सुर्याविनाच रात्र सरली
सुर्याविनाच रात्र सरली
रवि किरणांसवे येणारी पहाट
शोधी किरणांसी मागे वळूनी
रात्र सरली आज सुर्याविनाच
झेलीत मिठाचा थर पापण्यानी
हरवले तिचे का, कोणी अन् कोठे?
इतका गच्च तिचाही गाभा...
मुसमुसत एकटी चांदण्याभोवती
हिरमुसल्या उषेची लकेर नभा
कोंबून बोळा, कोंडून श्वास
रिपरिप करती कोरडे थेंब
कुठे सुकी, कुठे नुसतीच ओलावली
तर भिजुनी कुठे झाली चिंब
धुपूनी पांढरी - फिकी पडली आज
नभाशी गेलेली काळी गाठोडी
ओलीच राहतील आता ऋतुभर
वाळण्यास नुरली जागा कोरडी
होऊनी खिन्न ओलावली पानेही,
क्षण - क्षण मोजलेले अंतराने.
नकोत म्हणती ओलावा मज,
स्वाभिमानी तिष्टणेच बरे तहानेने...
अशी प्रभात पहिल्या पावसाची
अन् सुर्याविनाच रात्र सरली
स्वाभिमानीच तिष्ठेन म्हणे,
जरी नवीही गाठोडी राहतील ओली....