देवाचे दुसरे रुप आई
देवाचे दुसरे रुप आई
"तूच दुर्गा, तूच लक्ष्मी
आहे तू गुणवान
तुझ्या पोटी जन्म घेतला
आहे मी भाग्यवान"
आई म्हणजे आत्मा रुपी ईश्वर. ईश्वराच्या आधी ती पूजनीय असते. परमेश्वर प्रत्येकाची काळजी घेण्यासाठी स्वतः येऊ शकत नाही म्हणून त्याने आईची निर्मिती केली. ती नऊ महिने बाळाला पोटात वाढवते म्हणून तर तिची आणि बाळाची नाळ सतत जोडलेली राहते.बाळ जेव्हा पोटात असते तेव्हापासून आई त्याला ओळखायला लागते,बाळावर गर्भसंस्कार व्हावेत म्हणून भगवद्गीतेसारखे पविञ ग्रंथ वाचते, इतरांपेक्षा नऊ महिने जास्तच ती बाळाला ओळखते.असे म्हणतात की बाळाला जन्म देताना एक स्त्री ज्या वेदना सहन करते त्या वेदना पुरुष कधीच सहन करु शकत नाही,प्रसुतीच्या काळात तिच्या शरीरातल्या कितीतरी नसा तुटतात पण गोंडस बाळाला कुशीत पाहिल्यावर ती या सर्व वेदना विसरुन जाते .आपले अमृतासमान दुध ती बाळाला पाजते. मूल लहान असताना ती रात्र,रात्र जागते.बाळाला शांत झोप लागावी म्हणून अंगाई गीत गात थोपटून झोपवते.बाळाचे स्नायू बळकट व्हावेत म्हणून बाळाला मालिश करुन अंघोळ घालते .मूल मोठे होईपर्यंत त्याच्या खाण्यापिण्याची काळजी घेते,बाळ निरोगी राहावे म्हणून पौष्टिक आहार खायला घालते, स्वतः माञ वेळप्रसंगी शिळेपाके खाते , कधीकधी उपाशी राहावे लागले तरी तक्रार करत नाही बाळाला काय हवे काय नको ते तिला बरोबर कळते.जास्त मुले असली तरी सर्वांना सारखेच प्रेम देण्याची ताकद फक्त आईमध्ये असते. तिचे प्रेम तसूभरही कमी होत नाही. बाळाचा पहिला गुरु आईच असते, तीच असते जी बाळाला चालण्या बोलण्यापासून ते पाटीवर पहिले अक्षर गिरवायला शिकवते. शुभंकरोती म्हणायला शिकवते.स्वतः सतत समईप्रमाणे जळत राहते आणि सगळ्यांना प्रकाश देते,सतत समर्पनाची भूमिका असते तिची.त्यामुळेच तिची महती खूप आहे.आई हे नावच इतके पवित्र आहे की देवांनाही तिच्या ममतेचा मोह टाळता आला नाही आणि ब्रम्हा ,विष्णू आणि महेश यांनी दत्तरुपाने सती अनुसयेच्या पोटी जन्म घेतला .पैसे देऊन जग खरेदी करता येईल पण आईचे प्रेम नाही खरेदी करता येत ,कारण आई ही आईच असते म्हणूनच म्हटले जाते *"स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी".* ती कुठल्याही परिस्थितीत आपल्या मुलांच्या बाजूने उभी राहते.आपली मूले हेच तिचे विश्व असते.आपल्या मुलांच्या असंख्य चुका ती पोटात घेते.आपल्या मुलांवर संस्कार करताना कधी ती शामची आई बनते, कधी
शिवबाची जिजाऊ बनते तर कधी झाशीची राणी लक्ष्मीबाई.
माझी आई ही अशीच आहे.माझ्यासाठी ती प्रत्यक्ष परमेश्वरच आहे.ती लक्ष्मी, सरस्वती आणि वेळप्रसंगी दुर्गा आहे . माझ्यासाठी ती जीवनदायिनी आहे एखाद्या नदीसारखी,जी सतत अविरत निःस्वार्थ भावनेने कार्य करत असते . तिने मला लहान असताना अनेकदा मरणाच्या दाढेतून बाहेर आणले आहे.मी लहान असताना सतत आजारी पडायचे एकदा तर मला पाच मिनीटे उशीरा दवाखान्यात नेले असते तर आज मी या जगातच नसते माझ्या वडीलांचेही माझ्यावर खूप प्रेम आहे म्हणूनच त्यांचा रक्तगट माझ्याशी जुळल्याने डॉक्टरांनी रक्त द्यायला सांगितल्यावर ते लगेच तयार झाले पण वडील तब्येतीने किरकोळ होते त्यामुळे बाकीचे नातेवाईक म्हणाले "जाऊ दे मेली तर मेली कार्टीच आहे, ती मेली तर दुसरी होईल" पण आईने गोंधळ घातल्याने मला वेळेवर उपचार मिळाले,वडिलांनाही क्षणाचाही विलंब न लावता लगेच रक्त दिले आणि माझा जीव वाचला. माझ्या आईला ती लहान असताना आईवडीलांचे प्रेम कधी मिळाले नाही तिने बोरे ,चिंचा,आंबे विकून शिक्षण घेतले, तिच्या माहेरच्या लोकांचा राग सहन केला, चटणी मिरची खाऊन दिवस काढले तिला कधी केसांना तेल मिळाले नाही की कधी कपड्यांना नीट साबन मिळाला नाही, गुरांना वळत तिने अभ्यास केला.दहावीला फर्स्ट क्लास मध्ये आली लग्नानंतर बारावीची परीक्षा दिली ती अभ्यासात आणि पोहण्यात खूप हुशार आहे. माझे वडीलही स्वभावाने शांत, प्रेमळ आणि सुशिक्षित आहेत, आम्ही लहान असताना वडील मुंबईतील मिलची नोकरी सोडून गावी आल्यावर शेती करु लागले.
माझ्या आईला तिच्या सासरी पण खूप कष्ट करावे लागले,आम्ही एकापाठोपाठ एक तीन मुली आणि एक मुलगा त्यात मी सर्वात थोरली.आम्हा चौघांना सांभाळताना तिची दमछाक होई परंतु ती सर्व व्यवस्थित करायची, कधी आजारी पडली तर त्याचा तिने बाऊ केला नाही .आम्हाला म्हणायची एक तीळ सात जणांनी खाल्ला होता तुम्हीही असेच एकजुटीने राहायला हवे. माझी आई अंगणवाडी शिक्षिका आहे तिने १००/- रु पगार असल्यापासून नोकरी केली, सोबत पोस्टाची एजन्सी केली.गाडी नव्हती तेव्हा सायकलवर तर कधी पायी प्रवास केला .ती म्हणायची की कष्ट करायला काय लाजायचेय? शिक्षिका असल्याने तिने आमच्या शिक्षणाला जास्त महत्त्व दिले.पदरात शिक्षण हवे असे ती म्हणायची,कला कधी वाया जात नाही असेही तिचे मत होते. मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करता तिने सगळ्यांना उच्चशिक्षण दिले.आम्ही सर्वजण तिच्या मार्गदर्शनामुळे अभ्यासात सतत पुढे असायचो. मी तिच्या प्रेरणेमुळे विविध भाषणांमध्ये भाग घ्यायचे ,पुस्तकातल्या सर्व कविता माझ्या तोंडपाठ असायच्या,डिक्शनरीतले सगळे शब्द ,पाढे मला पाठ असायचे ..शिक्षकांनी सांगो अगर न सांगो माझा हा अवांतर अभ्यास चालू असायचा ,ती आम्हाला प्रेरणादायी गोष्टी सांगायची, तिचे अनुभव सांगायची.माझी शाळा घरापासून साडेतीन किलोमीटर अंतरावर होती तेव्हा आमच्या घरा जवळ एक म्हातारे आजोबा राहायचे ते आंधळे असल्याने एकटे गावात जाऊ शकत नव्हते पण त्यांना आवडायचे मोकळे फिरायला ,गावातल्या मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घ्यायला पण त्यांच्या घरातील असे कोणी नव्हते जे त्यांना घेऊन जाईल, म्हणून मी त्यांना शाळेत जाताना हाताला धरुन घेऊन जायचे त्यांना कधीकधी डब्बा खायला द्यायचे ,वडीलांनी खाऊसाठी दिलेले पैसे मी त्यांना द्यायचे ते मला भरभरून आशीर्वाद द्यायचे पण माझ्या जवळ राहणार्या मुलींना हे आवडत नव्हते त्या म्हणायच्या की ते बाबा किती कळकटलेले आहेत तु कशाला त्यांना हाताला धरुन नेतेस आणि त्यामुळे त्या मुलींनी माझ्याशी बोलनेच बंद केले होते मी जेव्हा ही गोष्ट मी माझ्या आईला सांगितली तेव्हा ती म्हणाली की तु जे करतेस ते बरोबर आहे त्यामुळे त्या मुलींकडे दुर्लक्ष कर दुसर्यांना त्यांच्या अडचणीत मदत करणे हे देवाचे काम असते. आई म्हणायची की कोणतेही काम हे दुसर्यांना दाखवण्यासाठी करायचे नाही .सतत निस्वार्थीपणे कार्य करायचे ,आपल्या चांगल्या कामाची दखल देव नक्की घेतो, *कुठलेही काम मोठे अथवा लहान हे महत्वाचे नाही आपले विचार महान असायला हवेत*. आज आम्ही तिघी बहिणी शिक्षिका आहोत आणि भाऊ नामांकित बँकेत नोकरी करतो.जो तो ज्याच्या त्याच्या कामात उत्तम आहे आणि आईच्या संस्कारांमुळे आम्ही भावंडे सतत एकजूटीने राहतो परंतु आम्हाला लहानाचे मोठे करताना ,तिला मात्र कधी स्वतःची हौसमौस करता आली नाही .माझी मुले हाच माझा दागिना आहे असेच ती म्हणायची आणि आनंदाने हसायची, त्यासाठी तिची होणारी फरफट मी अगदी जवळून पाहिली. अर्थातच वडिलांचा आधार होताच पण त्यांचा ओढा निःस्वार्थीपणे समाजसेवा करण्याकडे जास्त होता, त्यामुळे घरात पैशाची सतत ताणाताण असायची. माझी आई माझ्या वडीलांना देवमाणूस मानते आणि तसे ते आहेतही. ते उत्तम मातृपितृ भक्त आहेत,ज्याचे श्रेय त्याला ती देऊन टाकणे ही तिची खुबीच आहे.माझे आईवडील भलेही पैशाने श्रीमंत नसतील पण ते मनाने खूप श्रीमंत आहेत.दोघांच्याही गळ्यात तुळशीची माळ आहे. ते एकमेकांना समजून घेतात.
या जगात सर्वाधिक आदर्श मी आईचा घेतला.कारण मी सतत तिचे अनुकरण करायचे ,साधी राहणी उच्च विचारांची आहे माझी आई. ती अतिशय शिस्तप्रिय, मायाळू आणि प्रसंगी कडक,वक्तशीर,कष्टाळू, हजरजबाबी,स्वयंशिस्त असलेली,निडर, कर्तव्यनिष्ठ बाणेदार व्यक्तिमत्व असलेली,जिद्द असलेली ,मनमिळाऊ आणि समाजनिष्ठ अशी आहे. तिचे सर्व गुण माझ्यात आणि माझ्याकडून माझ्या मुलांमध्ये उतरले. तिने लहानपणीच माझ्यावर चांगले संस्कार केले. शाळेत जाताना मी नेहमी आईवडिल ,आजी-आजोबा यांच्या पाया पडायचे, तिने आम्हाला नेहमी खरे बोलण्यास शिकवले. थोरा मोठ्यांचा आदर करायला शिकवले. तिने शिकवलेल्या प्रत्येक गोष्टीचा मला माझ्या जीवनात खूप उपयोग झाला .माझ्या प्रत्येक अडचणीत ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. ती म्हणते की जीवनात काही बनता आले नाही तरी चालेल पण उत्तम माणूस बना. आपल्या जगण्याचे सार्थक करा.ती आजही नित्यनेमाने पहाटे उठते, व्यायाम करते,आजी अंथरुणाला खिळलेली असल्याने तिची सेवा करते,शाळेत जाते, पोस्टाचे पैसे गोळा करून पोस्टात नेऊन भरते ,तिचा दिनक्रम ठरलेला असतो,तिला मुक्या प्राण्यांची दया येते ती त्यांना खाऊ घालते,तिला झाडे लावायला खूप आवडतात , ती त्यांची पोटच्या मुलांप्रमाणे काळजी घेते .त्यांनाही वेदना होतात हे ती जाणते.
माझी आई कुठल्याही मोठ्या देवस्थानाला गेली नाही ,कुठलाही ग्रंथ तिला वाचायला वेळ मिळाला नाही पण ती स्वतःच एक अध्यात्म आहे. तिच्याकडे अनुभवांची खाणच आहे. माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तिच्याकडे असते, म्हणूनच आजही तिच माझा उत्तम गुरु आणि आदर्श आहे. आज माझे सासर आणि माहेर दोन्ही घरे उजळून निघाली ती केवळ तिच्यामुळेच, अजूनही ती एक भक्कम आधारवड आहे , आम्हां सगळ्यांसाठी तिच्या संस्काररुपी मूळ्या खोलवर रुजल्यात आमच्यामध्ये, आम्ही भावंडे तिच्या फांद्या आणि पाने आहोत आणि आमचा हा आईरुपी वडेश बहरलाय आता गोड नातवंडानी .....पण तीचे काम अजूनही अविरत चालू आहे कारण ती थांबणारांमधील नाही, स्वतः ञास सहन करुन दुसर्यांसाठी कसे जगावे हे तिने तिच्या कृतीतून दाखवून दिले. म्हणूनच मला म्हणावेसे वाटते....
"आई माझा आधार
अथांग मायेचा सागर
कशी होऊ उतराई
थोर तिचे उपकार"
माझ्या कातड्याचे जोडे करुन जरी तिला घातले तरी तिचे माझ्या वरचे ऋण फिटणार नाही अशी आहे माझी आई. शेवटी एकच म्हणेल की जन्मोजन्मी याच आईच्या उदरात माझा जन्म व्हावा. तिचा सहवास मला नेहमी लाभावा, अशा या थोर माऊलीला माझा शतशः प्रणाम.....
