स्वप्ने
स्वप्ने
दोन खडकांच्या मधली ती जागा शेकोटी पेटवून बसायला उत्तमच होती. आम्ही दहा एक मित्र आरामात पसरून बसू, इतकी. खडक वाऱ्याला अडवत असल्यामुळे आग पसरू शकत नाही. आम्हाला हवी तेवढीच राहते. खडकांनी पूर्व, दक्षिण आणि उत्तर दिशा व्यापून पश्चिमेला समुद्राचे दृश्य मात्र मोकळे सोडलेले. आम्ही शेकोटी पेटवून बसलो आणि वाळूत पाय घासत समुद्राकडे पाहिले. एका लाटेने पांढरा फेस पसरवत माझ्यासाठी डोळे मिचकावले.
"पस्तीस वर्षात इथे काही बदलले नाही, हो ना? तोच समुद्र, तेवढेच आणि तिथेच हे खडक, तशाच लाटा आणि हीच आपली लाडकी जागा! खूप छान वाटतंय." मी सुरवात केली गप्पांना.
बीअरच्या बाटल्यांमधून थेट घोट घेऊन त्या बाटल्या एकमेकात फिरवत गप्पा रंगल्या. तब्बल पंचवीस वर्षांनी मी इथे आलो होतो. हे सगळे जुने मित्र, आमचा खास ग्रुप, परत भेटणार या आनंदाने आलो होतो.
कोण काय करतोय, घरी कोण कोण आहे, होस्टेलमधल्या कुठल्या मित्रांशी संपर्क आहे, आपापल्या गावात त्यातले कोण राहतात? मुले किती आहेत आणि काय करताहेत, अश्या गप्पांनी सुरवात होऊन मग गप्पांची गाडी होस्टेलच्या काळातल्या आठवणींवर आली. अगदी मोजून दहाच मुली आपल्या वर्षात होत्या, त्यामुळे कशा सगळ्याच सुंदर वाटायच्या, यावरून हशा सुरु झाला. या गप्पा आल्यावर आणखी बीअर बाटल्या उघडल्या. आमच्या टोळीत मीच एकटा होतो दारू न पिणारा. त्यामुळे बाटल्या उघडून देण्याचं काम माझ्याकडेच आलं.
“अरे, त्या सुनीताची खूप आठवण यायची रे!” सावंत कळवळून म्हणाला. मग आमच्या वर्गातल्या सर्वात सुंदर मुलीच्या आठवणी निघाल्या. कितीतरी मुलं लायब्ररीत केवळ तिच्यासमोर बसण्यासाठी धडपडायची याची चर्चा झाली. ती कशी आमच्यातल्या एकाबरोबर फिरू लागली, तो विषय निघाला.
“ती उटीला पण जाऊन आली म्हणे सुरेशबरोबर.” सावंत म्हणाला. सावंत सुनीतावर उघड उघड मरायचा. त्याला तर स्वप्ने सुद्धा पडायची सुनीताची. आठवून आम्ही सगळेच हसू लागलो.
“मलाही माझ्या एका मैत्रिणीची रोज स्वप्ने पडायची,” कुणीतरी अनोळखी आवाजात बोलला. आम्ही सगळ्यांनी आवाजाच्या दिशेने वळून पाहिले.
सावंतच्या डाव्या बाजूला थोडा मागे तो बसला होता. आम्ही कुणीच त्याला ओळखले नाही. तो इथे येताना तर आमच्याबरोबर नव्हता. इतका वेळ त्याच्या अस्तित्वाची आम्हाला जाणीवही झाली नव्हती!
“कोण आपण?” मी विचारले. “आम्ही तुम्हाला ओळखत नाही. तुम्ही आमच्यापैकी कुणाला ओळखता का?”
तो सडपातळ शरीरयष्टीचा, साधारण साडेपाच फुटाचा, विरळ भुऱ्या रंगाचे केस असलेला, काळासावळा होता. चेहरा गंभीर, काहीसा रडवेला वाटावा असा होता. पण त्याचे डोळे काहीतरी वेगळेच होते. मी त्याला प्रश्न विचारले तेव्हा त्याने माझ्यावर डोळे रोखले. मला एकदम आतून गलबलून आलं. असं का व्हावं, माझं मलाच समजलं नाही.
चेहऱ्यावर थोडेसेही हास्य न आणता त्याने आपले नाव सांगितले. “मी ही याच कॉलेजचा. तुम्ही चौऱ्याऐंशीचे ना? मी अठ्ठ्यांशीचा. म्हणजे कॉलेजच्या काळात आपली कधी गाठ पडली नसावी. माफ करा, असा अचानक तुमच्या नकळत इथे येऊन बसलो. एकटाच आलो होतो इथे, बीचवर ही माझीही आवडती जागा, त्या मागच्या खडकावर बसलो होतो. तुम्ही सगळे आलात आणि तुमच्या गप्पा रंगत होत्या. तर खूप वाटलं, आपणही सामील व्हावं. तुम्हा लोकांची ओळख करून घ्यावी. अर्थात तुम्हाला काही आक्षेप नसेल तरच!”
“अरे, तुमचे स्वागत आहे. बीअर?” सावंत आपल्या हातातली उघडी बाटली त्याच्यापुढे धरत म्हणाला.
“नाही, मी घेत नाही काही.” त्याने सावंतला नजरेने बांधत नकार दिला.
“बर, तुम्ही काय म्हणत होतात, मैत्रिणीच्या स्वप्नांबद्दल?” कुणीतरी संवादातले गांभीर्य दूर करण्याच्या हेतूने म्हटले.
“सांगतो. पण तुम्ही सगळे मला अहो जाहो करू नका प्लीज. मी तुमचा सर्वांचा ज्युनिअर आहे.”
“बर बर. सांग तुझ्या स्वप्नांबद्दल. पण काही इंटरेस्टिंग असलं तरच सांग. आम्हाला आज अजिबात बोअर नाहीय व्हायचं. उद्या परत आपल्या गावी पोचलो की कंटाळा सुरु व्हायचाच आहे,” त्याला हसवण्याचा प्रयत्न करीत मी म्हणालो.
“मी बोअर केलं तर मला लगेच थांबवा. तुम्हाला तुमची ज्युनिअर राणी आठवते का?”
“ओह, राणी कृष्णन! होहो. आम्ही फायनलला होतो तेव्हा ती आली कॉलेजमध्ये. तीच का?”
“हो. तीच. मी तिच्याच गावाचा. तिला एक वर्ष ज्युनिअर. आधीची ओळख होती त्यामुळे इथे आल्यावर तिने लगेच माझ्याशी मैत्री केली.”
“अच्छा. राणी कृष्णन. गोड पोरगी होती. आम्ही हळहळलो होतो तिला बघून. असला माल आमच्या वर्गात नाही म्हणून.”
“अरे, तिची काहीतरी गडबड झाली होती का शेवटी?” मी विचारले. “ती फायनलला असताना काही घडलं, असं पुसटसं ऐकलं होतं मी. पण काय झालं होतं नक्की?”
“तुम्ही ऐकलं ते खरं होतं.” तो म्हणाला. “आणि तेव्हा मी तिच्याबरोबरच होतो.”
“अच्छा? सांग सांग काय झाले सविस्तर.”
“राणी खरेच राणी होती.” तो बोलू लागला.
समुद्राच्या लाटा काही क्षण स्तब्ध झाल्यात असे मला उगाच वाटले. जणू समुद्र त्याची कहाणी नीट ऐकण्यासाठी कल्ला बंद करून थांबला असावा.
“ती सगळ्यांशी मैत्री करायची. सगळ्यांना ती आवडायची. आधी सगळे तिचे सौंदर्य पाहून आकर्षित व्हायचे, मग ती बोलू लागली की तिच्यात गुरफटून जायचे. माझेही तसेच झाले. आणि त्यात ती माझ्या गावची असल्यामुळे मी तिचा चांगला मित्र बनलो. तिनेही जणू मला आपल्या छत्राखाली घेतलं.
“ ती फायनलला होती आणि मी तिसऱ्या वर्षात. तिने वर्षभरापासून आम्हा मित्र मंडळींच्या सहली काढण्यात पुढाकार घेतला होता. कुठेही सुट्टीला जोडून शनी रवी आला की तिचा काही प्लान असायचा. तर आम्ही एकदा तिच्या योजनेप्रमाणे तीन दिवसासाठी कोडाईकनाल या तामिळनाडूतल्या हिलस्टेशनला गेलो होतो.
“आम्ही सहाजण होतो. तिथे जाऊन आम्ही भाड्याने सायकली घेतल्या आणि खूप खूप भटकंती केली. सगळ्या डोंगर दऱ्यातून फिरत होतो. सायकलींची योजनाही तिचीच. खूप मजा येत होती. ती एक चांगला कॅमेराही घेऊन आली होती. स्वतः बरेच फोटो काढत होती आणि प्रत्येक प्रेक्षणीय ठिकाणी तिचे फोटो काढायला माझ्या हाती कॅमेरा देत होती. इतर कुणाच्या हाती मात्र तिने कॅमेरा दिला नाही. कुणी त्याबद्दल तक्रार केली, तेव्हा मी तिचा कसा खास मित्र आहे, असे तिने उत्तर दिले होते.
“मुक्कामाच्या शेवटच्या दिवशी कोडाईकनालच्या ग्रीन व्हॅलीकडे पुन्हा जावे, असे तिने टुमणे काढले. तिला तिथे तिचे फोटो काढायचे होते, असे म्हणाली. आमची परतीची बस दुपारी होती. आमच्यापैकी तिची मैत्रीण शोनाली आणि मी, एवढेच तिच्याबरोबर जायला तयार झालो. बाकी तिघांना परत सकाळी उठून सायकल चालवायची नव्हती, किंवा काही शॉपिंग करायचे होते.
“सायकली घेऊन आम्ही घाट चढत ग्रीन व्हॅली पॉइंटला पोचलो. सायकली बाजूला टाकून दरीच्या टोकावर पोचलो. तिने माझ्या हातात कॅमेरा दिला आणि कधी स्वतः एकटी, कधी शोनालीबरोबर पोज देऊ लागली.
“त्या काळात ती जागा खरेच खूपच सुंदर होती. माझ्या मते कोडाईकनालचे सगळ्यात प्रेक्षणीय स्थळ. टोकावरून दूर खोलवर नुसत्या हिरव्या रंगाच्या विविध छटा दिसायच्या. कुठेही डोंगराची जागा मोकळी नाहीच. सगळीकडे उंच, घनदाट वृक्ष. एकमेकांना बिलगून उभे विविध जातीचे वृक्ष. त्या सगळ्या वृक्षांचा एक सलग हिरवा गालीचा सर्वदूर पसरलेला. हिरव्या रंगाला कुठेही कसलीच बाधा नाही. तुरळक रंगीत फुलांच्या वेली झाडांना बिलगून चढत असल्या तरी ती रंगीबेरंगी फुलेसुद्धा हिरव्या रंगाच्या छायेत जणू झाकून गेली होती. इतका सारा विस्तीर्ण हिरवा रंग मी आजवर कुठेच पाहिला नव्हता.
“या फोटोंसाठी राणीने एक नवा रोल कॅमेरात टाकला होता. आणि जे छत्तीस, अडतीस फोटो जमणार होते, ते सगळे तिला इथेच संपवायचे आहेत असे मला तिने निक्षून सांगितले होते.
त्या हिरव्या रंगाच्या पार्श्वभूमीवर नाहीतरी राणी खूप सुंदर दिसत होती. तिने लालसर टी घातला होता आणि त्याखाली जीन्स. तिचे लांबसडक काळे केस तिने मोकळे सोडले होते आणि ते वाऱ्यावर भुरभूर उडत होते. टी शर्ट वाऱ्यामुळे तिच्या शरीराला बिलगला असल्यामुळे तिचा लोभस कमनीय बांधा आणि छातीवरचे उंचवटे आकर्षकपणे खुणावत होते आणि मी मोठ्या प्रयासाने फोटो काढण्याकडे लक्ष केंद्रित करू पहात होतो.
शोनाली माझ्या शेजारी उभी राहून सतत राणीशी काहीबाही बोलत होती, तिला प्रोत्साहन देत होती.
कॅमेरामध्ये आता चौतीस फोटो झाले होते. म्हणजे अजून दोन, फारतर चार फोटो येऊ शकणार होते.
“राणीबरोबर माझा एक फोटो काढशील का?” मी शोनालीला विचारले. तिने होकारार्थी मान हलवून म्हटले, “आणि उरलेला शेवटचा फोटो तुझा नि माझा.”
मी राणीला हाक मारून माझी कल्पना सांगितली. “अजून एक फोटो काढ माझा, मग दोन उरतील, मी रोल लोड असा केलाय की सदतीस फोटो निघतीलच.” ती म्हणाली. आणि वळून दरीच्या टोकावरच्या उंचवट्यावर चढू लागली.
मी तिच्या नजीक पोचलो. तिचा हात मागून पकडला आणि म्हणालो, “राणी,तिथे नको चढू. ते धोक्याचे आहे. जरा तोल गेला तर सरळ दरीत पोचशील. मग या सगळ्या फोटोंचे मी काय करू?”
“अरे काही नाही होणार. मी काळजी घेईन.”
“नको राणी. तिथे तू उभी राहून काय वेगळा फोटो येणार? नकोच.”
“अरे डरपोक आहेस तू. मला तिथे एक फोटो पाहिजेच.” हात सोडून घेत राणी हट्टाने म्हणाली.
“मग मी निघालो. हा घे कॅमेरा. बसा तुम्ही फोटो काढत.” मला खरेच हा प्रकार खूप धोक्याचा वाटत होता. शोनालीनेही राणीला समजावयाचा प्रयत्न केला. पण आता राणी हट्टाला पेटली होती. ती चढलीच. चढून आधी बसली ती उंचवट्यावर. खरे तर तो चारेक फुटी उंच निमुळता सुळकाच होता. पण त्यावर दोन पाय टेकायला पुरेशी जागाही नव्हती. टोकच होतं ते. तिने केस नीट सावरले. ओठांचा चंबू केला. म्हणाली, “काय रे असं करतोस. माझा मित्र ना तू? हा एकच फोटो काढ. मग तू सांगशील ते करेन.”
“मी कॅमेरा सरसावण्याच्या आधीच ती उठून उभी राहिली. पण मला ज्याची भीती होती, तेच घडले. उठतानाच तिचा मागे तोल गेला. तिने दोन्ही हात पुढे फिरवत तोल सांभाळायचा प्रयत्न केला. माझ्या नावाचा पुकारा करत उजवा हात माझ्याकडे रोखला. मी भान आवरून झटकन पुढे झालो. माझा उजवा हात पुढे केला...
“फास्ट फॉरवर्ड करावं तसे पुढचे क्षण घडले..
१. मी तिचा हात पकडला आणि तिला जोराने माझ्याकडे ओढले. त्यात माझाही तोल मागे जाऊन मी मागे कोसळलो. डोके मागे मातीवर आदळले. पाठ शेकून निघाली. राणी माझ्या अंगावरच कोसळली. तिचे अंग माझ्या अंगावर आदळले आणि मला तिच्या वजनाची क्षणभर जाणीव झाली. पण मग तिच्याभोवती माझे हात गुंफले गेले. तिच्या मऊ शरीराची माझ्या शरीराला प्रकर्षाने जाणीव झाली. मी मिठी घट्ट केली. स्वतःला सावरतानाच तिला ते जाणवले आणि तिने डोके उचलून माझ्याकडे पाहिले. पुढच्या क्षणी तिचे ओठ माझ्या ओठावर आले..
२. मी हात पुढे करताकरता माझ्या डोक्यात विचार आला. तिचा तर तोल गेलाय. ती पडतेय. मी हात धरला तर मीही ओढला जाईन का? जमेल का तिला वाचवणे? की मीही तिच्याबरोबर जाईन दरीत? एका क्षणात इतके सारे विचार घडले आणि मी एक पाउल मागे सरकलो. जरासाच. तिचा हात माझ्या हाती आलाच नाही. तिच्या डोळ्यात मला आश्चर्य दिसले आणि पुढच्या क्षणी राणी दृष्टीआड झाली.
“खरेच मला त्याक्षणी या दोन्ही शक्य घटना घडल्याचा अनुभव आला. मनसुद्धा कसे विचित्र असते नाही? त्याने मला दोन्ही शक्यता एकाच वेळी अनुभवायला लावल्या, पण त्यातली एकच घटना वास्तवात घडली.”
बोलता बोलता तो थांबला आणि मागे हात करून वाळूत टेकवत झुकला. त्याला पुढे बोलवता येत नाही असे वाटले मला. तोच काय, कुणीच बोलले नाही. मागे समुद्राच्या लाटांचा आवाज जरा अधिकच भेसूर आणि बेसूर वाटला त्या क्षणी.
बराच वेळ तो नुसता गप्पचिप बसून राहिला. किनाऱ्यावर आता आमच्याखेरीज कुणीच नव्हते. बिअरच्या बाटल्या हातात थबकल्या होत्या, ओठांपर्यंत कुणीच नेत नव्हता. मागे लाटांचा आवाज मोठ्ठ्याने गर्जत होता.
सावंतने बाटली उचलून ओठांना लावली आणि जणू समुद्रगाज प्यावा अशा आविर्भावात मोठे घोट घेत रिकामीच केली. शेजारी बसलेल्या त्या पाहुण्याच्या मांडीवर जोराने थाप मारून म्हणाला, "पुढचं सांग गड्या, कशाला अडकवून ठेवतोस!"
पुढे होत तो सावरून बसला. म्हणाला, "माफ करा, मी तुम्हाला बोअर करतोय ना?"
"अरे कसला बोअर होतो आम्ही? गुदमरतोय इथे! नाकात खारं पाणी गेल्यागत वाटतंय. आता सांग लौकर. वाचवलंस ना राणीला?" मी गुरगुरलो.
"नाही हो, ती गेलीच. दुसरा पर्याय खरा ठरला!
"राणीने पुढे केलेला हात पकडायची हिम्मत झाली नाही मला. हात पुढे करून मी मागे सरकलो! मला स्वतःचीच खात्री वाटली नाही. ईश्वराने दोन्ही पर्याय दाखवले मला आणि निर्णय माझ्यावर सोडून दिला. पण मी फसलो. दोन्ही पर्याय शक्य होते याचा विचार केलाच नाही. स्वतःचा जीव वाचवणेच केवळ मला शक्य आहे, यावर विश्वास ठेवला. त्यासाठी काहीच करावे लागणार नव्हते, पण राणीचा जीव वाचवण्याकरता मात्र कृतीची आवश्यकता होती, हे मी समजलोच नाही. तिने मलाच खाली ओढले असते तर मी नंतर हात सोडू शकलो असतो, हेही त्याक्षणी जाणले नाही. समोर एक नैसर्गिक उंबरठा होता, जो मला वाचवू शकला असता हे त्या क्षणी मला समजलेच नाही. आणि त्या माझ्या मुर्खपणाची जाणीव मला त्याच क्षणी राणीच्या नजरेत दिसली. तिच्या त्या डोळ्यात जो भाव होता तो अविश्वासाचा होता की मैत्रीचा घात झाल्याचा होता की कीव होती माझ्याबद्दल? - मला नाही माहीत. की या साऱ्या भावना एकत्र होत्या त्या नजरेत? पण ही जाणीव माझ्या ठायी सोडून, आपली ती नजर माझ्या मनःपटलावर सोडून ती माझ्या नजरेआड झाली.
"पुढच्या क्षणी मी वेगाने पुढे झालो. एक कर्कश किंकाळी मारत शोनालीही लगबगीने पुढे आली. आम्ही दोघेही ओणवे झालो त्या उंचवट्यावर आणि पलीकडे वाकून पाहिले.
राणीचे शरीर वेगाने खाली जाताना दिसले आम्हाला. त्या ठिकाणी खोल खोल दरी होती. तिला पडताना अडवायला एकही झाडाची फांदी नव्हती. उभा कडा होता तो. खूप खूप खोलवर राणी एक झाडावर आदळली. झाडाने जणू आपल्या फांद्या विस्तारल्या आणि तिच्या शरीराला कवेत घेतले. परत वरून हिरवी चादर गुरफटली गेली आणि त्यात राणी अदृश्य झाली!
"काही क्षण सुन्न होऊन आम्ही खाली पाहत होतो. मन रिकामे झाले होते. भय आणि विषण्णता इतकी खोल आणि रिक्त असते?
मी तसाच तिथे आडवा पोटावर पडून राहिलो. आत्ता त्या फांद्या उघडतील आणि त्यातून राणी बाहेर येईल अशी वेडी आशा मनात धरून पडून होतो.
"आधी शोनालीने स्वतःला सावरले. मग मला सावरण्याचा प्रयत्न केला. मला मागून धरून उठवून उभं केलं. मी वळून तिलाच घट्ट पकडली आणि मोठ्याने रडू लागलो. त्या अवस्थेत मला आधी घट्ट मिठी मारून, नंतर गदागदा हलवून आणि शेवटी दोन थोबाडात मारून तिने मला जागे केले. म्हणाली, काहीतरी करायला हवे. मदत बोलवायला हवी. आपल्या टोळीला, कदाचित इथल्या पोलिसांना, फायर ब्रिगेडला बोलवूया. राणी कदाचित जिवंत मिळेलही. नाहीतरी तिचं शरीर तरी.
"कसेबसे सायकल चालवत आम्ही युथ होस्टेलला पोचलो. माझ्या तोंडून शब्द नव्हते फुटत, तर शोनालीने सगळे सांगितले थोडक्यात. सगळेच धक्क्याने सैरभैर झाले, पण माझ्या तुलनेत लौकर सावरून पुढच्या कामाला लागले.
"त्या काळात आत्तासारखे मोबाईल कुठे होते? युथ होस्टेलमधल्या बऱ्याच मुलांना घेऊन शोनाली अपघातस्थळी पोचली. आम्ही इतरांनी चौकशी करून आधी फायर स्टेशन गाठलं आणि मग पोलीस स्टेशन. पण अनेक तासांनी हे लोक तिथे पोचेपर्यंत अपघात स्थळी काही तरुण ट्रेकर्सनी धाडस करून, दुसऱ्या मार्गाने गाडीने दरीत पोचून, तिथून वर चढून राणीचे मृत शरीर शोधून काढले होते! तिथून ते खाली दरीत उतरवून गाडीने वर आणले गेले. शरीर बाहेर काढून पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आणि आम्हा मित्रांनाही घेऊन पोलीस ठाण्यात नेले!
पुढचे दोन आठवडे आम्ही दोघे तिथे होतो. चार दिवसांनी शोनाली आणि मी सोडून बाकीचे कॉलेजला परतले. सुरवातीचा तपास आणि आम्हा दोघांची संशयित म्हणून परखड तपासणी करून आम्हाला पोलिसांनी त्यानंतर कॉलेजला परतू दिले खरे, पण प्रत्येक वेळी कोर्टाचे बोलावणे आले की यावे लागेल या हमीवर.
पुढची दोन वर्षे कोर्टाची टांगती तलवार आमच्या डोक्यावर राहिली. आम्ही दोघांनी या काळात मदुराई कोर्टाच्या अनेक खेपा केल्या. त्यामुळे मी आणि शोनाली खूपच जवळ आलो, एकत्र जाऊ लागलो, एकत्र हॉटेलात मुक्काम करू लागलो, एवढीच जमेची बाजू!
माझे शिक्षण संपले त्याच दरम्यान कोर्टाने आम्हाला कोणत्याही कारणाअभावी आणि पुराव्याअभावी निरपराध घोषित केले. आम्ही पूर्ण मुक्त झालो, असे शोनाली म्हणाली. मलाही तसेच वाटले. पण तसे कुठे होते?
