सुभाष मंडले

Inspirational Others

4  

सुभाष मंडले

Inspirational Others

शाहीर...

शाहीर...

26 mins
478


           १.


शाहीर.! 

शाहीर म्हंटले की डोळ्यासमोर येतात, 

त्या त्यांना लोकांनी दिलेल्या उपाध्या..

जसे...

राष्ट्रशाहीर...

लोकशाहीर...

शिवशाहीर...

भिमशाहीर...


पोवाडे गावून समाजाचे प्रबोधन करणे आणि त्यातून समाजाला विचारांची दिशा देणे असे सामाजिक आणि ऐतिहासिक काम शाहीर करीत असतात.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे पराक्रम... 

डॉ. भीमराव आंबेडकर यांचे सामाजिक कार्य...

अशा विविध विषयांवर शाहिरी कार्यक्रम सादर केले जातात. 

त्या त्या काळातील ज्वलंत विषयावर समाज प्रबोधन व्हावे यासाठी सुद्धा शाहीर समाजासमोर आपली शाहिरी काव्य सादर करत असतात.

आज आपण अशाच एका शाहिरांबद्दल जाणून घेणार आहोत. कलेचा कोणताही वारसा नसताना ज्यांनी वयाच्या तेराव्या वर्षापासून आपले जीवन कलेसाठी अर्पण केले आणि सर्वत्र 'शाहीर' या नावाने लोकप्रिय असलेले, या शिवाय त्यांनी गावात कुणाचं लग्न लावलेलं नाही, लग्नाचा विधी केला नाही किंवा त्यांच्या पहाडी आवाजात लग्नातील मंगलाष्टका खणखणली नाही, असे चुकूनच एखादं लग्न असेल, असे सर्वांचे आवडते,


'शाहीर खाशाबा मंडले.''


मी त्या दिवशी त्यांना सकाळी सकाळीच म्हणजे नऊच्या सुमारास त्यांना भेटायला गेलो, पण जशी कायमचीच लांब लांबच्या लोकांची त्यांच्याकडे दाढकिडीवर औषध घेण्यासाठी वर्दळ असायची, अगदी तशीच खूप मोठी वर्दळ त्या दिवशी दिसली.

या सगळ्या लोकांच्या गराड्यातून त्यांना जास्त वेळ बसून माझ्याशी बोलायला, गप्पा मारायला वेळ देता येत नव्हता, त्यामुळे ते मला बोलले, "साडेअकरा-बारा वाजेपर्यंत ही अशीच वर्दळ राहणार...सुभाष, तू आसं कर.. दुपारी ये, आपण निवांतपणे बोलू."


______मी काहीच बोललो नाही, मी तसाच तिथं एका खाटेवर पेपर वाचत बसून राहिलो. 

दाढ दुखत असणारे लोक कानावर झाडपाल्याचा बोळा ठेवून सरासरी अर्धा तास तसेच पडून रहायचे. मैदानावर तळवट पसरलेला. त्यावर सकाळच्या उन्हाच्या तिरपीला चहुकडे लोकं कलंडलेली दिसत होती. असे एका वेळी अनेक लोक मैदानावर आडवे झालेले. त्यांना झाडपाल्याचे औषध तयार करून देण्यासाठी शाहीरनानांची माझ्या जवळून सतत ये जा चालू होती. त्यातूनही त्यांनी वेळ काढून अडगळीत ठेवलेल्या कपाटावर.. ट्रंकेच्या तळाशी जपून ठेवलेल्या..पुस्तकावरची जमा धुळ बऱ्याच वर्षांनी उडवली. हे करत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहण्यासारखा होता. जणू आपण कलाकार जीवनातील आठवणींच्या पुस्तकाचं पान न् पान लख्ख करत आहोत.

ते पुस्तक मला वाचायला दिले. पुस्तक वाचण्यात माझा किती वेळ गेला, ते माझे मलाच समजले नाही.


जे जवळपासच्या गावातील असतात, ते सकाळी सुर्य उगवल्यापासून गर्दी करतात आणि जे लांब गावचे आहेत, ते अकरा बारा वाजेपर्यंत पोहचतात आणि औषध घेतात. त्यामुळे सरासरी बारा वाजेपर्यंतच लोकांची वर्दळ असते. नंतर ती पुर्ण थंडावते.

साधारण, साडेअकरा वाजून गेले असतील. शाहीरनाना (लोक त्यांना शाहीरतात्या, शाहीरबाबा, शाहीरनाना असेही म्हणतात. मी त्यांना शाहीरनाना म्हणतो.) झाडपाला कुस्कारून कुस्कारून त्याचे छोटे छोटे गोळे तयार करत होते, असा रोज सकाळी नित्यनेमाने चार पाच तासांचा त्यांचा कार्यक्रम ठरलेला. त्यामुळे हाताला घट्टे पडलेले. पुर्ण सफेद इस्त्री केलेल्या सदऱ्याच्या हातुब्यातून बाहेर, घट्टे पडलेल्या हातांना हिरवा रंग चढलेला. त्यांनी बाहेर टाकीतल्या पाण्यानं हात धुतले आणि धोतराचा एक सोगा हातात धरून सरळ आत घरात माझ्याजवळ येऊन बसले.

माझी पुस्तकाची काही पाने वाचून झाली होती. त्यांना पाहून मी ते पुस्तक हातावेगळे केले आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या.

खूप वर्षांनी इतकं मनमोकळेपणाने आणि निवांत बसून त्यांच्याशी बोलायला मिळालं, त्यामुळे त्यांनी माझी इकडची तिकडची विचारपूस केली. मलाही त्यांच्याबद्दल आणि त्यांनी शाहिरी, कला जीवन जगलेल्या आठवणींबद्दल जाणून घ्यायचे होते. आमच्यात रंगलेल्या गप्पांचा ओघ त्यांच्या कलाकार जीवनातील जुन्या आठवणींपर्यंत पोहचवणे, हे माझं इच्छित होतं. बोलण्याच्या ओघात मी त्यांना विचारले, 

"नाना... तुमचं शिक्षण कितवी पर्यंत झालंय आणि कलेची आवड कशी निर्माण झाली ?"

त्यांनीही आपला जीवनपट अगदी मुक्तपणे सुरुवातीपासून मला उलगडून सांगायला सुरुवात केली.


"घरची परिस्थिती बेताचीच अन् गावात चौथीपर्यंतच शाळा होती, त्यामुळं चौथीपर्यंतचे शिक्षण (हणमंत वडीये) गावातच आणि त्यानंतरचे सातवीपर्यंतचे शिक्षण थोरल्या वडव्याला (वडिये रायबाग) झालं. 

थोरल्या वडव्याला शाळेत जायचं म्हंटल्यावर येरळा नदी पार करून जावं लागायचं.

शिक्षणाची आवड पहिल्यापासूनच होती, पण 'नदीला पाणी आलं, की शिक्षणावरही पाणी फिरायचं.'

त्यात, शाळेला जाताना आमचं पाच सहा जणांचं टोळकं असायचं. नदीला थोडं पाणी असलं, की अंगावरची कपडे पाण्यात भिजू नये म्हणून ती काढायची.. शाळेचं दप्तर, कपडे हातात घ्यायची.. आन् कपडे, दप्तर भिजूनी म्हणून हात वर करून नदी पार करून जायचं. मध्येच त्यातल्या कोणाला पाण्यात पोहायची हुकी आली, की तो हातातली कापडं सरळ पाण्यात बुडवायचा. वल्ल्या कापडामुळं शाळंत जाता येत नसायचं, 


आन् मग काय!.. सगळ्यांनीच डोक्यातला शाळंत जायाचा विचार वाहत्या पाण्याबरोबर सोडून द्यायचा. सगळ्यांनी शाळेची दप्तरं नदी काठावर ढिग मारून ठेवायची आणि तास न् तास त्या पाण्यात पोहत बसायचं. असं खूप वेळ पोहून झाल्यानंतर शाळा आठवायची, पण तोपर्यंत सुर्य डोक्यावर आलेला असायचा. मग काय! आल्या पावली परत फिरायचो. पण इतक्या लवकर घरी गेलो तर घरचे शिर्डी (शेळी) बांधायच्या कासऱ्याने वळ उठेपर्यंत मारणार, या भितीने संध्याकाळी शाळा सुटायच्या टायमापर्यंत नदी काठावर असलेल्या जांभळाच्या झाडावर चढून जांभळं खायची, कुठं बोरीची झाडं असतील, तर दगडांनी बोरं पाडून खायची, अख्खा दिवस हुंदडण्यात जायचा. 

