Jayant Karnik

Romance

5.0  

Jayant Karnik

Romance

“रिमझिम गिरे सावन”

“रिमझिम गिरे सावन”

8 mins
976


“रिमझिम गिरे सावन”


असा पाऊस 

अशा पाऊस वेळा 

प्रत्येकाच्या मनात

बरसतो आगळावेगळा!

 आजकाल झालाय बेटा लहरी पण तेंव्हा कोसळायच्या काटेकोर चोख सरी! सात जून म्हणजे सात जूनला पाऊस यायचा, त्या काळातली ही गोष्ट आहे. ‘मै सोला बरस की, तू सतरा बरसका' हे असलं काही म्हणजे गीतकार जरा अतिशयोक्तीच करतात असं मला सोळाव्या वर्षी वाटायचं. आणि सतराव्या वर्षी तर मी त्यावर शिक्कामोर्तबच करायचं बाकी ठेवलं होतं. 

कॉमर्स, आर्ट्स किंवा सायन्स कॉलेजेस नंदनवनं, तर इंजिनीअरिंग आणि पॉलिटेक्निक कॉलेजेस म्हणजे वाळवंटच असायची, त्या जमान्यातला हा एक पावसाळा. 

अशा पार्श्वभूमीवर एक पावसाळा आणि तोही चक्क सतराव्या वर्षात माझ्या मनात प्रेमाचा अंकुर रुजवेल असं काही अगदी स्वप्नातही वाटलं नव्हतं. 

हा हिंदी सिनेमा बघून त्यातल्या  हिरोईन्स खुणावू लागल्या होत्या. आपलेही असं कोणी जवळचं असलं तर… ते जे कुणी असणार होती, 'ती' कशी असावी बरं, असले वारे मनात रुंजी घालू लागले होते. पण जर कोणी असलीच तर ‘मौसमी चॅटर्जी’ सारखी निरागस, अवखळ, बडबडी, थोडी बालिश, क्षणात रुसणारी, क्षणात हसणारी… अशी काहीशी असावी असं वाटायला लागलं होतं. पण इंजिनियरिंगच्या वाळवंटात सोळा सतरा वर्षाची महती सांगणार्‍या आनंद बक्षी वर विश्वास ठेवायला काही मन धजावत नव्हतं हेही तेवढंच खरं! 

त्याही वर्षी ‘संकेत मिलना’चा पाळून, सात जूनला तो आला म्हणजे आलाच. पहिल्या भेटीतच मनसोक्त भिजवून, तृप्त करून यावर्षीही त्याने आपला वादा तो निभाया. नेहमीप्रमाणे आमची नाईलाजाने सुट्ट्या संपल्या मुळे पुढच्या सेमिस्टर साठी रुजू व्हायला, खामगांवला जाण्यासाठी तयारी सुरु झाली. पाऊस असा मस्त कोसळत असताना कॉलेजला, तेही होस्टेलला राहायला जायचे म्हणजे अंतःकरण जड होणारच.

 पावसाच्या मनात त्या वर्षी काय होतं मला काही कळत नव्हतं. तो असा काही धो-धो कोसळत होता की विचारू नका. आणि त्याच वेळी, ऐन पावसाळ्यात माझ्या एका चुलत आत्याच्या लग्नाची तारीख ठरली. दोन-तीन दिवसांकरीता कां होईना पण गांवाला जावं तर लागणार होतं. पण संततधार कोसळणारा पाऊस नद्या-नाल्यांना पूर आणत, गावाकडे जाण्याचे एक एक रस्ते बंद कां करत होता कुणास ठाऊक!

 त्याकाळी आमच्या गांवी यवतमाळला जायचा मग एकच पर्याय उरायचा. रेल्वेने धामणगांवला उतरायचं आणि तिथून बसने जायचं. कारण त्या रस्त्यावरील नदीवर ब्रिटिशकालीन खूप उंच पूल होता. शेवटी मग खामगांवहून जलंबला शटलने जाऊन ट्रेनने निघालो.

 यावर्षी पावसाने एवढी वातावरण निर्मिती का केली याची प्रचिती लवकरच येणार होती. धामणगांवला उतरुन एस्.टी. पकडायला थोडं चालत जावं लागतं. रिमझिम पडणाऱ्या पावसात छत्री वगैरे उघडण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा, थोडं भिजत जाणं सर्वांनी पसंत केलं. एस्.टी स्वागताला उभीच होती. दरवाज्यात थोडी गर्दी जमली. मी आज जाणार तेवढ्यात एक मुलगी त्याच वेळी पुढे सरसावली. पहिले आप, पहिले आप करत तिला जाऊ दिलं. थँक्स म्हणत ती पुढे गेली. बस तशी रिकामीच होती. मागेपर्यंत चक्कर मारून, अगदीच चाकावर नको म्हणून एका सीटवर बॅग ठेवणार तेवढ्यात त्या मुलीने तिथे बॅग ठेवली. कोई बात नही म्हणत मी तिच्या मागच्या सीटवर बसलो. पुन्हा एकदा थँक्स असे म्हणत ती गोड हसली. आणि आता कुठे मला तिचं नीट दर्शन झालं. छोट्या चणीची, बोलके डोळे, गालाला खळ्या, हसरा चेहरा, समोर चेहऱ्यावर आलेल्या कुरळ्या बटा, त्यातून निथळणारे पावसाचे थेंब… मला एकदम मुंबईच्या पावसात अमिताभबरोबर अवखळपणे बागडणारी मंझिल मधली मौसमी आठवली. लताने किशोर पेक्षा जलद लयीत म्हटलेलं, ‘रिमझिम गिरे सावन’... अन् ते चिंब पावसातलं गाणं… सतराव्या वर्षात पदार्पण केलेल्या मी, या सोला बरसकी शोडषेला बघून, ‘आनंद बक्षी’ला; ‘प्यार तेरी बाली उमर’ को ‘सलाम’ काय, अगदी “कुर्निसात” केला.

 अन त्या शोडषेचं अखंड बडबड करणं, मनमुराद लाघवी हसणं असं काही चालू होतं की बस… हीच का ती आपल्या मनात रेंगाळणारी ‘मौसमी’ असं वाटायला लागलं. रिमझिम पावसानं तर भिजवलंच पण त्याहीपेक्षा किणकिणणाऱ्या आवाजाच्या सरींनी मला नखशिखांत असं काही भिजवलं की, त्यातला थेंबन् थेंब माझ्या हृदयात कळत-नकळत असा काही झिरपला अन् प्रेमांकुर कधी उगवला मला कळलंच नाही.

 खिडकी बाहेर कोसळणारा पाऊस माझ्याकडे बघून उगाचच मिस्किलपणे हसत मला चिडवतोय, माझ्या आतापर्यंतच्या विचारसरणीला त्याने लावलेल्या सुरुंगाने, माझ्या मनाची उडालेली तारांबळ बघत त्याला अजूनच चेव येतोय की काय असं वाटलं! इकडे ह्याचं असं वागणं तर तिचीही काही वेगळं होतं का! बडबड करत, किणकिणत, मागे मान वळवून वळवून बघत, ती अधून मधून कटाक्ष टाकतच होती. जास्त मिस्कील कोण..ती, कां तो बाहेरून माझी मजा बघणारा पाऊस या संभ्रमात मी होतो.

 आता माझ्या मनात तिच्याविषयी विचार सुरू झाले. ही कोण असावी… हिंदी भाषिक… गुजराथी वाटत होती! ही यवतमाळची तर वाटत नव्हती…. ही पण एखाद्या लग्नाला एका दिवसासाठी आली असेल तर! आता हिचा शोध कसा घेणार…. तिच्याशी बोलू तर शकत नव्हतो. तिच्या घरचे लोक बरोबर होते आणि तिच्याशी बोलणार काय! ती आपल्याशी कशाला बोलेल! मनात असंख्य प्रश्नांचे काहूर माजलं. यवतमाळ पण जवळ येत चाललेलं…. मग ठरवलं उतरल्या उतरल्या रिक्षाने त्यांच्या रिक्षाचा पाठलाग करायचा.

 पाऊस चालू होता ते एक बरं झालं. त्यांनी रिक्षा केली मागच्या रिक्षात बसून मी फिल्मी स्टाईल ‘पीछा करो’ असं सांगणार तितक्याच एका मित्राने मला बघितलं अन् हाक मारली…. त्याच्याशी बोलावं लागलं आणि गवसलेली मौसमी दवबिंदू सारखी उडून गेली.

 मित्राला शिव्या देत चडफडत घरी आलो. पण घरातील लग्नाचा वातावरण बघून ते सर्व विसरलो. स्वागताला माझ्या मैत्रिणी; एक वर्षांनी मोठी बहीण व दोन वर्षांनी मोठी एक चुलत आत्या उभ्या होत्या. चहा घेत घेत आमच्या तिघांची नेहमीप्रमाणेच गप्पांची मैफल जमली. पण आज मी नेहमीसारखा उधळलो नाहीये हे त्यांच्या लक्षात आलं. काय झालं म्हणून आत्याने छेडलंच. मी कितीही नाही नाही म्हटलं तरी किती वेळ तग धरणार… शेवटी सर्व खरं खरं सांगून टाकलं. बाहेर पडणारा पाऊस माझी मजा बघत होता. खरं तर त्यानीच सर्व जुळवून आणलं होतं. पण मला त्याचाही कारण नसताना राग यायला लागला होता. कारण तो माझ्याकडे बघून उगाचच खिदळतो आहे कां असं मला राहून राहून वाटायला लागलं होतं.

 दुसऱ्या चहाच्या पहिला घोटाला आत्याने बॉम्ब टाकला, “मला माहितीये ती मुलगी” माझा विश्वासच बसेना. कारण माझ्या मनात ती बाहेरगावची आहे हे पक्के ठसलं होतं. आणि मी केलेल्या नुसत्या वर्णनावरून ही एवढ्या ठामपणे कसं सांगू शकते ही शंका मनात होती पण….

 “तिचं नाव मौसमी”,

 आता मात्र मी उडालोच हे कसं शक्य आहे…. कारण माझ्या मनातल्या मौसुमीची वाच्यता, मी तोवर स्वतःजवळ ही धडपणे केलेली नव्हती.

 “अरे हो, मौसमी…”,

 मी लगेच म्हणालो आडनाव चटर्जी आहे असं सांगू नको. ती हसत हसत म्हणाली,

“ नाही रे तिचं नाव मेहता आहे”

 मी म्हटले,“तुला कसं माहित!”

 “अरे माझ्या एका मैत्रिणीच्या शेजारीच राहते ती. आहे माझी ओळख.”

 बाहेरच्या कोसळणाऱ्या पावसाने थांबून डोळा मिचकावला की काय असं मला क्षणभर वाटलं. लग्न घर असल्यामुळे आमची मैफिल तिथेच संपली.

 मोठ्या बहिणीचं लग्न दोन-तीन दिवसावर आलं तरी ह्या आत्याच्या काही पत्रिका वाटायच्या राहिल्या होत्या. त्यात तिच्या त्या मैत्रिणीचीही पत्रिका होती. हे काम पावसाने माझ्याचसाठी “राखून” ठेवलं होतं. त्या पत्रिका वाटायला आत्यानी मलाच बरोबर घेतले. आम्ही तिच्या त्या मैत्रिणीच्या घरी पण गेलो. तिच्याकडे पत्रिका दिल्यावर तिला घेऊन आम्ही शेजारी मेहतांकडे पण गेलो. आणि जेव्हा मौसमीनेच दरवाजा उघडला तेव्हा तर माझ्या काळजाचा ठोका चुकला. छातीत एकदम धडधड व्हायला लागलं. तिनेही आश्चर्याने एकदम डोळे विस्फारून माझ्याकडे बघितलं. मला अचानक तिथे बघून तिलाही आश्चर्याचा धक्का असावा. मग आत्यानेच हसत हसत,

 “अगं, हा माझा भाचा जयू” अशी ओळख करून दिली. तिनेही आमची भेट बसमध्ये कशी झाली हे सांगितलं. आत्याने पण हे तिला आधीच माहिती आहे हे सांगितलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर उमटलेले आश्चर्याचे भाव तिला लपवता आले नाही. त्यावेळी आत्या आणि आत्याची मैत्रीण उगाचच सहेतुक एकमेकींकडे बघत हसत होत्या की काय असं मला वाटलं. मुख्य म्हणजे मौसमी पण का कुणास ठाऊक पण बऱ्यापैकी लाजत होती आणि बऱ्यापैकी भांबावलेली दिसली. तेवढ्यात मौसमीची आई आली. त्यांना पत्रिका देऊन सर्वांनी लग्नाला जरूर यायचा आहे असं निमंत्रण आत्यानी दिले. शिवाय सीमांत पूजनाला आम्ही एक संगीत रजनी करणार आहोत त्याला आणि जेवायला पण सगळ्यांनी यायचं आहे असं पण आत्याने आग्रहाने सांगितलं. आणि त्या संगीत रजनीत आत्याची मैत्रीण  मौसमी पण भाग घेणार आहेत तेव्हा दोन दिवस दुपारी रिहर्सल साठी मौसमीला पाठवा असेही सांगितले. अरे हे घरचेच कार्य आहे असं म्हणत त्यांनीही होकार दिला. घरी आल्या आल्या मी आत्याला शिरसाष्टांग नमस्कारच घातला.

 “बस झालं उगाच जास्त मस्का लावू नका”, असेही तिने दरडावलं. त्यातल्या लटका रागातल्या मूकसंमतीने तर आमच्या उत्साहाला एकदमच उधाण आलं.

 पावसांच्या सरींवर सरी येत होत्या अन् मला स्तिमित करून जात होत्या. संध्याकाळची पावसाची सर, गाण्यांची रिहर्सल करायला, आत्याच्या मैत्रिणीबरोबर “ती”लाही घेऊन आली. मी माझ्या आवडते ‘रिमझिम गिरे सावन’ म्हटले आणि कुणीतरी लताचे व्हर्शन म्हणावे म्हणून मला जमेल तसे गाऊनही दाखवले. कारण त्यातली कडवी ही वेगळी अन् लयही वेगळी आहे; आणि लताचा स्पेशल टच! हे आव्हान मौसमीने लगेच स्वीकारलं. त्या गाण्याच्या निमित्ताने आम्ही अधिकच जवळ आलो. एकतर मी रिमझिम किशोर व्हर्शन खूप छान म्हणतो असं सर्वांचेच मत होतं आणि मौसमी पण माझ्या गाण्यावर आणि एकंदरीतच माझ्या स्वभावामुळे बऱ्यापैकी प्रभावित झाली होती. सीमांत पूजनाच्या रजनीत तिने ते लताचे रिमझिम म्हटले. लताने किशोर पेक्षा जरा हटके आणि सरस गायलेय असं म्हणतात…..  पण मौसमी निर्विवादपणे माझ्या पेक्षा खूपच सुंदर गायली. या लग्नात आणि ह्या कार्यक्रमामुळे आमची छान ओळख झाली.

जेंव्हा जेंव्हा सुट्ट्यांमध्ये मी यवतमाळला असायचो, त्यावेळेस आम्ही खूप हिंदी, मराठी, भक्तीगीते, चित्रपटगीते, गझल, कविता वाचन कथाकथन, कथा अभिवाचन, असे अनेक कार्यक्रम करत असू. त्यात मी, माझी बहीण, आत्या, तिची मैत्रीण, मौसमी, माझे काही मित्र, त्यांच्या बहिणी असा सर्व गोतावळा असायचा. खूप खेळीमेळीच्या वातावरणात आमच्या रिहर्सल्स चालायच्या. मुख्य म्हणजे आमच्या सर्वच कार्यक्रमांचं खूप कौतुकही व्हायचं. कारण आम्ही त्यात खूप नवनवीन प्रयोग करायचो आणि त्यामुळे त्यात एक वेगळाच ताजेपणा, टवटवीतपणा असायचा. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमाला आता ही मुलं काय करतील ह्याचं एक औत्सुक्य सर्वांनाच असायचं. आमच्या दृष्टीनेही हे आम्हाला आव्हान असायचं. आणि प्रत्येक वेळी आम्ही या कसोटीत उत्तीर्ण होतो. ह्या कार्यक्रमाची निम्मी भिस्त माझ्यावरच असायची, कारण संकल्पना, लेखन, निवेदन ह्या बऱ्याच जबाबदाऱ्या मीच पार पाडायचो. पण पुढे पुढे निवेदनात मी सर्वांनाच सामावून घ्यायला लागलो आणि त्यानीही आमच्या कार्यक्रमाची खुबी आणि रंजकता वाढली.

माझ्यात अन् मौसमी मध्ये प्रेमाचा अंकुर खुलला आहे हे इतरांना लक्षात आलंच होतं. पण आमची कोवळी वय लक्षात घेता, माझी मोठी बहीण आणि आत्या यांनी आमच्यावर बऱ्यापैकी अंकुश ठेवला होता. हळूहळू दोघांच्याही घरी ही बाब लक्षात आली आणि त्यांनीही या गोष्टीला फारसा विरोध केला नाही. त्यांचं फक्त एवढंच म्हणणं होतं की आम्ही आमचं शिक्षण पूर्ण करावं, मला चांगली नोकरी लागली की मग आमच्या लग्नासाठी त्यांची काही हरकत नव्हती. तोही दिवस उगवला मला छानशी नोकरी लागली. आमचं छान लग्नही झालं. पण आमची ती बस मधली पहिली भेट आणि नंतर झालेली छानशी ओळख, लग्नाआधीचे ते मोहरलेले दिवस आठवले की अजूनही आपण खूप भाग्यवान आहे असं वाटतं. आज लग्नाला इतकी वर्ष झाली तरीही आमच्यातलं प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही. एवढेच कशाला त्याबद्दल, आता मोठे झालेले, वयात आलेली मुलगा आणि मुलगी यांचा आम्ही नेहमीच चेष्टेचा विषय असतो. अर्थात ही चेष्टा खूपच खेळकर असते आणि मनातल्या मनात त्यांना आमच्या या निखळ आणि इतकी वर्ष जपून टिकवून ठेवलेल्या प्रेमाचा, आमच्या नात्याचा, आमच्या मैत्रीचा सार्थ अभिमानच वाटत असतो.

    आज इतक्या वर्षानंतरही आम्ही दोघेही किशोर-लताची व्हर्शन्स् गातो…. पण आजही तीच बाजी मारते यात दुमत नाही!

रिमझिम रिमझिम म्हणत हा पाऊस आयुष्यभर असाच बरसत राहाणार…. आमच्या नात्याचा एक भाग म्हणून…!!!

  


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance