Achala Dharap

Inspirational

4.4  

Achala Dharap

Inspirational

हात धरुन ते हात धरुन प्रवास

हात धरुन ते हात धरुन प्रवास

2 mins
283


  अशोक सकाळी जवळच्या बागेत जाॅगींग ट्रॅकवर फे-या मारायला जायचा.एक दिवस बाबा त्याला म्हणाले,'मला पण फिरायला जावस वाटत.पण आता एकट्याला रस्त्यावर चालायला जमत नाही. वाहने खूप असतात ना रस्त्यावर! ' 

'बाबा, मी नेईन हात धरुन तुम्हाला. मी तिकडे फे-या मारेपर्यंत तुम्ही तिथल्या बाकावर बसुन रहा.'

बाबा खुश झाले.अशोक रोज त्यांना हात धरुन न्यायचा.रस्ता क्राॅस करताना लहान मुलांना सांभाळून हात धरुन नेतात तसा न्यायचा.बाबांना कौतुक वाटायचे.

   अशोकची आई एक दिवस त्याला म्हणाली, 'इथल्या देवळात शनिवार, रविवार भजन चालू झालय.मला आवडतं जायला.तू हात धरुन नेशील का मला?'

अशोक हो म्हणाला. शनिवार, रविवार आईला हात धरुन न्यायचा आणि आणायला जायचा.

  हे रुटीन महिनाभर झाल आणि अचानक कोरोनाच्या बातम्या यायला लागल्या.भारतात जेव्हा याचा शिरकाव झाला तेव्हा आधी जेष्ठ नागरीकांनी बाहेर पडू नये अशा सुचना आल्या.मग अशोक आई बाबांना म्हणाला,'तुम्ही आता घरातन बाहेर पडू नका.मी एकटाच जाऊन येइन.'

पण बाबांना चैनच पडायच नाही. ते जवळच्या चौकापर्यंत एक फेरी मारून यायचे.

  पण जसे मुंबईत कोरोनाचे रुग्ण आढळून आले तस अशोक बाबांना बोलला ,'आता अजिबात बाहेर जायच नाही. माझा नाईलाज म्हणून मी कामावर जातोय.'

तरी दुसर्‍या दिवशी बाबा सकाळी आवरुन बाहेर पडण्यासाठी म्हणून तयार होवून निघाले.तेव्हा अशोकने बाबांचा हात धरला आणि म्हणाला, 'बाबा तुम्हाला सांगून कळत नाही का? कशाला जीवाला घोर  लावताय.'

अस म्हणत त्याने दरवाजाला लाॅक करून किल्ली स्वतःच्या ताब्यात घेतली.

बाबा हसत अशोकच्या चेह-याकडे बघत बसले.

बाबा हसतात हे बघून अशोक आणखी चिडला.त्यावर बाबा म्हणाले, 'तुझ्या लहानपणी तू असा दुपारच्या वेळी बाहेर जायला निघालास की मी असाच तुझा हात धरुन घरात बसवायचो.तू हल्ली फिरायला हात धरून न्यायचास तेव्हा पण तुझ्या लहानपणीची आठवण यायची.तेव्हा मी तुला सांगायचो हळूहळू चाल .हल्ली तू मला सांगतोस.

मग आई पण म्हणाली,' मला पण देवळात अगदी हात धरुन सावकाश न्यायचास हो.त्या दिवशी येताना अगदी माझ्या आवडीचा ऊसाचा रस पाजलास.एक दिवस कलिंगड घेतलस.तुझ बालपण आठवल.तुला बाजारातुन येताना असाच मी पण खाऊ घ्यायचे.'

आई आणि बाबांना अशोकच बालपण डोळ्यासमोर आलं आणि भरुन आलं.

बाबा म्हणाले,' काळजी तशीच.फक्त रोल बदलला.'

तसे तिघे हसायला लागले. अशोकने एक हात आईचा धरला आणि एक हात बाबांचा धरला.

त्यावर आई म्हणाली, 'हात धरुन ते हात धरुन प्रवास खूप आनंददायी आहे. अशीच आमची काळजी घे. '

बाबांना ही भरुन आले.

    अशोकचा पाच वर्षाचा मुलगा हे सगळ बघत होता.तो अशोकला येऊन बिलगला आणि म्हणाला,' बाबा तू आजोबां एवढा म्हातारा झालास की मी पण तुला हात धरुन फेरी मारून आणीन.' 

   अशोकने लेकाला कडेवर घेऊन त्याची पापी घेतली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational