सुभाष मंडले

Inspirational

4.8  

सुभाष मंडले

Inspirational

कव्हर फाटलेलं पुस्तक

कव्हर फाटलेलं पुस्तक

21 mins
305


कव्हर फाटलेल्या पुस्तकाचं वरचं पान मळतं, चोळामोळा होतं, ते खराब झालेलं पान फाडून टाकले, की पुन्हा दुसरं पान मळतं, चोळामोळा होतं. ही सतत होणारी क्रिया आहे, तसंच दुःखाचं आहे. आपण सुख शोधायला लागलो की दुःखचं मिळतं आणि असे दुःख वारंवार मिळतं.


घडून गेलेल्या घटनांची पुन्हा आठवण काढायची नाही असे ठरले होते, पण जे नको आहे तेच घडले,

त्या दिवशी माझे सिनियर साहेब leave वर होते, त्यांनी मला massage केला, की 'आज होणाऱ्या new joiners चा interview तुम्ही घ्या'

 नविन जबाबदारीचा आनंदही होता आणि मनावर दडपणही होते. interview हा HR team सोबत घ्यायचा होता, त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नव्हते.

नवीन येणाऱ्या employees ना त्यांचा या अगोदरच्या कामाचा अनुभव आणि त्या work मध्ये त्यांचा रोल याबद्दल माहिती विचारल्यानंतर त्याची निवड माझ्याकडून नक्की केली जाणार होती,

 HR team, family ची basic information घेत असते. ही information विचारण्यामागचा हाच उद्देश असतो, की employees चा सच्चेपणा तपासला जावा.

एका मागून एक employees ची test घेतली जात होती. शेवटी vacancy full झाल्यानंतरही एका गरजू मुलीच्या interview साठी staff member विनवणी करत होते, तसेही अजून extra employeesची joining करायची नव्हती, त्यामुळे HR team चे सदस्य निघून गेले, पण त्यांच्या मनाच्या समाधानासाठी तिचा interviewघ्यायचा ठरवले.

त्या मुलीने दरवाजा उघडला आणि बोलली,

"may I come in sir?"

मी खाली मान घालून पेपर आवराआवर करत बोललो,

    "Yes, come in."

ती मुलगी माझ्या समोर येऊन उभी राहिली. तरीही मी माझ्या कामात व्यस्त होतो. थोडा वेळ झाला तरी दोघांपैकी कोणीही ब्र शब्द काढला नाही. काही वेळ गेल्यानंतर न राहून तीच बोलली,

"सर, मी शितल."

"हा बोला, job experience?",

 मी तिच्याकडे न पाहताच बोललो.

"Job कुठेही नाही.",

"Interview चे पेपर तपासून मान वर करत मी म्हणालो, "without experience आम्ही आपणाला job offer नाही करुss....( मी तिच्याकडे पाहिले अन् तोंडातले शब्द तोंडातच राहिले. मला गहिवरून आलं)...तु...?"

"हो, मीच, without experience,"

ती तुटक तुटक बोलली.

अडाणी भाषेत बोलणारी शितल, इंग्लिश शब्दांचा वापर सराईतपणे करत होती, तिच्यात कमालीचा बदल झाला होता.

"सॉरी, तुला पाहिलंच नाही, उभी का, बैस ना."

ती चेअरवर बसली.

मी पाण्याचा ग्लास भरून तिला देत बोललो, "इतक्या वर्षांपासून कुठे होतीस?, त्यावेळी नंतर तु भेटशील असं वाटलं होतं, पण तू भेटलीच नाही."


"तुम्हाला अजून आठवतोय तो दिवस?",असे म्हणून तिने पाण्याचा एक घोट घेतला.


"कसा विसरेन तो दिवस, अन् कसे विसरू ते दिवस.....", 


झाल्या घटनेला आठ वर्षांचा काळ उलटून गेला होता…

तरीही तो काळ जसाच्या तसा माझ्या नजरेसमोर उभा राहिला.

    गावाकडून शहरात नोकरी मिळावी या उद्देशाने आलो होतो. वाटलं होतं, 'आपलं शिक्षण बघून आमच्याकडे नोकरी करा म्हणून कुणीही पळत मागं लागतील, पण 'खेडेगावात शिकलेल्या माणसाचे शिक्षण शहरात आल्यावर कळतं'. ते जागोजागी जाणवू लागलं.


 पुण्यात, नोकरी संदर्भात कुणाला मराठीत पत्ता विचारला, तर समोरून हिंदीत रिप्लाय मिळायचा अन् हिंदीत प्रश्र्न विचारला, की मराठीत उत्तर मिळायचं, सगळा गोंधळ उडायचा.

नोकरी मिळाली नाही. होते नव्हते तेवढे पैसे खर्च झाले. रूम होती, पण खाण्याची व्यवस्था नव्हती. रोज सकाळी प्लेसमेंट ऑफिसवर जाऊन अॅड्रेस घ्यायचा. दिवसभर नोकरी शोधायची. पाच वाजेपर्यंत रूमवर यायचं आणि सायंकाळी पैसे नसल्यामुळे मंगल कार्यालयात जेवण करायला जायचं. तिथं ओळीने चार मंगल कार्यालये होती. कोणत्या ना कोणत्या मंगल कार्यालयात जेवण असायचंच,असा दिनक्रम सुरू होता.

महिना संपत आला, तरी नोकरी मिळाली नाही, शेवटी प्लेसमेंटवाल्याने रूम खाली करायला लावली. योगायोग असा की ज्या दिवशी रूम खाली करायला लावली त्याच दिवशी नोकरी मिळाली होती. त्याच दिवशी ऑफिसपासून जवळ रूमची चौकशी केली होती, कारण ऑफिस ते प्लेसमेंटवाल्याची रूम यासाठी सहाशे रुपये खर्च होणार होते.

नवीन रूम मालकाबरोबर, महीना पुर्ण झाल्यानंतर पैसे द्यायचा व्यवहारही ठरवला होता.

रूम खाली करायला लावली, हे माझ्या दृष्टीने बरंच झालं होतं, कारण नोकरी लागल्यावर पहिल्या पगाराचे पूर्ण पैसे त्याला द्यावे लागणार होते. 

त्या दिवशी रात्री दहा वाजता रूम खाली केली. रूम खाली केल्यामुळे त्याचा आणि माझा संपर्क राहणार नव्हता‌.

नवीन रूम शहरातून बाहेर निर्जन अशा 'बंगला वस्ती' नावाच्या वस्तीत होती.


रूम मालकाच्या मदतीने एक वेळ मेस लावली. महीनाभर जवळ पैसे नसले, तरी काळजी करण्याचे कारण नव्हते.

रूम पासून आॅफिसपर्यंत चालत जायचे, दिवसाचे आॅफिस कॅंन्टींगमध्ये जेवण करायचे. ज्याचे पैसे पगारातून कापून घेतले जाणार होते आणि रात्री मेसचं जेवण.

मेसचं जेवण डब्यातून रूमवर 'ती' आणून द्यायची. असा दिनक्रम सुरू झाला.

पंधरा दिवस उलटले, सायंकाळी ड्युटीवरून आलो, रूम मध्ये शिरणार इतक्यात, डबा रूमवर पोच करणारी 'ती' पैसे मागायला आली.

मी तिला म्हणालो, "महिनापुर्ण झाल्यानंतर पैसे द्यायचा ठरलं होतं, मग मध्येच पैसे कसे मागता?,जा, तुझ्या आईला पाठवून दे."


"माझी आय माझ्यासोबत नाय राहत.",ती शांतपणे बोलली.


"मग मेस कोण चालवतं?"


"मीच चालवती."

मला विश्वासच बसला नाही, कारण अशी जबाबदारी सांभाळण्याचे तिचे वय वाटत नव्हते. ती कमी वयात लग्न झालेली अडाणी मुलगी दिसत होती.

महिन्याच्या शेवटी नोकरी मिळाली होती, त्यामुळे पगार कमी आला होता, त्यातील खर्च होऊन चारशे रुपये शिल्लक राहिले होते.

मी तिला म्हणालो,"जवळ चारशेच रुपये आहेत, पगार झाला की लगेच देतो."


ती म्हणाली, "अहो, मला माहित हाय ,या वस्तीत फक्त गरीब लोकच येतात, मी प्रेग्नंट असल्यामुळं दवाखान्याला पैसे लागतात. माझीही अडचण हाय."


"माझ्या जवळ तेवढेच पैसे आहेत, पुर्ण महीना कसा घालवायचा ?"


"मी तुम्हाला पैसे मागितले नसते, पण किराणा भरायला देखील माझ्याकडे पैसे उरले नाहीत."

"मला समजतंय, म्हणून आठ दिवस झाले तु फक्त वरण भात देतेय तरीही कुठलीच तक्रार न करता जेवण करतोय", मी माझी बाजू मांडली.


"मी फक्त वरण भात चालू केल्यापासनं सगळ्यांनीच मेसचं जेवण बंद केलंय, ते तुम्ही बघतायच, अन् किराणा भरला नाय, तर तुम्हीपण मेस बंद कराल, पैसे नसल्यावर मी मेस कशी चालवायची?" तिच्या डोळ्यांत पाणी तरळू लागले होते.


"तुझे मिस्टर काय करतात, त्यांचे पैसे येत असतील ना?"


"आमचा स्वत:चा टेंपो हाय, दोन महीनं झालं, टेंपो घेऊन बेंगलोरला गेलेत, ते आल्यावर पैशाचा प्रश्न सुटंल. तोपर्यंत तरी पैसे लागतील, मेस बंद झाल्यावर मी खाणार काय?"

तिचा केविलवाणा चेहरा पाहून मी क्षणाचाही विलंब न करता खिशातून चारशे रुपये काढून दिले. तिने त्यातले शंभर रुपये परत केले.

"असूद्या,अडीअडचणीला उपयोगी पडतील.", असे म्हणून ती निघून गेली.

मला प्रश्र्न पडला,की ज्यांच्याकडे टेंपो आहे, त्यांच्याकडे घरखर्चासाठीही पैसे नसावेत, कसं शक्य आहे?..जाऊदे असेल एखाद्याचा problem.

मी माझ्या मनाची समजूत काढली आणि रूम मध्ये शिरलो.

नुकताच आॅफिसमधून आलेलो, हात पाय धुवून फ्रेश झालो आणि पुस्तक वाचत बसलो. ऐरवी आठ वाजताच डबा पोच करणारी ती, रात्रीचे नऊ वाजले तरी आली नाही, अजून अर्धातास उलटला तरी ती आलीच नाही. भूक खूप लागलेली, अजून वाट बघू शकत नव्हतो, न राहून मी तिच्या मेसवर गेलो. दरवाजातून आत बघितले तर ती एक चटईवर झोपलेली, मला बघून ती पडल्यापडल्याच बोलली, "माझी तब्येत बरी नाही, त्यामुळे आज स्वयंपाक बनवला नाही."

 थोड्यावेळापुर्वी पैसे घेऊन जाताना ठिक होती अन् आता काय झाले हिला. स्वयंपाकाचं काय, वरण आणि भातच तर बनवायचा होता. मला राग आलेला,पण काय करणार, गप्प बसण्याशिवाय पर्याय नव्हता. मी तसाच माघारी फिरलो आणि दुकानातून पार्ले बिस्कीटचे दोन पुढे घेऊन रूमवर आलो. तांब्याभर पाणी घेऊन त्यात बिस्किटे भिजवून खाल्ली. रूम पार्टनर उपाशीपोटीच झोपला होता. मीही अर्धपोटी झोपलो.


रात्रीचे दोन वाजले असतील, दरवाजावर दोन चार वेळा थपथपाटलेला आवाज ऐकू आला.

मी-"कोण आहे, काय झालं इतक्या रात्री दरवाजा वाजवायला?"

बाहेरून कुणीतरी बोललं,"कोण जागं आहे?"

मी-"हा, बोलतोय, काय पाहिजे?"

बाहेरून परत आवाज आला,"ती तुमची मेसवाली, जास्तच कणत, विवळत आहे, तिच्याजवळ कुणीच नाही म्हणून सांगायला आलो. बघा तेवढं काय झालंय तिला."

मी झोपेतून पटकन उठलो, मित्र 'दिपकला' उठवले आणि त्याच्यासोबत मेसवालीच्या रूमवर गेलो.

ती चटईवर लोळण घालत विवळत होती. ही तिची अवस्था पाहून तिला लवकरात लवकर डॉक्टरकडे घेऊन जाणे आवश्यक होते. मला काय करावं सुचत नव्हतं. तोपर्यंत दिपक भाड्याची ओमीनी कार घेऊन आला. येवढ्या रात्री याला कशी काय कार सापडली समजले नाही. तिला ताबडतोब दोघांनी कारमध्ये घातले. दोन किलोमीटर अंतरावर एक दवाखाना आहे, तिथे तिला ऍडमिट केले. दवाखान्यात आतल्या रूममध्ये तिला पोचवले आणि रिसेप्शनच्या ठिकाणी तिच्या एॅडमिटचा फॉर्म भरायला आलो. रिसेप्शनिस्टने पेशंटचे नाव विचारले.

मी- "शितल"

रिसेप्शनिस्ट,-"शितल, पुढे... आडनाव?"

मी शितल तेवढंच नाव ऐकून होतो, मी आत गेलो.

मी-"शितल तुझं आडनाव?"

ती-"आल्हाट.....जाधव"

मी-"आल्हाट कि जाधव?"

यावर ती काहीच बोलली नाही. मीही तिला जास्त न विचारता रिसेप्शनिस्टला येऊन तिचं पुर्ण नाव 'शितल आल्हाट जाधव' सांगितले.

