Vinay Khandagale

Tragedy Drama

5.0  

Vinay Khandagale

Tragedy Drama

प्रेम, लफडं, प्रकरण

प्रेम, लफडं, प्रकरण

10 mins
1.5K


             

प्रेमात पडणं आपल्या हातात असतं का? प्रत्येकजण प्रेमात पडलेला असतो. कधी ते वन वे असतं तर कधी टू वे.  प्रेमाचा विषय निघाला की आपल्याला लैला-मजनू, रोमिओ ज्युलिएट, हिररांझा, शीर फरहाद अशी नावं आठवतात. पण या सर्व नावांमध्ये एकही मराठी नाव कसं नाही? आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती म्हटलं तर सामान्य कथा आहे, म्हटलं तर असामान्य. कारण प्रेम, त्याग वगैरे बाबतींत ती वरील जोडयांपेक्षा कुठेही कमी नाही. म्हटलं तर ही एक प्रातिनिधिक जोडी आहे. कदाचित ही प्रेमकहाणी तुमची असेल, कदाचित तुमच्या आसपासच्या कुणाची. तर ही कथा आहे माधव अन मालती यांची. हे दोघे टिपिकल मध्यमवर्गीय घरातले आहेत. आधी दोघांच्या घरात चक्कर मारून येऊ.


स्थळ: माधवीचं घर


“माधवी, सकाळपासून काय त्या पुस्तकात डोकं घालून बसलीयेस?”

“वाचू दे गं आई”

"तो आला की घर डोक्यावर घेईल. अहो तुम्ही तरी सांगा हिला" आई (स्वतःच्या) नवऱ्याकडे पाहत म्हणाली

"इथे देश कठीण परिस्थितीतून चाललाय अन् तुम्हाला काय सुचतंय. रोजरोज तेचतेच. बदल पाहिजेत बदल" वडील वर्तमानपत्रातून डोकं वर काढत म्हणाले

तेवढ्यात बुटाच्या टापांचा ठक ठक ठक आवाज आला. सगळेजण भेदरले.

"तुम्ही एवढे घाबरल्यासारखे का दिसता?" नुकत्याच घरात आलेल्या माधवीच्या फौजदार भावानं विचारलं

"कुठे काय, काही नाही. मी पेपर वाचत होतो"

वडिलांच्या उत्तरानं त्याचं समाधान झालं, मग त्यानं माधवीकडे मोर्चा वळवला,

"अन तू काय करतेस गं?"

"पुस्तक वाचतेय"

"कुणी दिलं हे पुस्तक तुला? विकत आणलं, मैत्रिणीने दिलं की मि त्रा ने दिलं? मला याचा पंचनामा केलाच पाहिजे"

"कुणी नाही दिलं?"

"मग आकाशातून टपकलं का? कोण आहे तो? त्याचं नाव काय, गाव काय, पत्ता काय?" 

"मी वाचनालयातून आणलं" माधवी शांतपणे म्हणाली

"हे आधी का नाही सांगितलं?"

"तू बोलू देशील तर ना"

"ही प्रेमाफिमाची पुस्तकं नको वाचत जाऊ. साहसकथा अन् प्रेरणादायी पुस्तकं वाच. विरंगुळा हवा असेल तर पुलं, शंकर पाटील, मिरासदार वाच"

"तू विनोदी पुस्तकं वाचली असशील असं वाटत नाही." माधवी विनोदानं म्हणाली

"वाचलीत वाचलीत. तू आता नोकरी करायची. दिवसभर घरात बसून त्या रटाळ मालिका अन् प्रेमपुस्तकं वाचून काय होणार आहे?"

"अरे पण हिला नोकरी कोण देणार" आई पहिल्यांदा बोलली.

"हिचा भाऊ पोलिसात आहे म्हटलं. तू लेखी परीक्षा पास झालेलीच आहेस. इंटरव्ह्यूत मी सेटिंग लावतो"

त्याचा शब्द म्हणजे अंतिम शब्द होता


माधवचं घर म्हणजे वन BHK फ्लॅट होता. होता छोटाच पण नीटनेटका अन् स्वच्छ. माधवचे वडील असल्यावर राहणार कसं नाही. यावेळीही ते याच कामात व्यस्त होते, अर्थात घर झाडत होते.

"अगं जरा पाय बाजूला करतेस का, खुर्चीखालचं झाडायचं आहे" माधवचे वडील बायकोला म्हणाले. ती टीपॉयवर पाय लांबवून टीव्ही बघत होती. तिनं प्रतिसाद दिला नाही

"मी म्हटलं, पाय बाजूला करतेस का जरा?" त्यांनी जरा मोठ्यानं विचारलं

"कंटाळा आला, जरा बाजूने झाडा" 

वडिलांनी रागानं झाडू फेकून दिला

"बाईबाईबाई सगळी धूळ उडवून दिली. एक काम जमत नाही या माणसाला." 

"धूळ राहणार कशी? दिवसातनं दोनवेळा घर झाडतो मी. दर तिसऱ्या दिवशी लादी पुसतो. शिवाय धुणी-भांडी करा, रांधा वाढा, उष्ट काढा. परमेश्वरा..."

"बरं बरं, आता रडू नका. माधवची तयारी झाली का? जेवण केलं का त्यानं?"

"हो"

"काय बनवलं जेवायला?"

"वरण, भात, पोळी, वांग्याची भाजी अन् मीठ" 

"मीठ कुणी करतं का? मीठ असतं"

"अरे वा, तुला माहीत आहे वाटतं"

"बघितलं, बघितलं. नेहमी असं घालून पाडून बोलणं तुमचं. माझ्या घरच्यांनी वाटोळं केलं माझं. गळ्यात धोंडा बांधला माझ्या" एवढं बोलून माधवची मम्मी रडू लागली.

"ए बाई रडू नको. सकाळी सकाळी तुझ्या माहेरची आठवण नको"

"का नको? माझे माहेरचे सहन नाही होत तुम्हाला..."

माधव त्यांच्या भांडणात व्यत्यय यावा म्हणून मोठ्याने गाणं म्हणू लागला.

"गाणं म्हणण्याची एवढीच हौस असेल तर नोकरी सोड अन गायक बन" 

"मम्मी, जे व्हायचं असतं ते होता येतंच असं नाही. बाबांकडेच बघ न. त्यांना राष्ट्रपती व्हायचं होतं, झाले फक्त पती." माधव भावुक होत म्हणाला

"बाळा हे आपलं प्राक्तन रे" बाबांनी त्याला इमोशनल साथ दिली.

"कळतात बरं मला हे टोमणे. माझं माहेर काढता का, काय, होतं काय हो तुमच्याकडे? भिक्कारडे होता. माझ्या पायगुणामुळे बरे दिवस दिसताहेत."

"तू मोठी नवाबाची औलाद होती न..."

दोघांचं तुंबळ भांडण सुरू झालं. 

"तुमचं हे सासर माहेर ऐकल्यापेक्षा मी ऑफिसला जातो. पाऊले चालती ऑफिसची वाट..." 

गाणं गुणगुणत माधव ऑफिसकडे निघाला


माधवचं ऑफिस म्हणजे अजिबात प्रेक्षणीय वगैरे नसलेलं ठिकाण. इथं काम कमी अन् बिनकामाच्या गोष्टीच जास्त चालतात. हुशार वाचकांच्या लक्षात आलंच असेल की हे सरकारी कार्यालय आहे. इथं कामाला येणाऱ्या लोकांनी असा गैरसमज करून घेतलाय की आपण आपला मौल्यवान वेळ वाया घालवतो म्हणून सरकार आपल्याला पगार देतं. बरीचशी मंडळी घरी करमत नाही, किंवा झोप होत नाही म्हणून ऑफिसला येतात. इथल्या सुडौल गृहिणींबद्दल तर बोलायलाच नको. केवळ हवापालट म्हणून त्या घर ते ऑफिस चक्कर मारतात. काहीजणी मुलं त्रास देतात तर काही घरी थांबलं तर काम करावं लागेल या भीतीनं इथं येतात. ( घरी सासूबाई असतात नं )

यांचा साहेब म्हणजे स्वतःबद्दलच्या गैरसमजुतींचं भलंमोठं गाठोडं आहे.


