सण
सण
दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण! दिवाळी म्हणजे रंगांचा सण !दिवाळी म्हणजे फराळाची आणि मिठाईची लयलूट!
कोणाची दिवाळी अचानक भरपूर बोनस मिळाल्याने अविस्मरणीय ठरते तर महिलांना छान छान साड्या,ड्रेस आणि दागिने मिळाले की अविस्मरणीय ठरते तर कोणी दिवाळीच्या सुट्टीत मस्त फिरायला जातात आणि मग तो मिळालेला आनंद ;त्याने त्यांची दिवाळी अविस्मरणीय ठरते.
पण एखादी अशी व्यक्ती जिच्या कडे घरासमोर आकाशकंदील नाही, रांगोळी नाही की रंग नाहीत, फराळाची लयलूट नाही की चाखायला मिठाई नाही .ती व्यक्ति आपली दिवाळी अविस्मरणीय करुन जाते.
जवळपास सोळा वर्षांपूर्वीची गोष्ट. मी आणि माझे पती दोघे जण दिवाळीच्या खरेदीला सकाळी दहा साडेदहाच्या दरम्यान बाजारात गेलो होतो. घरी माझा मोठा मुलगा आणि धाकटा मुलगा असे दोघे होते.
माझे पती वकील आहेत.तर त्यांचा एक पक्षकार घरी आला.तो एका खेडेगावात छोट्याश्या मातीच्या घरात रहात होता.तो घरी आला आणि मुलांना विचारल बाबा घरी आहेत का? बाबा बाहेर गेलेत अस सांगितल्यावर तो म्हणाला की तुमच्या बाबांनी मला एका केसमधुन सोडवल.माझ्याकडे फी द्यायला पैसे नव्हते तरी माझी केस घेतली आणि मला सोडवल.नाहीतर मला खूप शिक्षा भोगावी लागली असती.
त्याने एका पिशवीतन त्याच्या घराच्या बाजुला लावलेली भाजी आणली होती, कंदमुळे, त्याच्या बायकोने केलेला बोर सारखा दिवाळीत करतात तो पदार्थ आणला होता आणि त्याच्या ऐपतीप्रमाणे आणलेल्या पेढ्यांचा एक पुडा माझ्या मुलाच्या हातात दिला आणि माझ्या दोन्ही मुलांना साष्टांग नमस्कार घातला आणि म्हणाला , 'तुम्ही देवमाणसाची मुले आहात.' मुले ओशाळली आणि बघतच राहिली.त्यांना क्षणभर काही कळलच नाही.
वयाने मोठा असलेला माणूस आपल्याला नमस्कार करतोय म्हणून दोघे एकमेकांकडे बघतच राहिले.
तो आमची वाट बघत थांबला होता. मुलांनी त्याला पाणी आणि दिवाळीचा बनवलेला फराळ खायला दिला.तेव्हा आमच्या कडे मोबाईल नव्हता.त्यामुळे मुलांना आमच्याशी संपर्क साधता आला नाही.
मग तो माणूस जायला निघाला.तो जरावेळ घुटमळत होता.मग त्याने खिशात हात घातला आणि खिशातन पैसे काढले.सगळ्या फक्त दहाच्याच नोटा होत्या.मग नोटा हातात घेऊन काहीतरी विचार केला. बहुतेक जायच्या एस.टी.च्या भाड्याचा हीशोब करुन पैसे खिशात ठेवले आणि दोन्ही मुलांच्या हातात दहा दहा रुपये दिले आणि सांगितल की तुम्हाला फटाके आणा.
आम्ही येइपर्यंत तो माणूस निघून गेला होता. पण मुलांनी आल्यावर हा सगळा प्रकार सांगितला. माझ्या डोळ्यात एकदम पाणी आले.
माझा धाकटा मुलगा तेव्हा तीन वर्षांचा होता.तो जरा वेगळाच चेहरा करून म्हणाला आई फटाके आणायला दहा रुपये दिले.मग मी त्याला म्हटल अरे ते दहा रुपये असले तरी खूप मोलाचे आहेत.त्या मागची त्याची भावना बघ.त्याच्याकडे जास्त पैसे नव्हते. तरी मुलांना दिवाळीच काही तरी द्यायला पाहिजे ही भावना मनात होती.तो तुम्हाला कपडे कींवा भेटवस्तू देवू शकत नव्हता.पण लहान मुलांना फटाक्यांच आकर्षण असत . दिवाळीत फटाक्यांची मजा मिळावी म्हणून त्याने त्याच्या ऐपतीप्रमाणे पैसे दिले.मग मी मुलाला म्हटल की
या पैशातन तुला तुझ्या फटाक्यांच्या बंदूकीत घालायच्या केपा आणि रोल आणता येतील. मग तो पण खुश झाला.मुलांना म्हटल पण आज त्या वयाने मोठ्या असलेल्या माणसाने तुम्हाला केलेला नमस्कार हा पैशांनी विकत घेता येणार नाही.त्याची किंमत ही करता येणार नाही.
त्याने आणलेल्या त्या साध्या पेढ्यांची गोडी ही घरातल्या महागड्या मिठाई पेक्षा जास्त होती.
नंतर दोन्ही मुलांना त्या पैशातून बंदुकीत घालायचे रोल आणि केपा आणल्या. त्यांनी त्या वाजवल्या.मग मुलांनाही कळल की कोणीही प्रेमाने काही दिल की त्याच मोल काही वेगळच असत आणि त्या दिलेल्या किंमती पेक्षा त्या मागची त्याची भावना ही महत्वाची असते.
त्या माणसाची परोपकाराची भावना, त्याची दानत आणि कृतज्ञता यांनी मी भारावून गेले. ज्याच्याकडे पुरेसा पैसा नव्हता,सुबत्ता नव्हती, दिवाळीच्या पदार्थांची लयलूट नव्हती; तो माणूस आमच्या घरात येऊन दिवाळीत आनंदाची लयलूट करुन गेला!
अस वाटल तो माणूस आम्ही बाजारातून येइ पर्यंत थांबला असता तर त्याला घरचे फराळाचे पदार्थ, मिठाई आणि त्याच्या मुलांसाठी फटाके देता आले असते.
ती दिवाळी आणि ते फटाक्यांसाठी दिलेले दहा रुपये त्याची मला दर दिवाळीत आठवण येते.
माझी अविस्मरणीय दिवाळी!
