STORYMIRROR

सुभाष मंडले

Inspirational

3  

सुभाष मंडले

Inspirational

काळ रात्र होता होता

काळ रात्र होता होता

15 mins
184

१.

पावसाळ्याचे दिवस होते. संध्याकाळची वेळ होती. धोधो पाऊस पडून गेला होता, तरीही पावसाची बारीक संततधार सुरूच होती.


आज रोजच्या पेक्षा थोडं लवकरच काम उरकले होते. निदान आज तरी घरी लवकर पोहोचू या खूशीत ऑफिसमधून बाहेर पडलो, पण रस्त्यावर वाहनांची हू म्हणून गर्दी दाटलेली. रात्रीचं लुकलुकणाऱ्या काजव्यांचे मोहोळ नजरेसमोर घोंघावत रहावं, तसं वाहनांच्या लाईटच्या उजेडात आभाळातून पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे बारीक तुषार चमकून डोळे दिपवून टाकत होते.


 घरी लवकर पोहोचण्याच्या उत्साहावर पावसाने पाणी फिरवले होतेच, पण वाहनांच्या दाट गर्दीतून वाट काढत पुढे पुढे सरकत राहणे तेवढेच आपल्या हातात होते.


दिवसभर कमी अधिक पाऊस पडतच होता, त्यामुळे हवेत कमालीचा गारठा पसरलेला होता. अंगात अगदी कमी वेळात थंडी संचारली होती. गावाकडे लोक जसं 'शिवकळा येण्यासारखी थंडी आहे' असे म्हणतात, तशी बोचरी थंडी होती. अशा थंडीत दातांचं थडथडणं काही केल्या थांबत नव्हते.


त्या दिवशी रोज ठरलेल्या वेळेपेक्षा कित्ती तरी उशिराने घरी पोहोचलो. या जास्तीच्या वेळात घरापर्यंत पोहचण्यासाठी जी धडपड करावी लागली; ती केरात उलट्या पडलेल्या झुरळासारखी होती. जेवढी धडपड करावी तेवढी थोडीच.


 जुन्या छपराच्या वळचणीतून पावसाचं पाणी थेंब थेंब ठिपकावे, तसं डोक्यात मुरून उरलेलं पाणी केसातून खाली ठिबकत होते. अखेर कपडे व मन कर्दमलेल्या अवस्थेतच मोठ्या कष्टाने घरापर्यंत येऊन पोहोचलो. 

घराचा दरवाजा उघडला. आत गेलो. आतून दरवाजा बंद करून घेतला आणि 'पोहचलो बुवा एकदाचं' म्हणून एक मोऽठ्ठा सुस्कारा सोडला.

इतका वेळ पावसात भिजल्यामुळे नाक जवळजवळ बंदच होत आले होते. घशात खवखवायला लागलं होतं. त्यामुळे पहिल्यांदा टॉवेलने भिजलेलं डोकं व तोंड कोरडे करून घेतले.

आता मात्र पावसात भिजलेल्या पाखरासारखी माझ्या मनाची अवस्था झाली होती, जो जो कोरडं व्हायची धडपड करावी, तसतशी अधिरता वाढत गेल्यासारखी. 

पण इतकं अंतर अशा भेदरलेल्या मनःस्थितीत चालत येऊन कंटाळा आला होता. आहे त्या स्थितीतच खुर्चीवर बसून क्षणभर विश्रांती घ्यावी आणि मग चिखल पाण्यामुळे खराब झालेले कपडे बदलून निर्धास्त होवू, असे ठरवले.

 खुर्चीवर आरामशीर बसून योगसाधनेत डोळे झाकतात, तसे क्षणभर डोळे मिटून घेतले. इतक्या वेळपर्यंत डोक्यात कालवाकालव करणारी दुनिया हळूहळू भुईसपाट होत होती. 


इतक्यात, मोबाईलची रिंग वाजली आणि शांतता भंग पावली. फोन उचलायची देखील इच्छा नव्हती, तरीही डोळे मिटलेल्या अवस्थेतच फोन उचलून कानाला लावला.


"असशील तसा निघून ये.", 

 

 घाबरलेल्या सुरातल्या आवाजाने माझे निद्रा अवस्थेतले डोळे खाडकन उघडले. अक्षरशः काळजाचं पाणी पाणी झालं. हात पाय गळून पडले.


कोण आहे हा ?,

हा इतक्या तातडीने कुठे बोलवत आहे मला ?, 

आणि याने मला का म्हणून फोन केला असावा ?,

काय घडलं असावं ?

अशा एक ना अनेक काळजीत पाडणाऱ्या प्रश्नांनी मला खडबडून जागे केले.


अचानक कानावर पडलेल्या अशा शब्दांमुळे तिकडून कोण बोलत आहे, काय झालंय, याची विचारपुस करण्याचंही भान मला उरले नाही. मी तसाच सुन्न अवस्थेतच असताना तिकडून पुन्हा आवाज कानावर पडला,


 " मी गणेश! तुझा ऑफिस सहकारी. तू एकमेव असा माणूस आहे; जो माझ्या काळजाच्या अत्यंत जवळचा आहेस, म्हणून मी तुला फोन केलाय. तू आत्ताच्या आत्ता माझ्या घरी ये. ताबडतोब निघ."


मागे एकदा, गणेशने नवीन चार चाकी गाडीची खरेदी व नवीन घराचा 'गृहप्रवेश सोहळा' एकाच दिवशी करण्याचं आयोजन केले होते, त्या निमित्ताने त्याने आमच्या ऑफिस सहकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून निमंत्रण पत्रिका दिली होती, पण मला तो ना भेटायला आला; ना निमंत्रण पत्रिका दिली. 

कदाचित कामाच्या गडबडीत तो मला निरोप द्यायला विसरला असेल.


 पण एक प्रश्न अनुत्तरितच राहतो, तो म्हणजे, ' गणेश मला इतका जवळचा मानतो, तर आपल्या जवळच्या माणसाला आपल्या आनंदाच्या क्षणांत सहभागी करून घ्यायची त्याला आठवण कशी होऊ नये ?! '


मला या 'सोहळ्याची' नंतर बातमी समजली होती, पण माझा स्वाभिमान म्हणा कि अहंकार; मी त्या सोहळ्यासाठी गेलो नाही. त्यामुळे त्यांचं घर कुठे आहे, हे खरंच मला माहीत नव्हते.


शिवाय तिकडे जायचं म्हणजे पुन्हा त्या पावसात नको असणाऱ्या चिखलाच्या किचकिचीतून जावं लागणार होतं. त्यासाठी माझं मन कधीच तयार होणार नव्हते. 


" काय झालं, गणेश? ! , जरा सविस्तर सांगशील का?", 

खूप वेळ पावसात भिजल्यामुळे माझ्या आवाजात थोडासा बदल झाला होता. घराबाहेर न पडता इथूनच काय करता येईल का, हे जाणून घेण्यासाठी 'काय झालं असेल' याची चाचपणी करीत मी थोडं धीराने बोललो.


"इथं सगळं न सांगण्यासारखं घडत आहे, पण आता डोक्यावरून पाणी चाललंय, त्यामुळे सांगावंच लागेल. आत्ताच माझं न् माझ्या बायकोचं कडाक्याचं भांडण झालंय. म्हणे, 'मला सुख हवंय'... अरे, कोणतं सुख तिला कमी पडलंय?, घर आहे, गाडी आहे. वेळ जात नाही म्हणून मी नको म्हणत असतानाही ती नोकरी करत आहे. तिच्या मनाला वाटेल तसे ती वागत आहे. तरीही मी एका शब्दानेही तिला दुखावले नाही. तरीही!!!...", 

तो खूपच घाईघाईने वैतागून बोलत होता.


"शांत हो गणेश, अरे हा तुमचा घरगुती वाद आहे. तो तुमचा तुम्हालाच सोडवला पाहिजे. त्यात मी किंवा बाहेरचा कोणी तिथे येऊन काय करू शकतो! त्यातल्या त्यात स्वतःच्या बायकोला नवराच जास्त समजू शकतो; समजूत घालू शकतो. बरोबर ना!", मी त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होतो.


" तुला तर माहितीये, दिवसभर ऑफिसमध्ये डोक्याला किती तान असतो. तरीही घरी आल्यानंतर तिने माझी सेवा करावी, असा कधीच आग्रह धरला नाही. तिला कसलीही फर्माईश केली नाही. मला जे हवं नको ते मी स्वतः करतो. तिला त्रास नको म्हणून तिच्या घरगुती कामातही कधी लुडबुड करत नाही. ती जे चार घास बनवून देईल; ते जसे असतील तसे मुकाट्याने कुरबुर न करता खातो. अलीकडे ती रोज वैतागते, खूप राग राग करते. तरीही ' तिला त्रास होत असेल, म्हणून ती आपल्यावर चिडत आहे, नाहीतर विनाकारण का म्हणून ती आपला राग राग करेल !' अशी स्वतःच्या मनाची समजूत काढून निमुटपणे सहन करीत राहतो. बघ ना, तरीही आत्ता..... हा कुठला न्याय!", त्याच्या पुढच्या शब्दांची जागा इतका वेळ कंठात अडवून ठेवलेल्या गहिवरण्याने घेतली.


ऑफिसमध्ये माझ्याशी अतिमहत्वाच्या कामाव्यतिरिक्त चुकुनही न बोलणारा गणेश! आज भडभडून बोलत होता. वर्षानुवर्षे छातीत कोंडून राहिलेला श्वास मोकळा करावा तसा.

 

२.

आज मला तो अगदी खूप जवळचा मित्र असल्यासारखं समजून आपल्या दुःखाची झोळी पुर्णपणे उलटी करत होता. आपल्या मनात इतके दिवस साठलेलं दुःख झाडून झाडून खाली करत होता.


" गणेश तुझं सगळं म्हणणं बरोबर आहे, पण यात मी काय करू शकतो?"


कितीतरी वेळ गणेशच्या कंठात धडका मारत असलेल्या हुंदक्याचा अखेर बांध फुटला, म्हणाला,

"अरे, ती आत्महत्या करायला गेलीय."


'आत्महत्या' हा एकच शब्द ऐकला, अन् अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. माझ्या तोंडातून आपसूकच शब्द निघाला,

"आत्महत्या?!..." 


" हो, आत्महत्या... आत्ताच ती आतल्या खोलीत गेलीय न् आतून दरवाजा बंद करून घेतलाय. मी तर खूप घाबरलोय. सगळं सुचवायचं बंद झालंय." , घाबऱ्याघुबऱ्या झालेल्या गणेशला बोलणं उरकेनासं झालं होतं. एक एक शब्द शेवटचाच आहे, असं तो बोलत होता.


"तुला कसं माहित, की वहिनी आत्महत्या करायला गेल्या आहेत म्हणून.?"


"माझ्या समोर हातात सापडतील त्या वस्तू आदळआपट करत ती आतल्या खोलीत शिरली न् म्हणाली, 


'माझ्या जगण्यात आता रसच उरला नाही. सगळं जीवनच कोरडं कोरडं... असं जगणं जगण्यापेक्षा मेलेलं बरं. माझ्या मरणाचा तुम्हा कुणालाही त्रास होणार नाही. मी तशी व्यवस्था करून जातेय. शेवटची चिठ्ठी लिहून स्वतःला संपवून टाकणार आहे. मला आडवायचा कुणीही प्रयत्न करू नका, त्याचा काहीच उपयोग होणार नाही आणि मी माझ्या निर्णयावर ठाम आहे.'... 


मी तिला चांगलंच ओळखतो. ती जे म्हणते; ती ते करतेच करते. आता तर तिने आतून दरवाजाही बंद करून घेतलाय. तू लवकर घरी ये अन् काहीतरी कर... "


"हे बघ गणेश, मी तुझ्या घरी येईपर्यंत सगळं संपलेलं असेल, त्यापेक्षा तू असं कर, तुझा फोन त्यांच्याकडे दे मी त्यांच्याशी बोलतो."


"अरे, समजत कसं नाही तुला... तीने आतून दरवाजा बंद करून घेतलाय...", या वेळी गणेशच्या बोलण्यात कमालीचा ताण जाणवत होता. त्यातूनही तो पुढे बोलला, "तिच्याकडे मोबाईल फोन आहे. तिचा फोन नंबर देतो. घे.. बघ उचलते का. तिने फोन उचलला नाही, तर सगळं संपलंच म्हणून समज."


"काळजी करू नकोस, मी आहे. तू फक्त फोन नंबर दे.", 


स्वतःहून मृत्यू ओढवून घेत असलेल्या एका अनोळखी स्त्रीला मृत्यूच्या दारातून परत आणण्याचं अशक्यप्राय आव्हान स्वीकारायला निघालो होतो; हे खरं, पण नाही म्हटलं तरी स्वतःच्या इच्छाशक्तीवर कितीही केलं तरी या वेळी विश्वास ठेवता येत नव्हता.


'करून तर बघू. जमलं तर जमलं; नाहीतर जे होणार आहे ते होणारच, त्याला मी किंवा दुसरा कोणी टाळू शकणार आहे का.' 

तरीही 'आपण ते अशक्यप्राय काम करूच करू' अशी स्वतःच्या मनाची तयारी करत गणेशच्या बायकोला फोन लावला.


आपण एखाद्या त्रासलेल्याला मायेनं समजावण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्या भावना अनावर होतात. अश्रूंचा बांध फुटून महापूर वाहू लागतो. जर कदाचित त्याच्या अश्रूंचा बांध आपल्या कलेने फोडू शकलो नाही, तर त्याच भावना आपण केलेल्या प्रयत्नांवर वरचड होतात व त्या विकृत रूप धारण करून त्याच्या विनाशास कारणीभूत ठरतात. 


'ज्यांच्या डोळ्यांत विकृत कृती करण्याची धुंदी चढलेली असते, त्यांना वेळ प्रसंग बघून कठोर बोलूनही जागं करता येते.' हा माझा आजवरचा अनुभव आहे. त्याच अनुभवाचा वापर इथं करण्यासाठी आतून मनाची तयारी करू लागलो.


फोनची रिंग होत होती, पण फोन उचलला गेला नाही. शंकाकुशंकेचं आभाळ दाट होत चालल्याचे संकेत मिळत होते. फोन कानाला लावलेल्या अवस्थेत हाताला कंप सुटलेला होता, तरीही मनाचा ठिय्या न सोडता पुन्हा एकदा फोन लावला. पुन्हा तिकडून फोन उचलला गेला नाही. आता मात्र वाटलं, सगळं संपलं!...


 डॉक्टरांना बोलवावं न् डॉक्टर पोहचण्या अगोदरच पेशंटने प्राण सोडावेत, अशी माझ्या मनाची अवस्था झालेली.


शेवटचा फोन लावून बघू, म्हणून फोन लावला. आणि काय आश्चर्य! फोन उचलला गेला! मन थोडं शांत झाले. 'तसं' काही घडलेलं नाही, या जाणीवेनं सुखावलो, पण मनाची अस्थिरता धापा टाकत होती. अर्ध युद्ध जिंकल्याचा आनंद माझ्या डोळ्यात तरळू लागला.


 माझ्या कावऱ्याबावऱ्या झालेल्या डोळ्यांची हालचाल स्थिर करत मनाला उसनं बळ देत मी बोलायला सुरुवात केली, 


 "नमस्कार मॅडम, आत्ताच माझा मित्र गणेशने, म्हणजे तुमच्या मिस्टरांनी फोन करून तुम्ही करत असलेल्या कृत्याची माहिती दिली. तुम्ही आत्ता जे कृत्य करत आहात, त्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा."


समोरच्याला दोन वाक्यांच्या मध्ये शिरून बोलता येऊ नये, यासाठी मुद्दामहूनच दोन वाक्ये एक सलग बोलूनच थांबलो. आता समोरून प्रतिक्रिया येण्याची वाट बघू लागलो.


 इतक्यात, "मी इथं माझ्या मरणाचा सोहळा मांडला आहे, असे वाटते का तुम्हाला?, कि जे तुम्ही शुभेच्छा द्यायला लागलाय. मी खरंच आत्महत्या करतेय.", तिकडून तिरसट व तिखट रागीट सुरात उत्तर मिळाले.


"मला पक्क ठाऊक आहे, की तुम्ही खरंच आत्महत्या करत आहात, म्हणूनच तर तुम्हाला शुभेच्छा देतोय, मला खोटं वाटत असतं, तर मी तुम्हाला फोन का म्हणून केला असता?"

आता समोरून काही ना काही प्रतिक्रिया यावी ही माझी अपेक्षा होती.


" शुभेच्छा देऊन झाल्या असतील तर फोन ठेवू शकता. धन्यवाद."

या अनपेक्षित प्रतिउत्तराने मी गडबडलो. आता पुढे काय बोलावे ते सुचेना.


आता जर फोन ठेवला गेला, तर पुन्हा संवाद साधता येणं जड जाईल आणि आपण लढत असलेली लढाई अर्ध्यावरच सुटून जाईल. 


समोरच्याचं ऐकून घ्यायची त्यांची मानसिकता नसणार आहे, त्यामुळे आता उपदेशाचे डोस किंवा प्रवचन देणं खूप परिणामकारक ठरणार नाही, हे माझ्या मनाने जाणले.


डोक्यात मृत्यूची चढलेली झिंग उतरण्यासाठी थोडा वेळ जावा लागतो. त्यासाठी हलक्याफुलक्या विषयावर चर्चा करून त्यांना बोलतं ठेवायचं होतं. पुढे काय होईल ते होईल; निदान आपण आखलेली रणनिती युद्ध पातळीवर अंमलात आणत राहायची. बस्स इतकाच विचार त्यावेळी माझ्या डोक्यात होता.


समोरून 'धन्यवाद' शब्दाने संवाद संपवला, तसं मी थोडसं बावचळलो, तरीही जे सुचेल ते नेटाने पुढे बोलू लागलो, "मॅडम, अजून एक... तुम्ही आत्ता खरंच आत्महत्या करत आहात का? मनात थोडी साशंकता होती, म्हणून विचारतोय. बाकी काही नाही."


"मी माझा जीवन प्रवास कायमचा संपवत आहे, यासाठी मी कुणाला पुरावा देण्याची काय गरज आहे? ते तुम्हाला काहीवेळा नंतर कळेलच."


"मला एक प्रश्न पडलाय, की आत्महत्या करत असताना कोणी गाणी लावून आत्महत्या करतं का?."


" मी तुमच्या असल्या फालतू प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी बांधील नाही. आणि तसंही माझी या वेळी कुणाशीही काहीच बोलण्याची मानसिकता नाही. तुम्ही फोन ठेवू शकता."


" एक मिनिट मॅडम... तुम्ही लावलेलं गाणं मला पुर्ण ऐकवू शकता का?, कारण हे गाणं माझ्या खूप जवळचं आहे."


"मी कुठेही गाणी लावली नाहीत."


मलाही माहित होते, की कुठूनही गाण्याचा आवाज येत नाही, तरीही मी पुन्हा एकदा बोललो,

"गाण्याचा स्पष्ट आवाज माझ्या कानावर पडतोय आणि तुम्ही नाही म्हणत आहात. हे कसं शक्य आहे?"


समोरून क्षणभर निशब्द शांतता...

".... गाणं वगैरे काहीही नाही. तुम्हाला भास होत असेल."


"अहो, नाही नाही!! असं कसं म्हणता. अगदी स्पष्ट सुरात

 'सत्यम शिवम सुंदरा'. 

हे गाणं ऐकायला येत आहे. कृपा करून ते गाणं पुन्हा ऐकवाल का?"


"इथं कोणतंही गाणं वाजत नाही.", यावेळी त्यांचा सुर बदललेला जाणवला, अचानक ऋतू बदलून चंद्राची सावली सुर्याने घेतल्यासारखा.


 बदललेल्या बोलण्याच्या सुराचा फायदा घेत मी पुन्हा बोललो," बघा ना, आत्महत्या करायला निघालेल्या माणसाकडून एक सुंदर गाणं ऐकण्याची इच्छा होती, पण ती कदाचित पुर्ण होऊ शकत नाही. माझा आवाज चांगला असता, तर मीच ते गाणं तुम्हाला ऐकवलं असतं, पण काय करणार... 


मॅडम तुमच्या आवाजात गोडवा आणि सुरही जाणवतोय. मॅडम तुम्हाला एक विनंती करू शकतो का?"


"हो बोला.", यावेळी मॅडमच्या बोलण्यात भडकलेल्या अग्नीने बर्फाचं रुप घेतल्यासारखं जाणवलं.


"म्हणजे तुम्हाला येत असेल, तर हे गाणं ऐकवू शकता? मॅडम नाही म्हणू नका. कोणी तरी तुमच्या मृत्यू पुर्वी शेवटची विनंती करत आहे, तेव्हा ती तुम्ही नाही म्हणू नका."


जादा आढेवेढे न घेता, मॅडमनी गीताचे सुर उमटवायला सुरूवात केली, 


" नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा,

सत्यम शिवम सुंदरा,

सत्यम शिवम सुंदरा...

शब्दरूप शक्ती दे,

 भावरूप भक्ती दे.

प्रगतीचे पंख दे, चिमणपाखरा, 

ज्ञानमंदिरा.

सत्यम शिवम सुंदरा...

सत्यम शिवम सुंदरा..."


आत्महत्या करायला निघालेल्या एका व्यक्तीने इतक्या सुंदर तालासुरात आणि तितक्याच सुंदर लयीत हे गीत गायले होते, यावर विश्वास बसत नव्हता. आज कान आणि मन दोन्ही तृप्त झाले.


"तुम्ही इतक्या सुंदर रितीने हे गीत गायले आहे; ऐकून मन प्रसन्न झाले. कदाचित हे गाणं तुमच्याही खूप जवळचं असावं. इतक्या सुंदर रितीने तुम्ही ते गायलं. ऐकून असं वाटतं, की तुमच्या काही आठवणी या गाण्यासोबत जोडल्या गेलेल्या असाव्यात."


 त्यांनी त्यांच्या पुर्वआठवणी जाग्या कराव्यात आणि त्यांच्या मनावर साचलेले दुःखाचे मळभ धुवून टाकलं जावं, यासाठी त्यांनी बोलतं व्हावं ही माझी अपेक्षा होती.


३.

अपेक्षेप्रमाणे, त्यांनी मनात खोलवर साचलेलं आपलं दुःख उघडं करत त्याला वाट करून द्यायला सुरुवात केली,


"आजपर्यंत कुठलीही गोष्ट माझ्या मनासारखी घडली नाही.

कदाचित मला मिळालेला जन्मही मला नकोसा होता. म्हणूनच की काय, माझ्या जन्माच्या वेळी माझी आई मला कायमची सोडून गेली. लहानपणी आईच्या मायेचं सुख कधी अनुभवायला मिळालेच नाही.


तारुण्यात असताना एक जीवलग वाटावा असा मित्र भेटला, ज्याच्यावर आपलं सगळं जीवनच अर्पण करावं असं वाटलं, पण त्याचं जगणं म्हणजे 'लिहिणं' होतं.


 एकदा, त्याला मी म्हणाले, " कथा, कविता लिहिण्याचा छंद पाळणं, म्हणजे भिकेचे डोहाळे लागण्यासारखे आहे. अशा कथा आपल्या जीवनावर जातात.


 आजपर्यंत कुठल्या लेखकाचं जीवन सुखात गेले आहे का?, लेखकाकडे खूप पैसा आहे, असं कधी ऐकले आहेस का? दुःख आणि त्रासच त्यांच्या वाट्याला आलेला असतो. तेच त्यांचे सोबती असतात. 


तू लिहिणं सोडून दे. मी जीवनभर तुला साथ देईन. आपण सुखी समाधानी राहू, पण त्यानं लिहणं सोडलं नाही. 


जन्मापासून दुःखच माझ्या वाट्याला मिळालं होतं; आता पैसा श्रीमंतीचं सुख मिळवायची इच्छा होती, पण ती त्या जीवलगा सोबत पुर्ण होऊ शकत नव्हती, म्हणून मी त्याच्याशिवायचा माझा वेगळा प्रवास सुरू केला."


त्या अजून पुढे काही बोलणार इतक्यात मी मधेच बोललो," तुम्ही त्यावेळी घेतलेला निर्णय योग्यच असणार आहे, कारण तुमच्या प्रेमासाठी तो त्याचं साधं लिहणं सोडू शकत नव्हता?! म्हणजे त्याचं तुमच्यावर खरं प्रेमच नसणार आहे. बरोबर ना?"

मी त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे समर्थन करीत जोडूनच एक प्रश्न विचारला.


"नाही, तसं काही नव्हतं. तोही माझ्यावर खूप मनापासून प्रेम करत होता. माझी काळजी घेत होता. मला जपत होता. तरीही... 


तरीही मी माझा मार्ग बदलला, कारण तो त्याचं लिहणं सोडू शकत नव्हता. मला अजूनही आठवतेय, की तो त्यावेळी म्हणाला होता,


 'लिहणं हा माझा श्वास आहे, त्याला काही क्षणासाठी मी थांबवू शकतो; पण बंद! कधीच करू शकत नाही.'


आणि मला माझ्या जीवलगाचा श्वास बंद होताना, त्याची घुसमट होताना पाहायचं नव्हतं...", 

एक मोठ्ठा सुस्कारा सोडत त्या पुन्हा पुढे बोलू लागल्या, "माझ्या जीवनात पुर्ण रंग भरलेच नाहीत. जे भरले ते फुलले नाहीत. सगळं कसं कोरडं कोरडं. आयुष्यभर ज्या ज्या वेळी सुख मिळवण्याचा प्रयत्न केला, त्या प्रत्येक वेळी माझ्या नशिबी फक्त दुःखच आले."


वाटलं सांगावं, की 'सुख मिळवायचं नसतं; ते अनुभवायचं असतं.' पण हे सगळं ऐकून घेण्याची त्यांची आत्ता मानसिकता आहे का?...


आपलं जीवनावरचं तत्त्वज्ञान मांडण्याची हीच ती योग्य वेळ आहे असं समजून मी बोलायला सुरुवात केली,

"जीवनात सुख दुःखचा पाठशिवणीचा खेळ चालणारच. दुःखाचा डोंगर सरत नाही, म्हणून कोणी मरतं का?"


"हे सगळे पुस्तकी शब्दांचे खेळ आहेत साहेब. खऱ्या आयुष्यात असले शब्दांचे जुमले चालत नसतात. या व्यवहारी जगात जो तो आपआपल्या फायद्याचा विचार करतोय. या जगात कोणाच्याच सुखदुःखासी कोणालाच काही घेणे देणे नाही. माझं दुःख मलाच माहीत, माझ्या दुःखाची वेदना तुम्हाला नाही कळणार. "


" कळतंय मला. तुमच्या भावना मी समजू शकतो, पण... म्हणून का कुणी मरत असतं का?"


आता मात्र त्यांच्या रडण्याचा, मुसमुसत बोलल्याचा आवाज ऐकू येऊ लागला.

"आत्तापर्यंत, ना मी कुणाला सुख देऊ शकले; ना मला कुणी सुख दिले. मग माझ्या मनानं वाळवंट झालेल्या शरीराने नुसतंच कशासाठी जगत राहायचं ? मला आता जगण्याची कसली इच्छाच उरली नाही. ही दुनियाच स्वार्थी लोकांनी भरलेली आहे. या स्वार्थी दुनियेत तुमचाही काहीतरी स्वार्थ असेल, म्हणूनच तर तुम्ही मला इतकं समजावण्याचा प्रयत्न करत असावेत."


"खरं सांगू मॅडम, माझा आत्तापर्यंत कसलाच स्वार्थ नव्हता. आजपर्यंत जी लोकं आपल्यावर विश्वास दाखवतात, त्यांचा विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न करत आलो आहे, पण आत्ताच्या या क्षणापासून मला वाटायला लागलंय, की तुमच्याकडून एक स्वार्थ ठेवायला हरकत नसावी. तेही तुमची हरकत नसेल तर..."


"कोणता स्वार्थ?"


" आत्ता तुम्ही जे गीत गायले ते माझ्या अंगात स्फुर्ती निर्माण करणारं होतं. तुमच्या सुमधुर आवाजातील गायनाने मला ऐकतच राहावं असं वाटलं. मला आनंदी जगण्याचं अजून एक नवं कारण मिळालं. 


तुम्ही जसं म्हणालात ना, की मी कुणाला सुख देऊ शकले; ना मला कुणी सुख दिले आहे. मग नुसतंच कशासाठी जगत राहायचं..


तर नुसतंच जगत राहू नका. माझ्या जगण्यासाठी तुम्ही जसं नवं कारण बनलात, तसं हजारो लाखो लोकांच्या जगण्याचं कारण बनून तुम्ही जगा. 


तुम्ही आत्ता जे गीत गायलं, ते ऐकून गाणी गाणं तुम्हाला खूप आवडत असावं, असं मला वाटतं."


"जुनी गाणी गाणं हा माझा खूप आवडता छंद होता. कॉलेजच्या पहिल्या वर्षीच्या गॅदरिंगमध्ये हे गाणं मी गायलं न् माझा आवाज ही माझी ओळख झाली. या गाण्याच्या प्रभावानेच खूप सारे मित्र मला मिळाले होते. त्यावेळी मी खूप उत्साही, खूश असायचे, पण काळाच्या ओघात सगळं सगळं मागं पडत गेलं." 

त्यांच्या या अशा बोलण्याने माझ्या विचारांना सर्मथन दिल्यासारखे झाले. माझ्यात अजून थोडा उत्साह संचारला. मी पुढे बोलू लागलो,


"अजूनही तुमचा तोच उत्साह तुमच्यात निर्माण करून खूश राहू शकता. लोकांनी आपल्याला चांगले म्हणावे किंवा कोणत्या तरी स्पर्धेत नंबर मिळावा यासाठी नव्हे किंवा आपल्याला कसलातरी लाभ व्हावा यासाठी नव्हे, तर आपल्या स्वतःच्या मनाला आनंद देण्यासाठी तरी तुम्ही तुमचा हा छंद जोपासत राहिलं पाहिजे, असे मला वाटते.


 तुमचा आवडता छंद आयुष्यभर जोपासत राहिलात तर बघा, मोजता येणार नाही इतका आनंद तुम्हाला मिळत राहील. तुम्हाला आयुष्यात कधीच मरावंसं वाटणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत जगावंसं वाटेल. 


तुमचा हा छंद तुमच्या आणि दुसऱ्यांच्या जगण्याचं कारण बनेल, तुम्ही अस्तित्वात असताना आणि नसताना सुद्धा."


क्षणभर निशब्द शांतता...

"आत्तापर्यंत मला कुणीही इतकं समजावून सांगितले नव्हते. तुम्ही माझ्याशी कसलीही ओळख नसताना मला जगण्याचं कारण सांगून बळ दिलंय. जगत राहण्याचा मंत्र दिलाय, तो आयूष्यभर मनात जपून ठेवावा असा आहे, तो मी नक्की ठेवेन.


 तुम्ही बघालच, यापुढे मी कधीच मरणाचा विचार डोक्यात आणणार नाही. आयुष्याचं गीत गात जीवनात रंग भरत राहणार. माझ्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल असे वागणार नाही. मी आनंदी जीवन जगणार.. आणि तुमचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. खूप खूप धन्यवाद सर."


"अहो, आभार कसले मानताय, गणेश माझा सहकारी, मित्र. माझ्या मित्रासाठी इतकंही करू शकत नाही!,"


"म्हणजे तुम्ही आमच्या नवीन घरात गृहप्रवेश सोहळ्याला आमच्या घरी नक्कीच आला असणार, बरोबर ना?"


समोरून अचानक आलेल्या या वेगळ्याच प्रश्नाने मला गोंधळात टाकले. कारण त्या सोहळ्यासाठी ना गणेशने मला बोलावले होते; ना मी गेलो होतो. हे सगळं यांना कसं सांगावं! तरीही वेळ मारून नेण्यासाठी मी त्यांना बोललो," मॅडम, त्यावेळी तुमच्या नव्या घरी त्या सोहळ्यासाठी मला येणं शक्य झाले नाही, पण लवकरच तुमच्या घरी येऊन तुम्हा सर्वांना भेटून जाईन. बरं ठेवू मी फोन?"

असे म्हणत मी तिकडून रिप्लाय येण्याअगोदरच फोन ठेवून दिला. 


पावसात चिंब भिजून आलेलो, तरीही इतकावेळ फोनवर बोलत खुर्चीवर तसाच बसून होतो, त्यामुळे कपड्यातील पाणी अंगात मुरलेलं. अंगावरचे कपडे बदलले. थोडीशी कणकण जाणवू लागलेली. जेवण उरकून घेऊन कागद आणि पेन घेऊन लिहायला बसलो.

 

इतक्यात फोनची रिंग वाजली. पुन्हा गणेशचाच फोन होता. यावेळेस शुभाशुभ विचार काळजावर घेर धरून नाचू लागले. आता आणि काय झालं असेल? या विचाराने फोन उचलायला हात धजावत नव्हता. फोन उचलून कानाला लावला. तिकडून गणेश काही बोलणार इतक्यात मीच प्रश्न केला, " गणेश, तिथं सगळं ठीक आहे ना?"


तिकडून गणेशने हसून बोलायला सुरुवात केली, "सगळं कसं मनासारखं झालंय बघ. तु अशी काय जादू केली आहेस, की माझी बायको आयुष्यात कधीच मरणाचा विचारही करणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत जगत राहणार आहे, असं म्हणतेय. 

असं काय सांगितलंस रे तू, की ज्यामुळे माझ्या बायकोच्या डोक्यातून आत्महत्येचा विचार जाऊन, मी कधीच मरणार नाही, असं म्हणतेय? आत्तापर्यंत कुणाचंही न ऐकून घेणाऱ्या माझ्या बायकोने तुझं कसं काय सगळं ऐकून घेतलं? सुरवात कशी केलीस?"

गणेश आश्चर्यचकित होऊन प्रश्नांवर प्रश्न विचारीत होता. त्याच्या बोलण्यात मला उत्सुकता जाणवत होती. 


"काही नाही रे, सुरवातीला नमस्कार मॅडम म्हणून बोलायला सुरुवात केली आणि मी गणेशचा मित्र बोलतोय म्हणून सांगितलं. बाकीचा माझ्या अनुभवाचा कस लावून त्यांना मरणाच्या विचारांपासून दूर केलं. नंतर...."


मी अजून काही स्पष्टीकरण देणार इतक्यात, माझं वाक्य पुर्ण व्हायच्या अगोदरच त्याने बोलायला सुरुवात केली, " बरं ते असूदे, तुला एक सांगायचं होतं, म्हणूनच आमची जेवणं उरकल्यानंतर आणि इतका उशीर झालेला असताना सुद्धा तुला फोन लावला. माझा मुंबईत नोकरी करण्याचा विचार आहे, त्यामुळे आम्ही हे घर आणि शहर दोन्ही सोडून कायमचं मुंबईला जाणार आहोत. तसंही तुझं बोलणं, तुझे विचार माझ्या बायकोच्या मनावर खोलवर परिणाम करणारे ठरले असतीलच, त्यामुळे तुला आमच्या घरी कधीच येण्याची गरज पडणार नाही."

इतकं बोलून अचानक गणेशने फोन ठेवून दिला. शेवटी तो ना ठेवतो बोलला; ना आभार मानले. 


आपल्या बायकोला आत्महत्या करण्यापासून वाचवण्यासाठीची गणेशच्या मनाची जी तगमग होती, ती बघून त्याच्या बायकोच्या जीवनाची काळरात्र होता होता, त्यांच्या आयुष्याची मशाल व्हावी व ती सदैव पेटती रहावी यासाठी मी प्रयत्न केला होता.


 पण गणेशचं वागणं पहिल्यापासूनच मला न समजण्यासारखं आणि कोड्यात टाकणारे होते,

 हे माहीत असूनही माझं छोटंसं मन अंतर्मनाच्या पटलावर धक्के देत लहान पोरासारखं विचारीत होतं, 'हा माझ्याशी असं का वागला असावा?' ...

समाप्त***



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational