The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Seema Pande Kamtikar

Drama

2  

Seema Pande Kamtikar

Drama

रेशीमगाठी " मी आणि अम्मा"

रेशीमगाठी " मी आणि अम्मा"

6 mins
9.8K


म्हणतात न काही ऋणानुबंधाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात...आज अश्याच एका सुंदर नात्याची गोड आठवण मी सांगणार आहे...

जन्मानंतर आजतयागत कधीही महाराष्ट्राबाहेर न पडलेली मी.. मी , घरकुल, माझी नोकरी आणि पुणे हेच माझा विश्व होतं त्यात एक दिवस नवरोबांनी बॉम्ब टाकला... म्हणाले आपण विशाखापट्टणमला जाऊया का?... छान जॉब ऑफर आहे.... काहीही न सुचलेली मी एकाच वेळी मानेने "हो"आणि "नाही" असं गोंधळलेल्या अवस्थेत म्हणाले. अहो भलतेच खूष झाले...

अंथरुणात पडल्यावर विचारचक्र सुरू झाले.... अनेक प्रश्न मनात होते... माझ्या नोकरीचा काय?? खूप मेहनतीने आता कुठे स्थिर होत होते, माझा लहान मुलगा एका वर्षाचा... तोही सातव्या महिन्यात जन्मलेला म्हणून खुपचं काळजीने वाढवलेला आणि एकदम,"पुणे" हे safe zone सोडून एकदम विशाखापट्टणम....???

केवळ नकाशात पाहिलेलं हे गाव, बंगालच्या उपसागरावर वसलेलं, आंध्रातला टोकाचा प्रदेश... जिथे जमीन संपते.. कसं होईल आपलं.. जमेल का..?? मुलं रुळतील न... बरं मग तेलगु भाषेचं काय..??? असे आणि यांसारखे असंख्य प्रश्न... मग अहोंना माझी दोलायमान स्थिती लक्षात आली, त्याने नेहमीच्या स्टाईल ने"मै हू ना".. अशी माझी समजूत काढली.

हळूहळू पुण्याचे पाश हलके करत आम्ही विमानात बसलो... गोंधळलेले मन आणि कितीही लपविले तरीही न लपणारा चेहऱ्यावरचा केविलवाणा भाव घेऊन मी खिडकीकडे पाहत बसले.. थोड्या वेळाने एअर होस्टेसने अनाउन्स केलं "थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहोत "city of destiny" विशाखापट्टणमला... यंत्रावत मी खिडकीकडे झुकले आणि उत्सुकतेने पाहू लागले.. दृश्य अतिशय लोभसवाणं होतं, एकीकडे अथांग पसरलेला बंगालचा उपसागर आणि दुसरीकडे स्वप्नात दिसावं असं सुंदर शहर विशाखापट्टणम".....

स्वच्छ आखीव रेखीव रस्ते, समुद्रातून उसळणाऱ्या उंचच उंच लाटा आणि तितकाच सुंदर समुद्रकिनारा... हो नक्कीच हे माझं या शहराबद्दलच "love at first site"होतं... मी पडले त्याच्या प्रेमात पाहताचक्षणी.

नवीन घरात बॅगा टेकवल्या.. अजून आमचं सामान यायचं होतं, कुठून सुरुवात करू असा विचार करत असताना एक गोड, प्रेमळ आणि आपला वाटणारा आवाज कानावर आला "निरू कावाली??" (पाणी पाहिजे का) मी मागे वळून पाहिलं... एक साधारणतः ७०/७५ च्या बाई होत्या त्या...कॉटनची मोठ्या काठांची साडी, काळासावळा रंग, हातभार सोन्याच्या बांगड्या, मोगरा आणि मरव्याचा केसांमध्ये गजरा माळलेल्या "त्या".. आवाजात जेवढा प्रेमळपणा होता तेवढीच माया डोळ्यात दिसली आणि चेहऱ्यावरचे बुद्धिमत्तेचे तेजही लपले नाही माझ्या नजरेतून... ह्याच त्या माझ्या "आम्मा"...!! त्यांना बघून नकळत मी त्यांना नमस्कार केला.. तसे त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेऊन मला आशिर्वाद दिला "खुश रहो...""(असं तोडकं मोडकं हिंदी साऊथ इंडियन हेल काढून)

हळूहळू नवीन संसाराला पुन्हा सुरुवात झाली.. माझं आणि आम्माचं संभाषण खूपच मजेशीर असायचं... त्या मोडकं तोडकं हिंदी तेलगु मिक्स बोलायच्या आणि मी हिंदी इंग्लिश मिक्स...!!

बरेचदा दोघींनाही एकमेकींच काहीच कळत नव्हते पण डोळ्यातून डोळ्याशी बोलली जाणारी भाषा शब्दांच्या पलीकडे होती..... आम्मा इतकेच त्यांचे यजमान ही छान.. आम्मा तेलगु पंडिता, प्राचार्या म्हणून सेवानिवृत्त झालेल्या, मुलगा चेन्नईत आणि मुलगी अमेरिकेत असं समृद्ध शेजार मला मिळाला .

हळूहळू ओळख वाढू लागली... मी तर त्यांची जणू मुलगीच झाले आणि त्या माझ्या मुलांच्या आमम्मा(आईची आई), येणं जाणं वाढलं, दोन संस्कृतींमधील देवाणघेवाण वाढली... त्यांचा पुलीहरा मी जेवढ्या आपुलकीनं करायला शिकले, तेवढीच आपली पुरणपोळी त्यांना आवडू लागली... हळूहळू मी त्यांच्याकडून तेलगु शिकू लागले आणि त्या माझ्याकडून मराठी...!! गंमत आहे न सगळी.. काही दिवसांपूर्वी कधीही न पाहिलेली माणसं कशी आपली होऊन जातात??... इतकी की मला माझे आईबाबा त्यांच्यात दिसू लागले... आम्मा अगदी प्रेमाने मला दाक्षिणात्य पारंपारिक पदार्थ शिकवत होत्या पुलीहरा,पयासम्, रस्सम, बब्बितलू, सांबार, टोमॅटोचे लोणचे, कच्च्या केळीची भाजी, इडली डोसा आणि बरंच काही... नोकरी नसेल तर तिथे काय करू या विचाराने अस्वस्थ झालेली मी चक्क या गोष्टींमध्ये रमायला लागले. त्यांचा दसरा आणि आपली नवरात्र, त्यांचा पोंगल आणि आपली संक्रांत,आपलं गौरी गणपती त्यांचं वरलक्ष्मी व्रतम्, आपला गुढीपाडवा आणि त्यांची उगादी सगळं कसं एक होऊन गेलं.... आणि लक्षात यायला लागलं की एकदा मन जुळली की जात पात रंग रूप, भाषा, संस्कृती खरंच सगळं अगदी गौण असतं. माझा मुलगा आरिष तर घरी कमी आणि अमाम्माकडे जास्त राहायचा आणि माझी मुलगी अधिरा तर त्यांची आवडती शिष्या झाली तेलगुची...

पण आयुष्यात असे काही प्रसंग येतात की आपण आंतरबह्य बदलून जातो... असाच तो प्रसंग... जणू काळरात्र म्हणूया अम्माच्या आयुष्यातला...३१ डिसेंबर ची रात्र.. अम्मांनी पुढाकार घेऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्याचा कार्यक्रम तयार केला, उत्साहात, जल्लोषात सगळे बिल्डिंगचे लोक एकत्र येऊन मज्जा करत होते... मी आपली संस्कार भरती रांगोळी काढण्यात दंग होते तेवढ्यात आम्माच्या चेहऱ्यावर मला अस्वस्थता जाणवली... त्यांना दरदरून घाम येत होता आणि दोन्ही हातांनी त्या त्यांचं पोट दाबत होत्या, मला थोडी काळजी वाटली त्या उठल्या आणि कोपऱ्यात जाऊन उलटी करायला लागल्या तशी मी धावत त्यांच्या पाठोपाठ धावत गेले आणि येम आयांदि आम्मा?(काय झालं?) असं विचारलं तर त्यांनी खुणेनेच त्यांच्या मिस्टरांना बोलवायला सांगितलं... मी धावत जाऊन निरोप पोहोंचवला... एव्हाना काहीतरी गडबड आहे असं सगळ्यांच्या लक्षात आलं... आम्मांची तब्येत बिघडतच होती.. कोणीतरी अँबूलन्स बोलावली आणि उत्साहात, आनंदात असणाऱ्या आम्मा थेट ICU मध्ये भरती झाल्या. डॉक्टरांच्या तपासण्यानंतर असं निदान दिलं की त्यांच्या ह्यदयाला एक छिद्र आहे आणि व्हेन्समधून ब्लड लिकेज होऊन आतड्यांमध्ये एक गाठ तयार झाली आहे व त्याचं इन्फेक्शन पूर्ण शरीरावर झालं होतं. आता दोनच पर्याय होते.. एक तर आम्माना असच ठेवायचं मृत्यूची वाट बघत एक दिवस, एक महिना, किंवा एक क्षणही....

किंवा २०% जगण्याची शक्यता असलेली सर्जरी करून ती गाठ काढून टाकायची... अवघड परिस्थिती होती, ७८ वर्षांचे त्यांचे यजमान, दोन्ही मुलं जवळ नाही आणि निर्णय घ्यायला एक तास..! कधीकधी देव आपल्याला कुठून बळ देतो खरंच कळत नाही, अशा परिस्थितीत मी आणि माझा नवरा खंबीरपणे त्याच्या सोबत राहिलो आणि सर्जरीचा निर्णय घेतला.. आम्मांना ९.३० ला रात्री ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं.. नाना आता पार कोसळले होते... माझ्यातली आई आणि मुलगी आता जाग्या झाल्या, त्यांना मी कसंबसं दोन घास भरवले आणि गोळी देऊन शांत केलं.... मुलं लहान असल्यामुळे मला घरी जावं लागलं पण माझा नवरा तिथेच थांबला... घरी आले खरी पण आतून प्रचंड घाबरलेली, रडू आवरत नव्हते पण मुलांसमोर रडायचं नाही म्हणून देवाजवळ "अंबे एक करी.." हे स्तोत्रं म्हणत बसले...

रात्री साधारण १.३० वाजता मोबाईल वाजला, धडधड एवढी वाढली.. थरथरत्या हाताने मोबाईल उचलला आणि काय ऐकायला मिळेल या विचाराने कानाला लावला... नवऱ्याचा शांत, स्थिर आवाज कानावर आला "ऑपरेशन छान झालं, she is out of danger"... एका क्षणात पुन्हा अंगात उत्साह संचारला माझ्या आम्मा परत आल्या होत्या, मृत्यूलाही त्यांनी परतून लावलं होतं आपल्या positive energy ने.

दीड महिन्यांनी आम्मा घरी आल्या अतिशय कृश झालेल्या, चेहऱ्यावरचं तेज मावळलेलं, अशक्त झालेल्या पण तोच उत्साह घेऊन....

या दीड महिन्यात त्यांची आणि नानांची सेवा करण्याची संधी मिळाली.. नाश्त्याच्या डबा, जेवणाचा डबा, कधी त्यांच्याजवळ बसून मायेनं त्यांच्या डोक्यावर हात फिरवत काही सांगत बसणे, सतत त्यांना positive energy देण्याचा प्रयत्न करणे... आणि हो नानांची तर आई झाले मी..!!

आता मी त्यांची शेजारी नाही तर मोठी मुलगीच झाले... त्या नेहमी म्हणायचा मला तीन मुले आहेत... मोठी मुलगी" सिमम्मा".

तोच मान मला त्यांच्या मुलाच्या लग्नात मिळाला... मी पण अगदी पट्टू साडी,वड्डाणम्(कंबर पट्टा) आणि मोगरा मारवा माळून त्यांच्यातलीच झाले....!!!

आणि एका दिवशी पुन्हा नवरोबांनी बॉम्ब टाकला,"आपण पुण्यात शिफ्ट होतोय...good opportunity आहे"...

विशाखपट्टणमचे तीन वर्ष आम्मा नानांच्या सहवासात कसे गेले ते खरंच कळलं नाही... आम्मांना कळल्यावर खुप रडल्या त्या गळ्यात पडून, आरिष (माझा मुलगा) जीव की प्राण झालं होता त्यांचं...

निरोपाचा दिवस उजाडला.. त्या दिवशी फक्त अश्रु बोलत होते... निघताना नाना म्हणाले "तुझ्या रूपाने देवाने माझ्या आईला पाठवलं होतं माझ्या मदतीला...!!" आणि मी विचार करत होते मागच्या जन्मीच्या ऋणानुबंधाच्या गाठी जुळविण्यासाठी कदाचित मी आले इथे.....

आयुष्यभर पुरेल अशी शिदोरी घेऊन मी विमानात बसले... सोबत आम्मा नानांचे आशिर्वाद आणि खुप प्रेम होतं....!!

"अश्या वाटांनी मुळी एकत्रच येऊ नये,

जीव जडवून चटका लावून निदान दूर होणं तरी असू नये,

पण अश्याच वेळी कळून येतं आपण आपले मालक नसतो,

रस्ते आपली दिशा आखतात आपण फक्त चालत असतो...!!!"

सीमा पांडे कामतीकर

पुणे


Rate this content
Log in

More marathi story from Seema Pande Kamtikar

Similar marathi story from Drama