धनाजी बुटेरे

Inspirational

4.5  

धनाजी बुटेरे

Inspirational

शाळेतील दिवस

शाळेतील दिवस

6 mins
477



               माझं गाव कल्याण तालुक्यातील पोई.माझ्या गावात शाळा त्यावेळी सहावीपर्यंत होती.पुढे सातवीला जवळच एक-दीड किलोमीटर आंतरवरील दहागावाला जावे लागत असे. दहागावला जिल्हा परिषद शाळेत सातवीपर्यंत शिक्षण घेतले की लगेच तिथेच हायस्कूलमध्ये दहागाव मध्ये प्रवेश केला.हा आता हायस्कूल म्हटले की तुम्हाला वाटेल मोठ्या मोठ्या इमारती,शिक्षकांचा सुकाळ,खूप सारे विद्यार्थी, मोकळे मैदान,सुसज्ज वर्ग खोल्या,आणि एकूणच काय सारे शिस्तबद्ध,असे वातावरण, असे शाळेचे चित्र आपल्या डोळ्यासमोर असेल.पण माझ्या हायस्कूलच्या बाबतीत तसे काहीच नव्हते.आमची शाळा जेव्हा मी आठवी दाखल झालो.त्यावेळी हे हायस्कूल गुरांच्या गोठ्यात भरत होते.नववीचा वर्ग हनुमानाच्या मंदिरात, दहावीचा वर्ग हनुमान मंदिराच्या पहिल्या मजल्यावर,खाली मातीची खरबट जमीन शेणाने सारवलेली.ती ही मुलेच सारवत.बाक वगैरे कधी पाहिलेच नाही.सारे जमिनीवर बसायचो.बसून बसून पायजवळ मोठमोठे घट्टे तयार झालेले.ते आजही जाणवतात.अशीही हायस्कूल त्यामुळे हायस्कूल नावाच्या प्रदेशाचा मनसोक्त आनंद घेता आला नाही.हे हायस्कूल नुकतच सुरु झालेले म्हणजे 1987 साली त्यामुळे शाळेला ग्रँड नव्हती.विनाअनुदानितची शाळा.अशी ती शाळा.आता राहिला प्रश्न शिक्षकांचा,शिक्षकही आमच्या मुलांसारखे नवोदित असायचे.अनुभवी शिक्षक मिळणे जवळजवळ अशक्य होते. कारण त्यावेळी शिक्षकांना पगार तीनशे चारशे रुपये दिला जाई बिचारे शिक्षक कसा संसाराचा गाडा चालवत असतील? ते देवालाच ठाऊक! पण उद्या शाळेला अनुदान येईल; आणि आपला पगारं पूर्ण मिळेल.या भाबड्या आशेवर बिचारे जगत होते.एखादे भाकड जानवर पावसाची वाट पाहत गोठ्यात खितपत पडलेले आभाळाकडे पाहत बसते;आणि हिरवळीचे स्वप्न बघते.तसे आमचे शिक्षक शाळेला अनुदान कधी येईल? याची आतुरतेने वाट पाहत असायचे.आता शाळा उघडणारी संस्था ही काही मोठी नव्हती.तीही नवोदित.म्हणजे पंचक्रोशीतील ग्रामस्थ एकत्र आले.आणि त्यांनी एकमताने निर्णय घेतला.गावात हायस्कूल उभे करायचे.आता मध्यवर्ती ठिकाण म्हणून दहागावला भरविण्याचे ठरले.कारण या आगोदर या परिसरातील मुले शिकली नाही.कारण आमच्या गावापासून आठ किलोमीटर अंतरावर रायते या गावी हायस्कूल होते.तेथे मुलांना हायस्कूल मध्ये जावे लागे.त्यात शाळेची वेळ सात वाजता.मग मुलांना घरातून पाच वाजता निघावे लागे.त्यामुळे रोजची पायपीट व्हायची.१९८७ पर्यत एकही मुलगी या परिसरातून हायस्कूल मध्ये गेली नाही.आज मात्र कितीतरी मुली शिकून पुढे गेल्या.ही शाळा चालविण्यात सिंहाचा वाटा आहे तो.श्री.महादेव दाजी देसले गुरुजी या माणसाचा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी वर्गणी काढून शाळेला आवश्यक वस्तू खरेदी करून .शाळा बांधणेपाडा येथील हनुमान मंदीरात सुरु करण्यात केली. मग पुढे वर्ग वाढत गेले.शाळेचे स्थलांतर बांधणेपाड्यातून दहागावला झाले. दहागावला मंदिरात दोन वर्ग,तर तिसरा वर्ग गुरांच्या गोठ्यात,त्यात दिसले गुरुजींची कृपा म्हणून जिल्हा परिषदचा एक वर्ग त्यांनी आम्हाला शाळा भरण्यासाठी दिला होता.त्यावेळेस दिसले गुरुजी संचालक पदावर होते आणि तेच शाळेचा कारभार पाहत असायचे

                 संस्था काही धनदांडग्यांनी नव्हती. त्यामुळे शाळा बेताची सुरू झाली.सगळ्यात महत्त्वाचे शाळेला प्रत्येक गोष्टीची वानवा होती. अगदी कित्येक वर्ष शाळेला शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी मुतारीची नव्हती.त्यामुळे फार मोठी पंचाईत व्हायची.पंचक्रोशीतील ग्रामस्थ हेच संस्थेचे पदाधिकारी. त्यातली सारेच पदाधिकारी नवखे होते.म्हणजे थोडक्यात काय तर त्यावेळच्या पुढाऱ्यांनी संस्थेवर ग्रामस्थांनी एक मताने निवडणूक केली होती.आता प्रश्न नेहमी यायचा तो निधीचा.आणि निधी उभा केला जायचा विद्यार्थ्याकडून घेतल्या जाणाऱ्या फी मधून.प्रत्येक विद्यार्थ्याकडून महिन्याला ठराविक रक्कम घेतली जाई.त्यात विद्यार्थी पण शेतकरी वर्गातील गरीब शेतकऱ्यांची मुले.शाळा चालली पाहिजे म्हणून विद्यार्थ्याकडून फी गोळा केली जाई.आठवीसाठी सहा रुपये,नववीसाठी सात रुपये; तर दहावीसाठी आठ रुपये.याच फी वर शाळेचा डोलारा चालायचा.वर्गात विद्यार्थी संख्या ही फार नसायची.तीस-पस्तीस विद्यार्थ्यांच्या संख्येवर वर्ग चालायचे,शाळेचा पट जेमतेम नव्वद, महिन्याकाठी एका वर्गाचे दोन अडीचशे रुपये गोळा व्हायचे.हेच दोन अडीचशे रुपये असे करून पाचशे सहाशे रुपये गोळा व्हायचे हेच पाचशे रुपये संचालक मंडळी शिक्षकांना वाटून द्यायची.त्यातही बरेच विद्यार्थ्यी फी देत नव्हते.कारण घरचे 'आठराविश्व द्रारिद्र '

काही अडचण आली,तर देसले गुरुजी आपल्या खिशाला कात्री लावून शिक्षकांना पगार करायचे.त्यामुळे पैसा फार मोलाची गोष्ट शाळेसाठी होती.कशीतरी शाळा चालत होती. शिक्षक बिचारे शेतकरी जसा पावसाची आतुरतेने वाट पाहतो; तसे सरकारी अनुदान शाळेला कधी चालू होईल याची वाट पाहत होते. त्याच आशेवर ते दिवस काढत होते.वर्तमान त्यांच् वाईट होता.त्यांच्या खिशात पैशाचा खडखडाट असायचा;पण बेकारी काहीही करायला लावते.तशी ही माणसे आपले पोट घेऊन.दूरन आली होती. सारीच माणसे आपल्या प्रदेशाला परागंदा होऊन होऊन इथे पोटासाठी आली होती.पण याच शिक्षकांच्या त्यागामुळे हे जागृती विद्यालय उभे राहिले होते.सुरुवातीला पाटील सर,भारंबे सर, झांबरे सर, राणे सर, जंगले सर,मंदाकिनी पाटील मॅडम, चौधरी सर,तळेले सर,नारखेडे सर, या सार्‍या माणसांनी खिशाला कात्री लावून भविष्याच्या आशेवर शाळा पुढे नेली त्यांच्या त्यागामुळे शाळा पुढे नावारुपाला आली.

              या शाळेत साऱ्याच वस्तूंचे वानवा होती वर्ग खोल्या,सार्‍या सुविधा अपूर्ण होत्या. शाळेला भव्य अशी प्रयोगशाळा नव्हती. क्रीडांगण, वाचनालय, कुठले खेळाचे साहित्य नव्हते.आमची शाळा मुंबई बोर्डात मोडत होती. त्यामुळे दहावीच्या परीक्षा एकदम कडेकोट व्हायच्या.कॉफी नावाचा राक्षस त्या वेळेस नावाला सुद्धा मुंबईत नव्हता;आणि त्यामुळे शाळेचे निकाल म्हणजे,शाळेचा निक्कालच लावायची.शाळेचा निकाल अगदी पाच सहा टक्के असायचा;आणि शासनाची अशी अट होती ;की किमान चाळीस पंचेचाळीस टक्के निकाल लागावा.तरच शाळेला शासनाचे अनुदान मिळायचे.आमच्या शाळेत दहावीला तीस पैकी एक दोनच विद्यार्थी पास व्हायचे.त्यामुळे शिक्षकांना फार कसरत करावी लागायची.बिचारे शिक्षक तोंड फुटेपर्यंत शिकवायचे.तरी मुलांच्या गळी उतरत नव्हते;तर ते काय करणार? त्यावेळेस इंग्रजी आणि गणिताचे राक्षस मुलांच्या समोर आ वासून उभे राहायचे.या दोन राक्षसांनी किती पिढ्या गिळल्या असतील कुणास ठाऊक? त्यात शिक्षकांचा काय दोष ?त्यावेळेस संपूर्ण पिढी अभ्यास करत नसायची.मुलांनी अभ्यास का करावा आणि दहावी का पास व्हावी हा मोठा प्रश्न होता.? परत दहावी केल्यानंतर पुढे काय? मग शहरात जावे लागे.कॉलेजचा खर्च आई-वडिलांना परवडत नसायचा.त्यामुळे मुलांनी दहावीपर्यंत शाळा शिकावी.असा पालकांचा कटाक्ष.तो पास व्हायलाच हवा असे नव्हे. बाकी काही फार मोठ्या इच्छा नसायच्या.त्यामुळे शाळेचा निकाल जेमतेमच लागायचा.आणि हाच शाळेचा निकाल अनुदान देण्यासाठी अडचणीचा ठरायचा त्यात शाळेत सुविधांची वानवा.शिक्षक काय करणार? मेटाकुटीला येत होते शिवाय हातात पगारही नसायचा.कित्येक दिवस विना पैशाचे जात होते.त्यांच्या घरात काही शिजत असेल का? हा मोठा प्रश्नच होता.की आमचे गुरुजन तसेच तर नसतील झोपत नसतील ना, कारण पाचशे रुपयात काय होत होते ते ही बिचारे तीन चार जण एकत्र राहायचे.आणि दुधाची तहान ताकावर भागवायचे.कारण पैसा.

                 एकदा गंमत झाली.आम्ही नववीत असू.आम्हाला विज्ञान शिकवायला तळले सर होते ते आज आम्हाला अमोनिया वायू कसा तयार होतो. ते तयार करून दाखवणार होते.प्रयोगासाठी वापरण्यात येणारी रसायणे फार जुनी होती.इतर साहित्य होते ते फार जुने. आणि मुदतबाह्य होते. सरांनी सगळे साहित्य मांडले.पुस्तकात सांगितलेल्या सगळ्या कृती केल्या;पण काही अमोनिया वायू तयार झाला नाही.का झाला नाही ते देवालाच माहीत?मग सरांनी आता आठवत नाही.पण,एखाद्या द्रावणात रंगीत फुले टाकली की फुले रंगहीन होतात.हा प्रयोग करायला घेतला.तो ही असफल झाला.मग सरांनी ऑक्सीजन वायू तयार करायला घेतला.तो ही प्रयोग अयशस्वी झाला याचे कारण काय माहिती नाही.पण अख्खा वर्ग सरांना खो-खो हसू लागला.त्या वेळी सरांचा चेहरा बघण्यासारखा होता. त्यावेळी शाळेत काही बेंच वगैरे नव्हते.मुले खालीच बसायची मी पहिल्याच रांगेतला पहिलाच विद्यार्थी,आपल्याला मुले हसतात असे पाहून सरांचा पारा चढला.मग सरांनी माझ्या पासून मुलांना बदडालायला सुरुवात केली.संपूर्ण वर्गातील मुलांना बदडून झाले.तरी काही सरांचा राग शांत झाला नाही.त्यानी पुन्हा माझी बकोटी पकडून पाठीवर दोन चार रट्टे हाणले.मग दुसरा,तिसरा,चौथा.करून पुन्हा अख्खा वर्ग बदडून काढला. तरी मुले हसत होती.मी मात्र काकुळतीला आलो.कारण पुन्हा माझ्याने सुरुवात होणार होती.त्या मुळे मी दात काढायचो थांबलो.मुले मात्र बदडली तरी हसतच होती.पण प्रयोग असफल का झाले.?याचा विचार करण्याची अक्कल कवडीची ही नव्हती.पण बहुदा सारेच रसायने जुने होते त्यामुळे असे झाले असावे.असा तरी माझा समज आहे.पण सरांनी दिला तो मार आयुष्यात शिक्षकाच्या हातातून खाल्लेला शेवटचा मार होता.हा प्रयोग तरी आम्ही कधीच विसरणार नाही. पुढे सरांची जाऊ मी क्षमा मागितली.सरांना ही माला मोठ्या मनाने माफ केले.येथे शिक्षकांना कोणतेच समाधान नव्हते.तरीही सारीच माणसे पोटासाठी काम करत होती.की अनुदान येईल;आणि आपले दिवस बदलतील.अनुदान मात्र येता येत नव्हते. बऱ्याच वर्ष आले नाही त्यामुळे बरेच शिक्षक पुढे आपापला रोजीरोटीसाठी शाळा सोडून शाळेला रामराम करून निघून गेले.नवीन येत होते.पण खूप अडचणी होत्या.सगळ्यात महत्त्वाचे पगार नव्हते.काही शिक्षक तर बिनपगारी होते.मी लहान होतो.पण शिक्षकांच्या व्यथा मात्र कळत होत्या.आज जेव्हा शाळेसमोरून जातो.तेव्हा मला आठवतात ते माझे जुने शिक्षक ज्यांनी कमी पगार घेऊन ही मला घडवले.माझी ही शाळा म्हणजे माझ्या सर्व त्यागी शिक्षकांचे प्रतिक आहे.त्याच शिक्षकांनी आमच्या मनामनात जागृतीची भावना जागृत केली.आणि जागृती विद्यालय हे नाव सार्थक केले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational