संसारकुंडातील समिधा
संसारकुंडातील समिधा
संसारकुंडातील समिधा
" ऐकलंस का ... तिकडून होकार आलाय ! महिन्याभरात लग्नही उरकायचंय " आईने लगबगीने येउन मिनलला मिठीच मारली .
अशोकचं स्थळ आलं ...लगेच कांदेपोह्यांचा कार्यक्रमही झाला ..आता होकारही ..! अशोक.. इंजिनिअर .. चांगला मल्टीनॅशनल कंपनीत कामाला . भरघोस पगार .. स्वत:चा फ्लॅट .. काही कमी नव्हतं ..! तिचं मन मोरासारखं नाचू लागलं तर त्यात नवल ते काय ...?
मिनल .. सुस्वभावी . हुशार ,देखणी, बी . कॉम झालेली परंतु नाकासमोर चालणारी .
दोघांचं लग्न झालं.संसाराची सुखचित्रे रंगवत तिने अशोकच्या घरात आणि आयुष्यातही प्रवेश केला .
पहिल्याच रात्री अशोकने तिचा हात हातात घेतला ... ती शहारली . ..त्याच्या मिठीत शिरण्यासाठी आतूर झाली .... पण ... तिच्या हाताला थोपटत अशोक म्हणाला ...
" आई मृत्यूच्या दारात आहे ..मला तिने गळ घातली म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं .. मी तुझा अपराधी आहे . मला माफ करशील .... ? "
मिनल गोठलीच. त्याच्या डोळ्यांत विस्कटलेली संसारचित्रे तिला दिसली तिने हात सोडवून घेतला . सुन्नपणे जमिनीवर चटई अंथरली . डोळे मिटले खरे ...पण झोप येणार तरी कशी ... ? तिने मन घट्ट केलं . तटस्थपणे येणाऱ्या प्रसंगांना सामोरं जाणं तिच्या स्वभावात भिनलेलं होतं .. म्हणून डोळ्यात अश्रू नव्हते ...तर कानात बहिणाबाईच गुणगुणत होत्या ...
"अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर ... आधी हाताला चटके ... तेव्हा मिळते भाकर ..."
तिचे सौदर्य .. स्वभाव .. . कर्तव्यनिष्ठा यांची कसोटी तिच्या उमेदीशी होती .ती जिंकेलच याचा तिला विश्वासही होता .
दुसऱ्या दिवशी सकाळीच उठून मिनल कामाला लागली. सत्यनारायणाची पूजा होती . चेहऱ्यावर कोणतंही किल्मिष न दाखवता सुहास्यवदनाने एखाद्या लाजऱ्या नववधूसारखी ती वावरली . वहिनी .. सून . काकी .. मामी .. ही नाती तिच्या हातावरल्या मेंदीवर आज उठून आली होती .. फक्त एकच नातं अस्पष्ट होतं , ' पत्नीचं ' ... ! मनातलं .. विचारांमधलं वादळ फोफावलं की .. बहिणाबाई कानी गुणगुणत आणि वादळ शमत राही .
मिनलच्या सेवाभावाने अवघ्या एका महिन्यात सासूबाई ठणठणीत झाल्या .सासरे तर बाबांची आठवण होऊच देत नव्हते ...मायेने त्यांचा हात डोक्यावरून फिरला की मनातले बंडखोरीचे सगळे तरंग विरून जात .
आता तर दोघांच्या लग्नाला एक वर्ष होत आलं होतं ...सगळ्यांचं मन तिने जिंकलं होतं अगदी अशोकचंही .. पण फक्त मैत्रीपुरतंच . तिचं कौमार्य अजूनही शाबूत होतं ... प्रेमस्पर्शाच्या अनुभूतीने ती मोहोरलीच नव्हती . दिवस सरायचा पण रात्र मात्र आसुसत राहायची ..मिनलचा उभार अंधारात उसासे टाकायचा. निराशा डोळ्यांतून झरायची . बहिणाबाईंचे बोलही आताशा विरळ होत चालले होते . कधीतरी वाटे प्रतारणा करावी ..सौदर्य उधळून टाकावं कुणावर तरी .. पण छे ..! विचारच किळसवाणा होता . ' 'प्रतारणा' सासर-माहेरकडील प्रत्येकाच्या विश्वासाशी होईल ... त्यापेक्षा या संसाराच्या अग्निकुंडातली समिधा बनून राहणंच तिला योग्य वाटलं .
"बाळा ..महिन्याभरात तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे ...आमच्याकडून तुझ्या आवडीची विशेष भेट काय हवीय तुला ..? " सासू सासऱ्यांनी एका संद्याकाळी मिनलला प्रेमाने विचारलं . ती हसली ... ,
" आई - बाबा मला कोणतीच भेट नको ... फक्त एक परवानगी हवीय ... द्याल ... ? "
"बोल ना बाळा .."
" जवळच असलेल्या अनाथाश्रमात अकांटंटची जागा आहे ..मला नोकरी करू द्याल ... मी घरचं सगळं सांभाळून करेन ..." मिनल म्हणाली .
सासू सासऱ्यांनीही हसतमुखाने परवानगी दिली .
त्या अनाथ मुलांसोबत दिवस सरत होते . त्यांच्यापैकी एक 'जुई '.. इवलंसं गोड पोर ...जुईच्या सहवासात मिनलच्या हृदयात मातृत्व पाझरू लागलं .ती बघता बघता जुईची आई झाली .मिनलचं उपरं जगणं काही अंशी बहरलं .
आज लग्नाचा वाढदिवस. मिनल सकाळी लवकर उठली . अशोकही उठला ; त्याने ओशाळून तिला शुभेच्छा दिल्या . मिनल त्याच्याकडे गेली .. त्याचा हात हातात घेतला .आणि म्हणाली ,
" मी तुझी पत्नी व्हायला लायक नाहीय का रे ...? "
अशोकचं अवसान गळालं .. डोळ्यांतल्या अश्रूंना वाट मोकळी करत त्याने मिनलला मिठी मारली ..
" I Really Love You ...! मी तुझ्या लायक नाहीय गं .. तुला पूर्णत्वाचं सुख मी कधीच देऊ शकत नाही .. दोन वर्षापूर्वी झालेल्या अपघातात माझे प्राण वाचले पण वैवाहीक सुखाच्या बाबतीत मी अपंग झालो ... डॉक्टरांनी सांगितलं तेव्हाच ही गोष्ट मी माझ्या मनात दडपून टाकली ;आईसाठी तुझ्याशी लग्न केलं... तेव्हापासून अपराधीपणाच्या आगीत जळतोय ..तू स्वतंत्र हो ...!
अशोकने हंबरडा फोडला . थिजलेल्या मिनलने स्वत:ला सावरत अशोकला कवेत ओढून घेतलं .. केसांमध्ये बोटं फिरवत त्याला मोकळू होऊ दिलं ... तिच्या डोळ्यांतली स्वप्ने आज ओघळून त्याच्या केसांत फिरणाऱ्या बोटात स्थिरावली . मिनल इतकंच म्हणाली ...
" अशोक ..तू .. मी आपली जुई... बघ झालं ना आपलं कुटुंब पूर्ण. "
अशोकने तिच्या भाळावर चुंबन करत मिठी घट्ट केली . बहिणाबाई पुन्हा गुणगुणल्या ...
"अरे संसार संसार ...."