सूर जुळता तुझे नि माझे...
सूर जुळता तुझे नि माझे...


संध्याकाळची रम्य वेळ.आभाळ भरून आलं होत ,गार सुटलेला वारा आणि त्यावर चाललेलं झाडाच्या पानांचं संगीत.मोबाईलवर लतादीदी-अशोककुमारची गाण्यांची मेजवानी चाललेली..या साऱ्या सुंदर वातावरणाचा आस्वाद घेत केशव आपल्या बाल्कनीत बसला होता.आई-बाबा नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी गेले होते,ते रात्री परतणार होते.संध्याकाळचा गरमागरम चहा पीत तो आपल्या खोलीच्या बाल्कनीत निवांतगाणी ऐकण्यात रमला होता .मुळातच संगीतवेडा असणाऱ्या केशवला हे सार संगीतमय वातावरण खूपच प्रसन्न करत होत. इतक्यात या संगीतात साथ द्यायला पावसाने हजेरी लावली.टपटप करत बरसणाऱ्या सरींसोबतच मातीचा सुगंध दरवळू लागला.केशव आणखीन तल्लीन होऊन हे सगळं न्याहाळू लागला .मधेच त्याला गिटार वाजवण्याचा मोह झाला.'दिल क्या करे' गाण्यावर त्याने मनसोक्त गिटार वाजवली.गाणं संपलं आणि त्याने गिटार बाजूला ठेवली. मोबाइलला वर 'एक प्यार का नगमा है' गाणं वाजू लागलं .केशवच्या आवडीच्या गाण्यांपैकी हे एक गाणं होत.तो खुर्चीत निवांत बसला आणि गाण्यात तल्लीन होऊन गेला.त्याने डोळे मिटून घेतले.गाण्याचे शब्द त्याच्या हृदयाला भिडत होते.तो मंत्रमुग्ध झाला होता......पण इतक्यात त्याच्या डोळ्यासमोर एक चेहरा येऊ लागला .तो तल्लीन होऊन गेला त्या चेहऱ्याला न्याहाळण्यात .आत्ता त्याच शरीर फक्त तिथं होत पण त्याच मन कधीच दूर निघून गेलं होत,त्या व्यक्तीच्या शोधात.थोडा वेळ असाच निघून गेला आणि तो भानावर आला.गाणं कधीच संपलं होत.'अजनबी कौन हो तुम' गाणं चाललं होत.केशवला अस्वस्थ वाटू लागलं.तो खुर्चीतून उठून उभा राहिला.पावसाचं गाणं अजूनही चालूच होत.त्याच्या मनाची घालमेल होत होती.तो तसाच सगळं न्याहाळत होता.शहरापासून थोडस दूर,उंच उंच आंबा-नारळीच्या झाडांमध्ये लपलेलं असं त्याच घर होत.त्याच्या बाल्कनीमधून रस्त्यावरून येणाजाणार्याना तो बघत उभा राहिला.इतक्यात त्याची नजर रस्त्याच्या पलीकडे असणाऱ्या सुधीर काकांच्या दुकानापाशी गेलं.दुकान बंद होत आणि दुकानाच्या आडोशाला एक व्यक्ती आपलं अंग चोरून पावसापासून वाचून उभी होती.ती दूर उभी असणारी व्यक्ती केशवच्या हृदयाची धडधड वाढवत होती.त्याच्या संपूर्ण शरीरावर शहरे येऊ लागले.भीती आणि ओढ अशी संमिश्र भावना त्याच्या मनात निर्माण झाली आणि काही दिवसांपूर्वीचा प्रसंग त्याच्या डोळ्यांसमोर उभा राहिला.......
त्या दिवशी केशवची गाण्याची ऑडिशन होती आणि नेमकं त्या दिवशीच आईने चार वेळा हाका मारूनही त्याचा डोळा उघडला नव्हता.जेव्हा त्याला जाग आली, तेव्हा बराच उशीर झाला होता.नऊच्या ऑडिशनसाठी त्याला जायचं होत आणि साडे आठ झाले तरी महाशयांची झोप जात नव्हती. १५ मिनिटात अंघोळ वैगेरे यावरून काहीही न खाता,आईला आणि आजीला नमस्कार करून केशव घराबाहेर पडला.मागून आई नाश्त्यासाठी आवाज देत होती,पण त्याला ते ऐकायचं नव्हतं.काहीही करून ऑडिशन केंद्रात पोहचणं इतकाच त्याला कळत होत..त्याने गाडी काढली,गाडीला किक मारली आणि तो भरधाव निघाला. पावसाळा असल्यामुळे रस्त्यावर जागोजागी पाणी साचलं होत.खड्डे चुकवत चुकवत तो सुसाट चालला होता.पुढे एका चौकात त्याला रस्त्याच्या पलीकडून येणारी मुलगी दिसली.कोरीव चेहरा,तांबूस डोळे,प्रसन्न चेहरा ,चेहऱ्यावर गोड़ स्मितहास्य अशी ती चुडीदार घातलेली,आपली ओढणी सांभाळत,मधेच खुले सोडलेले लांब-काळेभोर केस कानाआड घेत रस्ता पार करत होती.केशव तिला पाहण्यात आपलं भान हरपून गेला आणि समोर असणाऱ्या खड्ड्यात त्याची गाडी गेली,खड्ड्यातले पाणी उडून त्याच मुलीच्या कपड्यांवर गेलं पण गाडी थांबण्याइतकाही वेळ त्याच्याकडे नव्हता.तसेच त्याने मागे वळून पाहिलं,ती आपला ड्रेस सांभाळण्यात गुंतली होती. त्याची गाडी परत भरधाव निघाली.खरतर परत जावं आणि तिची माफी मागावी असं त्याच्या मनात खूप आलं,पण खूप दिवसांनी मिळालेल्या संगीताच्या संधीमुळे त्याला परतता आलं नाही.तो ऑडिशन केंद्रात पोहचला,त्याचा नंबर यायला अजून बराच अवकाश होता.तोपर्यंत तो तिथेच ठेवलेल्या बाकावर बसला.त्या मुलीचा चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर तरळू लागला.अर्धा तास तो तसाच तिचा विचार करत तिथे बसून होता,इतक्यात त्याला त्याच्या नावाची घोषणा ऐकू आली.तो उठला आली ऑडिशन साठीच्या खोलीत गेला.किशोरकुमारांचं 'ये मेरे दिल का चैन' गाणं त्यानं निवडल होत.गाण्याला सुरवात झाली.तो गुंग होऊन गाणं गात होता.सगळेजण मंत्रमुग्ध होऊन गाणं ऐकत होते.सगळ्यांच्या नजरा केशवकडे लागलेल्या होत्या.त्याच्या आवाजाची जादू संपूर्ण खोलीभर पसरली होती.परीक्षक अगदी स्तब्ध झाले होते.गाणं संपलं तस सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवल्या.केशवने संपूर्ण खोलीभर नजर फिरवली आणि त्याच लक्ष काचेच्या खिडकीपाशी गेलं. खिडकीबाहेर तीच मुलगी हसत त्याच्याकडे निरखून बघत होती.यावेळी तिचा चुडीदार वेगळा होता..त्याच तिच्याकडे लक्ष जाताच ती तिथून निघून गेली.केशवला आत्ता बाहेर जायचं होत.झाल्या प्रकाराबद्दल तिची माफी मागायची होती.इतक्यात तिथे बसलेले परीक्षक जोरात बोलले,''खूपच सुंदर,मजा आली". परीक्षकांनी त्याच्या गाण्याची वाहवा केली आणि निकाल नंतर जाहीर होईल असं सांगून त्याला जायला सांगितलं.तो तसाच धावत बाहेर गेला.पण तिथे नव्हती.तो तिला शोधत होता,पण त्याला कुठेच दिसत नव्हती.तो परत नाराज झाला.बाहेरच्या कठड्यापाशी तसाच उभा राहिला.तेवढ्यात ती त्याला नाव नोंदणी करणाऱ्या माणसाशी काहीतरी बोलताना दिसली.तिच्या सोबत अजून एक मुलगी होती.तो हरखून तिकडे जायला निघाला, तेवढ्यात ती तिथून बाहेर पडली ,तिच्या सोबतच्या मुलीसोबत गाडीवर बसली आणि निघून गेली.त्या काकांजवळ तो गेला आणि त्याने तिच्या बद्दल चौकशी केली.ते तसेच वैतागाने सांगू लागले,''काय सांगू बाबा,एक तर उशिरा येतात,आणि मग ‘आम्हाला आत पाठवा ना’ म्हणून विनवणी करतात.आम्हाला पण वरती ऐकून घ्यावं लागत.असं कस सोडणार". हे ऐकून केशवला वाईट वाटलं.आपल्यामुळे तिला उशीर झाला आणि म्हणून ऑडिशन देता आली नाही याची त्याला खंत वाटू लागली.त्या काकांना केशवने तिचे नाव विचारले.तीच नाव 'राधा' होत.राधा,राधा असं पुटपुटत तो तिथल्या बाकावर जाऊन बसला.त्या दिवसापासून तो तिच्या शोधात होता.तिची माफी मागण्याची त्याची खूप इच्छा होती.पण त्या दिवसानंतर ती त्याला कुठंच दिसली नाही.आणि तो तिला शोधातच होता.आज अचानक जेव्हा ती त्याला दिसली त्याला काहीच सुचेनासं झाल.ती दिसल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता.कशाचाही विचार न करता त्याने पटपट जिन्याच्या पायऱ्या उतरल्या, पलीकडच्या खोलीत ठेवलेली छत्री त्याने उचलली आणि तो धावतच घराबाहेर पडला.आज्जी तिच्या खोलीत आराम करत होती.तिला काहीही न सांगताच तो बाहेर पडला.घराचा दरवाजा तसाच ओढून घेतला,त्याने छत्री उघडली आणि तो धावू लागला.तो धावत धावत गेटबाहेर गेला,पण......त्याने इकडे तिकडे पहिले,ती तिथे नव्हतीच.त्याला ती मागच्या वेळेच्या गाडीवरून दूर जाताना दिसली.तो परत हिरमुसला.हे सगळं आपल्याच सोबत का होतंय हे त्याला समजत नव्हतं.राधाला भेटण्यासाठी त्याला लागलेली उत्सुकता आणि दरवेळी त्यांची होणारी चुकामूक यामुळे तो हैराण झाला होता.तो तसाच चेहरा पाडून घरी गेला.इतक्यात आजीने त्याला हाक दिली.तिथून तो आजीच्या खोलीत गेला.आजीने त्याला थोड्याच वेळापूर्वी आलेला एक लिफाफा दिला.त्याने तो लिफाफा उघडला.आणि त्याचा चेहरा आनंदाने उजळला. आजीला काहीही न समजण्याआधी त्याने तिला जोराची मिठी मारली. मग आजीला त्याने सांगितलं कि संगीत स्पर्धेच्या शेवटच्या फेरीसाठी त्याची निवड झाली होती.शेवटच्या फेरीत एक गायक आणि एक गायिका अशी निवड होणार होती आणि पुढे त्या दोघांना एका मराठी सिनेमाच्या पार्श्वगायनाची संधी देण्यात येणार होती.काही वेळापूर्वी जे काही झालं ते सगळं तो आत्ता विसरला होता.
दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटेच त्याला जाग आली.तो उठला,सगळी तयारी करून आई-बाबा-आज्जीचे आशीर्वाद घेऊन तो निघाला.थोडं अंतर गेल्यावर शहरातल्या त्या चौकात तो पोहचला.तेथे पोहचताच त्याला राधाची आठवण झाली.तो तिच्या आठवणीत तसाच पुढे निघून गेला.स्पर्धेच्या ठिकाणी मुलांची आणि मुलींची वेगवेगळ्या खोलीत निवड प्रक्रिया चालू होती.आणि शेवटच्या ४ जणांमध्ये जुगलबंदी एकत्र ठेवण्यात आली होती.त्यातून शेवटचे दोन विजेते-एक मुलगा आणि एक मुलगी अशी निवड होणार होती.केशव आत गेला.त्याला 'एक अजनबी हसीना से यु मुलकात हो गयी' हे गाणं देण्यात आलं होत.त्याने मन शांत केलं आणि गायला सुरवात केली.अशा दोन फेऱ्या झाल्या आणि मुलांमधून केशव आणि एका मुलाची निवड झाली.दुपारच्या सुमाराला शेवटची जुगलबंदीची फेरी होती. जेवण वैगेरे आटोपून सगळेजण सभागृहात जमले.तिथे मंचाचे विभाजन करण्यात आले होते.एका बाजूला दोन मुले आणि दुसऱ्या बाजूला दोन मुली अशी ती जुगलनबंदी रंगणार होती.एकमेकांचे चेहरे न बघता जुंगलबंदी पूर्ण करायची होती.स्पर्धेला सुरवात झाली.इकडून एक गाणं मग त्याला जोडून तिकडून एक गाणं अशी जुगलबंदी रंगली होती. सोबत असणाऱ्या मुलगा आणि पलीकडच्या एका मुलीची जुगलबंदी संपली.केशवने 'आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे’ गायलं.त्यांनतर पलीकडे एका मुलीने 'लग जा गले’ गायला सुरवात केली'.तिचा आवाज खुपच सुरेल आणि मंत्रमुग्ध करणारा होता.केशवला त्या आवाजाने गायला अजून उभारी आली.परत दोन फेऱ्या घेण्यात आल्या.आत्ता वेळ होती विजेते घोषित करण्याची.सगळ्यांची उत्सुकता पणाला लागली होती.निवेदकाने तिला आणखीन ताणवुन ताणवुन शेवटी निकाल जाहीर केला.मुलांमधून केशवला निवडण्यात आलं होत.आणि मुलींमधून राधा सरदेसाई ची निवड झाली होती.राधा नाव ऐकताच केशवला त्या राधाची आठवण झाली.इतक्यात विभाजन करणारा पडदा दूर करण्यात आला. आणि काय आश्चर्य!!! पलीकडची राधा सरदेसाई हि तीच राधा होती जिचा केशव इतके दिवस शोध घेत होता.तिला पाहताच केशवला दुहेरी आनंद झाला.राधाने केशवकडे पहिले.दोघांची नजरानजर झाली.केशव तिच्याकडे एकटक पाहतच होता.राधा लाजली.तिने आपली मान वळवली.जोरात टाळ्यांचा कडकडाट होऊ लागला.दोघांच्याही हृदयात धडधड होत होती. राधाला वेगळाच आनंद झाला होता.त्या दिवशी खिडकीत उभी राहून जेव्हा ती केशवच गाणं ऐकत होती तेव्हाच ती त्याच्या आवाजाच्या आणि त्यात गुंग होऊन गाणाऱ्या केशवच्या प्रेमात पडली होती.आणि आज त्यालाच आपल्या पलीकडे बघून राधाला हे सगळं स्वप्नवत वाटत होत.केशवची स्थितीही काही वेगळी नव्हती. तो विजेता तर झालाच होता पण ती इथे दिसल्याचा आनंद त्याहून जास्त वाटत होता.दोघंही विजेते झाले.सगळा सोहळा आटोपून राधा सभागृहाच्या बाहेर पडली.केशव कधीचा तिची वाट बघत बाहेर उभा होता.ती बाहेर येताच त्याने अभिनंदनासाठी आपला हात पुढे केला.राधाने त्याच्या हातात हात दिला आणि दोघेही काहीही न बोलता तसेच एकमेकांकडे बघत उभे राहिले इतक्यात राधा भानावर आली.तिने आपला हात झटकन मागे घेतला.तसा केशव जागा झाला.त्याने राधाची मागच्या प्रकाराबद्दल माफी मागितली.पण राधाला हा आपली माफी का मागतोय हे काही कळेना.त्यावर केशवने तिला घडलेला सगळा प्रसंग सांगितला. सुरवातीला राधाला त्याचा राग आला.पण नंतर त्याच्या प्रामाणिकपणाचं कौतुक वाटलं.ती केशवला म्हणाली,"काहीच हरकत नाही,जे होत ते चांगल्यासाठीच होत".त्यादिवशी तिला ऑडिशन द्यायची संधी मिळाली नव्हती, मग तरीही ती स्पर्धेत कशी याबद्दल केशवने आश्चर्य व्यक्त केलं.मग राधाने त्याला सांगितलं कि,ज्या दिवशी तो प्रसंग घडला ,त्याच्या दुसऱ्या दिवशी ज्यांना ज्यांना संधी नाही मिळाली त्यांना ऑडिशनसाठी बोलावलं होत.तेव्हा राधाची निवड झाली.होती.हे ऐकून केशवला खूप आनंद झाला.दोघेही खूप खुश होते.
आत्ता जायची वेळ झाली होती.राधा जायला निघाली.दोघांनी परत हस्तांदोलन केलं,एकमेकांना बाय बोलून ते निघाले.दोघांच्याही मनात एकच विचार चालू होता.आत्ता सिनेमाच्या गाण्यांच्या पार्श्वगायनाच्या निम्मिताने आपली परत भेट होणार.त्या दिवसाची उत्सुकता मनात ठेऊन दोघेही निघाले होते प्रेमाच्या वाटेने,प्रेमाच्या नगरीत, प्रेमाचा प्रवास अनुभवायला............