संसार सुखाचा
संसार सुखाचा


काळाच्या ओघात बहुतेक देवदासींना उदरनिर्वाहासाठी वेश्याव्यवसाय पत्करणे भाग पडले. तो त्यांच्यावर समाजाकडून लादला गेला. त्यावेळी त्यांची प्रतिष्ठा घसरली. देवदासींना विवाह करण्यास परवानगी नसे. देवदासीच्या मुलीला आईकडून वारसा मिळे आणि ती सुद्धा देवदासी बने तर मुलगा मंदिराचा गवई वा वादक बने. अशा या देवदासीच्या जीवनाला कंटाळून देवदासी अनुसया मुंबईहुन आपली 2 वर्षांची मुलगी सुजाताला घेऊन आपल्या गावी हसूरवाडीला राहायला आली. जेव्हा तिला
मुलगी झाली तेव्हाच तिने मनात ठरविले की आता माझ्या मुलीला मी देवदासी होऊ देणार नाही. हे नरकाचे जीवन मी तिच्या पदरात टाकणार नाही. माझ्यासारखे असे जगणे मी माझ्या मुलीच्या वाट्याला येऊ देणार नाही.
आईच्या कुशीत वाढत वाढत सुजाता मोठी होऊ लागली. ४ वर्षांची झाल्यावर बालवाडीत जाऊ लागली मग प्राथमिक शिक्षण घेऊ लागली. त्या बालमनाला अनेक प्रश्न पडत. मी नाव लिहितेवेळी कु.सुजाता अनुसया कांबळे असे का लिहायचे? घरात सगळ्यांसारखे माझे बाबा का नाहीत? पण या प्रश्नांची उत्तरे तिला कधी मिळाली नाहीत. आता तिला जग कळू लागलेले असते. अनेक प्रश्न समोर येत असतात. त्यांचा सामना करत करत ती मोठी होत असते. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी जवळच असलेल्या आजरा या शहरात ती जाऊ लागली. दिसायला सुंदर,हुशार सुजाता शाळेत पण सर्व शिक्षकांची लाडकी होती. परीक्षेत चांगले गुण मिळवायची. सर्व स्पर्धांमध्ये भाग घ्यायची. स्वभावाने पण खूप छान होती. बघता बघता सुजाता ९ वी च्या वर्गात गेली. आता देवदासी म्हणजे काय? याबद्दल थोडी कल्पना तिला येऊ लागली.
तिच्याच वर्गात त्याच गावातील अभिषेक मोरे नावाचा मुलगा होता. दोघे चांगले मित्र होते. तिला तो मुलगा आवडायचा व त्यालाही सुजाता आवडायची. ते सगळ्यांचा डोळा चुकवून भेटत असत. एकमेकांचे विचार,आवडी-निवडी जुळू लागल्या. नंतर या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांचीही १० वी झाली,१२वी झाली. अभिषेक नोकरीसाठी
प्रयत्न करू लागला. त्याच्या प्रयत्नाचे फळ त्याला मिळाले. लष्करात त्याची निवड झाली. तो लष्करी सेवेत रुजू झाला.त्याची पोस्टींग जोधपूरला झाली. अभिषेक सुजाताला म्हणाला,"माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. लग्न करीन तर तुझ्याशीच आणि तुला फूलासारखं जपीन." तिला जातेवेळी जोधपूरचा पत्ता व फोन नंबर देऊन गेला.
सुजाता पदवीचे शिक्षण घेत होती.अभिषेकच्या आठवणीत तिचा एक एक दिवस सरत होता. अधून मधून ती त्याला पत्र लिहीत असे. वर्षातून एक-दोनदा अभिषेक सुट्टीला आला की ते दोघे भेटत असत. असेच ४-५ वर्षे सुरू होते. सुजाताने बी.ए. ची पदवी घेतली. लेक मोठी झाली म्हणून अनुसयाने सुजाताचे लग्न करायचे ठरविले. स्थळे येऊ लागली. मनात नसतानाही सुजाता या सर्व गोष्टींना सामोरे जाऊ लागली. मग एक दिवस मैत्रीण लताच्या मदतीने आईला आपल्या प्रेमाबद्दल सांगायचे असे सुजाताने ठरविले.
सुजाताने अभिषेक बद्दल आईला सर्व सांगितले. त्याचा तिच्याजवळचा फोटोपण दाखविला. लेकीच्या सांगण्यावरून अनुसयाला सर्व आवडले. तिच्यासारखे देवदासीचे जगणे मुलीने जगू नये ही एवढीच तिची इच्छा होती. दिसायला देखण्या अभिषेकला सरकारी नोकरी आहे तसेच घर व शेतीपण आहे. तो चांगल्या सुशिक्षित घरातला आहे. हे सर्व अनुसयाला आवडले व तिने अभिषेक सुट्टीला आल्यावर त्याला भेटून लग्नाबद्दल बोलायचे ठरविले.
काही दिवसांनी अभिषेक सुट्टीवर आला.सुजाताच्या आईने त्याला भेटावयास घरी बोलावले. अभिषेक घरी आल्यावर त्यांच्या लग्नासाठी तिचा होकार असल्याचे सांगितले. अनुसयाने अभिषेक ला सांगितले की,"आता तू तुझ्या घरात विचारून आम्हांला कळव." अभिषेकने घरात आईवडिलांना त्याच्या व सुजाताच्या प्रेमाबद्दल सांगितले व लग्न करण्यास परवानगी मागितली. त्यांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला. वेगळ्या जातीच्या आणि देवदासीच्या मुलीशी आपल्या मुलाचे लग्न केले तर लोक काय म्हणतील? या विचाराने त्यांनी आम्हांला हे लग्न मान्य नाही असे अभिषेकला सांगितले. पण अभिषेकने ठामपणे सांगितले की,"मी लग्न करीन तर सुजाताशीच ."
अभिषेकने सुजाताला आपण पळून जाऊन लग्न करू असे सांगितले. पण याला सुजाता आणि तिच्या आईने विरोध केला. लग्न करायचे तर सर्वांच्या संमतीनेच असे त्यांचे मत होते. लेकीच्या सुखासाठी अनुसया स्वतः अभिषेकच्या आईवडिलांना भेटायला गेली. ती त्यांना म्हणाली , "दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे. सुजाता सुंदर व हुशार आहे. ती तुमच्या मुलाबरोबर छान संसार करेल. मी देवदासी आहे म्हणून त्याची शिक्षा माझ्या मुलीला देऊ नका. मी तिच्यावर चांगले संस्कार केलेत. ती चांगल्या वातावरणात वाढली आहे. त्यांची मने जुळली आहेत. त्यांना लग्न करू द्या. मी माझ्या मुलीच्या सुखासाठी तुमच्यासमोर पदर पसरते." अभिषेकच्या आईवडिलांना अनुसयाचे विचार पटले. समाजातील जुने विचार मागे टाकून नवीन विचार अवलंबले तरच ही देवदासी प्रथा बंद होईल व त्यांनाही सन्मानाने जगता येईल. त्यांनी शेवटी त्यांच्या लग्नाला होकार दिला.
धुमधडाक्यात त्यांचे लग्न झाले. अभिषेकने समाजातील वाईट रूढी,परंपरा मोडून एका देवदासीच्या मुलीबरोबर लग्न करून समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला. त्या दोघांचा राजा-राणीचा सुखाचा संसार सुरू झाला. काही वर्षातच त्यांच्या संसाराच्या वेलीवर विभा व साक्षी नावाची दोन फुले उमलली.