शोध..एक प्रवास ...
शोध..एक प्रवास ...




बाल्या नावाचा एक लहान मुलगा होता, त्याचे आईवडील वारले आहेत. त्याचे या जगात कुणी नाही. तो उदरनिर्वाहसाठी कृष्णाच्या मंदिराजवळ फुले विकायचा. आयुष्याची ही नियती त्यांने हसत स्विकारली होती. फुले विकून जे कमवायचा त्यातून स्वतःचा खर्च करायचा. डोक्यावर राहायला छत नव्हते तो एका वडाच्या झाडावर छोटी खोपडी करून राहायचा. देवाची लिला कुणा कळली. त्याच्या आयुष्यात एक घटना हात पसरवून स्वागत करायला तयार होती. एके दिवशी फुले विकताना एक गोंडस मुलगी त्याच्या जवळ आली. हसत त्याला म्हणाली "कशी दिली फुले ?" "दहा रुपयाला" तो म्हणाला. दहा रुपये घेऊन त्याने तिला फुले दिली. काही क्षणाकरीता तो तिच्या गोंडस रुपात बुडून गेला होता. तेवढ्यात चहाच्या टपरीवर चहावाल्या रामूकाकाने हाक मारली, "बाल्या ये चहा घे." तो काकाकडे बसला. नेहमीप्रमाणे त्याने रामू काकांकाडे ब्रेड मागीतला ! सगळ्यांना ब्रेड चहात बुडून खाताना आपण पाहिले. पण बाल्याचे वेगळे होते. त्याला ब्रेड चहात भिजवून खायाला आवडायचा. रोज तो मंदीरातील पुजाऱ्याने दिलेला प्रसाद आणि रामूकाकाचा चहा ब्रेड खाऊन जगायचा.
दुसऱ्या दिवशी ती गोंडस मुलगी पुन्हा आली, फुले मागितली पैसे दिले हसत निघून गेली. तो तिला पाहत राहिला. तिला बघताच एक हास्याचे तेज त्याचा चेहऱ्यावर दिसून यायचे. दिवसभर नाचत गात बागडत राहायचा. पुजारी बाबांना, रामूकाकाला आश्चर्य वाटायचं. त्याला आनंद पाहून ते सुद्धा आनंदी होत असत.
दुसऱ्या दिवशी तो तिची आतुरतेने पाहत होता. तेवढ्यात ती आली. "अरे फुलं दे !" तो तिला म्हणाला "माझं नाव बालू आहे. अरे नाही." ती हसली म्हणाली "बरं. माझे नाव ज्योती आहे. तू रोज इथेच फुलं विकतोस का ?" तो म्हणाला "हो, बरं चल नंतर बोलते आई हाक मारतेय. शाळेत जायचं आहे, उशीर होतोय. मी संध्याकाळी बागेत खेळायला जाते. तू येशील का ?" तो म्हणाला "हो नक्की." असं म्हणून ती तिथून निघून गेली.
ठरलेल्या वेळेप्रमाणे तो संध्याकाळी बागेत गेला. तिथे ज्योती तिच्या घरात काम करणाऱ्या बाईसोबत आली होती. बालू दिसता ज्योती पळत आली. "तू कुठे राहतो ? कोण कोण आहे घरात ?" बाल्या काही वेळ स्तब्ध झाला. त्याने भरल्या डोळ्याने तिच्याकडे पाहिले. तिला त्या प्रश्नांची उत्तरे जणू न सांगताच समजली होती. तिने प्रेमाने त्याचे डोळे पुसले. "काही खाल्लंयस का तू ?" त्याने नाही म्हणत मान डोलवली.
चहाच्या टपरी मंदिराच्या बाजूला होती. रामूकाकाची ती चहाची टपरी होती. रामू काकांनी चहा ब्रेड आणला. तो भुकेला असल्याने त्याने तो ब्रेड चहात बुडवून लगेच खाल्ला. ते पाहून ती हसली आणि म्हणाली, "अरे बालू काय करतो ? असे कधी खातात का ?" तो म्हणाला " मी असेच खातो !" ती हसत त्याकडे बघत राहिली. त्या क्षणी तिला त्यात जणू देवच दिसला. चल निघते मी भेटू उद्या म्हणून निघून गेली.
रोज ते दोघे भेटू लागले. बालूला जणू सगळेच मिळाले होते. तो बराच वेळ तिच्या सोबत राहत असत. ज्योती आणि तो खूप एकरुप झाले होते. तो गरीब ती श्रीमंत ही दरी त्यांच्यात होती. बालू लहान असून तो स्वावलंबी होता. हे ज्योती काही दिवसात समजून गेली होती. रोज नवनवीन उपाय करायची त्याला मदत करायची. कधी कमवाली बाई, कधी ड्रायव्हर, कधी मित्र मैत्रिणीला सांगून फुले विकत घ्यायची. रामूकाकाकडचा चहा नित्य नियमाने प्यायची.
सुट्टीच्या दिवशी मनसोक्त दोघे बागडायचे. तो अगदी तिच्या घरी जायचा तिच्या घरात तो रुळला होता. ज्योतीची आई पण माया लावायची. बालूला देवाने पुन्हा एक कुटुंब दिले होते. त्यासाठी तो परमेश्वराचे आभार मानू लागला.
त्याच्या आंनद कदाचित नशिबाला आवडला नसावा. ज्योतीच्या बाबाची बदली दुसऱ्या शहरात झाली. काही दिवसात त्यांना शहर सोडून दुसऱ्या ठिकाणी जायाचे होते. फक्त मागे राहणार होते ते मालेगाव आणि तेथील फुले विकणारा तो बालू. ज्योती बदलीच्या गडबडीत त्याला भेटलीच नाही. बालू विचारात पडला. ज्योती भेटलीच नाही, काय झाले तिला. तो खूप कासावीस झाला. नकळत पावले तिच्या घराकडे वळली. तेवढ्यात ज्योती गाडी बसताना दिसली तोच त्याने जोरदार हाक दिली. ज्योती गाडीत बसल्यावर मागे काचेतून बघितले तर बालू दिसला, पण गाडी भरधाव निघाली होती. तो गाडी मागे पळू लागला. ज्योतीला काही सुचेना तिने आपल्या शाळेच्या दप्तरातून एक पेन आणि वही काढली. एका पानावर तिने बालूसाठी एक मजकूर लिहला.
प्रिय बालू,
तुला कधी विसरता येणार नाही. तू माझ्यासाठी दुसरा तिसरा नाही तर माझाच भाग आहेस. आपण एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्या विभक्त होऊ शकत नाही. दुसऱ्याला ते करता येणार नाही.
मी तुझी ज्योती.
खाली तिच्या मुळ गावाच्या घरचा पत्ता आणि नंबर होता. आता ही चिट्ठी त्याला कशी द्यायची हा विचार करत असताना अचानक तिचा हात गळ्यातील एका चेनकडे गेला. त्यामध्ये तिचे दोन फोटो होते. तिने त्यामधील एक फोटो काढला आणि त्यात चिठ्ठी बारीक घडी करून त्या चेनमधे ठेवली. गाडीची काच खाली करून थोडी डोकावली, इशारा केला. हे सांभाळून ठेव. हाच आपल्या पुनर्मिलानाचा मार्ग आहे. बाल्याकडे फेकली. क्षणाचा विलंब न करता ते घेण्यासाठी तो सरसावला आणि काळाने घात घालून खेळी रचली. तो ती चेन उचलणार तेवढ्यात एका गाडीने त्याला जोरदार धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला. रक्तबंबाळ अवस्थेत तो फक्त ज्योतीच्या गाडीकडे बघत होता. हळूहळू त्याची शुद्ध हरवत चालली होती. डोळ्यासमोर तिच्या गाडीचे दृश्य ढसाळत चालले होते. ज्योतीला काय घडले तिच्या गाडी मागे याची थोडीही कल्पना नव्हती.