घरी परतलो, नोकरी सुरू झाली, काही वर्षांनी स्वतःचा व्यवसाय आणि मग लग्न. पण त्या प्रसंगानंतर मी कधी हिल स्टेशनला जाण्याचे धाडस केले नाही. किंबहुना ओळखीच्या लोकांबरोबर सहलीला जाणेही मी टाळत राहिलो. शक्यतो मोठ्या सहली टाळत राहिलो. खूप प्रयास करून मी राणीचा मृत्यू आणि माझा पाठलाग करणारे तिचे डोळे स्मृतींच्या ढिगाऱ्यात खोल कुठेतरी दडपून टाकण्यात यश मिळवले होते. पण पाच वर्षांपूर्वी ते पुन्हा माझ्या जीवनात आले, मला झपाटून टाकायला, मला वेडं करायला. माझं जीवन उध्वस्त करायला!
खूप अंधारून आले होते. मध्यरात्र उलटून गेली होती. समुद्रावर सगळं कसं शांत शांत वाटत होतं. मिष्टान्नाचं भोजन करून सुस्त पडावं तसा काळाकभिन्न किनारा आळसावून पसरून पडला होता. हवेची हालचाल अशी नव्हतीच. आवाज आणि हालचाल दोन्ही फक्त लाटांचे होते. समुद्र किनाऱ्यावर बराचवेळ लाटांचं निरीक्षण करत राहिलं की काही वेळाने नव्या लाटाच दिसेनाश्या होतात. पाहीन तेव्हा दिसते एक तेच ते दृश्य: काळसर निळ्या पाण्याच्या कॅनव्हासवर पांढरट रंगाचे ब्रशने फटकारे मारल्यासारख्या लाटा. पुढे एक सपाट पांढऱ्या फेसाची पातळी, त्याच्यामागे फूटभर उंचीची एक लांबसडक पट्टी, त्याच्याही मागे एक त्याहून अधिक उंचीची पांढरी लांब पट्टी. या पट्टीच्या मागे मात्र निळसर रंगाचे उंच आणि रुंद पाण्याचे डोंगर. पण कधीही वळून समुद्राच्या दिशेनं पाहिले की हेच स्थिर चित्र नजरेत येते आणि वाटते, अरे, समुद्रात काही हालचाल नाहीच!
आम्हीही सारे पुन्हा थबकलो होतो. हातातल्या सगळ्या बीअर बाटल्या रिकाम्या आहेत याचे अचानक सगळ्यांना भान झाले होते. कुणीतरी जाऊन क्रेटमधल्या उरलेल्या दोन बाटल्या उघडून आणल्या. अपेक्षेने सगळ्यांनी त्याच्याकडे पाहिले. तो खाली वाकून बोटाने वाळूत काही गिरवत बसला होता.
आम्ही नव्या कुतूहलाने त्याच्याकडे पाहात राहिलो. पहिल्यापासून मला त्याच्या व्यक्तिमत्वात काहीतरी गूढ, वेगळे जाणवले होते. तसा तर शरीराने तो चाळीशी ओलांडलेला एक सामान्य माणूस भासत होता, पण त्याच्यात नक्कीच काहीसे होते, जे नेमके सांगता येत नसले, तरी जाणवत होते.
आमच्या सगळ्यांच्या नजर त्याच्यावर रोखल्या असल्याचे समजल्यागत त्याने दचकून वर पाहिले. त्या अविर्भावाने मीही उगाच दचकलो आणि सावरून बसलो.
"सहज नकळत काही घटना घडत गेल्या आणि राणीची आठवण माझ्या आयुष्यात पुन्हा येऊन बसली. पाच एक वर्षांपूर्वी मी घरी काही वाचत बसलो होतो आणि पत्नी आणि मुले टीव्हीवर कोणतासा हिंदी चित्रपट पाहत बसली होती. अचानक "आई ग! तो ढकलणार आता तिला!" असं माझी बायको जोराने ओरडली. मी नकळत टीव्हीवर पाहिले तो त्यात एक नट एका नटीला कड्यावरून पडू देतो, आपला हात सोडवून घेऊन, असे दृश्य होते. तसाच कडा, तोच तो सुळका वर आलेला आणि त्यावरूनच ती नटी खोल दरीत पडते. तो नट माझ्यासारखाच एक पाऊल मागे सरकतो, पण हात सोडवून घेतो, असे दाखवले होते. आणि मग कॅमेरा त्या नटीचा पाठलाग करून तिच्या चेहऱ्यावरचे, डोळ्यातले भाव टिपतो. तेच, राणीच्या डोळ्यातले भाव! जणू त्या अभिनेत्रीने राणीचे मरतानाचे भाव पाहिलेच असावेत, असे हुबेहूब. मी चपापलो. बायको आणि मुलांकडे दचकून पाहिले. ते त्या चित्रपटात रमलेले दिसले. मी त्यांना कुणाला कधीही राणीची घटना सांगितली नव्हती.
"पण मला मग राहवले नाही. मी पुढचा सर्व चित्रपट पाहिला. दाक्षिणात्य दिग्दर्शकाने नेहमीसारखा अतिरंजित चित्रपट बनवला होता. मूळ कल्पना राणीच्या मृत्यूचीच असावी अशी होती, पण तिथे तिचा खून होतो आणि तो हात सोडवणाऱ्या मित्रानेच ढकलून केलेला असतो. शेवटी पोलीस तपासांती ते सत्य उघडकीस येते. चित्रपट सुमारच होता पण लेखकाने आमच्या घटनेला खून बनवून पेश केले होते!
"झाले, त्यानंतर माझे सहज शांत चाललेले जीवन पार दुःखाच्या घसरणीस लागले. दाबून टाकलेला गळू उफाळून यावा, फुटावा आणि त्यातून भळाभळा पू बाहेर यावा तसा माझ्या जुन्या आठवणींचा पूर आला. राणीचा चेहरा, राणीचे शरीर, टी मधून दिसणारा तिच्या तारुण्याचा गोंडस उभार, तिचे कमनीय कर्व्हज, तिचा किंचाळतानाचा आवाज आणि अविश्वास, कीव, दुःख असे भाव स्पष्ट दाखवणारे डोळे आळीपाळीने मला बंद आणि उघड्या डोळ्यांनी दिसू लागले. मी कुठेही असू, काहीही करत असू, अचानक काही ट्रिगर होऊन जागेपणी तिच्या आठवणी घोंगावत येऊ लागल्या. मग मी जे करीत असे त्यातून लक्ष पूर्ण दूर व्हायचे. कामावर असताना माझ्या सहाय्यकाना माझे बोलणे असंबद्ध वाटू लागले. माझ्या मित्रांना मी पुन्हा कुणाच्या प्रेमात पडलोय असे भास होऊ लागले. मी आजारी पडू लागलो. विनाकारण रक्तदाब वाढला. अन्नावरची वासना उडाली, या सर्वामुळे माझी उत्तम तब्येत ढासळली. माझ्या घरच्यांना चिंता वाटू लागली. प्रथम माझ्या पत्नीला माझ्याबद्दल काळजी वाटत होती, पण एकांतात मी शून्यात हरवायचो, शिथिल व्हायचो आणि मग कधी झोपेत राणीचे नाव घेऊन बरळलो, त्यामुळे तिच्या मनात संशयाने घर केले.
"दरम्यान मी आधी आजारांवर औषधोपचार केलेच, पण नंतर विश्वास नसूनही मानसशास्त्रीय उपचारांचीही मदत घेतली. काही उपचारांनी माझे जागेपणीचे आभास थांबले खरे, पण त्यांची जागा स्वप्नांनी घेतली!
पत्नीच्या मनातला संशय दूर करण्यासाठी मी तिला ती जुनी घटना थोडक्यात सांगितली. मग त्याच रात्री मला स्वप्नात तो सर्व प्रसंग पुन्हा जगल्यासारखा पाहता आला. तसाच रडत ओरडत, राणीचे नाव उच्चारत मी जागा झालो, तेव्हा घामाने डबडबलो होतो.
"पत्नीने जागे होऊन माझे सांत्वन केले तरी तिचा माझ्यावर पूर्ण विश्वास बसला नाहीय हे मला जाणवत होते. त्या चित्रपटातील कथेचा तिच्या अबोध मनावर पगडा होताच, त्यामुळे ते चित्रपटातले कथानक खरे आणि मी सांगितलेली गोष्ट काल्पनिक, असे तिने ठरविले! हळू हळू माझी स्वप्ने वाढत गेली, अधिक ग्राफिक झाली, तसतसे आमच्यातले अंतर वाढत गेले. वाद वाढू लागले. आमच्यातील शरीरसंबंध तर अशक्य झालाच होता. शेवटी खूप वैताग करून, भांडून ती मुलांना घेऊन अलग झाली! मी वेडात हिंस्र होतो आणि त्यामुळे तिला आणि मुलांना माझ्यापासून धोका आहे असे कारण तिने घटस्फोटाच्या अर्जात दिले आहे!
"मी जसा घरी एकटा पडलो, तसतसा राणीचा विचार माझा अधिकच पाठलाग करू लागला. मी दिवसभर कामात स्वतःला झोकून देऊ लागलो, त्यामुळे दिवस तर ठीक जात होते. पण रात्री झोपेत स्वप्नांनी घेरले जायचो, घामाने भिजून उठायचो, त्यामुळे माझी झोप खूपच अपुरी होऊ लागली.
"त्यातच मला एक नवा छंद जडला. कसा, ते मला माहित नाही, पण जडला खरा. मी माझ्या स्वप्नात खूप सृजनशील झालो. क्रीएटीव्ह स्वप्ने पाहू लागलो. नव्हे, तशी ती बनवू लागलो! आणि सृजनशीलता हे तर व्यसनच असते ना, त्यामुळे या व्यसनापायी मी अधिक काळ झोपू लागलो, झोपण्याचे मौके शोधू लागलो, माझ्यातील कलाकाराला संध्या मिळवून देऊ लागलो!!”
खरे तर किनाऱ्यावर येऊन खूप समय लोटला होता. बारानंतर परतायचे असे ठरवून आम्ही इथे बसलो होतो, तर आता एक वाजून गेला होता. रात्री समुद्र फारच गूढ वाटतो. कॉलेजमध्ये असताना कितीएक वेळा रात्री आलोय आम्ही. त्यावेळी तो किती आपला, वैयक्तिक असतो. चंद्र आकाशात दिसत असला, तर दूरवर क्षितिजापर्यंत काळेशार पाणी त्याचा प्रकाश आरशासारखे परावर्तित करत असते. सूर्यप्रकाशाच्या अभावात क्षितिजरेषेवर काळ्या जहाजाच्या रेषा त्यावरील कृत्रिम प्रकाशामुळे अधिकच काळ्या आणि उठावदार दिसतात.
किनाऱ्याच्या दिशांना पाहिले की दूर कुठून दिपस्तंभाचा फिरता झोत चमकून जातो. समुद्रावर उठणारी प्रत्येक काळी उंच लाट आपल्या अंगावर चमकती चंदेरी किनार घेऊन येते. हे सर्व दृश्य अतिशय लोभस आणि आकर्षक असते आणि त्यामुळे धोक्याचे असते. कारण ते आपल्या मनात खोल ओढ निर्माण करते, अद्वैताची खोल ओढ. समुद्राशी एकरूप होण्याची तीव्र ओढ.
त्याच्या त्या कथाकथनाने अशीच एक गूढाची ओढ निर्माण केली होती आमच्यात. त्याने नक्कीच खूप कौशल्याने आपल्या कथेत आम्हाला बांधून टाकले होते. इतर गप्पा विसरून जाऊन आम्ही खुळ्यागत त्याचे ऐकत बसलो होतो. पण बस्स, आता पुरे कर, असे सांगावेसे कुणालाही वाटत नव्हते. खरेच, दुसऱ्याच्या जीवनातील शोकांतिका ऐकायला आपल्याला खूप आवडतात ना? मग ते पुस्तक असो, वा टीव्ही सिरीयल!
"तर, माझी स्वप्ने! त्यांनी तर माझ्या रात्री व्यापून टाकल्या, माझ्या मनाला घेरून टाकलं. आणि प्रत्येकवेळी नवे स्वप्न. कोणत्याही प्रकारचे प्रसंग, आणि त्यामध्ये कुठूनही राणी कृष्णनचा काहीतरी संबंध. इतके की मी कधी स्वप्न पूर्ण पाहावे, त्यात कुठेच राणी नसावी आणि मग अचानक स्वप्नातच कुणी वृत्तपत्र वाचत असावे, ज्यात फोटोसह राणीच्या खुनाची बातमी असावी!
कधी मी स्वप्नात कुठल्यातरी कामासाठी दौऱ्यावर जावे आणि तिथे भेटणारी व्यक्ती राणी निघावी.
"कधी मी स्वप्नात माझ्या मुलांच्या शाळेत जावे आणि मुख्याध्यापिका राणी असावी.
"कधी स्वप्नात मला रस्त्यावरून चालताना कुणी कारने ठोकावे, मी हॉस्पिटलात जावे, माझ्यावर मोठे ओपरेशन व्हावे, सर्व काही ग्राफिक. मग मला एका जनरल वार्डमध्ये ठेवले जावे आणि तिथे माझ्या शेजारच्या कॉटवर कड्यावरून दरीत पडून खूप जखमी झालेली बाई असावी! राणी!
"हिचकॉकच्या सर्व चित्रपटात तो कुठेतरी एखाद्या प्रसंगात स्वतः दिसायचा. तशीच राणी माझ्या प्रत्येक स्वप्नात येनकेन प्रकारेण प्रकट व्हायची. फरक एवढाच की ती आली की मग स्वप्नात दुसरं कुणी महत्वाचं राहायचं नाही. आणि ती हिचकॉकसारखी निघून जायची नाही.
"या स्वप्नांची मला चटक लागली. आज राणी कशी येणार, ती काय करणार, अशा कुतुहलासह मी झोपायचो आणि स्वप्नांची वाट पाहायचो. पण अशाने माझ्या झोपेची आणि प्रकृतीची कशी वाट लागली असेल याची तुम्हाला कल्पना आली असेल!
"ही स्वप्ने हानिकारक आहेत, आपण भ्रमिष्ट होत आहोत, आपला संसार उगीच संपला आणि आता हे असं करीत राहिलो तर जीवनही संपेल याची मला जाणीव अर्थातच होती. पण मी काय करणार? माझ्या जवळच्या मानस तज्ज्ञांनी सुचवलेले उपाय व्यर्थ ठरले होते. झोपेच्या गोळ्यांनी फारसा उपयोग झाला नव्हता. गोळ्यांचा परिणाम म्हणून झोप लागावी आणि प्रभाव संपला की राणी तिची स्वप्ने घेऊन यावी, असे काहीतरी होऊ लागले.
“राणीला वाचवण्यासाठी मी त्यावेळी पुढे झालो नाही, तिचा हात धरला नाही, याचा जणू बदला घेत होती राणी माझ्यावर!
"अशी चार वर्षे तरी काढली मी. खरेच जीवनात राणीची स्वप्ने पाहणे याशिवाय काही राहिलेच नव्हते. हाहाहा! मी मृत व्यक्तीची स्वप्ने पाहत होतो!
"त्याच दरम्यान मी कुणीतरी वाचण्यास दिलेले मुराकामी या जपानी लेखकाचे एक पुस्तक वाचत होतो. पुस्तकाचे नाव लक्षात नाही, पण कथासंग्रह होता. खूप विचित्र कथा होत्या. पण एका कथेत एक पात्र अशाच भूतकाळातल्या एका प्रसंगाच्या आठवणीने सैरभैर झालेले असते. तर ज्या ठिकाणी तो प्रसंग घडला होता, त्या स्थळाला भेट देऊन ये, असं त्याचा एक मित्र त्याला सुचवतो. हा पठ्ठ्या तिथे जाऊन येतो आणि त्याला त्रासणाऱ्या बऱ्याच विचारांचे आणि स्वप्नांचे तिथे उलगडे होतात, असे काहीसे कथानक होते. मला वाटले आपणही करून बघावे असे. खरेतर मुराकामी यातला कुणी तज्ञ नाही, पण बुडणाऱ्याला तृणाचा सहारा असे काही म्हणतात तसे झाले. कदाचित मला त्या जागी जाण्यासाठी काही बहाणा हवा होता. कदाचित तिथे जाणे माझ्या नशिबीच होते. काही का असेना, मी इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा कोडईकॅनालला पोचलो.
"पुन्हा एकदा मी सायकल भाड्याने घेतली. खरेतर मी टॅक्सी घेऊन जाऊ शकत होतो. खरेतर पूर्वीसारख्या सायकली सर्व ठिकाणी भाड्यानं मिळत नाहीत आजकाल तिथे. खरेतर या वयात खराब प्रकृती असताना सायकलने घाटातून ग्रीन वॅलीला जाणे मला शक्य वाटत नव्हते. पण हा माझा हट्ट होता असे समजा. मला तो पंचवीस वर्षांपूर्वीचा प्रसंग माझ्याबरोबर जसा घडला होता, तसा हवा होता कदाचित.
"तर मी सायकलने निघालो तिकडे. घाटात दोनतीन किलोमीटर कसाबसा चढलो, तर श्वास चढलाच. आणि मांड्याही भरून आल्या.
"पायडल पुढे रेटता येईना! मग सायकलवरून उतरलो आणि ती धरून चालू लागलो. पुढचा एक किलोमीटर चढल्यावर तेही अशक्य वाटू लागले. सायकल आडवी टाकून रस्त्याच्या कडेला बसलो. दीर्घ श्वास घेतले काही. निलगिरीचा वास माझ्या फुफ्फुसात भरला. दुपारची वेळ होती, पण झाडांनी सूर्य झाकला होता. शिवाय वाराही होता बराच. त्यामुळे यावेळी घाम आल्याचे नवल वाटले मला. काही काळ बसून राहिलो आणि मग उठलो. पण सायकल उचलायचं धाडस होत नव्हतं. म्हणून ती तिथेच बाजूला आडवी केली आणि चालत पुढे निघालो.
"पुढच्या वीसेक मिनिटात मी ग्रीन व्हॅलीच्या त्या पॉइंटला पोचलो. एक खरं की पंचवीस वर्षांत कोडईकॅनाल खूप बदललं आहे. पूर्वीचं स्वच्छ गर्दी नसलेलं हिल स्टेशन नाही हे. तशी सगळीच हिल स्टेशनं कमर्शियल झालीत म्हणे. पण मी गेल्या पंचवीस वर्षात कुठेच गेलो नाही. त्यामुळे इथलं बदलतं रूप मला धक्कादायक होतं. सगळीकडे घरं, हॉटेल, दुकानं. झाडी बरीच कमी झालीय. त्यामुळे हिरवा रंग एवढा अंगावर येत नाही आता. ग्रीन वॅलीची तीच तऱ्हा. त्या कड्यावरून खाली खोल आणि दूरवर पाहिले तर आजही सगळे हिरवे आहे, पण त्या रंगाची घनता कमी झाल्याचे जाणवते. मधेमधे रिकाम्या जागा दिसतात. काही तुरळक इमारतीही दुरून माचीसच्या डब्यांसारख्या वाटतात. मी बराच वेळ सुरक्षित जागेतून हा दरीतला नजारा पाहात राहिलो. त्या दिवसाच्या जुन्या आठवणी एकदम मोठी लाट यावी तशा आल्या. राणीचे मी कुठून कुठून कसे फोटो काढत होतो, ती कशा पोजेस देत होती, सर्वकाळ कशी आणि काय बोलत होती, आपण कसे मोठ्या प्रयासाने तिच्या शरीराकडे ध्यान न लावता फोटो काढत होतो, शोनाली त्या प्रत्येक क्षणात कुठे होती आणि काय म्हणत होती, तेही स्पष्ट आठवले. वाटले जणू आत खोलवर गाडून टाकलेल्या आठवणी मुळासकट उपटल्या जाऊन बाहेर येताहेत आणि त्यामुळेच इतक्या स्पष्ट आणि विस्तृत आठवत आहेत. कदाचित मुराकामीने सुचवलेली युक्ती योग्यच असावी..
"तो सुळका तिथे अजून होता. पंचवीस वर्षांमध्ये घासला जाऊन थोडा कमी उंच आणि अधिक गुळगुळीत वाटत होता. मी काहीही विचार न करता त्यावर चढलो. अगदी जपून पाय टाकत चढलो. स्वतःला सावरले आणि मग सरळ कोनात खाली पाहिले.
"ती तिथेच होती, राणी! खाली खोलवर ज्या झाडांनी तिला इतक्या साऱ्या वर्षांपूर्वी झेलून गिळून टाकलं होतं, त्याच झाडांच्या घनदाट हिरवळीवर ती पाठीवर आडवी पडून होती. इतक्या खोल अंतरावर असूनसुद्धा तिचे पूर्ण शरीर झूम केल्यागत स्पष्ट दिसले. तो टी, ती जीन्स, टीमधून दिसणाऱ्या तिच्या शरीराच्या लोभसवाण्या रेषा, सगळे स्पष्ट, हात पसरून स्पर्शावे तसे!
"तिचा तो पुढे केलेला हात, माझा हात पकडण्यास आतुर..
"आणि माझ्याकडे टक लावून पाहणारे ते डोळे.. त्यामधले ते अनाकलनीय भाव..
"मी ते उघडे रोखलेले डोळे पाहून दचकलो! पाय जमिनीत खिळून राहिले आणि डोके, खांदे, धड दचकून मागे सरकले. मागे तोल गेला आणि गुळगुळीत सुळक्यावरून पाय पुढे घसरले. मी खाली सरकतानाच डोके त्या सुळक्यावरच आदळले. पण पुढच्या क्षणी मी हवेत होतो पूर्णपणे. शरीर पिसासारखं हलकं झालं होतं आणि तरीही वेगाने राणीच्या दिशेने जाऊ लागलं होतं. गेल्या पाच वर्षात मला पहिल्यांदाच हर्ष झाला.."
तो अचानक बोलायचा थांबला. इतका वेळ आवाज न करता आम्ही त्याचं बोलणं ऐकत होतो, त्यामुळे अचानक शांतता पसरली आणि मागे समुद्राची पुढची लाट मोठ्ठा स्फोट होऊन फुटल्यासारखी वाटली. तो उठून उभा राहिला आणि त्याने थोडे आळोखे पिळोखे दिल्यागत केले. आम्ही अपेक्षेने त्याच्याकडे पाहात राहिलो. पण तो खाली बसला आणि मान खाली घालून बसून राहिला.
सगळे मित्र एकत्र बोलत असताना अचानक सगळेच बोलायचं थांबतात आणि एकदम निरव शांतता पसरते ना, तसे झाले. अगदी असह्य, हिंस्र, स्मशानशांतता! ती सहन न होऊन मी वाळूत सरकत त्याच्याकडे पोचलो. जवळ वाकून त्याला उद्देशून म्हणालो,
"मग पुढे काय झाले? तू वाचलास कसा? आणि थांबली का स्वप्ने?"
त्याने डोके वर उचलून माझ्याकडे पाहिले. पहिल्यांदाच त्याच्या चेहऱ्यावर एक मंद हास्य दिसले मला. डोळे मात्र तसेच, भावहीन..
"पुढे काय झाले? मी वाचलो कसा? हे कसले प्रश्न विचारताय? तरी देतो तुम्हाला उत्तर. दोन पर्यायी उत्तरे, खरेतर.
"एकतर, मी वाचलो नाही, पोचलो. राणीकडे पोचलो, तिचा हात धरला. ती हसली..
नाहीतर, अहो, पुढे काय झाले हे मलाही माहीत नसेल तर माझ्या या नव्या स्वप्नातल्या तुम्हा पात्रांना मी काय सांगू?"