स्वर गंगेच्या काठावरती
स्वर गंगेच्या काठावरती
प्रभातीची वेळ, पाखरांची किलबिल,धुक्यातून लाजतच हळूच डोकावणारा सूर्य,मंद शीतल वऱ्याची झुळुक, त्याबरोबर तरंगणारे राग भटियारचे शांत स्वर,वातावरण आल्हाददायकच असायला हवे होते पण बंदिश आळवणाऱ्या स्वरात कारुण्य भरून होते. अजराचा रोजचा रियाज सुरु झाला होता. लियाकत तिच्या समोर बसून तन्मयतेने ऐकत होता. त्या हवेलीच्या कानाकोपऱ्यात "आयो प्रभात नव युग आयो" ह्या बंदिशचे नाद आंदोलित होऊन विरत विरत बाहेर ही पसरत होते. अजरा गेल्या दहा वर्षा पासून नित्य नियमाने रियाज करायची आणि आठवणींच्या दुनियेत फिरुन यायची.आठवणी तिच्या अब्बूच्या,आठवणी अमजदच्या, आठवणी त्या काळरात्रीच्या आणि आठवणी अमजद ह्या हवेलीत आला त्या दिवशीच्या. उस्ताद फैय्याज खां हे किराणा घराण्याचे नामवंत गायक. त्यांच्या मुरऱ्या, फिरकीच्या ताना,स्वरांवरचे प्रभुत्व,हे सर्व खयाल गायकीचे वैशिष्ट्य,त्यांना एक उत्कृष्ट खयाल गायक ह्यांच्या रांगेत प्रथम स्थानी बसवत होते. एक वेगळाच मान आणि दरारा, गायन क्षेत्रात त्यांनी मिळवला होता.अर्थातच त्यामागे त्यांची वर्षानुवर्षांची अथक तपस्या होती. फैय्याज खां जितके चांगले गायक होते, तितकेच लहरी उस्ताद होते. आपल्या शागिर्दांना ते चांगलेच धारेवर धरत. त्यांची लहर कधी आणि कशी फिरेल ते सांगणे कठिण. अमजद हा एक शागिर्द म्हणून हवेलीत आला,तेंव्हा त्याच्या आवाजातील भारीपणा, गांभीर्य, स्वरांची जाण आणि गायकीचे खाच खळगे समजूण घेण्या विषयीचे कौतुहल ह्या गुणांमुळे तो लवकरच खांसाहेबांचा आवडता शागिर्द झाला होता. ज्यादिवशी तो ह्या हवेलीत दाखल झाला त्यादिवशी,त्यावेळी, अजरा बागेत फुलं तोडत होती, आणि एक फांदी वाकवण्यासाठी परत परत उड्या मारत होती. गोरीपान,नाजुक लांबलचक शेपटा असलेली अजरा, लाल चुटुक कपड्यां मधे लालपरीच भासत होती. अमजद भान विसरून एक टक तिच्या कडे बघतच राहिला. अजरा फांदी धरता धरता धपकन् खाली पडली आणि खळखळून हसू लागली. तिची हसताना, एकाच गालाला पडणारी खळी तर अमजद च्या मना वर वार करून गेली. हसता हसता अजराचे लक्ष अमजद कडे गेले आणि ती निरागस पणे म्हणाली "अरे ! सिर्फ देखते रहेंगे या उठाएंगे भी?" असं म्हणत तिने हात वर केला. अमजद ने पुढे वाढून तिला हात दिला आणि मन ही.
अमजदची गाण्यातील प्रगती उत्तरोत्तर यशाच्या नभाला गवसणी घालण्याच्या तयारीत होती. त्याच बरोबर प्रेम हिंदोळ्या वर ही तो आणि अजरा झुलत होते. अजरा ही उत्तम गात होती. सगळे शागिर्द रियाजसाठी खांसाहेबां भोवती बसायचे. एकेका कडून दमछाक होईपर्यंत ते रियाज करवून घेत. जराशी ही चूक ते सहन करत नसत. षड्ज ते तार सप्तकातल्या निषाद पर्यंत आवाज लागलाच पाहिजे, असा त्यांचा आग्रह असायचा. नाजुक अजरा रियाज करताना थकुन लालबुंद व्हायची,घामाने थबथबून जायची. पण खांसाहेब तिला सवलत देत नसत. अमजद ते बघून दुख्खी व्हायचा पण त्याच्या हातात काहीच नसायचे. हळूहळू अजरा आणि अमजद जवळ येऊ लागले. हे जेंव्हा खांसाहेबांच्या लक्षात आले तेंव्हा ते भलतेच बिथरले. " नाशुक्रे! बेगैरत! वाह क्या सिला दिया? मेरी नजरों से दूर हो जा. दफा हो जा इस हवेली से" म्हणत ते अमजद च्या अंगावर धावून गेले. पण अजराने " अब्बू! मैं भी तो अमजद को चाहती हूं तो क्या मैं भी दफा हो जाऊं?" असं लडिवाळ पणे विचारताच. खांसाहेबां मधले अब्बू विरघळले आणि दोघांचा निकाह झाला. अमजद ला हवेलीत येऊन पाच वर्ष झाली होती. तो खांसाहेबां बरोबर महफिलीत गायला लागला होता. खांसाहेब ही त्याला दाद देत असत. त्यांचा लाडका शागिर्द, त्याचा आवडता राग केदार म्हणताना जेंव्हा षड्ज वरुन शुद्ध मध्यम आणि तीव्र माध्यमात जायचा तेंव्हा त्याची ती मींड प्रत्येक वेळेस त्यांना नवीनच वाटायची आणि नकळत त्यांच्या तोंडून " वाह" निघायचे.
एकदा खांसाहेब बाहेर गावी गाण्या साठी गेले .अमजद ची तब्येत बरी नसल्याने तो हवेलीतच राहिला. त्या रात्री खांसाहेब परत आले ते अमजद ला शिव्या देतच. " अरे! एहसान फ़रामोश! किसकी इज़ाजत से तूने फिल्म में एक गझ़ल गाने का इरादा जताया. तू अभी अपना सामान उठा, और दफा हो. खबरदार जो आज के बाद मेरी हवेली में कदम रख्खा तो. कसम है तुझे जो तूने किसी महफिल में या फिल्म में गाना गाया तो." अजरा,अमजद आणि इतर कोणाला काही कळेचना ते काय म्हणतायत ते. सगळे स्तब्ध उभे होते. ते परत ओरडले. " अजरा! तू आपल्या शौहर ला हवेलीतून बाहेर जायला सांग. आणि त्याच्या कडून वचन घे तो ह्या पुढे कुठे ही गाणार नाही.आज से अमजद मेरा शागिर्द नहीं." अजराने काय झाले ते जाणून घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला, रडून झालं ,समजवून झालं पण ते जे आपल्या खोलीचे दार लावून बसले ते बसले. " अब्बू ! मी आई होणार ते तरी ध्यानात घ्या" पण खांसाहेबांच मन दगड झालं होतं. शेवटी आपण कोणत्या फिल्म मधे गाणार? हा काय प्रकार आहे हे न समजताच,आणि आपण काय अपराध केला हे न कळताच अमजद हवेली बाहेर पडला. अजराने त्याच्या बरोबर जाण्याचा हट्ट केला, पण आतून अब्बूचा आवाज " अजरा! गर तू उसके साथ गई तो मैं जान दे दूंगा." आणि अमजदचे समजावून सांगणे कि "अब्बूंचा राग शांत झाला कि मी परत येतो." त्यामुळे ती हवेलीतच राहिली. पण त्यानंतर अमजद हवेलीत येऊच शकला नाही. तो कुठे गेला ते ही कळले नाही. जवळपास दोन वर्षांचा काळ गेला. खांसाहेबांनी गाणं शिकवणं बंद केलं. आता अजरा, खांसाहेब आणि अजराचा मुलगा लियाकत हेच त्या हवेलीत रहात. काम करायला दोन माणसं होती. त्यातच एक दिवस फिल्म जगतातील नामवंत संगीत दिग्दर्शक सियाशरण, खांसाहेबांना भेटायला म्हणून त्यांच्या हवेलीत आले. इथल्या तिथल्या गोष्टी झाल्या नंतर, सियाशरणजींनी विचारलं. " अमजद दिखाई नहीं दे रहा." " उस बैगैरत का तो आप नाम ही मत लीजिए. मेरी इज़ाजत के बिना वो आपकी फिल्म में गाने को तैयार हुआ, इसलिए मैंने उसे उसी रात हवेली से बाहर निकाल दिया." " अरे! बापरे .खां साहेब समजण्यात काही तरी गल्लत झाली आहे. त्याच माझं काहीच बोलणं झालं नव्हतं. मी आपल्या समोर फक्त प्रस्ताव ठेवला होता.अमजद ला ह्या बाबतीत काहीच माहीत नव्हतं." हे ऐकताच खांसाहेब आ वासून सियाशरणजीं कडे बघत राहिले.
सियाशरण कपाळाला हात लावत परत म्हणाले. " मी पण जरा व्यस्त असल्याने इतके दिवस आपल्याला भेटून पुढची योजना सांगू शकलो नाही.आणि हा प्रकार होऊन बसला." सियाशरणजी पुढे काय बोलले, ते कधी निघून गेले ते खांसाहेबांना कळलेच नाही.कारण ते तिथे असून ही नसल्या सारखे होते. अजराने त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. खांसाहेब पुढील आठ दिवस बिना बोलता बसून राहायचे. थकून शेवटी अजरान एक उपाय करण्याचं ठरवलं. आणि त्याप्रमाणे छोट्या लियाकतने एक दिवस त्यांना विचारलं. "दादू जान ! मेरे अब्बू कब आएंगे?" आणि झालं. खांसाहेब ढसढसून रडू लागले. " मैं तेरा गुनहगार हूं. मुझे माफ़ कर दे." म्हणत त्याला आपल्या मांडीत घेऊन बसले. "आजरा! मैं तेरा भी गुनहगार हूं. तू मुझे जो सजा देगी वो मुझे मंजूर है.पर मुझे माफ कर दे." आणि त्यानंतर अमजदचा शोध सुरु झाला. पण तो कुठे गेला हे काही केल्या कळेना. त्या गोष्टीला ही दहा वर्ष झाली होती. लियाकत मोठा झाला होता. खांसाहेब शरीरा पेक्षा मनानेच जास्त म्हातारे झाले होते. अजरा रोज रियाज करायची. पण खांसाहेब तिला गाण्या बाबत काहीच नाही सांगायचे. पण हो त्यांनी अजराला राग केदार कधीच म्हणू दिला नाही. आज ही अजरा रियाज करता करता ह्या सगळ्या आठवणीतून भूतकाळात जाऊन आली . रियाज संपवून तिनं तंबोरा जागेवर ठेवला. डोकं टेकलं ( हो ती रोज तंबोऱ्यावर डोकं टेकायची) आणि बाहेरुन "खांसाहेब! अजरा! लियाकत!" अशा हाका ऐकू आल्या. अजरा झपाझप पावलं टाकत बाहेर आली आणि आपल्या मामूजान बरोबर अमजद ला पाहून नुसतीच उभी राहिली.आतून खांसाहेब म्हणाले. " कौन है? आजरा! कौन आया है?" " मैं हूं नईम. जरा बाहर आकर देखिए तो मेरे साथ कौन आया है?" खांसाहेब काठी टेकत बाहेर आले आणि अमजद ला बघताच अंगणातल्या पलंगावर टेकले. कोणालाच काय बोलावं सुचत नव्हतं.तितक्यात लियाकत म्हणाला. " अम्मी ये कौन हैं?" " ये ही तेरे अब्बू हैं, लियाकत. तू पूंछ रहा था ना. देख तेरे अब्बू आ गए. अब मैं बेखौफ़ खुदा के पास जा सकता हूं." थोड्यावेळ थांबून ते म्हणाले. " अमजद ! मैंने एकही बार में तुझसे जो कहा उसपर तूने अमल किया.पर गलत तो मैं था. अब मैं माफी किस मुंह से मांगू.अब तू मेरी जगह ले, और इस संगीत के घराने का नाम रौशन कर." "पण उस्तादजी ! तुम्ही मला जी कसम दिली, जे वचन घेतलं ते ही संपवा बरं." " हां ! हां ! उसकी तो याद भी ना दिलवा अमजद." म्हणत आपल्या प्रिय शागिर्द ची त्यांनी गळा भेट केली.