नदीला थोडं जास्त पाणी आसलं, की वाहत्या पाण्याला ओढ जास्त असायची, मग नदी ओलांडून शाळेला जाण्याचा प्रश्नच येत नव्हता, त्यामुळे शाळेची म्हणावी तितकी ओढ राहिली नाही.


आपलं गाव (हणमंत वडीये), जसं पहिल्यापासूनच किर्तन, भजन, प्रवचन, वारकरी संप्रदायाची आवड असणारं गाव आहे, तसं कलेची आवड आणि कलेची जोपासना करणारे गाव आहे.

नारायण मोरे,

बंडा तात्या,

रामभाऊ मोरे (रामभाऊ कंडक्टर),

राजाराम सकटे,

स्वामी,

नानाभाऊ,

हि आणि अशी बरीच मंडळी भजन कीर्तनासोबत कलेच्या माध्यमातून गावात यात्रेला नाटक बसवून लोकांची वाह! वाह! मिळवायची. 

यात्रेनिमित्त बसवलेलं नाटक बघायला मिळावं म्हणून सगळेच लोक गावच्या यात्रेची आतुरतेने वाट बघत बसायचे.

गावकऱ्यांनी वर्षभर शेतात केलेल्या कामाचा शीण या एका कौटूंबिक, जिव्हाळ्याचं नाटक पाहण्याने जायचा. 

नाटक बघायला गावातली लोकं असायचीच, पण लांब लांबची म्हातारी-कोतारी माणसं सुद्धा हौसंनं यायची. रात्रीचं काय काय बायका तर वाड्या वस्त्या वरून येताना लहान-सहान पोरं वाटेनं वडत-लवंडत, आपटत-झपटत घेऊन यायच्या. माणसं सुद्धा बैलगाडी जुंपून बैलगाडीत सगळ्यांना पुरेल अशी ताडपदरी, सोबत अंथरुण पांघरुण घेऊन येत असत. लहान पोरं जास्त वेळ दम काढत नसायची, त्यामुळं त्यांना अगोदरच ऐसपैस जागा बघून अंथरुण पांघरुण टाकून द्यायचं. ज्याला झोप निभत नसेल तो खूशाल आडवा व्हायचा, कुणी बसल्या जागी कलंडून नाटक बघायचा.

__तर अशा साऱ्या रात्रीचं नाटक बघायला आलेल्या लोकांच्या गमतीजमती असायच्या. 


नाटकात काम करणाऱ्या मंडळींनी लोकांच्या मनात मानाचं स्थान मिळवलं होतं, त्यामुळेच गावात प्रत्येक वर्षी सादर होणाऱ्या नाटकाची माझ्यासह कित्येकांच्या मनावर भुरळ असायची.


साधारण; 1962 साल असेल, गावात नवीन नाटक बसवलं होतं. त्यात एक स्त्री पात्र होतं, पण नाटकात काम करणारे सर्वच कलाकार अंगापिंडाने मजबूत असल्याने स्री पात्र शोभून दिसेल असं कोणी मिळत नव्हतं. त्यावेळी तेरा वर्षांचं, एक चुणचुणीत, नाजूक बांध्याचं पोरगं खाशाबा, हे बंडातात्यांच्या नजरेला पडलं आणि त्यांनी ठरवलं, की यालाच आपल्या नाटकात घ्यायचं. 

घरी वडील- अग्नुअण्णा हे धार्मिकतेची आवड असणारे होते. नाटकात काम करणारी सर्व मंडळी भजन, कीर्तन, प्रवचन करणारी असल्यामुळं अग्नुअण्णांनीही विरोध केला नाही. 

मला कलेची आवड पहिल्यापासूनच होती, पण आवड असणं आणि कला साकारणं यात जमीन अस्मानाचा फरक असतो, हे मला ठाऊक होतं, तरीही या सगळ्यांनी सतत प्रोत्साहन दिले आणि मी धाडसाने स्री पात्र रंगवू शकलो. त्यानंतर प्रत्येक वर्षी माझी नाटकातली जागा फिक्स झाली. जसजसे वय वाढत जाईल तसतसे माझं नाटकातलं पात्र बदलत गेले. स्री पात्रावरून सुरू झालेला प्रवास पुरूष पात्रानं पुढे सरकत होता.


शाळा केव्हाच सुटून मागं पडली होती, पण पुस्तकं वाचण्याची आवड शाळेत असल्यापासूनचीच.. त्यामुळं सुरपेटी वाजवण्याबरोबर, कवणं रचने, त्या कवणांना चालीत बसवणे आणि ती कवणं स्टेजवर सादर करणे, या सगळ्या गोष्टी नारुतात्या, बंडातात्या यांच्यासोबतीत आवडीने मी करु लागलो.

स्टेजवर बोलायची भिती हळूहळू निघून गेली होती. बोथट, मॉंड झालेल्या कुऱ्हाडीला इसण्यावर घासल्यावर जशी धार यावी, तशी या शाहिरी कवणांना धार येत गेली.

बाबासाहेबांचं एक वाक्य कुठं तरी वाचलं होतं, " माझी दहा भाषणं तर शाहिरांचं एक गाणं बरोबर आहे" 

त्यामुळं शाहिरी कवणं बसवणं आणि ती सादर करणं हे एक मोठे जबाबदारीचं काम आहे, याची कायम जाणीव होत राहिली. त्यामुळंच हे सगळं माझ्याकडून होत राहिलं. 

पुढं पुढं मला पेलतील न पेलतील अशी सर्व प्रकारची, लोकं आग्रह करतील ती शाहिरी कवणं सादर करत राहिलो, पण ती करत असताना मनापासून आणि अगदी प्रामाणिकपणानं करत राहिलो, कदाचित म्हणूनच मला वाटतंय, लोकं मला 'शाहीर' म्हणूनच ओळखतात."


"तुम्ही पहिल्यापासून गावात नाटक सादर करत होताच, पण मग बाहेर गावांत नाटक कधीपासून करायला लागलात?", मी पुढचा प्रश्न केला.

  

" गावात दरवर्षी नाटक असायचं, त्यावेळी तुफान गाजलेलं नाटक, 'वेडी झाली बाळासाठी'...

  

        २

"या नाटकात मी नवरा, रामभाऊ कंडक्टर

(रामभाऊ मोरे- यांना उत्तम प्रवचनकार म्हणून ओळखतातच, पण ते आटपाडी एस. टी. डेपोमध्ये कंडक्टरची नोकरी करत होते, त्यामुळे जास्त करून त्यांना लोक 'रामभाऊ कंडक्टर' या नावानेच ओळखतात.) 

यांनी माझ्या बायकोचं म्हणजे बाळाच्या आईचं काम केलं होतं. बंडातात्या सासरा आणि राजाभाऊ सासू अशी चार मुख्य पात्रं होती. या पात्रांभोवती नाटकाचं कथानक फिरत रहायचं. 

रामभाऊंनी बाळासाठी वेडी झालेल्या-आईचं काम इतकं एकरूप होऊन केलं होतं, की लोकांच्या मनातून वेड्या आईची छबी जाता जात नव्हती. काही लोकं अजूनही सांगतात, 'ज्यांनी नाटक बघिटलंय, ते झोपेत सुद्धा चावळत उठायचे-' तिचं बाळ, तिला परत द्या.' म्हणायचे...


बाहेर गावांहून लोकं नाटक बघायला यायची. ती लोकं नाटक बघून त्यांच्या त्यांच्या गावात जाऊन आमच्या नाटकाची प्रसिद्धी करायला लागली, त्यामुळं परगावची लोकं त्यांच्या गावात नाटक सादर करण्यासाठी विनवण्या करू लागली. काही प्रतिष्ठित, ओळखीच्या लोकांच्या आग्रहाखातर आसपासच्या खेड्यात जाऊन आपल्या गावात नाटक झालं, की पुढचे चार दोन दिवस नाटकाचा प्रयोग त्या त्या गावात करू लागलो. थोरल्या वडव्याचे शेळके गुरुजी- त्यांना कलेची आवड होती, ते देखील अनेक प्रयोगांत भाग घ्यायला लागले. याचा परिणाम असा झाला, की काही गावचे लोक त्यांच्या गावात नाटक सादर करण्यासाठी सुपारी घेऊन यायला लागले. 


नाटकात काम करणारी सगळी माणसं गावातलीच होती. दिवसभर आपापल्या शेतात काम करणारी.. फक्त हौस आणि कलेची आवड म्हणूनच काम करणारी होती. पैशासाठी नाटकात काम करणं हे अनेकांना पसंत नव्हते, शिवाय वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन प्रयोग सादर करायचे म्हणजे अनेक दिवस नाटकांसाठी वेळ द्यावा लागेल. मग शेतात काम कुणी करायचं!.. आणि घरच्या लोकांनी खायचं तरी काय!..


तुला तर माहीतच आहे, की एक तीन तासांचं नाटक बसवायचं म्हंटलं म्हणजे एक दिड महिना अगोदरच नाटकाच्या तालमी सुरू व्हायच्या. 


वयोमानानुसार काही माणसं थकलेली, तर काहींना शेतातल्या कामातून वेळ मिळेनासा झालेला. काहींनी वेळेअभावी तर काहींनी घरगुती कारणांमुळे नाटकाला बगल दिली, पण पुढं नवीन पिढीनं नाटकात भाग घ्यायला सुरुवात केली. ज्यांचा कलेशी तुणतुण्याच्या तारे इतकाही संबंध नाही, पण आवड आहे, अशी काही पोरं सुद्धा हौसेनं नाटकात भाग घेऊ लागली. नव्या पिढीत बबन (लेखक- उत्तम डी. मंडले) नवीन नवीन नाटकं लिहू लागला, 

आत्मा (आत्माराम), 

पका(प्रकाश), 

पंढरीनाथ, 

कुंडला(कुंडलिक),

विठ्ठल, 

राम, 

हाणमा (हणमंत),

संभा (संभाजी),

नानाभाऊ जाधव

ही आणि अशी बरीच मंडळी काम करायला सुरुवात झाली.

बाहेर गावच्या नाटकाच्या प्रयोगासाठी आम्ही मोजकीच माणसं तयार झालो. सुपारीची रक्कम नाममात्र असायची. सुपारीच्या पैशात चहा पाणी, गाडी भाडं, नाटकासाठी लागणारं किरकोळ सामान आणि हार्मोनियम वाजवणारा. तेवढंच भागायचं.


बाहेरगावी कार्यक्रम करायला गेलो, की लोकं विचारायची, 'तुमचा तमाशा हाय का आरकेसट्रा ?'

मग आम्ही म्हणायचो, " आमचं नाटक हाय."

तरीही लोकांना शंका यायची. लोकं विचारायची, 'तमाशा न्हाय.. आरकेसट्रा न्हाय.. मग ह्यो वाघ्या मुरळीचा कार्यक्रम तर न्हाय नव्हं!..पण, तुमच्यात मुरळी कुठं दिसत न्हाय ती...'


खरं सांगायचं, तर आम्ही ह्यातल्या कुठल्याच प्रकारात मोडत नव्हतो. आमच्यात रामभाऊ कंडक्टर आणि शेळके गुरुजी शिवाय दुसरं कुणी जादा शाळा शिकलेलं नव्हतं. हिच मंडळी पुढं हुन- 'आमचं कलापथक हाय', म्हणून सांगायची. 

अशा तऱ्हेनं आमच्या नाटकाचं कलापथक झालं. कलापथकाला पुढं


'आर्शीवाद कलापथक'


हे नाव दिलं आणि पुढं या नावानेच कार्यक्रम करत राहिलो.

प्रत्येक वर्षी यात्रंखात्रंला छोटे छोटे प्रयोग आसपासच्या खेड्यात जाऊन करत होतो.

आपला दिलीप (कै.फौजदार, दिलीप (आप्पा) मंडले) हा पोलिस हवालदार म्हणून मिरज पोलिस स्टेशनला होता.

तिथल्या पोलिस चाळीत प्रत्येक वर्षी गणपती उत्सव थाटामाटात साजरा केला जातो. अशाच एका गणेश उत्सवाच्या टायमाला दिलीपआप्पा तिथल्या पोलिस लोकांना म्हंटला, "आमचे चुलते शाहीर आहेत, त्या सगळ्यांचं एक कलापथक आहे. त्यातलं नाटक एकदा बघाच, मग तुम्हाला समजेल त्यांची कला."


मिरजेच्या पोलिस चाळीत दरवर्षी कोल्हापूरवाल्यांचा मोठा कार्यक्रम ठरलेला असायचा, पण दिलीप च्या सांगण्यावरून तिथल्या पोलिस लोकांनी आमचा कार्यक्रम घ्यायचं फिक्स करून टाकलं. हे ठरलेलं दिलीपनं गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी गावात येऊन आम्हाला सांगितलं. अगदी पुढच्या तीन चार‌ दिवसानंतरचीच तारीख ठरलेली. 


रुटींग बसल्यालं असलं, की तयारी करायला वेळ लागत नाही, पण आपापल्या कामानिमित्त हिकडं तिकडं पांगलेल्या लोकांना एकत्र आणायचं. त्यांची तालीम घ्यायची, म्हणजे लय जिकीरीचं काम! या सगळ्या खटपटीत आम्हाला तालमी साठी दोन दिवसच मिळाले.

त्यात पहिल्यांदाच मिरजेसारख्या मोठ्या शहरात आमचा कार्यक्रम होणार होता. त्या अगोदर स्त्री पात्रासहीत सगळी पात्रं गडीच करत होते,

पण शहरात कार्यक्रम होणार म्हंटल्यावर नाटकात बाई पाहिजे!.. म्हणून पलिकडच्या वडव्याची,

'शकुंतला पवार' 

ही आर्केस्ट्रात नटी म्हणून काम करत होती. तिला कार्यक्रमासाठी आणायचं ठरलं. तिला आणायचं म्हंटलं म्हणजे जवळ पैसे पाहिजेत. त्यावेळी पैशाची थोडी चणचण असायची. कलापथकासाठी 'कुणाकडं पैसे मागायचं म्हणजे मरण परवडलं.'अशी गत असायची. आम्ही तिला कसलेही पैसे न देता मिरजेच्या कार्यक्रमाचं सांगून आलो. त्यावेळी तीने कोणतीही अट न घालता आमच्या कलापथकात नटी म्हणून काम करायला होकार दिला, ती त्यावेळी नाटकासाठी हो म्हणाली नसती, तर ऐनवेळी चांगलीच धावपळ उडाली असती. पुढं ती शेवटपर्यंत आमच्या कलापथकाचाच एक भाग बनून राहिली.

शकुंतला सोबत अलीकडच्या काळात राधा आणि साहेबराव ही पलिकडच्या वडव्याची कलाकार म्हणून नवरा बायकोची जोडी काही ठराविक कार्यक्रमासाठी आम्ही आणायचो एवढंच.


तर नाटक बघायला येणाऱ्या पब्लिकचा अंदाज यावा, म्हणून आम्ही कार्यक्रमा दिवशी थोडं लवकरच मिरजेत पोहोचलो. 

आम्ही पोहचण्याअगोदरच स्टेज चांगलंच सजवून ठेवलेलं. समोर लेडीजसाठी एक आणि माणसांसाठी एक भाग, असे लाकडी बांबू ठोकून दोन भाग बनवलेले. त्या बांबूपासून शेवटच्याकडंपर्यंत रस्स्या बांधल्याल्या आणि मधला भाग येण्याजाण्यासाठी मोकळा ठेवलेला. लोकांची गर्दी वाढत जाईल तसतसा गोंगाट वाढत चाललेला. आम्ही सगळीच थोडं धास्तावलेलो होतो, पण 'कार्यक्रम झक्कासच होणार' याची खात्री होती. 


पण फक्त सुरवातीला मनाला थोडी रुखरुख लागली होती, 'नाचगाण्यासाठी अजून दोन तीन नट्या आणल्या असत्या तर बरं झालं असतं.'


कार्यक्रम सुरू झाला. मी खड्या आवाजात कवण म्हणायला लागलो,


"गुणी आहे बायको माझी भोळी भाबडी,

घेतो तिला नायलॉनची भारी ती साडी,

दिसेल जणू शंकर पार्वतीची जोडी,

संसारात भरती त्या साखरेची गोडी..."


अशी फक्त शाहिरी तडाख्याची सुरुवात ऐकूनच वातावरणातला गोंगाट शांत झाला आणि लोकांनी टाळ्या आणि शिट्या वाजवून वातावरण दणाणून सोडलं. तशी अंगातली उर्मी अजूनच उसळली.


शाहिरी कवणं झाली. गण झाला आणि एका गीतावर शकुंतलाचा नाच झाला. एक गीत झालं आन् लोकांनी कार्यक्रम थांबवला. त्यातले तीन चार कार्यकर्ते स्टेजच्या पाठीमागं आले आणि बोलले, "हे नाच गाणं, बंद करा. आम्ही नाचगाणी बघायला आलेलो नाही."


आमच्यात कुजबुज सुरु झाली. ह्या अचानक घडलेल्या प्रकारानं मनातली ऊर्मी ढासळून पडली. मनात थोडी धाकधूक सुरू झाली,' ह्या लोकांनी आतापर्यंत कार्यक्रम कसातरी निभावून घेतला, तसं पुढं निभावून घेणार का नाहीत, कुणास ठाऊक!..'


