STORYMIRROR

Swati Darekar

Inspirational

3  

Swati Darekar

Inspirational

तोल मनाचा सावरा

तोल मनाचा सावरा

5 mins
319

"माझं माझं करणारे, किती आले आणि गेले

अहंकार रुपी वाळवीने सगळे गिळंकृत केले 

धनदौलत, प्रतिष्ठा सगळे इथेच हो राहिले

 जे प्रेमाने राहिले, तेच स्मृती ठेवून गेले " 

    "खरं तर आपण स्वतःला पृथ्वीवरील सर्वात बुध्दीमान प्राणी म्हणवतो... नव्हे आपण आहोतच, पण खरंच आपण तसे वागतो का?" आपण आपल्या बुद्धीचा वापर फक्त आपल्या स्वार्थासाठी आणि आपल्या गरजा भागविण्यासाठीच करत नाही ना?? " हा प्रश्न तसे पाहायला गेले तर खूप गहण आहे, पण त्याचे उत्तरही तितकेच सोपे होईल ,जेव्हा माणूस माणसाशीच नव्हे तर आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्वांशी आणि ज्यांच्यामुळे आपण आहोत अशा प्रत्येक प्राणिमात्रांशी माणसासारखे वागेल तेव्हाच सगळे नीट होईल. 

   आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपल्या प्रश्नातच असते असे मला वाटते.आपण या पृथ्वीवर माणूस म्हणुन जन्माला आलो आहे हेच ईश्वराने आपल्याला दिलेले अनमोल बक्षिस आहे. माणसाचा जन्म जर एकदाच असेल तर आपण त्याचे सार्थक करायला नको का?? "आपण असे काही जगतो की आपण कायमचे पृथ्वीवर राहणार आहोत." अरे पण आपल्याला मिळालेलं नाव तरी आपलं असतं का? तेही आईवडीलांनी आपल्याला दिलेले असते. आपण हे विसरतो की , "हे शरीर म्हणजे आपल्या आत्मारुपी चैतन्याला मिळालेले एक वस्त्र आहे" जे काही वर्षांनी जीर्ण होईल आणि एक दिवस आपला पृथ्वीवरील प्रवास संपेल. 

   आपण आपल्या आजुबाजूला असलेल्या माणसांना बऱ्याचदा कळत नकळत त्रास देतो. तसेच पशुपक्ष्यांशी तर असे वागतो की आपणच त्यांचे मालक आहोत. का बरं ??" त्यांना बोलता येत नाही म्हणजे त्यांना वेदना होत नाहीत". तेही त्यांना त्रास झाला तर खूप रडत असतील, विव्हळत असतील. "आपल्या सारखेच त्यांना पण दुखणे - खूपणे असेलच की ",आपण साधी पिन जरी टोचली तरी त्याचा बाऊ करतो त्यांना नसेल का हो काही त्रास होत? काही लोक तर एवढे विकृतपणे वागतात की , चलता चलता एखाद्या कुत्र्याला दगड मारतील , "बिचारा कुत्रा एका बाजूला शांत झोपलेला असला तरी त्याला त्रास देतील." लहान मुले सुध्दा मोठ्यांचेच अनुकरण करतात. "अरे ," तूमचा खेळ होतो पण त्यांचा जीव जातो त्याचे काय?" महान भारतीय शास्त्रज्ञ डॉ. जगदीशचंद्र बोस यांनी," वनस्पतींनाही संवेदना असतात" हे सिद्ध केले आहे, पण आपल्या संवेदना कुठे गेल्या?? आपण तर ज्या निसर्गाच्या कुशीत आपला जन्म झाला त्याच्यावरच कुर्‍हाड घातली. एवढेच नाही तर आपण स्वच्छताकर्मी असलेल्या पक्ष्यांची घरटी निर्दयीपणे मोडली. गेल्यावर्षी केरळमध्ये जंगलातील सायलेंट व्हॅलीमधून एक गर्भवती हत्तीण खाण्याच्या शोधात मानवी वस्तीत आली होती. पण माणूसकीला काळीमा फासणाऱ्या काही क्रुर माणसांनी तिला अननसाबरोबर फटाके खाऊ घातले आणि तिच्या तोंडातच फटाक्यांचा स्फोट झाला व त्यामुळे तिचा दुर्दैवी अंत झाला , यातून मानवाने क्रुरपणाची सीमाच गाठली आहे . कुठून येते एवढी विकृत मानसिकता... मानवाने आपल्या करणीनेच निसर्गाचा ऱ्हास केला आहे ,त्याने अक्षरशः सगळे ओरबाडून घेतलंय निसर्गाकडून तेही प्रमाणाच्या बाहेर . स्वतःच्या गरजा भागविण्यासाठी अनमोल ठेवा असलेल्या निसर्गावरच घाव घातला आहे ,आज त्याच्या परिणामाचे पडसाद उमटत आहेत, यातून वेळीच सावरले पाहिजे ,"नाहीतर निसर्ग आपल्याकडून सर्व सूटसमवेत माघारी घेईल."त्यामुळे मानवाला निसर्गरुपी प्रकोपाची खूप मोठी किंमत मोजावी लागेल. 

     

        सोडून सारे हेवेदावे

           तोल मनाचा सावरा

             माणसांनो माणसांशी 

                माणूसकीने वावरा 

     

      माणसाने माणसांशी प्रेमाने वागायला हवे. कारण "प्रेमात जग जिंकण्याची ताकद असते". आपण आपल्या सान्निध्यात असलेल्या व्यक्तींशी असे वागले पाहिजे की, आपल्या असण्याने समोरच्या व्यक्तीला आनंद झाला पाहिजे. बर्‍याच घरातील व्यक्तींनाही शारीरिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले . एका गोष्टीची खंत वाटते की, ज्या व्यक्ती इतरांशी चांगले वागतात. इतरांच्या रागाला, अहंकाराला प्रतिकार करत नाहीत ,अशा व्यक्तींना मुर्खात काढून ,कमजोर समजून त्यांची टिंगल टवाळी केली जाते, चेष्टा करुन त्या व्यक्तींना वेड्यात काढले जाते , पण खरं सत्य हेच असते की , अशा व्यक्ती कमजोर नसतात ,परंतु त्यांना घरात, समाजात एकोपा टिकवून ठेवायचा असतो म्हणून ते प्रत्युत्तर देऊन समोरच्याला दुखवत नाहीत, वाद करत बसत नाहीत. खरंतर दुसर्‍यांना विनाकारण त्रास देणार्‍या व्यक्ती विकृतच स्वभावाच्या असतात . 

   आजकाल माणसाच्या आयुष्यात पैसा इतका महत्त्वाचा झाला आहे की ,"पैसा माणसासाठी आहे की माणूस पैशांसाठी हेच कळत नाही. " मला मान्य आहे की आपल्या गरजा भागविण्यासाठी पैसा महत्त्वाचा आहे , पण इतका की, "सख्खा भाऊ पक्का वैरी व्हावा. "लहानपणी एका ताटातून चिऊकाऊचा घास ज्या भावांनी खाल्ला ते जेव्हा एकमेकांचे तोंडही पाहत नाही, तेव्हा जिच्या उदरातून त्यांनी जन्म घेतला... त्या माऊलीला आणि आयुष्यभर हाडाचं काडं करुन झिजणार्‍या बापाला काय वाटत असेल ? हे फक्त कशासाठी तर संपत्तीसाठी, जमीनजुमल्यासाठी.......जी कधीच आपली नसते." एवढा जगज्जेता सिकंदर खाली हात आला आणि खाली हात गेला हेच परमसत्य आहे ". 

   काही लोकं स्त्रियांना विनाकारण त्रास देतात. कुठे एखादी स्त्री दिसायला बरी वाटली की शिट्टी मारणे, वेडेवाकडे हावभाव करणे हे पुर्णपणे चुकीचे आहे, सगळ्यांना आपल्या मनाप्रमाणे जीवन जगण्याचा अधिकार आहे. कोणीही समोर असलेली.. स्त्री आहे म्हणून मालकी हक्क गाजवू नये.बरेचसे नवरेही स्त्रियांवर नवरेगीरी गाजवतात, हे कितपत योग्य आहे? काही घरात स्त्रिया सुध्दा इतरांशी चुकीचे वागतात. उदा. सासू ने सुनेचा छळ करणे, जावा जावांमध्ये कटकारस्थाने, हेवेदावे करणे, काही ठिकाणी सुना सुद्धा सासू सासऱ्यांना त्रास देतात या सगळ्यांमुळे एकत्र कुटुंबपद्धती लयाला जात आहे. काही लोकं शेजार्‍यापाजार्‍यांशीही धड नीट वागत नाहीत , तसेच समाजात वावरतानाही स्वतःचेच खरे करतात. त्यामुळे इतरांना त्रासच होतो ना? काही माणसं पैसा मिळवण्यासाठी वाईट मार्ग पकडतात, आपल्या जिवाभावाची रक्ताची नाती सुध्दा त्यांना पैशापुढे फिकी वाटतात .धनदौलत, पदप्रतिष्ठा मिळवण्यासाठी अनेकजन वाममार्ग पकडतात, अक्षरशः खून पडतात एकमेकांचे, काय मिळते हो यातून ??... पश्चात्तापाशिवाय काहीच हाती लागत नाही .याच्या शेवटी....." पश्चात्ताप आणि फक्त पश्चात्ताप"........ 

    यात आणखी एक भर पडली आहे, ती म्हणजे माणसाचा अहंकार. खरं पाहायला गेलं तर "माणसाचे दुःख ही माणसाची चिंता नाही, तर दुसर्‍याचे सुख ही माणसाची चिंता असते."आपला अहंकारच दुसर्‍याला आणि आपल्याला दुःख देतो."माणसाला इतरांशी स्वतःची तुलना करण्याची सवय लागली आहे.. " आणि यातून त्याने आपल्याबरोबर लहान मुलांनासुध्दा तुलनेच्या जाळ्यात ओढले आहे .त्यामुळे सतत वर्गामध्ये, खेळात ...पहिल्या तीन नंबरमध्ये असेल तरच आपण हूशार अशी व्याख्याच जणू पालकांनी मुलांमध्ये तयार केली आहे "त्यामुळे मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढला आहे , " त्यांची मानसिक तोल ढासळायला लागला आहे. आपण आपला मुलगा पास झाला, याचा आनंद व्यक्त करायचा सोडून शेजारच्या मुलाला ९०% मार्क्स पडले याचेच जास्त दुःख करतो . यातून मुलांनाही शारीरिक, मानसिक त्रास होतोच ना?? "प्रत्येकाच्या क्षमता वेगवेगळ्या असतात" . कोणी खेळात तरबेज असतो तर कोणी नृत्यात ,चित्रकलेत तरबेज असतो .

    सांगायचे तात्पर्य हेच की , आपल्यामुळे कोणाला शारीरिक, मानसिक ,सामाजिक त्रास होईल असे वर्तन करुच नये. आपल्या मनाचा तोल ढळू न देता , सर्वांशी गुण्यागोविंदाने वागून जगासमोर एक चांगला आदर्श ठेवायला हवा , "शेवटी आपण सर्वजण एकाच प्रभूची लेकरे आहोत ना ??


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational