तो
तो
आज मी ठरवले त्याला बरोबर घेऊन जायचे नाही. इतके दिवस माझ्या कडे राहुन तो सुखावला होता आणि मी सुद्धा त्याच्या फरमैशी पुऱ्या करता करता कधी आमच्या दुनियेत विरले हे कळलेच नाही. पण आज मात्र ठरवले , अता बस!प्रत्येक गोष्टीची मर्यादा असते. म्हणुन त्याला घरीच सोडुन,पटकन तयार होऊन ऑफिस करता बाहेर पडले.
आज खूप हलकं वाटत होते.पण एकदम एकटेपणा जाणवला. त्याचं ते रस्त्यात बंडखोर वागणं,ऑफिस मध्ये उच्छाद, भांडणं, सर्व काही मागे टाकून आज मी एकटीच बाहेर पडले होते. बसमध्ये चढले आणि एकच जागा रिकामी दिसल्यावर चटकन जाऊन बसले.पुढच्या स्टॉप वर एक गर्भवती स्त्री चढली. एरव्ही' मीच का जागा द्यु?'म्हणणारी मी , तीला लगेच उठून जागा दिली.
ऑफिसमध्ये चपराशी मुकुंदवर गेल्या गेल्या ऑर्डर फर्मावणारी मी, आज स्वतः जाऊन चहाचा कप घेऊन आले. काम करताना आठवले ,माझी मैत्रीण स्नेहा ,किती दिवस झाले बोललो नव्हतो दोघी!मागे ती काहीतरी वाकडे बोलली होती,आणि ' आपणच का नेहमी बोलायचं' म्हणून चिडून बसले होते.आज ऑफिस नंतर तीला फोन करायचा ठरवलं.फोन वर खूप वेळ गप्पा मारल्या आणि रुसवे फुगवे नहीशे झाले.
घराशी पोचल्यावर कळले लिफ्ट बंद आहे. त्यात नेने काकूच्या हातातल्या पिशव्या बघून लगेच आठव्या मजल्यावर त्यांना घेऊन जायला मदत केली. जेव्हा माझ्या दारासमोर आले, तर एक हल्क हास्य चेहेऱ्यावर पसरलं.आज खूप छान वाटत होते.सर्व चेहरे हसरे आढळत होते!तेवढ्यात आठवले आज 'तो' माझ्या बरोबर नव्हता! आता दार उघडलं कि तो रूसलेला असेल, चिडेल, हट्ट करेल आणि मी पुन्हा उद्यापासून त्याला बरोबर घेऊन जाऊ लागेन.असा विचार करत दार उघडलं आणि बघते तर काय,तो कुठेही नव्हता!सगळ्या कानाकोपऱ्यात शोधला पण कुठे ही सापडला नाही! पहिल्यांदा खुशीची लहर धावली मनात, त्याच्या न असण्यानी! 'तो' कंटाळून निघून गेला होता कायमचा!
'तो' म्हणजे माझा 'अहंकार'!