रिसेप्शनिस्ट-"असे आडनाव असते का? एकच आडनाव सांगा."

मी-"कोण म्हणतं नसतं, मोहिते-पाटील असतं, वळसे-पाटील असतं, मग आल्हाट-जाधव असू शकत नाही का? हे एकच आडनाव आहे, लिहा."

पुढे रिसेप्शनिस्ट काही बोलणार इतक्यात दिपकने माझ्या हाताला धरून दवाखान्याबाहेर आणले आणि बाहेर पायरीवर बसायला सांगितले. मी आणि तो अंधारात पायरीवर बसलो.

दिपक-"सुभाष, आल्हाट आणि जाधव ही दोन वेगवेगळी आडनावे आहेत.

मी-"ते कसं काय?"

दिपक-"शितलची दोन लग्नं झालेत."

मला विश्वासच बसला नाही.

मी-"इतक्या कमी वयात दोन लग्नं?"

दिपक-"हो, तिला पहिल्या नवऱ्यापासून दोन मुली आहेत. पहिल्या नवऱ्याचं आडनाव आल्हाट होतं."

मी-"मुलींनी दोन दोन लग्न करण्याइतपत माॅडर्न आणि फॉरवर्ड नसावं."

दिपक-"तुला काय माहित, दोन दोन लग्न करायची तिला काय हौस होती का?...

'तिचा पहिला नवरा इथंच कंपनीत काम करत होता, शितलच्या आग्रहाखातर त्याने कंपनी सोडून टेंपो घेतला. कंपनीच्या नोकरीपेक्षा जास्त पैसे येऊ लागले, सुखाचा संसार चालू होता. तिला एक म्हणता दोन जुळ्या मुली झाल्या. एके दिवशी, तिच्या नवऱ्याचा अॅक्सिडेंट झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. या धक्क्याने त्याच्या वडिलांच्या डोक्यावर परिणाम होऊन वेड्यासारखे फिरु लागले. सुखानं भरलं, फुललेलं घर एका वाईट घटनेनं उद्वस्थ झालं, या वाईट परिस्थितीला शितलला जबाबदार धरून तिची सासू तिला त्रास देऊ लागली. बिचारी नवरा गेल्यानंतर मुलींच्या आधाराने जीवन जगेल असे वाटले होते, पण सासूने मुलींना शितलकडे न देता स्वत: जवळ ठेवून घेतले आणि ज्या टेंपोमध्ये तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला होता, त्या टेंपो सहीत शितलला घराबाहेर काढले. ती निराधारपणे तिच्या आई-वडिलांच्या घरी आली.

माहेरच्यांनी, काही दिवस तिला ठेवून घेतले पण नंतर तिच्यासाठी नवीन स्थळं शोधायला सुरुवात केली, शितलने त्यांना साफ नकार दिला. पण तिच्या आई वडिलांनी तिला समजावले की 'तुझी लहान बहीण बिना लग्नाची आहे, जर तु अशीच इथं राहीलीस, तर तुझ्या लहान बहीणीचं लग्न होणार नाही. अन् तुला असं वाटतं का, की तुझ्यासारखं तिनंही संसार सुख घेऊ नये.'

ती लग्न करायला तयार नव्हती. पण तिनं लग्न नाही केलं, तर तिच्या लहान बहीणीच्या लग्नाला अडचणी येतील, म्हणून ती दुसऱ्या लग्नाला तयार झाली.

आत्ता केलेला नवरा हा तिच्या सौंदर्याला पाहून, तिच्याजवळच्या पैशासाठी आणि ड्रायव्हिंगची हौस भागवण्यासाठी त्यानं तिच्याशी लग्न केले. तो टेंपो भाड्यामधून मिळणाऱ्या पैशांवर मजामस्ती करतो आणि दोन-दोन महिने घरी येत नाही. बिच्चारीने पोटापाण्यासाठी मेस चालू केली, पण त्या मेसची अवस्था तु बघतोयसच."

दिपकने जे काही सांगितले यावर माझा विश्वास बसत नव्हता, इतक्या समजदार, प्रेमळ शितलच्या वाट्याला दुःख यावं याचं वाईट वाटू लागलेलं.

इतक्यात डॉक्टरनी आतून आवाज दिला, मी आणि दिपक धावत आत गेलो.

डॉक्टर-"घाबरण्यासारखं काही नाही, डिलेव्हरीची वेळ आहे. त्यामुळे पोटात कळ मारत आहे. एक इंजेक्शन दिले आहे, थोड्यावेळात वेदना कमी होतील. पण..."

मी-"पण काय डॉक्टर?"

डॉक्टर-"पेशंटचे पाय खुप सुजलेले आहेत त्यामुळे, इथे डीलेवरीसाठी अडचणी येतील, शिवाय या दवाखान्यात पुरेशा प्रमाणात सुविधा उपलब्ध नाहीत, त्यामुळे तुम्ही पेशंटला सरकारी दवाखान्यात अॅडमिट करावं."

मी-"बघा प्रयत्न करून इथंच, हिचं अजून हाल झालेलं पाहावणार नाही."

डॉक्टर-"इथं केस हॅंडल केली तर पेशंटच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो."

मी थोडा सुन्न झालो, काय करावं सुचत नव्हतं. सरकारी दवाखाना वीस-पंचवीस किलोमीटर लांब होता.

मी-"ठिक आहे."

असे म्हणून मी दिपकला आवाज दिला,"दिपक, बघ जरा,ओमिनी आहे का, गेली."

दिपक-"आहे पण, तो हॉस्पिटलला यायला तयार नाही."

मी-"का?"

दिपक-"इथं पर्यंत यायचं पैसे मी दिलं होतं, आता इथून पुढ जायचं पैसे द्या असं तो म्हणतोय."

मी जाऊन ओमिनी कारवाल्याला समजावले,'हि वेळ पैशाचा विचार करण्याची नाही. फार तर नंतर मी स्वतः पैसे देतो.'

आमचं संभाषण चालू होतं इतक्यात चौकात हायवेवर अॅक्सिडेंट झाला होता, त्या अॅक्सिडेंटमध्ये एक जणाची परिस्थिती गंभीर होती, त्याला याच दवाखान्यात आणलं होतं. पण त्याची इतकी वाईट अवस्था पाहून डॉक्टरनी त्याला अॅडमिट करून घेतले नाही, त्यांनाही सरकारी दवाखान्यात जाण्यासाठी वाहनाची आवश्यकता होती. अॅक्सिडेंट पेशंटने ओमिनीवाल्याला खिशातून पैसे काढून दिले आणि सांगितले, 'तुझं काय भाडं आहे ते घे, पण लवकरात लवकर सरकारी दवाखान्यात पोहचव.' 

मग तो तयार झाला.

त्याच कारमध्ये अॅक्सिडेंट पेशंट आणि शितल दोघांना घातले. जाताना शितल अॅक्सिडेंट पेशंट बघून घाबरून जाईल म्हणून आधारासाठी मी तिच्या जवळ बसलो. तिच्यावेदना पुन्हा चालू झाल्या, तीने आय...ग..आय... असा सतत धावा चालू केलेला.

मी-"शितल तुझं कोणी रिलेटिव्ह जवळपास नाही का?, फोन करून बोलावून घेतले असते."

शितल-"गावाकडं आय हाय, पण घरी फोन न्हाय, शेजाऱ्यांच्याकडे हाय."

मी-"फोन नंबर सांग."

तिने फोन नंबर सांगितला, सांगितलेल्या नंबरवर दोन-चार वेळा कॉल केला, पण तिकडून फोन उचलला नाही.

मी तिला तिच्या नवऱ्याचा नंबर मागितला, तिने दिला. मी त्याला कॉल केला, पण त्यानेही कॉल उचलला नाही. उत्तर रात्रीचे चार वाजले होते.

शितलच्या शरिरातून पाणी जायला लागले होते, पाठीमागून तिची साडी पुर्ण भिजली होती. मी घाबरून गेलो. इतक्यात ओमिनी दवाखान्यासमोर येऊन पोहोचली. मी शितलचा हात माझ्या खांद्यावर घेऊन एका हाताने तिच्या कमरेला आधार देत हळूहळू चालू लागलो. तिला सरळ चालताही येत नव्हते. कसंबसं तिला आधार देत रिसेप्शनच्या दरवाजापर्यंत घेऊन गेलो. समोर लेडीज नर्स बसली होती. तिला मी आवाज दिला,"डॉक्टर प्लिज पटकन या, हिला थोडासा आधार द्या."

नर्स-"काय झालंय तिला?"

मी-"डीलेवरी पेशंट आहे म्हणून म्हणतोय, जरा मदत करा."

नर्स-,"सोड तिला, मरत नाही ती, येतेय तिच्या पायाने चालत."

मी-,"अहो पण...."

नर्स-,"सोड म्हणतेय ना, सोड, येईल ती तिच्या पायाने."

मी-,"तिची अवस्था...?"

नर्स-,"तुला एकदा सांगितलेलं समजतं नाही का?, सोड म्हणतेय ना, सोड तिला."

नर्स जशी रागाने खेकसून बोलली, तसं मी तिला सोडलं, वाटलं पडेल, कोलमडेल. पण तसं काही झालं नाही, तिच्या डोळ्यांत पाणी आलेलं, ती जीव एकवटून थोडं थोडं पाय उचलून पुढे टाकत होती, कशी बशी रूमच्या दरवाजातून आत गेल्यावर तिनं अंग सोडून दिले, मी धावत जाऊन तिला सावरावं यासाठी पुढे झालो इतक्यात नर्सने हाताने इशारा केला,'काही नाही होत, मी आहे' आणि ती उठून आत रूममध्ये गेली.

इतका वेळ रागात बोलणारी नर्स थोडंसं स्मित करून माझ्याशी बोलली, त्यावेळी वाटलं मोठ्या हॉस्पिटलमध्ये असंच बोलतात... की पेशंटला एकप्रकारे निर्भिड करण्यासाठी तिने तसं केलं असावं?...

 मी रूमच्या बाहेरच होतो. आतून आवाज आला.

नर्स-,"सोनोग्राफी चेकअपचे रिपोर्ट कुठे आहेत, द्या हिकडे,"

शितल,"घ घरी राहिलेत."

नर्स-,"पोरं जन्माला घालायची हौस आहे, मग डॉक्यूमेंट आणता येत नाहीत का."

असं बडबडत नर्स बाहेर आली आणि माझ्याकडे बघून बोलली,"आम्ही या आधीचे चेक अप रिपोर्ट बघितल्याशिवाय पेशंटची जबाबदारी घेऊ शकत नाही."

मी,-"मॅडम, तुम्ही तिला अॅडमिट करून घ्या, तोपर्यंत आम्ही चेक अप रिपोर्ट आणायची व्यवस्था करतो."

मी पटकन उठलो आणि दिपकला शितलच्या रुमवर जाऊन सोनोग्राफी चेकअपचे पेपर आणायला सांगितले, पण दिपकजवळचे सगळे पैसे संपले होते. अन् मीही झोपेतून तसाच आहे त्या कपड्यावर पैसे न घेता आलो होतो.

दिपक,"मी जातो पण परत यायला माझ्याजवळ पैसे राहीलेले नाहीत."

मी-"दिपक,हॅंगरला अडकवलेल्या शर्टाच्या खिशात शंभर रुपये आहेत, ते घेऊन ये,त्यातलेच वाटखर्चीसाठी घे.आणि..."

मी अजून काही बोलणार इतक्यात, तो ज्या ओमिनी कारने आम्ही आलो होतो त्या कारमध्ये जावून बसला आणि ओमिनी कार निघून गेली.

शितलचे रिलेटीव फोन उचलतील, म्हणून मी सकाळपर्यंत राहून राहून दोन्ही ठिकाणी कॉल करत होतो, पण फोन कुणीच उचलत नव्हतं. पहाटे साडेपाच वाजता तिच्या नवऱ्याने फोन उचलला अन् बोलला,"कोण आहे, काय झालंय इतकं रात्रभर फोन करायला?"

मी-"मी सुभाष बोलतोय, तुमची मिसेस शितल हिला प्रेग्नंशीसाठी दवाखान्यात अॅडमिट केले आहे. त्यामुळे लवकरात लवकर सरकारी दवाखान्यात या"

तो-"हो, मी जवळच आलोय ट्राफीकमध्ये अडकलोय,गर्दी कमी झाली की लगेच येतो."

मी-"लवकर या, तिच्या जवळ तुमच्या घरचं कुणीच नाही, ती वाट बघतेय."

तो-"वाट बघ.."

त्याचं वाक्य पुर्ण व्हायच्या आत फोन कट झाला.

प्रेग्नंशीच्या कळा येऊन शितल जोरजोराने ओरडत होती, तिची वेदनामय अवस्था पाहून तिचा हात घट्ट पकडून आधार द्यावा असं वाटायचं, पण जेंन्टसना डिलेवरी रूममध्ये अलाव नसल्यानं तिच्या असाह्य वेदना ऐकण्याशिवाय मी काहीच करू शकत नव्हतो.

पाचवाजून चाळीस मिनिटांनी शितलने एका गोजिरवाण्या जीवाला जन्म दिला. 


डिलेव्हरी नॉर्मल झाली, दहा मिनिट नर्सने तिची सर्व प्राथमिकता पुर्ण करुन त्यांनी मला त्या रुममध्ये जाण्याची परवानगी दिली. मी आत गेलो, तिच्या अंगावरची साडी खराब झालेली म्हणून फक्त एक चादर अंगावर ओढून घेतलेली. बाळ तिच्या शेजारी झोपलेलं आणि ती डोळे सताड उघडे ठेवून छताकडे पाहत होती. मी थोडी चादर खाली करून बाळ बघितलं अन् शितलच्या डोक्यावरून हात फिरवला.तसं तिचा हुंदका अनावर झाला, तिच्या डोळ्यांतून अश्रू गालांवर घळाघळा ओघळू लागले.

मी-"बाळ छान आहे."

तिनं थोडंसं स्मित केले, पण अश्रूंनी जोर धरलेला, एका वेळी दोन भावना तिच्या चेहऱ्यावर दिसत होत्या.

मी-"काय झालं, त्रास होतोय, दुखतंय?"

शितल-"न्हाय"

तिच्या डोळ्यांतील पाणी थांबतच नव्हतं,

मी-"अगं,वेडी आहेस का, असं का समजतेस 'तुझ्या सोबत तुझं कुणी नाही म्हणून'.काही काळजी करू नकोस, तुझ्या मिस्टरांना फोन केला होता. टेंपो ट्राफिकमध्ये अडकल्यामुळे थोडा उशीर होईल, दुपारपर्यंत येतो, म्हणून सांगितले आहे,

थांब, तुला फोन लावून देतो, तुच खूश खबर त्यांना सांग."

शितल-"नको, ते विचारतील, बाळ काय हाय, मुलगा की मुलगी, अन् एकदा का त्यांना समजलं, की मुलगी झाली हाय मग ते बिलकुल येणार नाहीत."

मी-"म्हणजे?"

शितल-"त्यांनी(मिस्टरांनी) त्यांच्या घरच्यांच्या विरोधात माझ्याशी म्हणजे 'विधवेशी' लग्न केल्यामुळे आम्हाला घराबाहेर हाकलून दिलं हाय, अन् त्यांना(मिस्टरांना) वाटतंय की मुलगा झाला, तर घरचे जवळ करतील. त्यामुळे त्यांना फक्त मुलगाच पाहिजे. त्यांनी मला निक्षून सांगितले आहे, 'मुलगी झाली की माझा आणि तुझा काहीही संबंध उरणार नाही, तू तुझ्या मार्गाने अन् मी माझ्या मार्गाने.'

त्यांचा फोन आला, तर त्यांना जन्मलेलं बाळ मुलगा हाय की मुलगी हे सांगू नका."


"तसंही इथं आल्यावर त्याला समजेलच की. मग पुढे काय करशील?", मला त्याचा राग आलेला मी रागावर कंट्रोल करत बोललो.

शितल-"पुढचं पुढं बघू., किमान इथपर्यंत येतील तरी."


मी विचार करत होतो, की हिचा नवरा, हिची मुलगी पाहून हिला नांदवणारच नसेल, तर तो इथं येऊन काय उपयोग?

शितलचं जीवन एक गुंताच, जितका सोडवल तितका अजून गुंता वाढत जात होता.


आता एकच आशेचा किरण उरलेला, तिची आई. तिला फोन लावला. फोन शेजाऱ्यांच्यात होता, तिकडून उत्तर आले, "तिची आई कामावर गेली आहे ."

मी विचारले,"शक्य असेल, तर त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन 'त्यांच्या मुलीला प्रेग्नंशीसाठी शहरात सरकारी दवाखान्यात अॅडमिट केले आहे' हा निरोप द्याल का?"

तिकडून उत्तर आले, "ठिक आहे, मी जाऊन निरोप देतो, पण त्यांचा मालक सुट्टी देईल असे वाटत नाही."

मी थोडा वेळ सुन्न झालो, अन् तसाच बसून राहिलो,

डॉक्टरांनी बाळ सी.टी. स्कॅनसाठी माझ्या जवळ दिले. मी छोट्या टॉवेलने बाळाला गुंडाळले अन् घेऊन विचारत विचारत त्या विभागात पोहोचलो. माझ्यासमोर आठ-दहा लोकं नंबरने उभे राहिले होते, तिथं सगळ्यांना विनंती केली, की 'हे नुकतंच जन्मलेलं बाळ आहे, त्यामुळे याची टेस्ट लवकर होणं गरजेचं आहे'. तिथल्या एकानेही कुरबुर न करता मला नंबर दिला. मी ताबडतोब टेस्ट करवून बाळाला शितलजवळ नेवून दिलं.

पहाटे गेलेला दिपक सकाळचे आठ वाजले तरी आला नाही, म्हणून मी हॉस्पिटलच्या आवारात बाहेर येऊन वाट बघत येरझारा घालत होतो, इतक्यात दिपक आला, त्याला बघून माझी चिडचिड वाढली.

मी-"काय रे इतका वेळ लागतो का डॉक्यूमेंट्स आणायला? , इथं तुझी वाट बघून बघून माझी वाट लागली."

दिपक,"मी शितलच्या रुमवर जाऊन सगळीकडे शोधलं, पण तिथं डॉक्यूमेंट्सचा एक कागद सापडला नाही. तुला फोन करून सांगायचे म्हटले, तर माझ्याकडे फोन नाही, मग मी आपल्या रूमवर जाऊन तास-दिड तास झोपलो. म्हणून उशीर झाला.(खिशातून पैसे काढून देत)हे घे साठ रुपये."

मी-"साठच रूपये?"

"हो, बससाठी वीस रुपये आणि वीस रुपयांची भजी खाल्ली, लय भूक लागली होती सुभाष, म्हणून...", दिपक लाचार होऊन बोलला.

दिपकने पैसे खर्च केले म्हणून मला राग आला होता, पण त्याचा केविलवाणा चेहरा पाहून माझे डोळे भरून आले, कारण तो रात्रीही उपाशीपोटीच झोपला होता. मलाही भूक लागली होती, भूकेनं माणसाची काय अवस्था होते, हे मला जाणवत होतं.(त्याच्या खांद्यावर हात ठेवून)

मी-"चल, शेजारच्या टपरीवरून नास्ष्टा करून येवूया."

आम्ही दोघं चहाच्या टपरीवर जाऊन दोन दोन वडापाव खाल्ले. चहा प्यायल्याने लवकर भूक लागत नाही, म्हणून पैसे कमी असतानाही अन् चहा प्यायला आवडत नसताना चहा पिलो,

चहा पिताना आठवलं, शितल?.. तिनं रात्री काय खाल्लं असेल का? अन् आता तिला भूक लागली असेल. 

पैसे कमी उरले होते, किमान चहा सोबत बिस्कीट खाईल, म्हणून तिच्यासाठी दोन पार्ले बिस्कीटचे दोन पुडे आणि प्लॅस्टिक पिशवीत दोन कप चहा घेतला.

आता शंभर रूपयातले फक्त दहा रुपये उरले होते. मी दिपकला सांगितले,"तू रूमवर जा, तिथून आमच्या आॅफिसवर जा, अन् माझं नाव सांगून साहेबांच्याकडून पाचशे रुपये घेऊन ये, तसं मी त्यांना फोन करून सांगितले आहे. मी इथंली व्यवस्था करून येतो.

तो निघाला पण त्याच्याजवळ 'एस टी बस'ने जाण्यासाठी पैसे नव्हते. त्याने हात पुढे केला

दिपक-"तिकटला पैसे?"


मी-"बसने नको जाऊ, रस्त्याकडेला उभा राहून लिप्ट माग, कुणी ना कुणी लिप्ट देईल."

त्याने हळूच हात खाली केला आणि काहीच उत्तर न देता निघून गेला. त्याला वाईट वाटले असेल, पण माझ्याकडे दुसरा पर्यायच उरला नव्हता.

मी चहा बिस्किटे घेउन हॉस्पिटलच्या आवारात गेलो आणि तिच्या नवऱ्याला फोन केला, पण फोन स्विच ऑफ लागत होता.

मी दवाखान्यात शितलला अॅडमिट केले होते त्या रूममध्ये गेलो, पण तिथं ती दिसली नाही,माझा जीव कासावीस झाला, इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये कुठे शोधायची 

हिला?

मी रुममधून बाहेर आलो आणि एका नर्सला विचारले,"इथला डिलेव्हरी पेशंट?"

नर्स-"सगळे पेशंट चौथ्या मजल्यावर शिफ्ट केले आहेत.

लिफ्ट कुठे आहे हे माहीत नव्हते म्हणून मी धावत वर गेलो, रूम शोधून काढली, रूममध्ये गेलो, तर ती भिंतीकडे तोंड करून झोपली होती, मी हळूच एक स्टूल घेऊन बसलो आणि चहा बिस्किटे ख्वॉटवर ठेवून

"शितल उठ, ही घे, चहा बिस्किटं."

ती हळूच उठली आणि तिने प्लॅस्टिकच्या कपमध्ये चहा ओतून घेतला आणि चहात बिस्कीट बुडवून खात बोलली

"सुभाषभाऊ ,आयची लय आठवण यीत्या."

पुन्हा तिच्या डोळ्यांतून पाणी ओघळू लागले.

(मी तिच्या आईला कॉल केला)

"हॅलो, सुभाष बोलतोय...

पुण्यातून..

शितलच्या आईला फोन द्याल का?."


फोनवरून रिप्लाय आला,

"मी सकाळी तुमचा निरोप दिला, पण त्यांनी सांगितले की 'साडेपाच वाजता सुट्टी होईल, तेव्हा बघू'. तुम्ही सहा वाजता फोन करा."


"त्यांना सांगायचं ना, की शितलजवळ कुणीच नाही."


"सांगितले पण त्यांनी सांगितले की,'आत्ताच जाऊ शकत नाही."


   "का?" 


"मला नाही माहित, तुम्ही सहा वाजता फोन करून त्यांनाच विचारा."असे म्हणून तिकडून फोन ठेवला.

मला शितलच्या आईचा खूप राग आला.

पोरगी एकटीच आहे म्हणून सांगितले, तरी इकडं यायला तयार नाही. उलट 'संध्याकाळी बघू' म्हणतेय. कसली ही आई दगडाच्या काळजाची.

"शितल, ही तुझी सख्खी आई आहे, की सावत्र?."


"माझी सख्खी आई आहे, का काय झालं?."


"काय झालं ते संध्याकाळी फोन केल्यावर कळेल, तुझी आई आत्ताच येऊ शकत नाही."

हे ऐकून ती शुन्यात हरवून गेली. बिस्कीट घेतलेला हात कपात तसाच राहिला.

थोडावेळ निरव शांतता पसरली.

मी-"शितल,आराम कर, मी येतो थोड्यावेळात."

शितल-"सुभाषभाऊ, तुम्ही कुठं लांब जाऊ नका,ते(मिस्टर) येतील."

मी-"बरं होईल, तुझे मिस्टर आल्यावर तुला आधार वाटेल."

शितल-"कशाचा आधार, मुलगी झाली आहे म्हटल्यावर ते खर्चाला पैसेही देणार नाहीत. तुम्ही आहे म्हटल्यावर तुमच्या धाकाने थोडेफार पैसे देतील तरी."

"लांब नाही जात, जरा खाली मोकळ्या हवेत जाऊन येतो."असे म्हणून मी रूममधून बाहेर पडलो.

शितल ही माझ्यासाठी अनोळखी विवाहित स्त्री होती. तरीही मी तिला एकेरी नावाने बोलवत होतो. कारण ती रूमवर डबा आणून देत होती आणि कधी मी उपाशीपोटी झोपलो किंवा मला भूक नाही म्हटले, तरी ती निःसंकोचपणे रूममध्ये येवून दंडाला हलवून उठवायची आणि जेवणासाठी आग्रह करायची,"भाऊ उठा, थोडं खाऊन घ्या, उपाशीपोटी झोपू नका."

आईनंतर इतक्या प्रेमाने खाऊ घालणारी शितल, कधी परकी वाटलीच नाही, त्यावेळी तिचं नाव माहीत नव्हते, पण तिनं माझ्या लहान बहीणीची कमतरता कधी वाटून दिली नाही.

मी अनेक ओळखी-अनोळखी लोकांना एकेरी नावाने बोलायचो, याचं कारण धाक बसवणं नव्हता, तर आपुलकी वाढावी हा होता.

मी खाली येऊन एका झाडाखाली ठेवलेल्या बेंचवर बसलो. रात्रभर जागरण झाल्यामुळे बसल्या बसल्या झोप लागली. दुपारी बारा वाजता झोपलो ते चार साडेचार वाजता दचकून जागा झालो. झोपून उठल्यावर तोंडातून एकच शब्द निघाला,"शितल!!"

तसाच डोळे चोळत पळत सुटलो, पण आत जाण्याच्या मार्गावर जागोजागी गेट होते ते सर्व बंद केलेले होते. दोन तीन ठिकाणी सिक्यूरिटीगार्डने विनंतीवरून आत सोडले, पण एक ठिकाणी सिक्यूरिटीगार्ड सोडेचना. मी त्याला विचारले,"काका, किती वाजता आत सोडणार."

त्यावर त्याने सांगितले,"सहाच्या आत गेटपासशिवाय एकालाही सोडणार नाही."

सहा वाजेपर्यंत मी तिथेच येरझारा घालू लागलो. सहाचा टोल वाजला अन् गेट उघडले तसा मी पटकन आत शिरलो आणि पटपट चालत शितलला अॅडमिट केलेल्या रुमकडे गेलो.आत गेलो तसं शितल गहिवरून रडू लागली.

"सुभाषभाऊsss."


"काय झालं?,तुझे मिस्टर आले होते का?"


"नाही"


"मग काय झालं?."


"काही नाही,ते(मिस्टर)अजून आले नाहीत आणि इथं एकटीला पाण्याच्या खोल डोहात गटांगळ्या खाल्ल्यासारखं, बुडाल्या सारखं वाटतंय"


"काळजी करू नकोस, मी आहे ना. थांब तुझ्या आईला कॉल करतो."

मी कॉल केला,

"हॅलो, मी सुभाष,

पुण्यातून बोलतोय.."

माझं वाक्य पुर्ण व्हायच्या आत तिकडून आवाज आला, "हा. थांबा, शितलच्या आईकडे देतो.(पुढे शितलची आई बोलली)

'हा काय काळजी करू नकोस मी यीतीया' "

मी-"अहो कधी येताय."

तिकडून काही बोलणार इतक्यात शितलने फोन मागितला आणि बोलली,"आये...(ती पुन्हा रडू लागली),आये कधी येणार हायस,________बर,_______हा___हा_____बर."

 तिने फोन कट केला आणि माझ्याकडे दिला.

मी-"काय झालं काय म्हणत होती तुझी आई."


"काय न्हाय, तास-दिडतासात इथं पोहचीन असं म्हणत होती.", असे म्हणून तिने कॉटवर पाट टेकली आणि कुस बदलून भिंतीकडे तोंड करून रडू लागली.

"काय झालं ?"


ती डोळे पुसत,"काय न्हाय."


"मग का रडतेस?

 तुझे मिस्टर आले नाहीत म्हणून?,

की तुला मुलगी झाली म्हणून?."


नकारार्थी मान हलवत,

"न्हाय."

बस एवढंच ती बोलली.

नंतर मीही काही प्रश्र्न विचारले नाहीत. पाच दहा मिनिटे झाल्यावर मीच बोललो,"शितल,तुझी आई नक्की येणार आहे ना?."


"हो, माझी आय येणार हाय, तुम्ही जा, तुम्हाला उद्या आफीसला जायचं असल, आणि रूमवर गेल्यावर माझ्यारूममध्ये भाताचं तांदूळ आसत्यालं ते करून खावा."

हे सगळं ती न रडता शांतपणे स्पष्ट बोलली. त्यामुळे माझ्या मनाला विश्वास पटला, की तिची आई नक्की येणार आहे. त्यामुळे काळजी करण्याचे काही कारण नाही म्हणून जाताना मी तिला म्हणालो,

"शितल, येतो मी, काही अडचण वाटली तर फोन कर, येऊ का?"


"हां"

 इतकंच बोलली. नंतर मी गेलो की नाही हेही तिने मागे वळून पाहिले नाही.

तिने एकदा भिंतीकडे तोंड केले होते, ते मी रूममधून बाहेर पडेपर्यंत भिंतीकडेच होते.

साडेसहा वाजले असतील मी हॉस्पिटलमधून बाहेर पडलो आणि तडक चालत चालत मेन रोडवर आलो, खिशात फक्त दहाच रुपये होते. एका कारला हात केला, नशिब मला जिथं जायचे होते तिथंपर्यंत कार मिळाली. माझा स्टॉप आल्यावर त्याने कार थांबवली आणि पैसे मागितले, मी दहा रुपये त्याच्या हातात टेकवले आणि न काही बोलता रस्ता पार करू लागलो. कारवाला पाठीमागून आवाज देत होता, 'दहा नाही वीस रुपये होतात‌. पण मी एकदाही पाठीमागे वळून पाहिले नाही. कारण पाठीमागे पाहिले, तर तो हुज्जत घालणार अन् हुज्जत घालूनही त्याला काही मिळणार नाही, त्यापेक्षा मागं वळून न बघितलेलं बरं, असं मनाशी ठरवून तसाच पुढे चालत राहिलो.


दुसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे मी ऑफिसला गेलो, ऑफिसवरून आल्यावर सायंकाळी तिची आठवण आली, पण नवीनच जॉब मिळाला होता, त्यामुळे सारखं ऑफिसला दांडी मारता येणार नव्हती. त्यामुळे मी पुन्हा हॉस्पिटलला गेलो नाही.

नंतर तिची आई किती वाजता आली? कि आलीच नाही, देव जाणे. कारण तिची आणि माझी कधीच भेट झाली नाही. ती ज्या भाड्याच्या रूममध्ये राहत होती तिथेही ती कधी आली नाही. रुममालकाने दोन महिने वाट बघितल्यानंतर रूममधली संसाराची भांडी बाहेर काढून गोणी भरून मैदानात ठेवली. आठ दिवस भांडी मोकळ्या जागेत तशीच पडून होती. नंतर समजलं, की कोणीतरी एका टेंपोमध्ये भरून भांडी घेऊन गेले. भांडी नेमकं कोण घेऊन गेले, कुणालाच माहीत नाही.


"सुभाषभाऊ...सुभाषभाऊ..."

असा दोन वेळा आवाज आला तसा मी भानावर आलो.

मी-"हो, भाऊच आहे तुझा, भावना शुन्य भाऊ, तु अडचणीत असताना शेवटपर्यंत साथ न देणारा भाऊ, खाल्लेल्या अन्नाला न जागणारा भाऊ"

शितल-"आसं कसं म्हणताय भाऊ, उलट तुम्ही माझ्या सोबत होता, म्हणून मी आज तुमच्या समोर आहे. नाहीतर माझं काय झालं आसतं परमेशराला माहीत "


"माझं चुकलंच, मी माझा स्वार्थी विचार करून तुला एकटीला सोडून आलो, किमान तुझी आई येईपर्यंत तरी मी थांबायला पाहिजे होतं."


"तुम्हाला पण नविन नोकरी लागली हुती. माझ्या अडचणी सोडवण्याच्या नादात तुम्हीच अडचणीत आला आसता, म्हणून मी त्या दिवशी माझी आय येणार न्हाय हे माहीत असूनही तुम्हाला खोटं बोलली."


"म्हणजे..? त्यादिवशी तुझी आई आली नाही!? मला वाटतंच होतं, की ही तुझी सख्खी आई नाही. कसली ही आई बिना काळजाची."


"तसं काय न्हाय, माझ्या आयचा माझ्यावर लय जीव हाय."


"तु एकटीच आहे सांगितले तरी ती तुझ्या आधाराला आली नाही, तरी तु तिच्याच बाजूने बोलत आहेस."


"आयचा नाईलाज हुता, दुकान मालकानं पैसं दिल्याबिगर कसं येणार मोकळ्या हातानं, दुकान मालकानं सकाळी पैसं दिलं, तवा ती आली."


"आणि तुझा नवरा?."


"ज्या व्यक्तीला आपण आपलं समजून जीव लावला, त्यानं आपल्या भावनांची कधीच कदर केली नाही, ज्यात आपुलकी, जिव्हाळा नाय, ते नातं काय कामाचं, ते आलं न्हायत ते एक बरंच झालं, बाहेरचा सगळा आधार संपला, तवा माझ्या आतल्या आधारानं मला सावरलं."


"शितल, त्यावेळी पैसे नसल्यामुळे तुला मदत करू शकलो नाही आणि आत्ता पैसे असूनही तुझ्या नोकरीसाठी मदत करू शकत नाही. आमच्या ऑफिसमध्ये लग्न झालेल्या मुलींना नोकरी दिली जात नाही, तसा इथला नियमच आहे"


"सुभाषभाऊ, मी नोकरीसाठी आलेली न्हाय,परवा तुम्हाला कारमधून हाफिसच्या गेटमधून आत जाताना बघितलं आणि तुम्हाला भेटायची इच्छा झाली, अन् तुम्हाला भेटता यावं म्हणून हे सगळं नाटक करावं लागलं.

मनातून लय उदास वाटायचं. या जगात गरीबाचं कुण्णी कुण्णी नसतं.

आत्तापर्यंतच्या अनुभवातनं असं जाणवलं होतं की,'डोळ्यातलं पाणी पुसायला लोकं येतात, पण ते त्याचाही सौदा करतात' म्हणून डोळ्यातलं पाणी स्वतःच पुसलं. कोणी जोडीदार मिळावा ही इच्छा तर मी कधीच मागं सोडली होती, कोणासोबत राहण्यापेक्षा मला माझं आयुष्य मुलींसोबत जगायला आवडेल आणि त्याबद्दल माझ्या मनात अजिबात दुःख असणार नाय. आता नवीन आयुष्य जगायला लागू अश्या विचारात मी होती, पण ते नवीन आयुष्य काय पद्धतीनी जगावं हे मात्र मला समजत नव्हतं. माझ्या मनात गोंधळ चालू होता."


मी-""अशावेळी तु इथं आलीस तेव्हा बरं झालं, आता तु माझ्या घरी चल कायमचं,आता तुला जादा कष्ट करण्याची गरज नाही. तुझा भाऊ तुला कशाचीच कमतरता होऊ देणार नाही."


"त्याची काय गरज पडणार नाही, त्या गोंधळापासून पळण्यासाठी शेवटी मी डोळे मिटून घेतलं आणि जादू झाली. माझ्या मनातून सगळेच विचार दूर गेले. त्या विचारांची जागा मी पाहिलेल्या स्वप्नांनी घेतली. ते(पहिले मिस्टर) गेल्यानंतर स्वावलंबी होण्याचं पहिलं स्वप्न होत ते खानावळ सुरू करण्याचं(मेसच),तो विचार आल्या आल्या मी डोळे खाडकन उघडले. मला आलेली सगळी मरगळ मागे पडली. आता मला काय करायचं ते माहिती होत. चालायचं म्हटल्यावर कधीतरी ठेच लागणारच म्हणून का कुणी चालायचं थांबतं का, म्हणून मी पुन्हा मेस चालू केली आणि त्यानंतर नुसती धावतंच होती ते फक्त पैसे कमवायला. पैसे मिळाले पण आनंद मात्र कुठेतरी मागेच राहिला. सगळीच सुखं पैश्यांनी विकत घेता येत नाहीत ते मला जाणवलं‌. मी माझ्या मुलींना माझ्याकडे आणायला गेली. त्यावेळी सासूने माझी अवस्था पाहिली आणि माझ्या गळ्यात पडून रडू लागली, सासू म्हणाल्या,"तरूणपणी माझा मुलगा गेला अन् माझं भान हरपून गेलं,त्याच्या माघारी तु तरणीताटी पोर, पांढऱ्या साडीत उभं आयुष्य घालवणार, हे माझ्या मनाला रोज टोचत राहीलं असतं, म्हणून तुझं दुसरं लग्न व्हावं, तु सुखात रहावं, म्हणून मी तुला मनात नसतानाही घराबाहेर हाकलून दिलं, पण काय करणार, करायला गेले एक अन् झालं भलतंच. तुझ्या जीवनाची जी तारांबळ झाली आहे ,त्याला मीच कारणीभूत आहे. आता तु कुठे जायचे नाही माझ्याजवळच राहायला यायचं आणि मला सासूबाई म्हणायचं नाही,आई म्हणायचं,आई"


"जगायचं म्हटल्यावर दुःख हे येणारच म्हणून का कुणी जगायचं सोडतं का."

खरंच, सासूबाईंच्या रूपानं मला दोन दोन आया मिळाल्या, दोन दोन आया मिळायलापण भाग्य लागतं..भाग्य.

मी त्यांना माझ्याकडे मी नविन घेतलेल्या घरी घेऊन आली, त्यांनी दिलेला त्रास मी कधीच विसरून गेली होती.

आता मात्र मला माझी चूक उमगली. आता मी जगणार, ते पैसे मिळवण्यासाठी नाही तर अर्धवट राहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी. माझ्या अशिक्षितपणामुळं माझी जी अवस्था झाली, ती माझ्या मुलींची होऊ नये यासाठी, मी तिघींना खूप शिकवणार आणि स्वावलंबी बनवणार. आता ती माझी चूक सुधारणार."


तिची जीवन जगण्याची निष्ठा पाहून माझा उर भरून आला.

"शितल,तु रिशेप्शनमध्ये थोडं थांब मी हे interviewचे पेपर HR ऑफिसमध्ये जमा करून येतो, मग आपण माझ्या घरी जाऊ.", असे म्हणून मी तिथून बाहेर पडलो आणि HR ऑफिसमध्ये पेपर जमा केले, त्यासोबत दोन दिवसांच्या सुट्टीचा अर्ज टाकला आणि गडबडीत reception मध्ये शिरलो, पण तिथं शितल दिसली नाही मग मी ऑफिसच्या गेटवर गेलो, तिथेही ती दिसली नाही, मी securityला विचारले,"इथं कुणी ladies येवून उभी राहिली होती का?."

सिक्यूरिटी-"नाही सर ."

मग मी त्यावेळीचे CCTV footage चेक करायला लावले, त्यात ती एका हातात पर्स आणि दुसऱ्या हाताने डोळे पुसत लगबगीनं बाहेर पडताना दिसत होती.

CCTV footageमध्ये तिला रडताना पाहून माझ्या ह्रदयात कालवाकालव सुरू झाली, नेमकं काय झालं असेल?

खरंच स्वावलंबी झाली असेल…?,

की तिला नोकरीची आवश्यकता होती.‌..?,

कि मला त्रास नको म्हणून ती पुन्हा एकदा माझ्याशी खोटं बोलली…?

हे सगळे प्रश्न अनुत्तरितच आहेत,


हे मात्र नक्की, की तिच्या जीवनात नवरा नावाचं छत्र (कवर)फाटलं नसतं, तर तिच्या जीवनाचा(पुस्तकाचा) असा चोळामोळा झाला नसता...


अजूनही मनापासून वाटत राहतं, तिनं कुठेही रहावं, पण सुखी समाधानी रहावं...

  


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational