Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Aniket Kirtiwar

Inspirational


3  

Aniket Kirtiwar

Inspirational


" सलाम सैनिक हो "

" सलाम सैनिक हो "

5 mins 17.4K 5 mins 17.4K

पूर्वी जेव्हा एखादा मुलगा मला म्हणायचा की, ‘मला सैन्यदलात जायचंय’ तेव्हा अभिमान वाटायचा, कौतुक वाटायचं. आता काळजी वाटते..

सौरभ कालिया, योगेंद्रसिंह यादव यांची आठवण होते. आणि आता कौस्तुभ राणे...

आज ही माणसं आपल्यात नाहीयत. आणि यांना कुणीही व्यक्तिगत शत्रुत्वातून मारलेलं नाहीय. नेमक्या कुणाच्या बंदुकीतून निघालेल्या गोळीनं यांना आपल्यातून ओढून नेलं, हे सुद्धा आपल्याला माहीत नाही. शत्रूकडून सुटणाऱ्या गोळीवर ‘कौस्तुभ राणे’ असं विशिष्ट नाव लिहीलेलं नव्हतं. ती गोळी केवळ ‘भारतीय’ सैनिकांना मारण्यासाठीच म्हणूनच झाडली गेली होती आणि आपल्या हुतात्म्यांनी ती गोळी ‘भारतीय’ म्हणूनच छातीवर झेलली.

आता असं वाटतं की, यांनी जर फक्त कौस्तुभ राणे म्हणून आयुष्य जगायचं ठरवलं असतं तर कदाचित त्यांना आज आपल्या कुटुंबासह आनंदात राहता आलं असतं. प्रत्येक रविवारी निवांत आयुष्य एन्जाॅय करता आलं असतं, कुटुंबियांबरोबर मस्त वेळ घालवता आला असता. एखाद्या दिवशी कंटाळा आलाच तर, ‘प्रकृती बरी नाही’ असं खोटंच सांगून घरात बसता आलं असतं. १५ आॅगस्ट, २६ जानेवारी ला जोडून सुट्ट्या घेऊन कुठंतरी आऊटींग ला जाता आलं असतं. हे सगळं सोडून देऊन ‘भारतीय’ म्हणून जगायला गेले आणि अन् सगळा डावच गमावून बसले..

भारतीय म्हणवून घेण्याची एवढी मोठी किंमत मोजावी लागते, हे तुम्ही सर्वांनी दाखवून दिलंत. या तुमच्या दाखवून देण्याला ‘डेमो’ म्हणता येत नाही आणि तुमच्या कृतीला रिटेक ही नाही. आम्ही टाईम मशीनवर नाटकं, एकांकिका करू शकतो हो, पण ते टाईम मशीन प्रत्यक्षात रिवाईंड करून तुम्हाला परत आणू शकत नाही. तुम्ही अभिमान आणि अस्मितेनं भारतीय म्हणवून घेण्याची तयारी दाखवली आणि स्वत:चं नावच मिरवण्याची भली दांडगी हौस असणाऱ्यांनी बुलेट प्रुफ जॅकेट्स मध्येच भ्रष्टाचार, घोटाळा केला. तुम्हाला एकीकडं भारतीय म्हणवून घेताना धन्यता वाटत होती अन् इकडं स्वत:च्या नावालाच जपणाऱ्यांनी सैनिकांच्या शवपेट्यांमध्येही घोटाळा करून आपापली घरं भरून घेतली.

तुम्हाला वेळ कुठं होता सेल्फी काढून लाईक्स अन् कमेंट्स मिळवत बसायला? तुम्हाला कधी फेसबुक लाईव्ह अन् युट्यूब चॅनेल्स वर आम्ही कुणीही पाहिलं नाही. ‘एक केक कापायला अन् दुसरा केक तोंडाला फासायला’ असले तुमच्या वाढदिवसांचे फोटोबिटो आम्हांला कधी कुठं दिसले नाहीत. अन् अचानकच एकदम तुम्ही स्वत:ला तिरंग्यात लपेटून घेऊन शेवटच्या प्रवासाच्या ‘रोड शो’ मध्येच दिसलात? भारतीय म्हणवून घेण्याची एवढी मोठी किंमत मोजलीत?

आईच्या हातचं जेवण, बायकोच्या हातचा फक्कड वाफाळता चहा, मुलांच्या बरोबर बागेत फिरायला-बिरायला जाणं, त्यांच्या गॅदरिंग्ज ना जाणं, पालकसभेत शाळेच्या धोरणांविषयी तावातावानं बोलणं, बायकोच्या हातचे कांदेपोहे खात दिल्लीची परेड घरातच बसून बघणं, हे सगळं करत राहिला असतात तर, तुमच्या एकसष्ठीचा अन् सहस्रचंद्रदर्शनाचा भला मोठा जंगी कार्यक्रम भविष्यात एन्जाॅय नसता का करता आला? मतदानाच्या दिवशीची आयती सुट्टी पकडून पुढचे-मागचे दोन दिवस सगळ्या नातेवाईकांना किंवा मित्रमंडळींना घेऊन एखाद्या रिसाॅर्टवर जाऊन राहिला असतात तर कुणी शिक्षा नसती केली तुम्हांला.

भारतीय टीम नं क्रिकेटची मॅच जिंकली की रात्री दणकून फटाके उडवण्याचं काम केलंत आणि त्याचे फोटो सोशल मीडीयावर टाकलेत तरी तुम्ही राष्ट्राविषयी प्रचंड आदर बाळगता आणि तुमची राष्ट्रीय अस्मिता किती ज्वलंत आहे, हे अख्खं जग मान्य करतं हो.. पण, तुम्ही तर भारतीय म्हणून जीवच गमावून बसलात..!

‘बीईंग ह्युमन’ चा टीशर्ट घालून फिरला असतात ना, तरी झाला असता तुम्ही देशभक्त. अहो, एखादं फक्कड आयटम साॅंग टाकून, मसालेदार डबल मिनिंग चे डायलाॅग जागोजागी कोंबून सिनेमा काढला की अडीचशे-तीनशे कोटी रूपये मिळतातच अन् वरून पुन्हा राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळवता येतो. पंधरा-वीस सिनेमांमध्ये काम करता करता सहज हरणं-बिरणं मारली असती तरी तुम्हाला अतुलनीय योगदानाविषयी थेट राष्ट्रपतींच्या हस्ते नागरी सन्मान मिळाला असता. आणि असाच एखादा पुरस्कार चिडून, निषेध करून सरकारला परत करून टाकला असतात ना, तर मग तुम्ही आणखी मोठे राष्ट्रभक्त झाला असतात. तुम्ही भारतीय म्हणून शत्रूला मारायला गेलात अन्...!

तुम्ही तर भारतीय म्हणून कायमचे निघून गेलात.. मागे उरलेल्यांचं तुमच्या कुटुंबातल्या भारतीय म्हणवणाऱ्यांचं काय हो? तुमच्या भारतीय बाण्याला आम्ही मोजणार दहा-बारा लाखांत..! तुमच्या नातेवाईकांच्या हाती पैसे टेकवले की तुमच्या प्राणार्पणाची नुकसानभरपाई देऊन टाकल्यासारखंच आहे ! पुढं-मागं तुमच्या स्मृतीप्रित्यर्थ वर्षातून एखादं रक्तदान शिबिर, एखादी देशभक्तीपर गीत स्पर्धा किंवा एखादं व्याख्यान आयोजित करणारं मंडळ उभं राहील. यापेक्षा अधिक काय होणार? याहून अधिक काही करावं असं आमच्या मनातही येणार नाही.

आम्हांला फक्त तुमच्याच प्राणत्यागाची किंमत नाहीय असं अजिबात नाही. आम्हांला तर स्वातंत्र्यवीर सावरकर, खुदीराम बोस, अनंत कान्हेरे, मदनलाल धिंग्रा, शिरीषकुमार, चापेकर बंधू, चंद्रशेखर आझाद, लाला लजपतराय यांच्याही प्राणत्यागाची किंमत नाही. जर किंमत असली असती तर,तुमच्या हौतात्म्यानं अख्खा देशच पेटून उठला असता. चापेकरांच्या वंशजांना आजवर आपण काय दिलंय? आणि सावरकरांना तर आजही त्यांच्याच देशात माफीवीर आणि संडासवीर म्हणणारे लोक आहेत. एकूण काय, तुमच्यापैकी कुणीही देशासाठी केलेल्या त्यागाची अन् समर्पणाची आम्हाला काडीची किंमत नाही.

तुम्ही या देशाला मातृभूमी मानता, देशावर आईसारखं प्रेम करता. म्हणूनच, देशाकडे कुणीही वाकड्या नजरेनं पाहू नये, याकरिता घरादारावर तुळशीपत्र ठेवून सीमेवर जाता आणि आम्ही इथं ‘शाळेचा गणवेश कसा असावा अन् कसा असू नये’ यावर सात-आठ माणसं मीडीयावर आणून चालवलेली तासाभराची चर्चा बघत बसतो ! सत्तर-पंच्याहत्तर वर्षांपूर्वीच्या हुतात्म्यांची अन् क्रांतिकारकांची आम्ही पत्रास ठेवली नाही, तर तुम्हांला लक्षात तरी ठेवू का? आम्ही फार साॅर्टेड आहोत, केवळ कामाच्याच गोष्टी लक्षात राहतात आमच्या. अगदीच लक्षात ठेवायचं म्हटलं तर, शाळेतली मुलं लक्षात ठेवतील बघा तुम्हांला. त्याकरिता तुमचा उल्लेख इतिहासाच्या अभ्यासक्रमात झाला पाहिजे ना. मगच मुलं तुम्हांला लक्षात ठेवतील. पण, तुमच्याविषयीच्या अभिमानापोटी नाही. तुमच्या नावानं विचारलेल्या परीक्षेतल्या प्रश्नांची उत्तरं लिहून दोन-चार मार्क मिळावेत म्हणून !

बदलत्या जगानुसार, ट्रेंडनुसार देशभक्तीची, स्वत्वाची, स्वाभिमानाची, भारतीयत्वाची व्याख्या आपली आपल्याला करता आली पाहिजे आणि आपण आपल्यापुरती जी व्याख्या केलेली असेल, ती कितीही स्वार्थानं बरबटलेली का असेना, तिलाच ‘राष्ट्रीयत्वाची व्याख्या’ असं ठामपणानं म्हणता आलं पाहिजे. तुम्हाला आभास निर्माण करता आला पाहिजे, तेवढं पुरेसं असतं. बाकी विशेष काही केलं नाही तरी चालतंच. कारण, आपण आपल्या देशासाठी काही करणं अनिवार्य नाहीय. आणि तसं अनिवार्य करताही येणार नाही.

मुळात,आमचं भांडण नक्की कुणाशी आहे आणि कशाशी आहे, हे सुद्धा आम्हांला माहित नाही कळतही नाही अन् समजून घेण्याची इच्छाही नाही. तसं बघायला गेलं तर, यातलं मर्म कळण्याची गरज तरी कुठंय? आम्हांला आमच्याच पद्धतीनं आणि आमच्याच कलानं जगायचंय. आमचं राष्ट्रीय चारित्र्य हीच आमची सर्वात मोठी संपत्ती होती, त्याच आमच्या राष्ट्रीय चारित्र्याच्या जहाजाला आम्हीच भोकं पाडत बसलोय. ते जहाज बुडालं तर सर्वांचाच विनाश होऊन काहीही शिल्लक राहणार नाही, हे समजण्याइतकंही शहाणपण आमच्यात उरलं नाहीय. ते चिमूटभर जरी उरलं असतं तरी आम्ही आमची नागरिक असण्याची कुठलीच कर्तव्यं कधीही विसरलो नसतो.

“तुम्ही तिकडं उभे आहात, म्हणून आम्ही इथं सुरक्षित आहोत” असं म्हटलं की झालं.. असंच वागायला आम्हांला आवडतं आणि तेवढंच जमतं. त्यामुळं, उद्या कुणी जर भारतीयत्वाची सत्त्वपरिक्षा घेतली तर त्यात आम्हांला ग्रेस मार्क्स मिळवूनही पास होता येणार नाही.

“रक्षिता तुम्ही स्वातंत्र्या, प्राणांस घेऊनी हाती

तुमच्यास्तव अमुची लक्ष्मी, तुमच्यास्तव शेतीभाती

एकट्या शिपायासाठी, झुरतात अंतरे कोटी

सैनिक हो तुमच्यासाठी !”

हे फक्त एक भावनिक गाणं उरलंय आणि त्याच्या कॅसेटला वर्षातून दोनच दिवस डिमांड असते. बहुतेकांची देशभक्ती तेवढीच..! बाकी तसंही आम्हांला भारतीयत्वाशी कर्तव्य उरलंय तरी कुठं? उरली आहे ती केवळ एक पोकळ समाधी !


Rate this content
Log in

More marathi story from Aniket Kirtiwar

Similar marathi story from Inspirational