प्रयत्नांती परमेश्वर
प्रयत्नांती परमेश्वर
रोशन हा कंप्यूटर इंजिनियर होता.तो पुणे ला एका मोठ्या कंपनीत लागला होता.त्याला 60 हजार रुपये पगार होता.दोन मित्रांनी मिळून एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. रोशनची घरची परिस्थिती बेताचीच होती. घरी आई वडील व लहान बहीण स्नेहल जी एमएससी झाली होती व घरीच मुलांना शिकवत होती.वडिलांचे किराणा दुकान होते .दुकान व स्नेहल च्या उत्पन्नावर घर खर्च चालत होता. पुण्याला रोशनला सायली मिळाली .ती त्याच कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर होती .दोघांची मैत्री झाली.मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले व प्रेमाचे रुपांतर लग्नात. दोघांनी एक फ्लॅट भाड्याने घेतला व कोर्ट मॅरेज करून संसार सुरू केला.
मुलगी गुजराती असल्यामुळे रोशनने घरी काहीच कळविले नाही पण एका मित्राकडून आई संध्याला हे सर्व कळले.तिने जास्त वाद न घालता पती प्रभाकरला शांत करून समजावले व दोघांना घरी बोलावले.दोघांनी घरी यायचे टाळले .इथे रोशन घरच्यांशी बेजबाबदारपणे वागला व नंतर संपर्क तुटला.पण म्हणतात ना वेळ केव्हा बदलेल हे सांगता येत नाही.2020 च्या मार्चमध्ये कोरोना चा उद्रेक चालू झाला. सगळीकडे दहशत पसरली होती .लाॅक डाऊन लागला .आणि तिथेच रोशन व सायली ची नोकरी पण गेली
दोघांच्या बँकेत पाच लाख रुपये होते.त्यांनी दोन महिने काढले पण पुण्यात राहणं त्यांना परवडणारं नव्हतं. सायलीने घरी अहमदाबादला फोन केला पण आंतरजातीय विवाह केल्यामुळे तिच्या वडिलांनी संबंध तोडले होते..थोडा विचार करून भीतभीतच रोशनने घरी फोन लावला प्रभाकरने दोघांना घरी बोलावून घेतले.रोशनने आपले पैसे वडिलांच्या अकाउंटला ट्रान्सफर केले.सायली फार समजदार होती तिनेच त्याला हा सल्ला दिला होता.
रोशन पत्नीसह घरी आला.पाच खोल्यांचं दोन मजली घर होतं .खालच्या मजल्यावर रोडलगत त्यांचं किराणा दुकान होतं.संध्याने वरच्या मजल्यावरील एका प्रशस्त रूममध्ये दोघांची व्यवस्था केली. रोशन ने जमवलेले सामान सर्व आणले होते .ते एका रूम मध्ये ठेवले.लाॅक डाऊन मुळे स्नेहल चे वर्ग बंद पडले होते .मुलांचं ऑनलाइन शिक्षण सुरू झालं होतं. रोशनने वडिलांशी चर्चा केली काहीतरी करायला हवं नुसतं बसून चालणार नव्हतं.रोशन वडिलांना मदत करू लागला तो पुण्याला घेतलेल्या कारमध्ये किराणा आणून भरायचा व स्वतः दुकानात बसु लागला.त्याने लाॅक डाऊन मध्ये ऑनलाईन किराणा विक्री करण्याचा प्रयत्न करून पाहिला.त्यात उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे स्नेहल पण त्याला मदत करू लागली.ती सर्व ऑर्डर घ्यायची लिस्ट प्रमाणे पॅकिंग करणे व प्रत्येक ग्राहकाच्या नावाचा मोठं पॅकिंग बनवणे हे काम स्नेहल, सायली ,संध्या करत होत्या. रोशन ग्राहकांकडून लोकेशन घेऊन डिलिव्हरी देण्याचे काम करू लागला. प्रभाकर दुकानात बसायचा व संध्या घरातील कामं बघायची.
अशाप्रकारे पूर्ण घर कामी लागलं .एकमेकावर प्रेम विश्वास व त्यांची मेहनत याचं रूपांतर प्रगतीत होऊ लागलं. रोशनने दीड लाख रुपये खर्च करून दुकानाचे रेनोवेशन करून घेतले व बाजूची रूम रोड कडून ओपन करत एक गाला बनविला. त्याने एकदा जळगावला एका भरीत सेंटर मध्ये जेवण केले होते व ते त्याला इतके आवडले होते की त्याने जळगावच्या मित्राकडून किशोर चौधरी कडून भरीताची रेसिपी शिकून घेतली होती.पुण्याला दोघेही सोबत राहायचे. सायलीच्या आग्रहाने रोशनने भरीत सेंटरचा प्लान आखला व त्याप्रमाणे रेनोवेशन करून घेतले. किशोरच्या शेतात वांग्याचे पीक घ्यायचे, प्रथम त्याने ट्रॅव्हल्स मध्ये पाच किलोच वांगी पाठविले.संध्या व सायलीने रोशनने सांगितल्याप्रमाणे त्या हिरव्या वांग्याचे भरीत बनविले व भरीत सेंटरची सुरुवात झाली 100 ग्राम च्या पाकिटात भरित विक्री सुरू झाली.या शहरात हा नवीन प्रयोग होता पण वीस रुपयाचे भरीत चे पाकीट हातोहात खपले. लोकांना हा नवीन प्रकार आवडला .आता रोशनला किराणा डिलिव्हरी करिता एक ड्रायव्हर ठेवावा लागला. म्हणतात ना नशीब बलवत्तर असले आणि प्रयत्न सुरू ठेवले की यश हमखास मिळते तसेच रोशनच्या आयुष्यात घडले.
आज हा कधी काळचा सॉफ्टवेअर इंजिनियर आपल्या इंजिनियर पत्नीसह भरीत सेंटर व किराणा दुकान चालवतो आहे.आज त्याच्याकडे सहा माणसे काम करीत आहे व त्याने 2नवीन जागा घेऊन तिथे पण हा व्यवसाय सुरू केला आहे .नोकरी गेल्यावर ही कामाची लाज न बाळगता एकत्रित कुटुंबात राहून सर्वांच्या प्रयत्नांनी आज वैभव ओढून आणले हे विशेष.कोरोना च्या वातावरणात पुष्कळ मुलांच्या नोकऱ्या गेल्या आहेत .बऱ्याच जणांनी असे नवीन नवीन उद्योग सुरू करून नवीन मार्ग पत्करला आहे .शेवटी एकच आहे की लाज न बाळगता कोणतेही काम करायची तयारी असली तर कामाची कमी नाही. आणि प्रयत्न व संघर्ष सुरू ठेवला तर यश हमखास मिळते हे मात्र नक्की.