माधव घरून निघाला तेव्हा त्याचा बॉस ऑफिसमध्ये पोहचला. माधव सिटी बसमध्ये बसला तेव्हा तो कॉम्प्युटर स्क्रीनजवळ तोंड नेऊन खाली न बघता टायपिंग करत होता.

माधवला ऑफिसला पोहचायला नेहमीप्रमाणे उशीर झाला. त्यानं बॅग टेबलावर ठेवली अन् गंभीर चेहरा करून केबिनचं दार ठोठावलं

"मे आय कम इन सर?"

"या या महाराज. तुमचीच वाट बघत होतो"

"थँक यु सर"

"ऑफिसला यायची ही वेळ आहे का? ऑफिस म्हणजे तुम्हाला हे वाटलं का?"

"डान्सबार?" 

"नाही हो, आपलं हे... हा, धर्मशाळा वाटलं का केव्हाही यायला?"

"सर, आई आजारी असल्यामुळे उशीर झाला." माधव रडवेला चेहरा करून म्हणाला

"अरे, मग हे आधी नाही का सांगायचं. आई म्हणजे..." (थोडा विचार करून) "आई असते रे. कुणीतरी म्हटलंच आहे न, स्वामी तिन्ही जगाचा, आईसह भिकारी"

"सर, आईसह नाही, आईविना भिकारी"

"तेच ते. भावना समजून घे रे वेड्या" 

"हो सर."

"बरं काल मी दिलेलं स्टेटमेंट पूर्ण केलं का?" 

"नाही"

"असं का करता रेS. तो मानमोडे साहेब मला काकडीसारखा कराकरा खाऊन टाकेल" बारसोडे साहेब रडवेल्या सुरात म्हणाले"आय विल ट्राय माय बेस्ट सर"

"प्रयत्न नाही पूर्ण करा"

"यस सर"

माधव "मै कभी बतलाता नही, पर तेरी परवाह करता हू मै माँ" हे गाणं म्हणत बाहेर पडला. तो जेमतेम चार पावलं चालला असेल तोच त्याची टक्कर समोरून इकडेतिकडे बघत चालणाऱ्या माधवीशी झाली. पहिल्या प्रेमाची धडकन झालेली ती धडक दोघांचीपण धडकन वाढवून गेली. दोघेजण जरा धडपडले, मग सावरले. माधव लहान मुलं किंडर जॉयकडे बघतात तसा तिच्याकडेच एकटक बघत होता. सुंदर होतीच ती, खांडेकरांच्या नायिकांसारखी. 

"एक्सक्युज मी. बारसोडे साहेबांचं ऑफिस कुठे आहे?" तिनं मंजुळ आवाजात विचारलं. माधव अजून तंद्रीतच होता

"कोण बारसोडे?"

"इथले बॉस"

"ओह! त्यांना तिथे ठेवलंय" तो नजर तिच्याकडे ठेवून केबिनकडे बोट दाखवत म्हणाला

"इश्श. ठेवलं का म्हणताय?"

"बसवलंय"  

माधवी हसत हसत केबिनकडे निघून गेली. 


माधवी पुढच्या दोन दिवसांत ऑफिसला रुजू झाली. मग काय, माधव अन् माधवी यांच्या नजरेचे खेळ सुरू झाले. इतर कर्मचाऱ्यांची कुजबुजही सुरू झाली...

"माधवचं काही खरं नाही"

"मुलगी जराशी हसली की यांना वाटतं फसली"

"जमतंय जमतंय"

पण एका कर्मचाऱ्याला मात्र हे सहन झालं नाही. तो खुर्चीवरून ताडकन उठून बॉसच्या केबिनमध्ये घुसला

"हे काय ऑफिस आहे का? शिस्त बिस्त आहे की नाही? अशाने ऑफिस लव्हर्स पॉईंट बनायचा" तो तावातावानं म्हणाला. बॉसनं चष्म्याच्या वरून त्याच्याकडे बघितलं

"मिस्टर दहिवडे, काय झालं एवढं चिडायला?"

"सर, कृपा करून मला नावाने हाक नका मारू"

"कुणीतरी म्हटलेलंच आहे की नावात काही नसतं. आता माझंच बघा न, माझं नाव बारसोडे आहे, म्हणून मी का लाजायचं? आमच्या शेजारी नागडे राहतात. म्हणून का ते नागडे फिरतात का?"

"हे बरोबर नाही"

"त्यांनी नागडं न फिरणे बरोबर नाही?!"

"अहो ते नाही. ऑफिसमध्ये जे चाललंय ते बरोबर नाही"

"काय चाललंय?"

"माधव अन् माधवी एकमेकांकडे पाहून हसतात"

"मग उद्यापासून त्यांना तुमच्याकडे पाहून हसायला सांगतो"

"माधवीचा भाऊ फौजदार आहे अन् माझा चांगला मित्र"

"मग त्याला जाऊन सांगा, मेदूवडे...बटाटेवडे... नुसतेच वडे... तुम्ही जा ना गडे"

तो पाय आपटत निघून गेला.

* * *

 

अशाच एका दुपारी माधव काम करता करता गाणं गुणगुणत होता. तेवढ्यात माधवी त्याच्याजवळ आली. त्याचं लक्ष नाही बघून तिने शुकशुक केलं

"हाडहाड"

"अहो मी आहे, माधवी"

"सॉरी हं मी बघितलंच नाही. बसा नं"

"मला एक डिफीकल्टी आहे"

"अरे वा! मज्जा."

"यात कसली आलीये मजा?"

"मला मदत करायला खुSप मजा येते. तुम्ही डिफीकल्टी सांगा नं"

"हो, पण त्याआधी एक सांगू... तुम्ही गाणं खूप छान गाता"

माधव स्वस्तुतीनं थोडा ओशाळला

"थँक्स. सहज गुणगुणतो."

"खूप आवड दिसते तुम्हाला गाण्याची" ती

"तुम्हाला जेवढी पुस्तकांची आवड आहे न, तेवढीच मला गाण्याची आवड आहे"

"अय्या! तुम्हाला कसं माहीत मला पुस्तकं आवडतात ते? जादूगारच आहात"

"तुम्हीच जादू केलीत

ती लाजली. दोघं गप्पा मारू लागले. 

"रणबीर दीपिकाचं लफडं जमलं बरं का"

"कुठल्या पेपरात आलं?"

"अहो आपल्या ऑफिसमधले रणबीर अन दीपिका."

कर्मचाऱ्यांच्या ताज्या कमेंट्स.

सगळेजण त्यांच्याकडे चोरून बघत होते. कुजबुजत कमेंट्स पास करत होते. हे सहन न झाल्याने दहिवडे चिडून उठला अन् दरवाजाला लाथ मारून बॉसच्या केबिनमध्ये घुसला

"बाकरवडे, हे काय आहे?" बॉस चिडून ओरडला

"बाकरवडे नाही हो, दहिवडे"

"हं, काय आहे?"

"तुम्ही आधी बाहेर व्हा"

"मला बाहेर जायला सांगतो?!"

"अहो तसं नाही. मागे नाही का मी तुम्हाला माधव-माधवीबद्दल सांगितलं होतं. प्रत्यक्ष बघा आता."

त्याने बॉसला खेचत बाहेर आणलं. बाहेर प्रेमीयुगुल गुलगलु गप्पा मारत होतं. थोड्यावेळाने ते उठले अन् हातात हात घेऊन, कुणाकडेच ढुंकूनही न बघता ऑफिसबाहेर पडले. बॉसचा "माझं स्टेटमेंट पूर्ण करा रेSS" हा आर्त चित्कारही त्यांना ऐकू आला नाही.


