STORYMIRROR

Kshitija Kapre

Others

3  

Kshitija Kapre

Others

राजा त्रिशंकू

राजा त्रिशंकू

4 mins
165

ही गोष्ट आहे स्कंद पुराणातील नागरखंडातील. यात एकूण २७९ अध्याय आहेत. नागरखंडात तीर्थ माहात्म्य वर्णन केले आहे.

सूर्यवंशातील ईश्वाकू कुळात त्रिशंकू नावाचा राजा होऊन गेला. त्याचे मूळ नाव होते सत्यव्रत. तो अतिशय दयाळू आणि प्रजाहितदक्ष राजा होता. सत्यव्रताचे त्रिशंकू असे नामकरण होण्याची कथा अतिशय रंजक आहे जी स्कंदपुराणात वर्णन केली आहे.

त्रिशंकूला सदेह स्वर्गात जाण्याची अतिशय तीव्र इच्छा होती. म्हणून तो त्याचे राजगुरू ऋषी वशिष्ठ यांच्याकडे गेला आणि म्हणाला, "मला सदेह स्वर्गात जाण्याची इच्छा आहे. कृपया आपण त्यासाठी एखादा यज्ञ करावा आणि एक उंच पर्वत निर्माण करावा. त्यायोगे मी त्यावर चढून स्वर्गारोहण करू शकेन."

ऋषी वशिष्ठांनी त्याची इच्छा हास्यस्पद ठरवली.

ते म्हणाले, "कोणतीही जीवित व्यक्ती अशी सदेह स्वर्गात जाऊ शकत नाही. हा नियम आहे. जा काहीतरी सत्कर्म कर आणि मग तू तुझ्या मृत्यूनंतर स्वर्गात जाऊ शकशील."

निराश झालेल्या राजाने त्यानंतर ऋषी वशिष्ठांच्या पुत्रांना बोलावले आणि यातून काहीतरी मार्ग काढण्यास सांगितले. राजा त्यांना म्हणाला, "तुम्ही जर तसे केले नाही तर मी कदाचित वशिष्ठ ऋषींचा गुरु म्हणून त्याग करेन." वशिष्ठ पुत्र रागावले. ते म्हणाले, "आमच्या वडिलांनी जी गोष्ट करण्यास नकार दिला आहे ती गोष्ट तू आमच्याकडून करून घेण्यास कसे सांगू शकतोस? आम्ही तुला शाप देतो. तू चांडाळ बनशील."

त्रिशंकू ताबडतोब चांडाळ बनला. त्याचा चेहरा कुरूप झाला. शरीर घाणेरडे झाले आणि जुने पुराणे, फाटके कपडे त्याच्या अंगावर आले.

त्रिशंकूने त्याचा मुलगा हरिश्चंद्र याला बोलावले आणि आपली दुःखद कहाणी सांगितली. आपण हे राज्य सोडून वनात जात आहोत असेही सांगितले. जाण्यापूर्वी त्याने हरिश्चंद्राला त्याचा उत्तराधिकारी म्हणून नेमले.

एके दिवशी जंगलात भटकत असताना राजा त्रिशंकूची भेट विश्वामित्र ऋषींशी झाली. त्रिशंकूने त्यांना वंदन केले आणि आपली दुःखद कहाणी सांगितली. विश्वामित्रांचे वशिष्ठ ऋषींशी मतभेद होते. विश्वामित्रांनी त्रिशंकूला त्याची इच्छा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले, "परंतु हे करण्यापूर्वी तुला शाप मुक्त व्हावे लागेल त्यासाठी तुला तीर्थयात्रेला जावे लागेल. ज्यायोगाने तू परत एकदा शुद्ध होशील." 

विश्वमित्र आणि त्रिशंकू दोघेही तीर्थयात्रेस निघाले आणि अर्बुदाचल येथे पोहोचले. तिथे त्यांची मार्कंडेय ऋषींची भेट झाली. मार्कंडेय ऋषींनी त्याला हाटकेश्वर येथे जाऊन पाताळगंगेत पवित्र स्नान करण्यास सांगितले. त्यामुळे त्रिशंकू शुद्ध होईल आणि त्याच्या सर्व समस्या सुटतील असेही ते म्हणाले.

आता विश्वामित्र आणि त्रिशंकू दोघेही हाटकेश्वर येथे पोहोचले. त्यांनी पवित्र पाताळगंगेत स्नान केले आणि काय आश्चर्य! त्रिशंकू खरोखरच शुद्ध झाला. त्याची सर्व हीन लक्षणे क्षणार्धात नष्ट झाली. विश्वामित्रांना अतिशय आनंद झाला. त्यांनी एक मोठा यज्ञ आरंभला. परंतु कोणीही नियम मोडून जिवंतपणी सदेह स्वर्गात यावे हे देवांना नको होते. त्यांनी यज्ञातील हविर्भाग स्वीकारण्यास नकार दिला.

विश्वमित्र अतिशय संतापले. ते म्हणाले, "हे राजा त्रिशंकू, उठ!! मी तुला माझ्या शक्तीने स्वर्गात पाठवतो."

त्यांनी असे म्हणताच त्रिशंकू वर वर जाऊ लागला आणि स्वर्गद्वारापाशी पोहोचला. परंतु देवांनी त्याला तेथे अडवले. ते म्हणाले, "तू जिवंतपणी स्वर्गात येऊ शकत नाहीस. जा, परत पृथ्वीवर जा. असे म्हणून देवांनी त्रिशंकू ला परत पृथ्वीवर ढकलून दिले."

झाले! त्रिशंकू खाली डोके वर पाय अशा अवस्थेत परत पृथ्वीवर येऊ लागला. त्याने विश्वामित्रांची कळवळून प्रार्थना केली. तेव्हा विश्वामित्र म्हणाले, "खाली येऊ नकोस! तेथेच थांब!!" आता त्रिशंकू स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामध्ये लटकू लागला. विश्वमित्र देवांवर अतिशय क्रोधित झाले. त्रिशंकूला दिलेले वचन पाळण्यासाठी त्यांनी इंद्राशी आणि इतर देवतांशी परत लढण्याचा निश्चय केला. त्यासाठी त्यांनी अनेक वर्ष घोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले. भगवान शंकर त्यांच्यापुढे प्रकट झाले. त्यांनी विश्वामित्रांना वर मागण्यास सांगितले.

विश्वामित्र म्हणाले, "हे महादेवा, मला एकच वरदान आपण द्यावे. ब्रह्मदेवाकडे ज्या प्रमाणे नवनिर्मितीची शक्ती आहे तशीच माझ्याकडे असावी." भगवान शंकर म्हणाले, "तथास्तु!" आणि अंतर्धान पावले.

आता विश्वामित्रांनी त्रिशंकूसाठी दुसरे ब्रम्हांड आणि दुसरा स्वर्ग बनवला. त्या स्वर्गात त्याला स्थान दिले.

त्यानंतर त्यांनी सूर्य, चंद्र, तारे,नद्या इत्यादींची निर्मिती केली. पण त्यांच्या या नवनिर्माणामुळे संपूर्ण जगात प्रचंड गोंधळ माजला. ब्रह्मदेवाने उत्पन्न केलेली प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी परत निर्माण झाली. त्यामुळे दोन डोंगर, दोन नद्या, एवढेच नाही तर दोन चंद्र, दोन सूर्य अशा सगळ्या गोष्टी दोन-दोन दिसू लागल्या. एक ब्रह्मदेवांनी निर्माण केलेली आणि एक विश्वामित्रांनी निर्माण केलेली!! माणसे गोंधळली, घाबरली. एकच हाहाःकार उडाला.

पण विश्वामित्र थांबायला तयार नव्हते. आता त्यांनी त्रिशंकूला नवीन स्वर्गाचा इंद्र बनवण्यास सुरुवात केली. पण देवांनी त्यांना थांबवले. ते म्हणाले, "ऋषीवर, कृपया आपण अशा अनैसर्गिक गोष्टी करू नका. सदेह स्वर्गात येणे नियमबाह्य आहे. केवळ म्हणून आम्ही त्रिशंकूच्या स्वर्गात येण्यास विरोध केला." देवांच्या विनंतीवरून विश्वामित्र थांबले. पण ते म्हणाले, " मी त्रिशंकूस सदेह स्वर्गात पाठवण्याचे वचन दिले आहे. त्यामुळे त्रिशंकू या नवीन स्वर्गातच राहील." देवही तसे करण्यास तयार झाले. पण ते म्हणाले, "त्रिशंकू स्वर्गामध्ये उलट्या अवस्थेत म्हणजे डोके खाली आणि पाय वर असा राहू शकेल."

त्रिशंकू याचा अर्थ 'मधेच लटकलेला'. धड इकडचाही नाही आणि तिकडचाही नाही. त्यामुळे तेव्हापासून 'त्रिशंकू अवस्था' असा वाक्प्रचार अस्तित्वात आला.

ही स्कंदपुराणातली गोष्ट आहे. आता तुम्ही म्हणाल, की इतकी जुनी, पुराणातली गोष्ट!! त्याचा आजच्या परिस्थितीशी काय संबंध? आपण मराठीत म्हणतो ना पुराणातली वांगी (वानगी) पुराणात. पण हे खरे आहे का हो? या पुराणातील गोष्टींपासून आपण काही शिकू शकतो? नक्कीच!!! धार्मिक आणि प्रत्यक्ष जीवनातील सुद्धा!!

१) निसर्गाविरुद्ध जाण्याची इच्छा कधीही मनात ठेवू नका.

२) गुरुआज्ञेचे उल्लंघन कधीही करू नका. गुरुंनी दिलेला सल्ला हा नेहमीच आपल्या फायद्यासाठी असतो.

३) जे लोक आपल्याला 'नाही' असे म्हणतात ते कदाचित तुमचे खरे मित्र असू शकतात. जसे वशिष्ठ मुनींनी त्रिशंकूला प्रामाणिकपणे 'नाही' असे सांगितले.

४) आपल्या एखाद्या बलशाली मित्राच्या नादी लागून निसर्गाचे नियम कधीही तोडू नका. अंततः तुम्हाला कुठेही स्थान राहणार नाही. 'न घर का न घाट का.' 

५) तुम्ही चुकीच्या गोष्टी करत असताना जर तुम्हाला कोणी मदत केली तर तुम्हाला त्या वेळेपुरते चांगले वाटेल. पण कदाचित त्याचा तुम्हाला मदत करण्याचा हेतू वेगळा असू शकेल. जसे इथे विश्वामित्रांनी त्रिशंकूला मदत केली कारण त्यांना स्वतःला वशिष्ठ ऋषींपेक्षा श्रेष्ठ सिद्ध करावयाचे होते.

६) तुम्ही चांगल्या गोष्टी केल्या तर त्याचे फळ नेहमीच चांगले मिळते. त्रिशंकू अतिशय चांगला राजा होता. त्यामुळे त्याने काही चुका केल्या तरी त्याला चांगले फळ मिळाले.


Rate this content
Log in