ते दोघे उडत राहिले !!!
ते दोघे उडत राहिले !!!


नुकतेच पंख फुटले होते तिला, घेत होती आस्वाद या नव्या जगाचा, चिऊ चिऊ करत नाजुकशी ती चिमणी आता अनुभवत होती दुनिया सारी. उंच उंच उडणं, नवीन नवीन झाडांवर डोलणं, दुसऱ्या चिमण्यांशी मैत्री करणं याची तिला होती आवड. स्वावलंबी आणि चिकाटी अशी होती तिची ओळख.
अशीच एकदा उडता उडता झाली तिची भेट एका चिमण्याशी. चिमणा होता देखणा आणि रुबाबदार आणि त्याचबरोबर हुशारही तितकाच. दोघांमध्ये झाली मस्त मैत्री. आता चिमणी पाहत होती जग चिमण्याबरॊबर, रोज त्याच्या संग उडणं, त्याच्याबरोबर नवनवीन जागा शोधणं आणि असंच करता करता मैत्री बदलली प्रेमामध्ये. त्या दोघांनी छोटंसं आपलं घरटं बांधायचं ठरवलं. चिमणी होती खूप खुश, नेहमीच चिमण्याची साथ देईल असा केला तिने ध्यास. चिमणा मात्र होता कशाच्या तरी शोधात, नेहमीच म्हणायचा मला अजून उंच उडायचं आहे आणि वेड्या चिमणीला त्यावर खूप विश्वास.
एकदा चिमणा उंच उडायला लागला, नेहमीपेक्षा खूप उंच, चिमणी ते पाहून झाली एकदम चकित, तिचा आनंद होता एकदम टोकाचा. ती एकटक आपल्या घरट्यातून त्याच्या उंच उडण्याकडे पाहत होती. जे तिला जमलं नाही ते चिमण्याला जमलं म्हणून आनंदाश्रू डोळ्यातून टपकू लागले. पाहता पाहता तो चिमणा तिला अदृष्य दिसू लागला. आता मात्र चिमणी घाबरली आणि चिऊ चिऊ चिमण्याला हाक मारू लागली. पण चिमणा काही थांबला नाही, तो उडत उडत तिच्यापासून दूर गेला. चिमणीला काय करू सुचेना, तिने खूप दिवस वाट पाहिली पण तो काय परतला नाही.
आता चिमणीने ठरवलं की आपण उंच उडून चिमण्याला शोधायचं आणि तीसुद्धा एक दिवस उंच उडायला लागली आणि चिमण्याच्या शोधात निघाली. शेवटी ती वेळ आली आणि तिला चिमणा दिसला. चिमण्यानं आपलं स्वतःचं एक घरटं बांधलं होतं आणि खूप मजेत तो राहत होता. स्वतःचं सुंदर त्याने जग बांधलं होतं.
या दोघांमध्ये चुकलं कोणाचं नाही, चिमणी चिमण्याच्या प्रेमापोटी त्याची वाट बघत राहिली आणि चिमणा स्वतःवरच्या प्रेमासाठी तिच्यापासून दूर उडत राहिला.
प्रेम दोघांनीही केलं पण पात्र वेगळी होती.
यातून एक गोष्ट तर चिमण्यानं चिमणीला शिकवली की उंच उडायचं ते स्वतःसाठी आणि चिमणीने चिमण्याला शिकवली की उंच उडायचं ते आपल्या जिवलगाबरोबर!!!