लैलाला मजनू मिळाला, रोमिओला ज्युलिएट मिळाली तसंच माधवला माधवी मिळाली. दुपार नाही संध्याकाळ नाही, घर नाही दार नाही अन् ऑफिस तर नाहीच नाही. त्यांचं प्रेम मिळेल त्या वेळी अन् मिळेल त्या ठिकाणी बहरू लागलं. थोडक्यात काय तर 'प्रेम करणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे' या वचनाचा त्यांना साक्षात्कार झाला. या नवीन भावनेमुळे आधीची बावरलेली माधवी वाघीण झाली अन् माधव दावं तोडलेल्या वासरासारखा चौखूर उधळला. त्यांच्या संगीताला नवा अर्थ मिळाला, नवी सुरावट अन् नवा ताल गवसला.

 

याच प्रेमतालात तल्लीन होऊन दोघं रोजच्यासारखंच 'मजनू हिल' पार्कमध्ये बसलेले होते. दोघांचे हात अर्थातच एकमेकांच्या हातांत होते

"माझ्या राजा"

"माझी राणी"

"माझ्या राजा"

"माझी राणी"

"राजसा, तू मला सोडून तर जाणार नाहीस नं?"

"तुला सोडून जाणं म्हणजे माझं मलाच सोडून जाणं"

"किती गोड बोलतोस रे. असं वाटतं हे क्षण कधी संपूच नयेत. आजपर्यंत फक्त कथा-कादंबऱ्यांत वाचलं होतं. आज प्रत्यक्ष घडतंय."

"प्रिये, माझं जीवन आधी ओसाड वाळवंट होतं. तू माझा उंट बनून आलीस अन् या रेतीत नंदनवन फुललं. सगळं मिळल्यासारखं वाटतंय. आता मला खायला नको की प्यायला नको."

"तू खाण्याची गोष्ट काढलीस अन् मला भूक लागली रे. एक भेळ घेऊन देशील?"

"भेळच काय, मी तुझ्यासाठी चंद्र, ग्रह, तारे, इतकंच काय, नुकताच हरवलेला विक्रम लँडरपण आणून देईन."

"तूर्तास भेळच बरी."

तो उठला अन् भेळवाल्याला आवाज दिला. तो हुबेहूब बॉससारखाच दिसत होता.

"अरे, हे तर आपले साहेब" माधव आश्चर्याने म्हणाला

"बोला साहेब, काय देऊ?" भेळवाला म्हणाला

"साहेब तर तुम्ही आहात. चांगला साईड बिझनेस उघडला."

"साईड नाय, हा आपला फुलटाइम बिझनेस हाय"

"आयला! तुम्ही भेळच देता की स्टेटमेंटपण देता?"

"असलं काही देत नाही आपण. भेळ पाहिजे तर बोला"

"दोन द्या." 

भेळवाल्यानं दोन प्लेट भेळ दिली. माधवनं त्याला पैसे देता देता विचारलं,

"तुम्हाला जुळा भाऊ आहे का कुणी, जो जत्रेत वगैरे हरवला होता?"

"नाही, का?"

"आमचे साहेबही तुमच्यासारखेच दिसतात. तुम्हाला माहीत नाही असा एखादा भाऊ आहे का?"

"ते माझ्या बापाला विचारावं लागेल. ख्या: ख्या:"

भेळवाला हसत निघून गेला.


दोघांनी भेळ खात खात गार्डनमध्ये चक्कर मारली. नंतर बोलत बोलत दूर कोपऱ्यातल्या एका झाडाजवळ गेले. ते झाड बुटकं होतं पण त्याच्या खोडाचा घेर बराच होता. माधव अन् मालती निवांतपणे बसले.

पुढं काही घडणार, कुणी तसा विचार करणार त्याआधीच झाड थरथरू लागलं. दोघं घाबरले, भूकंपाच्या भीतीनं दोघांनी इकडेतिकडे बघितलं, तोच त्या बुटक्या झाडाच्या खालच्या फांदीवरून माधवीच्या भावानं धापकन उडी मारली. त्याचा पोशाख हिरवट होता अन् गळ्यात दुर्बीण होती.

"मी इतका वेळ तुमच्या हालचालींवर लक्ष ठेवून होतो. काय थेरं चाललीत ही?”

“ते आम्ही, आपलं…”

“या चोरासोबत भानगडी करायला लाज नाही वाटत?"

"दादा, हे माझे भावी पती आहेत" 

भावाने माधवची कॉलर पकडली,

"काय रे पत्या, बारक्या"

"मी बारक्या? मग तू जाड्या"

"कारकुंड्या कुठला"

"कारकुंड्या नाही, लिपिक आहे. महागाई भत्यासह सतरा हजार पाचशे सव्वीस रुपये मिळतात."

"गाढवा, मला पगार सोडून याच्या दुप्पट मिळतात."

भावानं माधवीचा हात पकडला अन् ओढत नेऊ लागला


* * *


माधवच्या घरात आज सन्नाटा पसरलेला होता. माधव उदास मनानं बसला होता.

"माधव, काय झालं? कालपासून काही खात नाहीस, पित नाहीस" त्याच्या वडिलांनी विचारलं

"काय झालं बाळा? माझी शपथ आहे तुला"

"आई शपथ नको देऊस गं"

"मग काय झालं ते तरी सांग"

"मी एका मुलीच्या प्रेमात पडलोय. पण तिच्या फौजदार भावाला हे मान्य नाही. मी कारकून आहे हे त्याला आवडत नाही. आता का मी जीव देऊ का?"

"नाही मग मी एकटाच राहीन" त्याचे वडील घाबरून म्हणाले. माधवच्या आईनं त्यांच्याकडं रागानं पाहलं.

"कारकून आवडत नाही तर कोण पाहिजे त्याला?" वडील

"स्मगलरही चालेल म्हणाला पण कारकून नाही"

"मग स्मगलर हो"

"ते का एवढं सोपं आहे का?"

"मला पोलिसांची मुलगी घरात आणायचीच नाहीये. माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे. सुंदर आहे, सुशील आहे. तू तिच्याशी लग्न कर" 

"पण मम्मी, माझं प्रेम..."

"प्रेमाचा अन् लग्नाचा काही संबंध नसतो. आता आमचंच बघ नं" वडील आयुष्याचा सारांश मांडत म्हणाले.

"एकदा ठरलं म्हणजे ठरलं. तू त्या मुलीशी लग्न करायचं नाही"

"करणार"

"मग मी... मग मी आत्महत्या करेन"

एवढं बोलून त्याची आई निघून गेली. 

"माधव हिचं काही ऐकू नको, अशा धमक्या तिने बऱ्याचदा दिल्या आहेत" त्याच्या वडिलांनी अनुभवाचा सल्ला दिला.


दुसऱ्या दिवशी माधवी ऑफिसला आली नाही, तिसऱ्या दिवशीपण आली नाही. तो मात्र रोज ऑफिसमध्ये अन् नंतर त्यांच्या भेटीच्या ठिकाणी जात होता. तीन दिवस झाले, पण माधवी आली नाही. चौथ्या दिवशी संध्याकाळी मात्र ती आली. तो मजनू गार्डनमध्ये बसून तिची वाट बघत होता. ती येताच तो आनंदाने नाचायचंच बाकी उरला.

 "माधवी"

 "माधव"

 "तू आलीस माधवी! समाजाची बंधनं झुगारून, त्या खविसाचा डोळा चुकवून आलीस! माझं प्रेम आज जिंकलं"

 "तुला भेटले अन् असं वाटलं काय सांगू, कसं सांगू. तुझ्याविना जीवन म्हणजे चटणीविना वडापाव, कॉपीविना परीक्षा, कशाविना काहीही."

 "खरंच?"

 "अगदी खरं. चल या जगापासून दूSर निघून जाऊ. अगदी दूर. जिथे फक्त मी आणि तू, तू आणि मी. दुसरं काहीही नाही"

 "पण तिथे काहीच जर नसेल तर खाणार काय?"

 "तू खाण्याचं नाव काढलं अन् मला भूक लागली रे."

 "भेळ खायची?"

 "हो, चालेल"

 तो भेळवाल्याला शोधणार त्याआधी भेळवालाच त्यांच्याजवळ आला.

 "भेळ, घ्या भेळ"

 त्याचा चेहरा हुबेहूब माधवीच्या भावासारखा होता.

 "दादा!!" माधवी घाबरून म्हणाली

 "नाही गं, त्याचा जुळा भाऊ असेल"

 "काय देऊ साहेब?"

 "दोन भेळ लाव"

 "फिकी की तिखट?"

 "मला तिखट" माधवी

 "मलापण" माधव

 "चांगली झणझणीत लावतो"

 माधव त्याच्या कानाजवळ तोंड नेऊन म्हणाला, "नको, सकाळी प्रॉब्लम व्हायचा"

 "प्रॉब्लम तर आता तुला होणार आहे बेट्या" असं बोलून भेळवाला, म्हणजेच माधवीच्या भावाने माधवचं मानगूट पकडलं.

 "काय रे हरामखोरा, तुला सांगितलं होतं नं माझ्या बहिणीच्या नांदी लागायचं नाही. बारक्या कुठला"

 "अहो पण मी काय गुन्हा केला एवढा. प्रेमच तर केलं"

 "हाच मोठा गुन्हा आहे"

  नंतर पहिल्यापेक्षा अधिक गंभीर स्वरूपाची बाचाबाची झाली. अन् माधवीचा भाऊ तिला खेचत घेऊन गेला.


* * *


मधली काही वर्षे काय झालं यात सांगण्यासारखं काही नाही.


काही वर्षानंतर अशाच एका बाजारात माधव आपल्या चपलेला खिळा मारून घेत होता. तो जसा वळला तशी त्याला माधवी येताना दिसली. तिच्या हातांत भाज्यांच्या थैल्या अन् गळ्यात लायसन्स, अर्थात मंगळसूत्र होतं. आणि हो एक राहिलंच, सोबत तिचा मुलगाही होता. नजरानजर होताच त्यांच्या डोळ्यांत आश्चर्य अन् खेद उमटला.

"माधवी, तू इथे?"

"का? येऊ नये?"

"नाही तसं नाही"

"यांची बदली झाली इथे"

"कशी आहेस?"

"कशी वाटते?"

"तशीच"

तिकडून 'पप्पा' 'पप्पा' म्हणत एक मुलगी धावत आली.

"तुझी मुलगी वाटतं" 

"हो"

"खूप गोड आहे. बाळा, तुझं नाव काय?"

"माधवी" 

(मोठी) माधवीने माधवकडे बघितलं, त्याने नजर दुसरीकडे वळवली. मग तीच पुढे बोलली

"हा माझा मुलगा. याचं नाव माधव."

"काय!" 

"हो पण मी त्याला बारक्याच म्हणते"

दोघेही थोडं हसतात. 

"गाणं गात असतोस का?"

"आयुष्यच मला गुणगुणत असतं अधुनमधुन"

"म्हणजे?"

"काही नाही. तू पुस्तकं वाचतेस?"

"हो, पण प्रेमकथा नाही"

थोडावेळ कुणीच बोललं नाही.

"माधवी, तुझं प्रकरण माझ्या आयुष्याच्या पुस्तकात नेहमीच आहे. सिलॅबस बदलला तरी ते प्रकरण तसंच आहे"

दोघांच्या चेहऱ्यावर समाधानाचं स्मित झळकलं. 
Rate this content
Log in

More marathi story from Vinay Khandagale

Similar marathi story from Tragedy