सल
सल
एका गावात एक प्राथमिक शिक्षक राहत होता. आपल्या बायकोबरोबर आणि दोन मुलांबरोबर त्याचा सुखाचा संसार सुरू होता. थोरला मुलगा आणि धाकटी मुलगी. दिवस कसे मजेत चालले होते. मुलगा अतिशय हुशार होता. परिस्थितीची जाण असलेला. चौघे एका भाड्याच्या खोलीत दिवस घालवत होते. एकमेकांना सांभाळून घेऊन रोजचे दिवस घालवत होते. दोघे शाळेत गेले की त्यांची आई घरातली सारी कामे आवरायची. 'कोयल बोली दुनिया डोली' हे तिचं आवडत गाणं. गाणी गुणगुणत कसा कामाचा फडशा पडायचा हे तिचं तिलाच कळायचं नाही. दिवेलागण्याच्या वेळी मुलांकडून सगळे स्तोत्र पण म्हणून घ्यायची. मुलाचं फार कौतुक वाटे तिला. त्याच्या हुशारीचे किस्से ती सगळ्यांना आवर्जून सांगी.
बघता बघता अनेक दिवस निघून गेले. आणि एक दिवस काळाने तिच्यावर हल्ला केला. कॅन्सर सारख्या आजाराने तिला विळखा घातला होता. ऐपतीप्रमाणे नवऱ्याने तिचं सगळं केलंसुद्धा. पण थोडंच आयुष्य दिलं होतं देवानं तिला. तिची ज्योत मावळली होती. मुले आईविना पोरकी झाली होती. आता पुढे काय?हा प्रश्न त्याला सतत सतावत होता.
दुसरं लग्न करावं तर समाज काय म्हणेल याची भीती तर लहानग्यांच्या डोळ्यांत पाहिलं तर यांचं कसं होणार ही सल मनात कुठेतरी सतत बोचत होती त्याला. त्यामुळे त्याची झोप उडाली होती. शेवटी निर्णय घ्यावाच लागला त्याला. दुसरा पर्यायच उरला नव्हता त्याच्याकडे. मोठा मुलगा त्यावेळी १३-१४ वर्षांचा होता. त्याच्या बाबांनी घेतलेला हा निर्णय त्याला मान्य नव्हता. आपल्यापेक्षा चार वर्षे मोठी ताई आपली आई होणार ही कल्पनाच त्याला सहन होत नव्हती. मन फार नाराज झालं होतं त्याचं. काय करावं काही सुचत नव्हतं. बहिणीकडे पाहून असं वाटायचं कोण करणार हिचं. बाबा जाणार शाळेत, मग बहिणीचं कसं होणार. शेवटी इच्छा नसतानासुद्धा बाबा जे करतील त्यातच समाधान मानण्याशिवाय पर्यायच नव्हता दुसरा.
कमाल त्याला याची वाटायची की ही ताई लग्नाला तयार कशी झाली. हिला कसं पटलं, लग्न होताच आपल्या पेक्षा 4 वर्षांनी लहान असलेला मुलगा आई म्हणेल. तिची परिस्थिती पण हालाखीची होती. वडील जे म्हणतील ते त्या पोरीने पण ऐकलं. लग्न पार पडलं. पण याला काही त्या आईवर पहिल्यासारखा हक्क दाखवता येत नव्हता. दिवस सरत होते. दहावीची परीक्षा पण आली जवळ. पण हुशार असूनही बोर्डातला नंबर हुकला त्याचा. घरातील वातावरण कारणीभूत होतं त्याला. ११ वी झाली आणि त्याच्या मनाने ध्यास घेतला.
नाही असा हलगर्जीपणा करून चालणार नाही. काही तरी करायचंय. खूप मोठं व्हायचं आणि बारावीला परत मोठ्या जोमाने लागला तो अभ्यासाला. झाली परीक्षा १२वीची. आता चाहूल लागली होती ती निकालाची. खूप चांगल्या मार्कांनी पास झाला होता तो. आता मेडिकलला ऍडमिशन मिळवून डॉक्टर व्हायचं स्वप्न उराशी बाळगलं होतं त्यानं. खूप मेहनत घेत होता तो.
चार वर्षे अथक परिश्रम घेऊन तो डॉक्टर झाला. घरात तसं सगळं ठीक चाललं होतं. इकडे त्याच्या आईला तोपर्यंत दिवस जाऊन एक मुलगाही झाला होता. दोन वर्षे गावात त्याने प्रॅक्टिस पूर्ण केली. आता स्वतःचे हॉस्पिटल उभे करावे असे त्याच्या मनाने घेतले. पण पैसे कुठे होते. बाबांनी त्याचे लग्न करायचे ठरवले. तो इतक्यात तयार नव्हता लग्नाला. पण त्याचं काहीच चालत नव्हतं घरात. शेवटी होकार दिला.
सासुरवाडी छान मिळाली होती त्याला. बायको खूप प्रेमळ होती त्याची. सासरच्या लोकांनी त्याची हुशारी पाहून त्याला हॉस्पिटल उभं करायला पैशाची मदत केली. त्यातच त्याच्या बाबांनी अंथरूण धरलं. त्यावेळी त्याला कळलं की आपल्या बाबांनी दुसरे लग्न का केलं. त्याचा राग पूर्ण निवळला होता. तो पूर्णपणे बाबांची काळजी घेत होता.
पण मरण कोणाला चुकलंय का? प्राणज्योत मावळली त्यांची. त्याला परत पोरका झाल्याची जाणीव झाली. सगळं दुःख विसरून परत तो आपल्या प्रॅक्टिसमध्ये गर्क झाला. आता फक्त दोन मुलांचं चांगलं करायचं त्याच्या मनाने ध्यास घेतला. तो आज एक प्रसिद्ध डॉक्टरांच्या यादीत आहे.