प्रेमा तुझा रंग कसा
प्रेमा तुझा रंग कसा


रियाचं भाषण चालू होतं, आणि विषय होता वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रिया व त्यांच्या मुलांचं पुनर्वसन...कशाप्रकारे या स्त्रियांना या व्यवसायातून बाहेर काढुन त्यांचं पुनर्वसन करता येईल व त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देता येतील, यावर ती अगदी भरभरून बोलत होती...रियाच भाषण ऐकून रोहनचा राग मात्र अनावर होत होता... माणूस कसं दुतोंडी वागू शकतो यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता...
रोहन आणि रिया मागील दोन वर्षापासून एकमेकांना ओळखत होते...ओळखीचं रूपांतर कधी मैत्रीत, आणि मैत्रीच प्रेमात झालं हे त्यांचं त्यांनाच समजलं नाही...ते दोघे एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे...
रिया एका NGO साठी काम करायची तर रोहन वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांच्या जीवनावर काही रिसर्च करत होता...NGO साठी काम करत असल्यामुळे अश्या बऱ्याच स्त्रियांशी रियाचा संबंध येत होता...आणि म्हणूनच रोहन बऱ्याच दिवसापासून अश्या स्त्रियांची भेट घडवून देण्यासाठी रियाला विनंती करत होता...त्याला खात्री होती की रिया त्याला त्याच्या रिसर्च मध्ये नक्की मदत करेल...पण रिया मात्र जाणीवपूर्वक त्याचाकडे दुर्लक्ष करीत होती...बऱ्याच वेळा विचारून पण ती त्याला मदत करायचं टाळत होती...
एक दिवस रोहननी ठाम निश्चय केला की काहीही करून आज रियाच्या मदतीने वेश्यांच्या वस्तीत जाऊन त्यांची भेट घ्यायची...
ते दोघे कॅफे मध्ये मस्त कॉफीचा आस्वाद घेत गप्पा मारत बसले होते...तिचा मूड आज खूप छान होता...म्हणूनच त्याने मुद्दाम त्या बायकांशी भेटण्याचा विषय काढला आणि तिला विचारले... रिया "अंग! मला सांग ना कधी त्या बायकांशी भेटवतेस...कधी मला त्यांच्या वस्तीत घेऊन जाणार आहेस...ती म्हणाली..."हो रे भेटवते...आज संध्याकाळी आपण मुव्ही ला जाऊयात का?"…चल आपण मॉल मध्ये जाऊयात...मला थोडी शॉपिंग करायची आहे...रोहन चिडला...त्यालाही जाणवत होत कि ती त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत आहे...त्याने थोडे रागातच विचारलं " काय चाललंय तुझं, मी काही तरी विचारतोय तुला...कळतं नाहीये का? कधी घेऊन जाणार आहेस मला? "…त्याचा चढलेला आवाज ऐकून तिला राग आला आणि ती ही रागात बोलू लागली..."का जायचंय तुला तिथं...त्या घाणेरड्या वस्तीत…अरे ! समाजानं वाळीत टाकलेल्या बायका आहेत त्या...आणि आशा ठिकाणी तुला जायचंय...तुला जी काही माहिती हवी आहे ती मी माझ्या ऑफिस रेकॉर्ड मधून मिळवून देऊ शकते...पण मी तुला तसल्या घाणेरड्या जागेत जाऊ देणार नाही...ऐकलंस! आणि परत मला तुला तिथे घेऊन जाण्याचा आग्रह करू नकोस...
तिचं हे बोलणं ऐकून रोहन अवाक झाला...तो आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला...एका NGO साठी काम करणाऱ्या मुलीचे विचार असे असू शकतात...त्याचा विश्वास बसत नव्हता, आपण ज्या रियावर प्रेम केलं तिचे विचार एवढ्या खालच्या पातळीचे असू शकतात...तो तीच वेगळच रूप पाहत होता...आणि म्हणूनच आज त्याला तिचं वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रिया व त्यांच्या मुलांचं पुनर्वसन या विषयीच भाषण ऐकून खूप राग येत होता...तिच्या दुतोंडी वागण्याचा त्याला त्रास होत होता...
खरंतर त्याला हवी असणारी सर्व जुजबी माहिती तिच्या ऑफिस रेकॉर्ड मधून मिळाली असती पण त्याला त्या स्त्रियांशी प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्या...त्यांच्या व्यथा, समाजाकडून असणाऱ्या अपेक्षा...सर्व जाणून घ्यायच्या होत्या...त्यांच्या मुलांसाठी काहीतरी करायचं होतं...आणि म्हणूनच त्याने एकट्यानेच तिथे जाण्याचा निर्णय घेतला...
एका अरुंद गल्लीतून थोडं अंतर चालून गेल्यानंतर तो एक चाळीवजा वस्तीत घुसला...तिथे काही लहान-लहान मुले रस्त्यावर खेळताना त्याला दिसली...ती बहुतेक त्या बायकांची असावीत...काही गुंड प्रवृत्तीची माणसं तिथे होती...तसेच काही स्त्रिया तोंडावर भडक रंगाची रंगरंगोटी करून आपल्या मादक हावभावांनी ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसल्या...त्याने तिथे त्या बायकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला पण निष्फळ ठरला...या प्रयत्नात काही बायका त्याच्याशी लगट करण्याचा त्याला रिझवण्याचा प्रयत्न करत होत्या...आणि तो स्वतःला वाचवण्याचा...तर काही गुंडांनी त्याला तिथून हाकलून लावण्याचा प्रयत्न केला...त्याला कळून चुकलं की अशाप्रकारे त्याच काम होणार नाही...थोडी चौकशी केल्यानंतर एक माणूस त्याला एका बाईकडे घेऊन गेला...ती त्यांची मुखीया असावी...तिला सगळे मावशी म्हणायचे...तिने थोड्या पैशाच्या मोबदल्यात त्याला एक रूम मध्ये पाठवले...
तिथे त्याला एक मुलगी बसलेली दिसली...खूप सुंदर साधारण 23 - 24 वर्ष वय असेल...लांब केस, गोरा रंग, डोळे तर इतके सुंदर कि कुणीही तिच्या प्रेमात पडावं...पण अगदी निर्विकार, पाषाणी, जणू कुणी जगण्याची उमेदच हिरावून घेतलेली, एकदम निश्चल...तो तिच्या शेजारी जाऊन बसला...काय बोलावं त्यालाही समजत नव्हतं...त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला...त्याने तिला तीच नाव, गाव, ती इथे कशी आली या बाबत विचारलं...हे सर्व बघून ती संभ्रमात पडली...इतके दिवस एवढ्या आस्थेने तिची कोणी विचारपूस केलीच नव्हती...आत्तापर्यंत जी लोक तिथे अली सर्व आधाशी लांडग्याप्रमाणे तिच्या शरीराचे लचके तोडण्यासाठी...
त्याने तिच्याशी थोड्या गप्पा मारून तिला बोलकं केलं...तिने तिचं नाव रश्मी सांगितलं...ती जवळ-जवळ 2 वर्षांपासून तिथे होती...कसं तिच्या मित्राने तिला प्रेमाच्या नावाखाली फसवून तिथे आणून विकली होती हे तिने सांगितलं...उचललेलं एक चुकीचं पाऊल आयुष्य कसं उध्वस्त करत याचं उदाहरण होती ती!...
रोहन जेव्हा परत जायला निघाला तेव्हा तिच्या डोळ्यात त्याला एक चमक दिसली...एक आशेचा किरण...तो दोन तीन दिवस लागोपाठ तिला भेटत राहिला व त्याला हवी असणारी सर्व माहिती गोळा केली...पण राहून-राहून त्याला आपण रश्मीसाठी काहीतरी करायला हवं असं वाटू लागलं...सारखे तिचेच विचार मनात घोळू लागले...त्याने मनाशी काहीतरी ठरवलं व निर्णय पक्का केला...
दुसऱ्या दिवशी तो मावशीकडे रश्मीला बाहेर फिरायला घेऊन जाण्याची परवानगी मागू लागला...सुरवातीला तिने नकार दिला...पण रोहनने दुप्पट पैसे देऊ केल्यावर ती रश्मीला बाहेर पाठवण्यासाठी तयार झाली...रश्मी आज खूप दिवसातून बाहेर पडणार होती...जवळ-जवळ दोन वर्ष ती या कुंटनखाण्यात कैद होती...दोन वर्षांनंतर ती मोकळा श्वास घेणार होती...
ती छान तयार झाली होती...खूप सुंदर दिसत होती...रोहन तर थोडावेळ तिला पाहतच राहिला...नंतर त्याने स्वतःला सावरलं व दोघे बाहेर पडले...थोडा वेळ फिरल्यावर रोहन तिला एका रूमवर घेऊन आला...आणि तिला सांगितलं ती आजपासून इथेच राहणार...ती घाबरली तिला मावशीची भीती वाटत होती...ती काहीही करून आपल्याला शोधून काढेल व आपलं जगणं मुश्किल करेल याची जाणीव तिला होती...तिने रोहन ला समजावण्याचा प्रयत्न केला, तो जे करतोय ते शक्य नाही...यात खूप मोठा धोका आहे...पण रोहन ऐकायला तयार नव्हता...तिला विश्वासात घेऊन व्यवस्थित समजावून सांगितल्यावर ती तयार झाली...रोहन ने आधीच मित्रांच्या मदतीने रूम, गरजेपुरत लागणाऱ्या सर्व सामानाची जुळवाजुळव करून ठेवली होती...इकडे रश्मी परत न आल्यामुळे मावशीने तीची शोध मोहिम सुरू केली...रोहन ने तिला घरातून बाहेर न पडण्याची सक्त ताकीद दिली होती...
ती ग्रॅज्युएट होती व तिला फॅशन डिझाइनिंगमध्ये आवड होती...त्याने तिला काही फॅशन मॅगझिनस, वाचण्यासाठी काही पुस्तके आणून दिली होती...तो तिची व्यवस्थित काळजी घेत होता...
ती हळूहळू त्याच्याकडे आकर्षित होऊ लागली...मनातल्या मनात त्याच्यावर प्रेम करू लागली...त्यालाही तिच्या डोळ्यात त्या अव्यक्त भावना दिसत होत्या...पण तो तटस्थ होता...कारण तो अजून ही रिया वर प्रेम करत होता...बघता-बघता एक महिना संपत आला ...रिया ही वेळोवेळी त्याला समजावत होती...कस त्याच्या वागण्यामुळे त्या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण होतोय हे सांगण्याचा प्रयत्न करीत होती...पण रोहन त्याच्या निर्णयावर ठाम होता...तो रियावर खरचं खूप मनापासून प्रेम करत होता...पण हे तिला समजत नव्हतं...
एक दिवस रोहन घरात नाही हे बघुन रिया काही लोकांनां जे स्वतः ला सभ्य समाजाचे ठेकेदार समजत होते घेऊन रश्मीच्या रूमवर गेली...ही वेश्याव्यवसाय करणारी स्त्री आपल्या समाजाला लागलेली कीड आहे...हिच्या मुळे कशी आपली मुले बिघडतील...ती बाहेर सभ्य समाजात वावरण्याच्या लायक नाही...असल्या लोकांमुळे कसा आपला समाज विटाळत आहे असे बोलून त्यांना भडकाऊ लागली...काय चाललंय रश्मीला काहीच समजत नव्हतं...ती स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत होती... पण व्यर्थ...लोकांनी तिला मारहाण करायला सुरवात केली...तिला फरफटत ओढून घराच्या बाहेर आणलं...तिला लाथा बुक्यांनी मारायला सुरवात केली...तेवढ्यात रोहन तिथे आला...त्याने सर्वाना समजावण्याचा प्रयत्न केला...पण कोणी त्याच ऐकायला तयार नव्हतं...लोकांनी त्याला ही मारायला सुरवात केली...रिया हे सर्व बघत फक्त उभी होती...
रोहन आणि रश्मी एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते...दोघांना ही बरच लागलं होत...तो ही आता चांगलाच पेटून उठला होता...सर्व शक्तीनिशी तो प्रतिकार करत होत...लोकांचा जमाव मोठा असल्यामुळे त्यांच्यापुढे त्या दोघांची प्रतिकार शक्ती कमी पडत होती...लोक बोलत होते कोणत्या नात्याने तुम्ही दोघे एकत्र राहताय...तुमच्या असल्या वागण्यामुळे समाज बिघडेल...
त्याला काय करावं काहीच समजत नव्हतं...शेवटचा पर्याय म्हणून त्याने आपल्या हातातून वाहणार रक्त रश्मीच्या भांगात भरलं आणि रक्ताचा टिळा तिच्या कपाळी लावला... आणि जोरजोरात ओरडू लागलां" घ्या तुम्हाला नातंच हवं होत ना? आजपासुन ही माझी बायको." आणि जोरजोरात रडू लागला...
रश्मी अचानक घडलेल्या या सर्व गोष्टींमुळे भांबावली होती...रोहननी एक नजर रियावर टाकली... आणि पुढे होऊन रशमीचा हात हातात घेतला... आणि तिने अलगद आपलं डोकं त्याच्या खांद्यावर टेकवलं...
रियाच हे सगळं बघून अवसानच गळालं होत...ती रश्मीला रोहनच्या आयुष्यातून घालवायला आली होती...पण तीच रोहनच्या आयुष्यातून हद्दपार झाली होती कायमची...