प्रभू श्रीरामांचे संघटन कौशल्य आणि नेतृत्व गुण
प्रभू श्रीरामांचे संघटन कौशल्य आणि नेतृत्व गुण
सर्व भारतीयांचे दैवत असलेले प्रभू श्रीराम यांचे संपूर्ण जीवन अतिशय स्फुर्तीदायक आहे. एक आदर्श शासनकर्ता म्हणून त्यांचे गुणगान आजही केले जाते. किंबहुना भारतात उत्तम राज्य यालाच ‘रामराज्य’ असा प्रतिशब्द वापरला जातो. गुणनिधान अशा श्रीरामांना भजतांना, त्यांचे पूजन करतांना सर्वांनीच त्यांचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांचा जाणीवपूर्वक अभ्यास केला पाहिजे.
श्रीरामांच्या अनेक गुणांपैकी एक मोठा गुण म्हणजे त्यांचे नेतृत्वगुण व संघटन कौशल्य! आपल्या घराबाहेर एखादे ध्येय साध्य करण्यासाठी संघटना बांधणे, ती यशस्वीपणे चालवणे आणि आपले उद्दिष्ट साध्य करणे हे कुशल संघटकाला करता आले पाहिजे. म्हणूनच कुठलीही संघटना उभारणाऱ्या किंवा तिचे नेतृत्व करणाऱ्या प्रत्येकाने श्रीरामांच्या नेतृत्व गुणांचा, त्यांच्या संघटन कौशल्याचा अभ्यास केला पाहिजे.
कुशल संघटक श्रीराम- श्रीरामांचे संघटनकौशल्य त्यांच्या घरातही दिसते. नात्याने सावत्र असलेल्या आपल्या भावांवर अपार प्रेम करणे, त्यांच्याकडूनही ते मिळवणे आणि अत्यंत विपरीत परिस्थितीतही घरातील एकोपा कायम ठेवणे हे भावंडांमध्ये सर्वात ज्येष्ठ असलेल्या श्रीरामांनी सहज साध्य केले. त्यांच्या वनवासाला कारणीभूत असलेल्या सावत्र मातेला, कैकयीला, त्यांनी कधीही दुषणे दिली नाहीत. याउलट पित्यावर रागावलेल्या लक्ष्मणाची आणि मातेवर संतप्त झालेल्या भरताची त्यांनी समजूत घातली. राज्य, सत्ता, संपत्ती यांचा मोह त्यांना पडला नाही. त्यांनी वनवासात जाऊ नये म्हणून कौसल्या, सुमित्रा, इतर आप्त तसेच सर्व प्रजाजनांनी किती विनवण्या केल्या असतील? पण श्रीरामांनी मृदू, सौम्य भाषेत नम्रपणे पण ठाम नकार दिला. मृदूभाषी,संयत असूनही आपल्या निर्णयांवर ठाम रहाणे हा नेत्याच्या ठायी आवश्यक असलेला गुण आहे.
कर्तव्यपालक निर्मोही श्रीराम - रघुकुलातील एक युवराज,ज्याचा राज्याभिषेक होणे निश्चित झाले आहे, तो पित्याच्या आज्ञेनुसार क्षणार्धात निर्णय घेऊन वनवासात जाण्यास निघतो, पुत्र म्हणून आपले कर्तव्य पार पाडतो हे फार विलक्षण आहे. कारण सत्तेचा मोह भल्याभल्यांना भुरळ घालतो. पण यामुळेच श्रीराम लोकांच्या हृदय सिंहासनावर कायम विराजमान झाले, लोकनायक ठरले. जेव्हा त्यांच्या पित्याचा, राजा दशरथाचा, देहांत झाला, तेव्हा श्रीराम वनवासात असल्याने त्यांच्या अंत्यसमयी तेथे उपस्थित नव्हते. आपले कर्तव्यपालन करीत असताना वैयक्तिक सुखदुःखाचा विचार नेत्याने करावयाचा नसतो याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. अयोध्येचा हा राजपुत्र एक दोन नव्हे तर चौदा वर्षे वनवासात राहीला, हालअपेष्टा सहन केल्या, काट्याकुट्यांच्या मार्गावरून चालला, जमिनीवर निजला!! वनवासात आपल्या बरोबर आलेल्या लक्ष्मणावर श्रीरामांनी पुत्रवत प्रेम केले, त्याला जपले.
लोकसंग्रहक श्रीराम - माणसे जोडण्याची कला अवगत असणे प्रत्येक नेत्याला अत्यावश्यक आहे. श्रीरामांचाही लोकसंग्रह फार मोठा होता. श्रीरामांबरोबर एकाच गुरुकुलात शिकणारे निषादराज गुह हे त्यांचे आदिवासी बालमित्र होते. आपल्या संपूर्ण वनवासाच्या काळात श्रीरामांनी अनेक माणसे जोडली. वाटेतील छोट्या छोट्या राज्यांमधून जातांना निषादराजासह इतर अनेक राजांच्या भेटीगाठी घेतल्या. पण तरीही ते त्या नगरांत न राहता ‘वन’वासातच राहिले.
क्षत्रियधर्मपालक श्रीराम - वनवासात श्रीरामांनी,सीता आणि लक्ष्मणासह अनेक ऋषी मुनींचे दर्शन आणि आशिर्वाद घेतले. त्यांच्याशी चर्चा करून ज्ञान संपादन केले. अत्री ऋषींच्या आश्रमात रहातांना त्यांना काही राक्षस आश्रमातील लोकांना त्रास देत आहेत असे समजले. त्यानंतर रामांनी त्या राक्षसांचा वध केला. म्हणजे प्रभू राम वनवासातही त्यांचा क्षत्रिय धर्म पाळत होते. ‘सद् रक्षणाय’ आणि ‘खलनिग्रहणाय’ ते कार्यरत होते. त्यांच्या या अशा कृतीतून त्यांच्याबद्दल सर्वांच्या मनात प्रेमादर निर्माण झाला असेल हे निश्चित. पुढेही त्यांनी अनेक राक्षसांना मारून जनतेला त्यांच्या त्रासातून वाचवले. म्हणूनच श्रीराम जनतेचा विश्वास असलेले लोकप्रिय राजा-नेता- ठरले.
पुढे श्रीराम जेव्हा दंडकारण्यात वास्तव्य करून नाशिक जवळ पंचवटी येथे आले, तेव्हा त्यांची पक्षीराज जटायूशी मैत्री झाली. याच जटायूने सीताहरणाच्या वेळी रावणाशी युद्ध करून आपले बलिदान दिले आणि मृत्यूपूर्वी श्रीरामांना सीतेबद्दल माहिती दिली. पंचवटी येथील वास्तव्यातही श्रीरामांनी खर, दुषण, मारीच इत्यादी राक्षसांना ठार केले आणि त्रासलेल्या ऋषीवरांना, सामान्य माणसाला मोठा दिलासा दिला.
लोकनायक श्रीराम - जेव्हा श्रीराम नाशिक जवळ अगस्त्य ऋषीना भेटले, तेव्हा अगस्त्य ऋषींनी त्यांना त्यांच्या अग्नीशाळेत तयार केलेली शस्त्रे भेट दिली. आपल्या नम्र वर्तणुकीने श्रीराम सर्वांचे लाडके झाले होते, मग ते ज्ञानसंपन्न ऋषी असोत की सामान्य माणसे! याच नम्र,प्रेमळ वागणुकीमुळे त्यांनी आदिवासी, वनवासी लोकांनाही आपलेसे केले. त्यामुळे त्या लोकांनीही रामांना खूप मदत केली. अंगी नम्रता नसलेली अहंकारी व्यक्ती कधीही मोठा नेता होऊ शकत नाही.
पुढे सीतेच्या शोधार्थ हिंडताना राम-लक्ष्मणा़ची भेट शबरी मातेशी झाली. आपल्या सद्भक्तांबद्दल श्रीराम किती कनवाळू होते हे या भेटीने लक्षात येते. वृद्ध शबरीने भोळ्या भावाने दिलेली उष्टी बोरे श्रीरामांनी अत्यंत प्रेमाने खाल्ली. असा राजा…असा नेता….. विरळाच!
मित्रधर्म पालक- त्यानंतर पुढे राम- लक्ष्मणांची भेट हनुमंत, सुग्रीव आणि जा़बुंवंत यांच्याशी झाली. या सर्वांच्या आणि रामाच्या संस्कृतीत फार मोठा फरक होता. पण तरीही ते सर्व श्रीरामांचे निस्सीम भक्त बनले कारण सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा श्रीरामांचा स्वभाव! हनुमंत श्रीरामांचा भक्त आणि दास बनला. किष्किंधा नगरीचा राजा सुग्रीव याचे राज्य त्याच्या भावाने, वालीने, बळकावले आणि त्याच्या पत्नीचे अपहरण केले. तेव्हा श्रीराम त्याच्या सहाय्याला धावून गेले आणि वालीचा वध करून मित्रधर्म निभावला तसेच ते राज्य परत सुग्रीवाला दिले.
गुणग्राहक, शूर योद्धा श्रीराम - वनवासातील या संपूर्ण प्रवासाचा, मर्यादापूर्ण वर्तणुकीचा, धर्मपालनाचा परीपाक म्हणजे श्रीरामांनी केलेली वानरसेनेची रचना आणि त्यांना बरोबर घेऊन रावणाशी केलेले युद्ध!! धनसंपन्न, बलवान, लंकाधिपती रावणाने आपल्या पत्नीचे, सीतेचे, हरण केले आहे हे समजल्यावर हातपाय न गाळता, दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर श्रीरामांनी अथक परिश्रम करून तिला शोधले. आपल्या नेतृत्वगुणांच्या आधारे जीवाला जीव देणारे अनेक मित्र जोडले. वानरांचे सैन्य तयार केले. लंकेपर्यंत जाण्यासाठी समुद्रावर सेतू बांधला. त्यासाठी नल आणि नील या जाणकारांची मदत घेतली. योग्य कामासाठी योग्य वेळी योग्य व्यक्तींची निवड करणे आणि त्यांच्यावर आवश्यक तेवढा विश्वास दर्शवणे हा नेत्याच्या ठायी आवश्यक असलेला गुण रामांकडे होता. प्रत्यक्ष रावणाचा भाऊ बिभीषण हा रामांचा भक्त आणि मित्र बनला. ज्या वानरांना केवळ मोठमोठ्या शिळा, प्रचंड झाडे हीच शस्त्रे ठाऊक होती त्यांच्या सहाय्याने शस्त्रसंपन्न रावणसैन्याचा विनाश केला. आणि रावणाचा वध करून सीतेची सुटका केली. खरे तर रावणाशी युद्ध करण्यासाठी अयोध्येस भरताकडे निरोप पाठवून तेथील सैन्याची मदत घेणे श्रीरामांना सहज शक्य होते. पण वनवास पालन करायचे असल्याने ते त्यांनी केले नाही.
कोणतेही पाठबळ नसताना राम आणि लक्ष्मण यांनी महाप्रतापी, महापराक्रमी,सेनाधुरंधर, ऐश्वर्यसंपन्न रावणाचा पराभव केला आणि परस्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास काय दुर्दशा होते हे ही जगास दाखवून दिले. श्रीरामा़च्या अद्भुत संघटनकौशल्याचा तसेच नेतृत्वगुणांचा हा विजय मानला पाहिजे.
धर्मपालक राजा श्रीराम - लंकेवर विजय प्राप्त केल्यानंतरही ते लंकेच्या सिंहासनावर बसले नाहीत. त्यांनी रावणाचा सत्शील बंधू बिभीषण याला राजपदावर बसवले आणि मित्रधर्माचे पालन केले. एवढेच नव्हे तर श्रीरामांनी शत्रू धर्माचेही पालन केले. रावणाला मारल्यानंतर त्यांनी ‘मरणान्तानि वैराणि निवॄत्तं न: प्रयोजनम्।’ या उक्तीप्रमाणे बिभीषणाकरवी रावणावर अंत्यसंस्कार केले.
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रभू रामचंद्रांनी कर्तव्यपालनाला महत्त्व दिले. ते खरे कर्मयोगी होते. ज्या परमप्रिय पत्नीसाठी,सीतेसाठी, त्यांनी लंकाविजयाचे अद्भुत कार्य केले त्या पत्नीचाही त्यांना पुढे राजधर्म पालनासाठी त्याग करावा लागला. परंतु राजधर्म पालन करताना त्यांनी पतिधर्माचे, एकपत्नी व्रताचेही पालन केले आणि सर्व सुखोपभोग वर्ज्य केले. ‘राजा हा प्रजेचा उपभोगशून्य स्वामी असतो’ हे आपल्या आचरणातून दाखवून दिले. रामराज्यात प्रजा दुःख, दारिद्रय, वेदना यापासून मुक्त होती. भेदभाव, अन्याय यांना तेथे थारा नव्हता. प्रजा निर्भय होती.
“जननी जन्म भूमिश्च स्वर्गादपि गरीयसी॥” असे म्हणत चौदा वर्षे वनवास भोगून श्रीराम; जानकी आणि लक्ष्मणासह अयोध्येला परत आले. मातृभूमीवर इतके अपार प्रेम करणाऱ्या राजा रामचंद्रांना त्रिवार वंदन.
श्रीराम जय राम जय जय राम.
