमध्ये खूप अंतर होते. शेवटी राजाने आईला त्यांच्या भाषेत सर्व संगितले. मी त्याला विचारले “तू भाकरीचा तुकडा का चोरलास? माझ्या घरी येवून मागायची होती. घर माहीत आहे ना माझ तुला?”

तेव्हा त्याने संगितले की, “मी काल तिकडे गटारात उतरलो असताना पायात काहीतरी घुसले. आय मला बोलली की जर भाकरीचा तुकडा दुधात भिजवून बांदला की पायातून पु (घाण) भायेर निघेल आणि दुखायचा नाई मनून मी मागितला तर कोन न्हाय दिलं मग मी...” मी त्याला म्हटले “थांब, मी घेऊन येतो घरून.” असं बोलून मागे फिरलो तेवढ्यात त्याने माझा हाथ पकडला आणि म्हणाला, “दादा हाये माझ्याकड.” मी आश्चर्याने म्हणालो, “कसा, तो तर मातीत गेला ना?” अस म्हणताच त्याने उजवा हाथ डाव्या काखेत घातला आणि डावा हाथ वर करून लपवलेला तो तुकडा काढून आईकडे दिला आणि जगातील सर्वात मोठी अनमोल गोष्ट मिळाल्यासारखा आनंद त्याच्या चेहर्‍यावर दिसत होता. हे पाहताच मी त्याला एक घट्ट मिठी मारली. मला माझे अश्रू अनावर झाले होते. त्याच्या आईने तिथे बाजूलाच पडलेल्या प्लास्टिकच्या पिशवीने तो तुकडा त्याच्या पायाला बांधला आणि मी डोळे पुसत त्याला हसताना पाहून तसाच तेथून निघालो.


           आयुष्यात स्वत:ची परिस्थिती वाईट होती हे अनुभवलं होत, पण आपल्यापेक्षा दुसर्‍याची परिस्तिथी वाईट, दयनीय आणि असहनीय असते हे मला त्या दिवशी कळाले होते. हा प्रसंग जणू काही काळजाला हाथ घालणारा म्हणण्यापेक्षा काळजाला चटका देऊन जाणारा होता.


Rate this content
Log in

More marathi story from Anil Kute