तोपर्यंत एक कार्यकर्ता बोलला, 'आम्हाला तुमची नाचगाणी बघायची नाहीत, नाचगाणी बघायची असती, तर कोल्हापूरची एखादी पार्टी आणली असती, न्हाय तर सिनेमातल्या एकापेक्षा एक सरस नट्या नाचवायला आणल्या असत्या, तुमचा कार्यक्रम कशाला ठेवला असता!'

आम्ही बुचकळ्यात पडलो. आता करायचं काय!..

तोपर्यंत एक कार्यकर्ता बोलला, "आम्हाला बाकी काही बघायचं न्हाय. हे सगळं बंद करा आणि थेट तुमच्या नाटकाला सुरूवात करा."


दिव्याच्या वातीची काजळी झाडल्यावर अंधारातला अंधुकपणा जाऊन लख्ख उजेड दिसायला लागतो, तसं आमच्या सगळ्यांचं झालं. काळजावरचा भला मोठा दगड बाजूला सारल्यागत झालं.


तिथं जायाच्या अगोदर, 'अजून दोन-तीन नट्या आणायला पाहिजे होत्या, अशी जी मनात चुटपुट होती, ती त्या माणसांच्या बोलण्यानं बंद झाली.

लोकं नुसती नाचगाण्याचीच हौशी नसत्यात, कलेची जाण असणारी, कलेची आवड असणारी माणसं सुद्धा असत्याती, हे समाजलं.

आन् मग काय!.. ज्याच्यात आमचा हातखंडा होता ते म्हणजे आमचं 'नाटक'... मनातल्या नरमाईला झटकून टाकलं आन् जोमानं पुढच्या तयारीला लागलो.

मैदानावर पब्लिक मावत नव्हतं, इतकी गर्दी! 

नाटक तीन तास चाललं. मधल्या वेळेत लोकांनी मुतायला सुद्धा जागा सोडली नाही, कारण एकदा का जागा सोडली, की पुन्हा त्या जागेवर बसून नाटक बघायला मिळणार नाही, मग लांबूनच नाटक बघावं लागेल...


अशा तऱ्हेनं मिरजेतला कार्यक्रम जोमात झाला.


"मिरजतलं नाटक झालं आन् गावोगावच्या कार्यक्रमासाठी सुपाऱ्यांचा ओघ सुरू झाला. 


गणेश चतुर्थीनिमित्त मिरजेत कार्यक्रम झाला आन् पुढच्याच महिन्यात दसऱ्याला घरणिकीच्या कार्यक्रमाची सुपारी आली. दसऱ्याला घरणिकीला रात्री कार्यक्रम झाला आणि दुसरी दिवशी सकाळी तिथंच त्या गावच्या लोकांनी जमून ठरवलं, की प्रत्येक वर्षी दोन खेळ करायचे. यात्रंला आणि दसऱ्याला, असे पुढच्या सलग दहा वर्षांसाठी करार करायचा आणि तो करार केला सुद्धा. 


आमच्या मनात सुरवातीला धाकधूक होती, की आमचं बेभरवशाचं कलापथक; दहा वर्षांसाठी करार कसा करावा! पण जे व्हायचं हाय ते होऊदे, असं ठरवलं आणि काम करत राहिलो. प्रत्येक वेळी बबन नवीन नाटक लिहायचा. वर्षाला नवीन दोन नाटकं लिहायची. ती बसवायची. तालमी करायच्या. कलेची चटक गप्प बसून देत नव्हती, त्यामुळंच ही नाटकाची तारेवरची कसरत सलग दहा वर्षे आम्ही करत राहिलो.

घरणिकीला प्रत्येक वर्षी यात्रंला आणि दसऱ्याला असे सलग दहा वर्षे कार्यक्रम करत होतोच, पण त्या दरम्यान, आसपासच्या गावातल्या लोकांना तर आमच्या कलापथकाची चटकच लागली होती.


एके वर्षी काय झालं, अगोदरच ठरल्याप्रमाणं यात्रेनिमित्त घरणिकीला रात्रीचा कार्यक्रम झाला. लांब पल्ल्याच्या गावाला गेल्यावर रात्रीचा कार्यक्रम झाल्याझाल्या पडदा सोडवून ठेवायचा, लाईटचं सामान, बाकीच्या सगळ्या वस्तूंची आवराआवर करून ठेवायची आन् सकाळ होईपर्यंत तिथंच कुठंतरी आडवं व्हायचं आन् सकाळ झाली, की लवकरच घरी परत फिरायचं, असं आमचं नियोजन असायचं. 

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच आटपाडी तालुक्यातल्या झऱ्याची (झरे) चार सहा लोकं येऊन आमच्या जवळ येऊन बसली. 'आमच्या गावात आज रात्रीचा कार्यक्रम तुमचाच झाला पाहिजे' म्हणून अडून बसले. 

आता काय करायचं! आता झाली का पंचाईत..

एकतर सकाळची आंघोळ झाली नव्हती, आदल्या दिवशी कार्यक्रमासाठी धुतल्याली, इस्त्री केल्याली चांगली कापडं घालून आलो होतो आन् त्या कपड्यावरच सकाळपर्यंत लोळलो होतो. त्यामुळं सगळ्यांचीच कापडं न्हाय म्हंटलं तरी थोडी मळल्यालीच. नाटकाच्या पात्रासाठी जी कापडं होती, ती नाटकापुरती वापरता येत्याली, पण बाकीच्या टायमाला आपल्या आंगच्या कापडावरच वावरावं लागणार.

मळक्या कापडावर कार्यक्रम करायचा तरी कसा! 


लोकं आपल्याला न्हाय, तर आपली कला बघून आपल्याला न्यायला आलेत आन् आपल्यात कला हाय म्हणून लोकं इतक्या लांबून आपल्याला त्यांच्या गावात येण्याचं निमंत्रण देत्यात, न्हाय तर आपल्याला विचारायला कशाला आले असते!

आन् येत नाय म्हणून सांगितले, तर तो त्यांचा नाही, तर आपल्या कलेचा अपमान होईल, माणसाच्या अंगात कला भिनली, की त्याला बाकी काही दिसत न्हाय आन् सुचतबी न्हाय. तो कला नेईल तिकडे तो आपोआपच व्हात राहतो. मग आमचा अंगावरच्या मळक्या कपड्यावर तसाच पुढचा झऱ्याकडचा प्रवास सुरु झाला.


दुसऱ्या दिवशी झऱ्याचा कार्यक्रम झाला, तिसऱ्या दिवशी लगेच आटपाडीत आणि चौथ्या दिवशी खानापूरला, असा सलग चार दिवस आमच्या कार्यक्रमाचा सपाटा सुरू होता. सुपारी घेऊन आलेल्या लोकांना असा सलग कार्यक्रम करायला नाही म्हंटलं, तरी लोकं आयकायची न्हायती. आमच्या नाटकासाठी लोकं अक्षरशः वेडी झाली होती.


आम्ही न्हाय म्हंटल्यावर, लोकं काय करणार हायती!.. पण काय काय लोकं, 'आमच्या गावात तुमचा कार्यक्रम झालाच पाहिजे, न्हाय तर तुमचं कलापथकाचं सामान आमच्या ताब्यात घेऊ आणि ते सामान आमच्या गावात कार्यक्रम झाल्यानंतरच तुमच्या ताब्यात देऊ.' असा दम द्यायची. त्यात त्या लोकांची नाटकासाठीची ओढ, तळमळ दिसायची, मग पर्यायच उरायचा न्हाय. जावंच लागायचं.


हा सगळा प्रवास बैलगाडीनं होता. ज्या गावात कार्यक्रम आसंल, त्या गावात कार्यक्रमा दिवशी लोकं गेल्या गेल्या चहा पाणी देत. 

संध्याकाळी तापल्या तव्यावर थापल्याल्या भाकरी-कालवण आणून देत. लय करुन आमचा कार्यक्रम कुठल्याही गावच्या ऊरूसा दिवशी असायचा, त्यामुळं त्या दिवशी सगळीकडं सकाळी पुरणाच्या 

पोळ्या बनवल्याल्या असायच्या, त्याच पोळ्या संध्याकाळी गोड मानून शेक, भात गुळवण्या संगं खायाच्या आन् रात्रभर जागून काढायची. लय खाऊनबी चालायचं न्हाय. अर्ध्या अर्ध्या पोटानं उठायचं, न्हाय तर झोप आलीच म्हणून समजा.

सकाळचं प्वॉट खपाटीला गेल्यालं असायचं, मग सकाळचं ती लोकं जे खायला देतील ते सडकून हाणायचं. रात्री नाटकात केलेली भूमिका लोकांच्या मनात घर करून राह्याची, त्यामुळं काही काही लोकं जेवायला घरी बोलवायची. 

त्या गावातल्या बायका भाऊ दादाच्या नात्यानं आपल्या घरचंच मानून सकाळचं तिथनं निघताना गरम गरम थापल्याल्या भाकरी आणि सोबत चटणी फडक्यात बांधून द्यायच्या. आम्ही मग ऊन डोक्यावर येईपर्यंत कधी चालत, कधी बैलगाडीत बसत प्रवास करत राह्याचो. रस्त्यानं जाताना रानात कुठं पाण्याचा चेंबर चालू दिसला आणि सावलीचं झाड दिसलं, की त्या झाडाखाली सगळे जाऊन बसायचो. बसून चटणी भाकरीचं जेवण घास घास खायचो आणि परत पुढचा प्रवासाला लागायचो. तर सगळं आसं चालायचं...


खानापूरला कार्यक्रम करायचं ठरलं होतं, पण असं सलगच्या दिवसात, तेही अशा ऐनवेळी करायचं मनात नव्हतं. त्यावेळी रामभाऊ कंडक्टर हे आटपाडी डेपोला कंडक्टर होते, त्यांच्या डेपोतल्या लोकांपर्यंत बातमी पसरली होती, की रामभाऊ हे वेड्या झालेल्या आईचं खूप छान काम वटवतात. म्हणून मग तिथल्या लोकांनी आमच्या कार्यक्रमासाठी रामभाऊकडे आग्रह केला, मग मात्र आम्हाला नाही म्हणता आलं नाही. तीन दिवस झोपेचा पत्ता नव्हता, रोज दिवसा चालायचं अन् रात्री कार्यक्रम करायचा. पार थकून गेलो होतो, तरी सुद्धा आम्ही तो त्या दिवशीचा प्रयोग चांगल्या पद्धतीनं केला.

मला आठवतंय, त्यावेळी आम्हाला बक्षीस म्हणून मिळालेलं एकशे पन्नास रुपये जमा झाले होते. त्यावेळी दिडशे रुपये म्हणजे आमच्यासाठी लय मोठ्ठी रक्कम होती...


आणि हो, खानापूरच्या प्रयोगादिवशीची गंमत राहिलीच की!...


खानापूरच्या यात्रेला कलापथक, कोल्हापूरच्या पार्ट्या, तमाशा हे सगळं प्रत्येक वर्षी असायचंच आणि त्या ऑर्केस्ट्रात, तमाशात काम करणाऱ्या कलाकार मंडळींच्या जेवणाची सोय ठरलेल्या खानावळीत केलेली असायची. आमच्यासाठी सुद्धा जेवणाची व्यवस्था त्याच खानावळीत केलेली. दोन तीन दिवस चालून सगळेच थकल्यालो आणि मग मी, आत्माराम, प्रकाश, नानाभाऊ, राजाराम, बबन अशी आठ दहा जण ओळीनं जेवायला बसलो. 


खानावळीत चपात्या लाटणाऱ्या बायकांना नेहमीप्रमाणं वाटलं होतं, की 'ही आरकेस्ट्रात काम करणारी माणसं! त्यांचं नाजूक खाणं. खाऊन खाऊन किती खाणार! दोन, नाही तर तीन चपाती.. लय झालं तर चार.. पाचवी चपाती खाणं म्हणजे शेडीवरनं पाणी जाण्यासारखं.', 

अशी त्यांची समजूत होती, पण आम्ही सगळीच जण रोज रानात कष्टाचं काम करणारी, आडदांड शरीराची आणि जेवणाच्या बाबतीत मागं पुढं न बघणारी, जेवायला ताट असणारी होतो. पहिल्यांदा सगळ्यांच्या ताटात दोन दोन चपात्या दिल्या. पुन्हा सगळ्यांनी दोन दोन चपात्या मागवल्या. चपात्या लाटणाऱ्या बायकांना वाटलं,'झालं यांच जेवण.' पण कुणीच बसलेल्या जागेवरून उठला नाही. मग पुन्हा बायकांनी थोड्या चपात्या लाटल्या आणि निवांत झाल्या.

पण तरीही कुणी जेवणाच्या ताटावरून उठायला तयार नाही. पुन्हा खानावळीच्या मालकानं बायकांना, 'या कलाकार मंडळींचं जेवण होत नाही, तोपर्यंत चपात्या लाटणं बंद करू नका' म्हणून सांगितले. मग सगळेच हाताच्या बाह्या मागं सारून जेवणावर तुटून पडलेले. चपात्या लाटणाऱ्या बायका आळीपाळीने आम्हा जेवण करणाऱ्यांना बघायला बाहेर यायच्या आणि पडद्याच्या आडोशानं बघायच्या. त्यांना सुद्धा वाटलं असेल, 'हे नेमके कलावंतच हायेत, की राक्षस!...'


बायका चपात्या लाटून थकल्या, तरी आमचं जेवण चालूच. एका एकानं दहा दहा, बारा बारा, पंधरा पंधरा चपात्या हांटल्या. जेवण झालं. आम्ही सगळीच जेवण उरकून येताना मागं बायकांचं कुजबूजनं कानावर पडलं, त्यातली एक बाई म्हणाली सुद्धा, 


"आसली राक्षसासारखी खाद आसणारी माणसं, म्या आजतागायत कुठं बघिटली नव्हती."


उपाशी माणसाला कशाची आल्या लाज!..


कोण काय म्हणंल, याकडं लक्ष न देता पुढ्यात येऊन पडेल ते मुकाट्याने दामटत राह्यचं, येवढंच आम्हाला ठावं. 'प्वॉट भरल्यावरच कोण काय म्हणतंय याकडे लक्ष जातं, तोपर्यंत न्हाय...'"


शाहिर नाना इतकं बोलून थांबले आणि नजर खाली जमिनीवर स्थिर केली. कदाचित, मला हे सारं सांगताना तो काळ त्यांच्या डोळ्यासमोर तरळून गेला असेल. ते ज्या उत्साहाने सांगत होते, त्यावरून असे वाटत होते, की ही घटना कालचीच आणि ती आज मला सांगत आहेत.


ते बोलत होते आणि माझ्या नजरेसमोर तो काळ, तो प्रसंग जसाच्या तसा उभा रहात होता.


त्यांची एकाग्रता भंग करून मी पुढचा प्रश्न विचारला, " नाना, असं कधी झालंय का, की 'एखाद्या ठिकाणी तुमचा कलापथकाचा कार्यक्रम आहे आणि तिथं तुम्ही आळस करून कार्यक्रमाला गेलाच नाहीत.' नाहीतर, 'मनाला येईल तेव्हा जायचं, मनाला येईल तेव्हा नाही जायचं. असं कधी केलंय का?

       ४.

"..आस्सं कव्वाच झालं न्हाय, की कुठल्या प्रयोगाला मी गेलो नाही. 'माणसाच्या अंगात कलेची गोडी भिनली, की त्याला जा म्हणून सांगावं लागत न्हाय, त्याची पावलं आपोआपच तिकडं वळत्याती. मग त्याला बांधून ठेवलं तरी सुध्दा.' 


तुला सांगायचं म्हंजी, आमचा आर्वी ला कार्यक्रम होता आन् आम्ही कार्यक्रमासाठी बैलगाडी जुंपून इथनं दुपारचंच निघाल्यालो. बैलगाडीत पुढच्या बाजूला कलापथकाचं सगळं सामान बसवल्यालं आन् मागच्या बाजूला चार पाच जणांना बसता येईल इतकी जागा होती; त्यात आम्ही दाटीवाटीनं बसल्यालो. वर उन्हाचा नुसता रक हुता.


असल्या उन्हाच्या रकीत बाकीचे आळीपाळीनं रस्त्यानं चालत होते. जाताना वाटेत एक वढा (ओढा) लागला. वढ्यात थोडं पाणी होतं, ते पाणी बघून उन्हाच्या धगीनं घामाघूम झालेले बैलगाडीतले एक दोघं वढ्याच्या अलीकडच्या काठावर हातपाय धुवायला, तोडावर पाणी मारायला उतरले. काहीजणांनी खांद्यावरचं टावेल पाण्यात बुचकाळून काढलं आन् पिळून डोक्यावर घेतले, 'तेवढीच उन्हाची झळ कमी लागंल म्हणून.' 


वढा वल्डून वढ्यातनं वर निघताना मोठा चढ हुता. आम्ही बैलगाडीत मागच्या बाजूला असल्यामुळं आम्हाला काय माहित, की पुढं चढाला एका बाजूनं घसरट हाय ते. बैलगाडी हाकणाऱ्यानं तशीच एका अंगानं बैलगाडी रेमाटली. 

मग काय, उलाटली बैलगाडी!.

बैलगाडी उलाटल्यावर बैलगाडीतल्या सगळ्या सामानसकट आम्ही रस्त्यावर...


तुला सांगायचं म्हंजी, कुणी बघू नि (बघू नये) अशी आमची अवस्था झाली होती. आमचं सगळं कलापथकच रस्त्यावर इस्काटल्यालं. 

बरंच्या बरं माझ्याशिवाय कुणाला जास्त लागलं न्हाय. एक दोघांना थोडं खर्चाटून मुक्का मार लागल्याला, पण माझ्या गुडघ्याला निबार मार बसल्याला.

पण काय न्हाय, कापडाचं चिरगुटं गुडघ्याला बांधलं आन् तसंच लंगडत लंगडत वढ्यातनं वर गेलो.

बाकीच्यांनी माझ्या गुडघ्याला लागल्याली जखम, त्यातनं निघायला लागल्यालं रगात बघितलं आन् हाबकून गेले. सगळ्यांच्या पुढं एकच प्रश्न, 'आता काय करायचं...?' 

कार्यक्रम करायचा तर ठरलाय, त्यामुळं कायबी करून गेलं पाहिजे, पण आसं इतकं गुडघ्याला लागल्यालं असताना सुदीक ह्यास्नी म्हणजे मला पुढे कसं न्यायचं.. आन् कार्यक्रमासाठी घेऊन गेलं तर अशा अवस्थेत यांना स्टेजवर उभा राहता येणार हाय का ?.. त्यापेक्षा यांना माघारी पाठवूया, घरी गेले तर दवापाणी तरी करता येईल, असा सगळ्यांचा विचार...


" शाहीर, तुम्ही आसं करा. तुमच्या गुडघ्याला लय लागलंय, तुम्ही माघारी फिरा, आम्ही जसा जमेल तसा ह्यो आर्वीचा कार्यक्रम करू, हाय त्या कलाकारांमध्ये पार पाडू." , अशा सगळ्यांनी मिंनत्या (विनंती) करून बघितल्या, पण मी माझ्या निर्णयावर ठाम राहिलो, 

'पाय मोडून पडला, तरी चालंल, पण कार्यक्रमासाठी जाणारच, माघारी फिरणार नाय.'

आसं ठरवून मी बैलगाडीत बसलो आन् सगळ्यांच्या संगं पुढचा प्रवास चालू ठेवला. वाटेत निरगुडीच्या झाडाची एक फांदी मोडून घेतली; चालायचं म्हंटलं तर त्या काठीच्या आधाराने चालता येईल. तेवढाच आधार...


तर असं करत आम्हीं एकदासं आर्वीत पोहोचलो, त्या टायमाला नुसताच दिस मावळला होता. आमच्या कलापथकाच्या कलाकारांच्या थांबण्याची व्यवस्था मराठी शाळंच्या वरांड्यात केलेली. गेल्या गेल्या त्या गावातल्या मंडळींनी किटली भरून चहा आणला. एक कळशी भरून पाणी, त्यासंगं पाणी प्यायला तांब्या हे आम्ही तिथं पोहोचायच्या आधीच आणून ठेवल्यालं. चहा पाणी झालं आन् मराठी शाळंच्या वरांड्याला लागून पुढंच स्टेज होतं, तिथं पडदा बांधायचं, लायटिंगची व्यवस्था करायची, अशी किरकोळ किरकोळ काम उरकून घ्यायला सुरुवात केल्याली, पण मी आपला शाळंत मास्तरला बसायला लोखंडी खुर्ची होती, त्या खुर्चीवर तसाच बसून राहिल्यालो. 

आधीच चार पाच तासांचा प्रवास करून गेल्यालो, त्यात दुष्काळात तेरावा महिना म्हणून गुडघ्याचं दुखणं वाढल्यालं. गुडघ्याला लागलं, त्या टायमाला रगात गेलं आन् कापाड बांधल्यावर काय टायमानं रगात थांबलं, पण लागल्यावर जी कळ आली होती, ती त्या टायमाला कशी तरी सोसली, पण सांजच्या टायमाला पाय टम्म सुजल्याला. दुखण्याची कळ वाढतच होती. उठून चालता येईना ना मांडी घालून बसता येईना, अशी अवस्था झालेली, त्यामुळं कळ सोसून तसाच खुर्चीवर बसून राहिलो होतो.


गावात कलापथक आलंय म्हंटल्यावर आम्हाला बघायला लोकांची वर्दळ सुरू झाली. सांजच्याला दिस मावळल्या पासून कडूस पडेपर्यंत लोकं आम्हाला बघायला येत होती. आमच्यातल्या सगळ्यांना बघून, भेटून, विचारपूस केल्यानंतर लोकं विचारायची, 'तुमच्यात शाहीर कोण हाय ?' मग आमच्यातले माझ्याकडे बोट दाखवून म्हणायचे, 'तेऽऽ बघा. लोखंडी खुर्चीवर पाय वाकडा करुन बसलेले हायत, ते शाहीरच हायत.'


लोकं माझी अवस्था बघून जायची आन् गावात जाऊन सांगायची. पुन्हा तीच लोकं बाकीच्या चार सहा जणांना घेऊन माझ्याकडं यायची. असं करत करत लोकांची वर्दळ 'नेमके, शाहीर कोण आहेत ?' हे बघायला यायला लागली. लोकं राहुन राहुन वरचेवर येऊन विचारायची, 'शाहीर कोण आहेत...!, शाहीर कोण आहेत...!'


'आता झाली का पंचाईत!' पाय सुजलेला कुणाला समजू नि, म्हणून मी आत्तापर्यंत जे दडवत होतो, ते लोकं उ उघडं करून बघत होते. 'आत्ता रं काय करायचं..!' पण काय न्हाय, एकदा का ह्यो कार्यक्रम झाला, म्हणजे गुडघ्याचं काय व्हायचं हाय, ते होऊदे... बघूया गुडघ्याच्या दुखण्याची कळ माझ्यावर वरचढ ठरतेय, की माझा कवणं म्हणायला आवाज वरचढ ठरतोय, अशी मनाला आट्टण लावली आन् रात्री कार्यक्रमाला स्टेजवर कवण म्हणायला उभा राहिलो. 


आन् कवण म्हणायला सुरुवात केली... ..थांब.. हं.."


इतकं बोलून शाहिर नानांनी तीन ते चार सेकंदाचा वेळ घेतला आणि अक्षरशः तो क्षण स्मृती पटलावर उमटवून माझ्यासमोर कवण म्हणायला सुरुवातही केली.


ऐक,

" होता शेतकरी सारा सुखी त्यावेळा,

  नव्हता आळस ठावं कोणाला.

  आनंदानं राबती शेताला,

पावसाची चिंता नव्हती आम्हाला.

जर पावसानं घोटाळा केला,

अन् आव्हान देऊन त्या वरुणाला,

दंड ठोकून उभे शेताला,

एका दिवसात खणून विहिरीला,

पाजीन मग पाणी साऱ्या शिवाराला.

चढे मग जोर जितराबाला,

हिरवंगार...


धान्याच्या ना ना जाती,

सांगू मी किती,

झळके शिवार..

सांगतो ऐका जात धान्याची,

तऱ्हा लय न्यारी हरबऱ्याची,

ऊस अन् मका काळ्या उडदाची,

पांढऱ्या तुर मुग मटकीची,

चाखावी बहार शेंगदाण्यातली.

सुबत्ता सारी भाजीपाल्याची,

साऱ्या मुलखाला...

नाही आळस ठावं कोणाला न्

सारी राबती आनंदानं शेताला..."


ह्या कवणाच्या सादरीकरणाने क्षणभर का होईना, पण त्यांनी मला हिरव्यागार शिवाराची सफर घडवून आणली, त्यासोबत माझ्या मनावरची मरगळही झटकून टाकली..


शाहिरनानांचा उत्साह तर ओसंडून वाहत होता. त्यांचा उत्साह पाहून माझ्या मनाला अजूनच मोहर फुटला. मला जणू चटकच लागली, मी मग अजून एखादं गीत ऐकायला मिळतंय का ते पहात होतो, तितक्यात त्यांनीच दुसरं एक कवण म्हणायला सुरुवात केली,


" गडे दुनियेची दौलत सारी,

बघ पिकलीया माझ्या शिवारी. ||धृ||

रातदिवस राबून कसली,

आली भरात अन् मुसमुसली,

आज आनंदानं बघ हसली,

वर आकाश उधळीत लाली,

खाली सोनेरी ही शेत सारी. ||१||

आला रंगात शाळू हा माझा,

फुलं उधळीतो काऱ्याळा तुझा,

साऱ्या धान्याचा शाळू हा राजा,

आरं ऊस वाऱ्यावरं.!

ऊस वाऱ्यावर डोलतो भारी,

समदा दख्खन दणाणू ललकारी.||२||

या रे हातात गोफण घेऊ,

रान राखाया एकीने जाऊ, 

जीवापरीस आमची प्यारी,

धरणी कसील त्याची सारी.||३||


शाहिर नानांनी गायलेलं हे काव्य ऐकून माझ्या तोंडातून आपसूकच शब्द बाहेर पडले, "व्वाह्..! मस्तच..! जबरदस्त..!"


(या दोन्ही कवणांच्या व्हिडिओची लिंक १. https://youtube.com/shorts/3H1veo3EoKs?feature=share

२. https://youtube.com/shorts/3H1veo3EoKs?feature=share)


"तुला सांगायचं म्हणजे, बळीराजाचं कवण झालं, तसं लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला, लोकांच्या मुखी ते शब्द रेंगाळू लागले. तेव्हा सगळ्या लोकांना समजलं, की शाहीर म्हणजे नेमकं कोण आहेत अन् काय आहेत..."


तीस वर्षांपूर्वी म्हंटलेलं गीत आठवायला आणि त्या गीताची मनातल्या मनात उजळणी करायला त्यांनी अवघ्या तीन ते चार सेकंदाचाच वेळ घेतला. यावरूनच त्यांच्या कलेची एकरुपता तुमच्या लक्षात येईल.


मघाशी या घटनेला अनुसरून मला एक प्रश्न पडला होता, पण ते जे सांगत होते, तो काळ त्यांच्या नजरेसमोरून हटवून, त्यांचा उत्साह मला कमी करायचा नव्हता आणि तसंही त्या घटनेतील सलगता भंग करायला माझं मन धजवत नव्हतं, इतकं मी त्या घटनेशी समरस होऊन ऐकत होतो.


तो प्रश्न मी आत्ता विचारला, " नाना,.....


          ५.

"...तुमच्या गुडघ्याला इतकं लागलं, तर त्या वेळी डॉक्टर, दवाखाना असतीलच की! "


" ही मागच्या तीस वर्षां अगोदरची गोष्ट. त्या टायमाला सरकारी दवाखान्याशिवाय कवचितच कुठंतरी एखादा दवाखाना असायचा. आन् दवाखान्यात जायाचं म्हंटल्यावर अंगावर काटा उभा राह्याचा, त्या वेळची माणसं दुखण्यानं जाग्यावर बसून राह्यली तरी दवाखान्याचं नाव काढत नसायची. हळद, झाडपाल्याच्या औषधावरच लय लोकांचा विश्वास. त्यामुळं दवाखान्याचा इचार कुणाच्या डोक्यात सुद्धा येत नसायचा. आन् मग कुठला दवाखाना न् काय..! ,

पण आत्ताच्या लोकांचं कसं झालंय, कष्टाचं प्रमाण कमी.. खाणं नाजूक.. त्यामुळं जीवन नाजूक झालंय, ह्यांना त्यावेळच्या माणसांसारखं किरकोळ दुखणं सुद्धा अंगावर काढणं म्हणजे जीवावर बेतण्यासारखं आहे."


"नाना, तुम्ही इतकी वर्षे शाहीर म्हणून काम करत असताना कुठे मोठा पुरस्कार किंवा बक्षीसं मिळाले आहे, असं कधी झालंय का?"


" तुला अगोदरच सांगितलं तसं, आम्ही पैसं किती मिळत्यालं, पैसं मिळत्यालं..का मिळणारच नाहितं, याचा कवाच डोक्यात विचार आणला नाही. कलेसोबत वाहत रहाणं एवढंच आम्हाला ठावं. आमची कुठंही पोहच नाही, ना आमच्यात कोण लय शिकल्या सवरल्यालं होतं, त्यामुळं कितीही चांगलं काम केलं, तरी त्याची वरच्या लेव्हलला दखल कोण घेणार? तरीही अनेक ठिकाणी शाल, श्रीफळ देऊन, फेटा बांधून माझा सत्कार करण्यात आला आहे आणि जे तुझ्या समोर भिंतीवर काही स्मृती चिन्हं, ढाल दिसत आहेत, तेवढंच काय ते आता उरलंय. शाहीर म्हणून आजवर लोकांनी जो मानसन्मान दिला आणि आजही 'शाहीर' या नावानेच लोक मला ओळखतात, या शिवाय अजून काय पाहिजे! यावरच मी समाधानी आहे."


"नाना, तुम्ही इतकी वर्षे झाली दाड किडीवर औषध देत आहात, तेही लोकं इच्छेनुसार देतील तेवढेच पैसे घेऊन.आणि तेवढ्यावरच घर चालवता. मग तरीही लोक तुम्हाला इतर नावांनी न ओळखता 'शाहीर' या नावानेच ओळखतात, असं का असेल?"


दाड किडीच्या औषधाचं म्हणशील, तर ती आमच्या अग्नुअण्णांची म्हणजे आमच्या वडीलांची देणगी आहे, पुण्याई आहे. ते हयात असताना जीवनभर लोकांना दाड किडीवर औषध देत होते, त्यांचाच वारसा मी चालवतोय.आणि माझ्या 'शाहीर' या नावाचं म्हणशील, तर शाहीर म्हणजे नुसता फेटा हाय का..., दोन अडीच रुपय टाकलं, की पटकन मिळंल!. आन् नुसता डोक्यावर फेटा बांधला, म्हणून कुणाला शाहीर होता येतं का..? शाहीर हा, लिहिलेल्या शब्दाला घासून पुसून गुळगुळीत करून त्याचं सोनं करत असतो. ही नुसती कला नाही, ही साधना आहे अन् ती एका दोन दिवसांत येत नसती. त्याला सराव लागतो, तालमी व्हाव्या लागत्यात, मग ते हळूहळू जमतं; अंगात उतरतं न् मग पुर्ण अंगात भिनतं...


तुला सांगायचं म्हणजे, या भाळवणी जवळच्या बलवडीला दरवर्षी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त मोठ्ठा कार्यक्रम असायचा. बाबासाहेबांच्या वर लिहलेली कवणं सादर करायला दरवर्षी वेगवेगळ्या भागातून एकतारी वाले भजन म्हणणारे शाहिर यायचे. त्या टायमाला बलवडीतल्या या कार्यक्रमात जो सरस ठरंल, त्याचा सत्कार आन् 'मानाचं चांदीचं कडं' बक्षीस म्हणून दिलं जायचं. इथल्या कार्यक्रमात आपली शाहिरी कवणं सादर करायची नुसती संधी जरी मिळाली, तरी आसपासच्या परिसरात त्याचं आपोआपच नाव होत होतं. त्यामुळं अशी संधी सहसा कोणी सोडत नव्हतं. अन् त्यात ते 'चांदीचं कडं' ज्याला मिळंल, तो तर चांदीसारखाच चमकायचा. त्यामुळं एकतारीवाल्या शाहिरांच्यात दरवर्षी चढाओढ लागलेली असायची.


मलाही एके वर्षी त्या कार्यक्रमाला बोलावलं होतं. एका पाठोपाठ एक असे आठ दहा जणांनी आपापल्या परीनं बाबासाहेबांच्यावर लिहलेली एकापेक्षा एक सरस कवणं सादर केली. 'यात आपला कुठं निभाव लागणार', असं वाटायला लागलं होतं, पण स्टेजवर गेल्यावर जी हाळी ठोकली अन् कवण म्हणायला सुरुवात केली..!


' पब्लिक नुसं टक लावून बघतच राहिलं. माझं कवण झालं अन् आयोजन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सांगितले, की आता बाकीचे एकतारी वाले गप्प बसतील, कुणीही वळवळ करणार नाही. फक्त हाच एक शाहीर आपली कवणं सादर करेल आणि खरंच त्यापुढं फक्त माझीच कवणं सादर केली गेली. माझ्या आवाजाची धार अन् कवणं ऐकून पब्लिक नुसतं घायाळ झालं. कार्यक्रम झाल्यानंतर हौशी लोकं स्टेजवर मला भेटायला यायला लागली. त्यातले बरेच जण यायचे आणि मला म्हणायचे, 'जय भीम शाहीर. जय भीम शाहीर.' मला भेटायला येणाऱ्या लोकांना मी कधी जय भीम म्हणायचो, तर कधी नमस्कार करायचो. यावर काही लोकं परस्पर चर्चा करायची, मग त्यांना कुठून तरी समजायचं, की हा शाहीर आपल्या जातीचा नाही. हा रामोशी जातीचा आहे. त्यावेळी लय वाईट वाटायचं. वाटायचं, कलाकाराची कला बघावी, महामानवाच्या विचारांबद्दलची आस्था बघावी, की जात....?


त्यातलीपण जी कलेची थोडीफार जाण असणारी काही लोकं असायची, ती आश्चर्यानं तोंडात बोटं घालायची अन् म्हणायची, ' बघा..जातीनं रामोशी असूनसुद्धा बाकीच्यांना जमणार नाहीत अशी सुरेख, एकापेक्षा एक सरस कवणं सादर करतोय.'


आपल्या कलेची कुणी स्तुती केली, की हुरूप वाढायचा. नव्या उमेदीने नवीन कवणं लिहायची, चालीत बसवायची अन् प्रत्येक वर्षी तिथं जाऊन सादर करायची, असं चालू झालं. असं करून बलवडीला दरवर्षी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बोलावलं जाऊ लागलं. तिथून पुढं काही वर्षें आंबेडकर जयंतीनिमित्त शाहिरी कार्यक्रम सादर करण्यासाठी वेगवेगळ्या गावांमध्ये वीस बावीस दिवस माझ्या तारखा बुक असायच्या. असं पुढं कैक वर्षे चालू होतं.


आत्ता नवीन जमाना आला, अन् सगळीकडं कुणाला कसं आवडेल, जमेल तशी जयंती साजरी करू लागले. यात अशी 'मानाच्या चांदीच्या कड्यासाठी' शाहिरां शाहिरांमध्ये सरस कवणं सादर करण्यासाठी होणारी चुरस मागं पडत गेली आणि आता ती प्रथा बंद झाली...


"इतक्या वर्षांपासून चालू असणारं तुमचं कलापथक तुम्ही बंद का केलं ?", मी सहजच विचारलं.


            ६.

 "कलापथक बंद केलं नाही, बंद झालं. चांगल्या फळालाच किड लागायचा थोका जास्त असतो, त्यासाठी ते फळ जपावं लागतं, त्याची काळजी घ्यावी लागते, तसं कलापथकात काम करणाऱ्या कलाकारांचं झालं. त्यांनी स्वतःच्या जीवनाची काळजी घेतली नाही. तुला तर ठावं आहेच; बाकी मी अजून काय सांगणार. 

पाच सहा पोरं दारूचं व्यसन करत होती, तरीही आमचं कलापथक चालू होतं, कलापथकात काम करणारी काही चांगली चांगली माणसं वयोमानानं गेली आणि जी काम करण्यारखी होती, त्यांना व्यसनाची किड लागलेली. वाईट येवढंच वाटतंय, की ज्यांच्या अंगात वेगवेगळी चांगली कला होती, अशी सहा सात पोरं दारूच्या व्यसनामुळं वयाची पन्नाशी सुद्धा गाठू शकले नाहीत.


आमच्या कलापथकातला वयाची ऐंशी पार केलेला गुणी माणूस रामभाऊ कंडक्टर हे पार थकले आहेत, आत्ता ते अंथरूणाला खिळून पडले आहेत.


आमच्या कलापथकात काम करणारे हौशी, आवड असणारे काही कलाकार अजूनही आहेत, पण आत्ता नव्यानं कलापथक चालू करायचं मनावर घेणारं कोण आहे का..? अजूनही कुणी मनावर घेणारं असेल, तर कलाकार म्हणून काम करायला आत्ताही मला आवडेल. मला कवणं म्हणायची हौस असल्यामुळं जुनी सुरपेटी खराब झाली होती, म्हणून एक नवीन सुरपेटी आणली आहे. सवड मिळंल तसं ती वाजवत, कवणं म्हणत असतो. खूप सारी कवणं लिहलेल्या अवस्थेत माझ्याजवळ नाहीत, पण ती अजूनही माझ्या तोंडपाठ आहेत.


जे कलापथक कलाकारांनी आयुष्यभर एका कळीसारखी खुलवलं, ते फुलासारखं उमललं, पण पटकन कोमेजलं. 

समाधान येवढंच, की कलापथकात काम करणारे कलाकार गेले, पण आपल्या कलाकारीची छाप मागे सोडून गेले.

आता झालं गेलं गंगेला मिळालं, सगळं इतिहास जमा झालं."


इतकं बोलून त्यांनी एक सुस्कारा सोडला आणि खुर्चीवरून उठले आणि पाण्याचा तांब्या हातात घेऊन कळशीतून पाणी घेऊन ते बाहेर गेले आणि हात तोंड धुवून थोड्या वेळाने आत घरात आले. कदाचित, इतका वेळ त्यांनी माझ्यासमोर जो त्यांच्या अनुषंगाने सहकलाकारांचाही कलाकारी जीवनातील चैतन्याचा झरा वाहता केला, त्याचा शेवट असा दुःखाच्या आठवणीने ओला झालेला मला दिसू नये, म्हणून ते माझ्या समोरून उठून बाहेर गेले असावेत.


खूप वेळ आमच्या गप्पा रंगल्या होत्या. नंतर माझ्या आग्रहाखातर त्यांनी अडगळीत एका मोठ्या बॅगेत पॅक करून ठेवलेली सुरपेटी काढली आणि काही गीतं गायली, खूप वेळ झाला होता, दुपार झाली, तरी माझ्यासोबत गप्पांमध्ये रंगून गेल्यामुळे जेवणाची आठवण राहिली नव्हती. 


जिजीनं (शाहिरनानांची मालकीन कमल, त्यांना आम्ही सगळेच आपूलकीनं जिजी म्हणतो.गावात सगळे 'शाहीरनानांची जिजी' म्हणूनच ओळखतात.) आणि शाहीरनानांनी जेवण करायला मला आग्रह केला, पण मला त्या एका दिवसात तडसर येथील आत्त्याला आणि कडेगांव येथे खास मित्रांना भेटून, विचारपूस करून माघारी फिरायचं होतं, त्यामुळं मला शाहीर नानांच्या इथं अजून जास्त वेळ थांबता आलं नाही, तरीही मी त्यांना विचारले, "नाना, मला अजूनही तुमच्याशी बोलायचं आहे, तुम्ही जी कवणं सादर केलेली आहेत, ती लिहून काढायची आहेत. या नंतर तुम्हाला मोकळा वेळ कधी मिळेल, संध्याकाळी ?"

त्यावर त्यांनी क्षणाचाही विचार न करता सांगितले, " मी चार-पाच वाजता वस्तीवर येतो."


माझ्यामुळं त्यांना चार पाच किलोमीटरची पायपीट करावी लागू नये, म्हणून मी त्यांना सांगितले, की मी आज दिवसभर बाहेर गावी असणार आहे, संध्याकाळ होईपर्यंत घरी परतेन. मी एका दिवसात अनेक गोष्टी साध्य करून घेत होतो, त्यात किती गोष्टी साध्य झाल्या, किती गोष्टी निसटल्या, ते पुढे काळच ठरवेल...


त्या दिवशी नियोजित ठिकाणी गेल्यानंतरही मला अजून दोन तीन ठिकाणी जाणं अत्यंत आवश्यक वाटलं. ती ठिकाणं म्हणजे वांगी, ऐतिहासिक संदर्भासाठी तडसरच्या डोंगरावर आणि कडेगांव कुस्ती संकुल येथे.


मला संध्याकाळी घरी यायला खूपच उशीर झाला होता. घरी आल्यावर आईने मला सांगितले, की शाहीरनाना चार वाजता घरी आले होते, 'सुभाष कुठं हाय, त्याची भेट घ्यायची होती', असं म्हणत होतं. तू घरी न्हाय म्हंटल्यावर ते थोडावेळ बसले, बोलले आणि निघून गेले. हे ऐकून मनात थोडी हळहळ वाटली. खास माझ्यासाठी, खास माझ्या आग्रहाखातर त्यांनी वेळात वेळ काढून स्वतःहून इतकी पायपीट करून घेतली आणि इतकं करूनही त्यांची आणि माझी भेट झालीच नाही, याची माझ्या मनाला खूप बोचणी लागली.


त्यांनी वयाची बाहत्तरी पार केलेली असताना सुद्धा त्यांचं कलेवरचं प्रेम, कलेची आस्था त्यांना अजूनही स्वस्थ बसू देत नाही आणि आपण तर अजून धडधाकट आहोत, त्यामुळे मला अजूनही त्यांच्याकडून काही गोष्टी नव्याने शिकायच्या आहेत. त्यांचे अनुभव ऐकायचे आहेत, त्यासाठी गावी गेल्यावर मला त्यांना पुन्हा पुन्हा भेटायचं आहे.....


शाहीरनानांना दिर्घायुष्य लाभो, त्यांच्या सहवासाचा माझ्यासह इतरांना मिळणारा आनंददायी लाभ असाच वर्षानुवर्षे मिळत राहो,

हीच मनोमन सदिच्छा.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational