एक अविस्मरणीय प्रवास अनुभव
एक अविस्मरणीय प्रवास अनुभव
केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार।
शास्त्रग्रंथविलोकन, मनुजा चातुर्य येतसे फार।।'
खरंच, मोरोपंतांचे हे शब्द किती योग्य आहेत!! देशाटन केल्याने म्हणजेच प्रवास केल्याने माणसाला अनेक गोष्टी कळतात. त्याचा विकास होतो. केवळ भौतिक विकासासाठी नव्हे तर अध्यात्मिक विकासासाठी सुद्धा प्रवास केला पाहिजे. म्हणूनच "बहता पानी निर्मला और साधु तो चलता भला" असे म्हणतात.
मलाही प्रवासाची आवड आहे. देशात आणि परदेशातही अनेक कारणांमुळे मी प्रवास केला आहे. पण मोरोपंतांच्या वरील उक्तीचा अनुभव देणारा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रवास मात्र वेगळाच!!!
तो दिवस होता २३ ऑगस्ट १९९७. शनिवार होता आणि मी रोजच्या सारखीच कॉलेज मध्ये आले होते. सकाळ पासूनच ढगाळ वातावरण होते आणि पाऊसही पडत होता. पण मुसळधार कोसळणारा पाऊस हे मुंबईत सर्वांच्या अंगवळणी पडलेले असते. त्यामुळे मी रोजच्या सारखीच लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स घेत होते. पण साधारण १२.३० नंतर कॉलेजमध्ये पालकांचे फोन यायला सुरुवात झाली. पावसाचा जोर वाढला आहे, रेल्वे ट्रॅक वर पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. अशा आशयाचे ते फोन होते. त्यामुळे एकंदर परिस्थिती पाहता पुढील लेक्चर्स रद्द करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांना घरी जाण्यास सांगितले. आमचे कॉलेज मुंबई - ग्रांटरोड- येथे होते. आणि सर्वात लांब म्हणजे ठाण्यात राहणारी मी असल्याने मी पण कॉलेज मधून बाहेर पडले. त्यावेळी मला यत्किंचितही कल्पना नव्हती की मी आता एका अविस्मरणीय प्रवासाचा अनुभव घेणार आहे.
कॉलेजच्या बाहेर आले आणि गुडघाभर पाण्यातून स्टेशनकडे वाटचाल करू लागले. ट्रेन बंद होत्या हे माहीत असूनही मी तिकडे जात होते. पण तेवढ्यात दादरला जाणारी एक डबलडेकर बस मला दिसली आणि मी तिच्यात चढले. जरा हायसे वाटले. चला! दादरपर्यंत तर जाऊ! मग तिथून पुढे ठाण्याला जायला बरेच पर्याय आहेत असा विचार केला. रस्त्यात जागोजागी पाणी साठले होते. पण तरीही फारशी अडचण न येता मी तासाभरात दादरला पोहोचले पण! दादर स्टेशन जवळ बस थांबली…. मी उतरले…… समोर १००-२०० मीटर वर दादर स्टेशन……. पण…..पण…. तिथपर्यंत जाणार कशी? कारण सर्वत्र गुडघाभर पाणी होते….. हळूहळू त्यातल्या त्यात कमी पाण्याचा रस्ता शोधत एकदाची स्टेशन मध्ये शिरले. तर काय….. सर्व ट्रॅक पाण्याखाली गेले होते आणि लोकल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्या होत्या. आता परिस्थितीचे गांभीर्य माझ्या लक्षात आले. कारण मी कॉलेजपासून बरीच दूर आले होते आणि घरी जाण्याचा मार्ग बंद झाला होता. मग परत एकदा पाण्यातून कसरत करत स्टेशन बाहेर आले. ठाण्याला जायला काही बस, टॅक्सी मिळते का ते शोधू लागले. तेव्हा कळले की रस्त्यावर पण खूप पाणी साठले आहे आणि ठाण्याकडे जाणारे सर्व रस्ते बंद आहेत. आमच्या ऑफिसमध्ये प्रशासकीय व्यवस्था बघणाऱ्या मॅडम दादरला राहत होत्या. मी कॉलेजमधून निघताना "कुठे अडकलीस तर इथे तिथे न जाता माझ्या दादरच्या हिंदू कॉलनीतल्या घरी ये" असे प्रेमाने आणि अधिकाराने बजावून सांगितले होते ते आठवले. पण चौकशी अंती कळले की मी जिथे होते तिथपासून हिंदू कॉलनीपर्यंतच्या मार्गावर इतके पाणी भरले आहे की तेथे जाणेही शक्य नाही. मला दादरची फारशी माहितीही नव्हती. म्हणजे तेथे जाण्याचा मार्गही खुंटला. आता मात्र माझी पाचावर धारण बसली. "न घर का, न घाट का" अशी माझी अवस्था झाली होती. तरीही नेटाने टॅक्सी मिळते ते बघतच होते. माझ्यासारख्या अडकलेल्या आणि ठाण्यात रहाणाऱ्या चार जणी मला भेटल्या. चला, एक से भले चार! मग आम्ही चौघी मिळून टॅक्सी मिळते का ते शोधू लागलो. पण एकही जण ठाण्याला जायला तयार नव्हता. सर्वांच एकच सूर! " मॅडम, रस्ता बंद है| पानी भर गया है |टॅक्सी नाही जा सकती|" आतापर्यंत संध्याकाळ झाली होती. काय करावे काही सुचत नव्हते. तेवढ्यात आमच्यातील एक जणीला तिची एक मैत्रीण दिसली. ती एका छोट्याशा टेंपो मधे उभी होती आणि तिच्या बरोबर तिच्या ऑफिस मधल्या ४-५ स्त्रिया आणि ३-४ पुरुष होते. तिच्याशी बोलल्यानंतर कळले की तिचे ऑफिस भायखळा येथे होते. हा त्यांच्या ऑफिसचा टेंपो होता. आणि ते सर्व ठाण्याला जात होते. काहीही ओळखदेख नसताना सुद्धा त्यांनी आम्हाला त्या टेंपो मधे घेतले. आमच्या जीवात जीव आला. टेंपो हळूहळू ठाण्याच्या दिशेने वाटचाल करू लागला. पण जेमतेम १५-२० मिनीटे गेली असतील आणि ड्रायव्हरच्या लक्षात आले की पुढे गाड्यांची प्रचंड मोठी रांग आहे. जवळजवळ एक तास आमचा टेंपो एकाच जागी उभा होता. दरम्यान टेंपो मधील पुरुषांनी खाली उतरून चौकशी केली आणि कळले की पुढे रस्त्यावर भरपूर पाणी आहे आणि गाड्या पुढे जाऊ शकत नाहीत. आता काय करायचं? परत प्रश्नचिन्ह! पण त्या टेंपो मधील स्त्रियांनी आम्हाला धीर दिला. त्या़ंनी आम्हाला त्यांच्या बरोबर त्यांच्या ऑफिसमध्ये चालण्याचा आग्रह केला. रात्री तिथेच थांबून सकाळी पाणी ओसरल्यावर ठाण्याला जाऊ असे त्यांनी सुचविले. आमच्या पुढे पण दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध नव्हता. त्यामुळे आम्ही तसेच करण्याचे ठरविले. दरम्यान टेंपो मधील पुरुषांनी कुठे काही खायला मिळेल का याचा पण शोध घेतला होता. पण सर्व हॉटेल्स आणि दुकानांमधील सर्व खाद्यपदार्थ संपले होते. दोन -चार बिस्कीटचे पुडे तेवढे मिळाले. मग दोन-दोन बिस्किटे खाऊन आणि बरोबर असलेल्या बाटली मधील पाणी पिऊन गप्प बसलो. तेथील आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना तोपर्यंत परिस्थितीची कल्पना आली होती. त्यामुळे तेथे राहणारे कितीतरी लोक घरातील खाद्यपदार्थ आणून अडकलेल्या लोकांना वाटत होते. पण अडकलेल्या लोकांची संख्या इतकी मोठी होती की ते सर्व प्रयत्न अपुरेच पडत होते. टेंपो वळवून पुन्हा त्यांच्या भायखळा स्थित ऑफिस मध्ये आणला. हे ऑफिस आमच्या कॉलेज पासून फार लांब नव्हते. म्हणजे दुपारी तीन पासून रात्री नऊ वाजेपर्यंत फिरुन मी परत त्याच ठिकाणी आले होते. त्या भल्या माणसांनी आमच्यासाठी चहा केला. बिस्किटे दिली. पण काही खाण्याची इच्छाच नव्हती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिथून आम्ही आपापल्या घरी फोन केले. कारण तेव्हा काही मोबाईल फोन नव्हते. गंमत म्हणजे आम्ही तेव्हा नुकतेच नवीन घरात रहायला गेलो होतो. त्यामुळे आमचा फोन नवीन पत्त्यावर स्थलांतरित झाला नव्हता. पण शेजारी रहाणाऱ्यांचा नंबर माझ्याकडे होता. त्यांच्याकडे फोन करून मी सुखरूप असल्याचे घरी कळविण्यास सांगितले. माझ्या घरी माझा चार वर्षाचा छोटा मुलगा होता. त्याची आठवण येत होती. परंतु घरी आजी आजोबा असल्यामुळे आणि तोपर्यंत यजमानही ऑफिस मधून घरी पोहोचल्यामुळे मला त्याची काळजी नव्हती. पण आमच्याबरोबर असलेल्या एकीचा मुलगा फक्त सहा महिन्याचा होता. तिच्याही घरी काळजी घेणारे आजी-आजोबा होते. पण तिला बाळाच्या आठवणीने रडू येत होते. मग बाकी सर्व जणींनी तिला धीर दिला.
रात्री तिथेच खुर्ची वर बसून आणि टेबल वर डोकं ठेवून झोपलो. सकाळी बातमी आली की अजूनही रेल्वे ट्रॅक वर पाणी आहे. रस्त्यावर पण पाणी आहे. पण भायखळा डेपो मधून बेस्टच्या बसेस ठाण्याला सोडत आहेत. आम्ही सगळ्याजणी भायखळा डेपोत आलो. तेथे खूप गर्दी होती. पण आनंदाची गोष्ट म्हणजे तेथे एक डबलडेकर बस फक्त स्त्रियांसाठी सोडली. खूप गर्दी असूनही आम्हाला चढायला मिळाले आणि चक्क बसायला जागाही मिळाली. आहाहा!! आमचा आनंद काय वर्णावा!! चला, आता एकदाचा हा प्रवास संपणार आणि आपण घरी जाणार! बस लगेच सुरू झाली. अर्धा पाऊण तासात बस दादरपर्यंत आली आणि अचानक परत थांबली. बस ड्रायव्हर आणि कंडक्टर दोघेही खाली उतरले आणि खाली वाकून बसची तपासणी करू लागले. आम्ही सगळ्याजणी एकमेकींकडे बघू लागलो. आता आम्ही चिंता, काळजी, भीती या सर्व भावनांच्या पलीकडे गेलो होतो. जे जे होईल ते ते पहावे हेच विचार मनात चालू होते. हळूहळू काय झाले ते बघायला बस मधल्या बायका एक एक करून उतरू लागल्या. दहा ते पंधरा मिनिटातच कंडक्टरने आम्हाला अत्यंत आनंदाची(?) बातमी दिली व ती ऐकून आमचा आनंद गगनात मावेना(?). त्यांनी सांगितले की बसचा एक्सल तुटला आहे आणि बस पुढे जाणार नाही. आम्ही कपाळाला हात लावला. मला तर चकव्यात सापडल्यासारखे वाटत होते. कालच्य दुपारपासून आतापर्यंत मी ग्रॅंटरोड/भायखळा ते दादर एव्हढ्याच भागात फिरत होते. पण दादर ओलांडून पुढे काही जाता येत नव्हते. तेव्हढ्यात आमची बस बंद पडलेली पाहून एक ट्रक ड्रायव्हर ने ट्रक थांबवला आणि आम्हा सर्व बायकांना त्या ट्रक मधून थोडेसे अंतर पुढे आणून सोडले. नंतर त्याला दुसऱ्या मार्गाने जायचे होते. त्यामुळे आम्ही ट्रक मधून उतरलो आता मात्र आम्ही कुठल्याही वाहनावर अवलंबून न राहता पायांची दोन चाकी गाडी करून घरी पोहोचण्याचा निर्णय केला आणि एक दो - एक दो असे करत चालायला सुरुवातही केली. आमच्याबरोबर अनेक जण असेच चालत होते. सर्वजण रात्री कुठे कुठे अडकले होते आणि सकाळी आपल्या घराच्या ओढीने पायी चालत निघाले होते. आता पाणी बरेच ओसरले होते. मधे मधे काही भागात थोडे पाणी साठले होते. पण तेही ओसरत होते. चालत असताना आम्हाला अनेक कथा ऐकायला मिळाल्या. लोक कुठे कुठे अडकले होते. त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी रात्री प्रशासनाने अनेक शाळा उपलब्ध करून दिल्या होत्या. आजूबाजूच्या रहिवाशांनी त्यांना चहा, पाणी, खाणे पुरवले. अगदी एखाद्या कुटुंबातल्या व्यक्तीसारखी त्यांची काळजी घेतली गेली होती. आताही रस्त्याने चालताना आजूबाजूला अनेक जण पाणी, चहा, बिस्किटे, सरबत, वडापाव घेऊन उभे होते आणि चालणाऱ्या माणसांना हातात आणून देत होते. आग्रहाने खाऊ घालत होते. काळजी करू नका. लवकर घरी पोहोचाल. असा धीरही देत होते. त्या लोकांमध्ये सर्व जाती-धर्मांचे लोक होते. जातीधर्मांच्या भिंती माणुसकी पुढे कोसळून पडल्या होत्या. माणुसकीच्या त्या दर्शनाने आमच्या डोळ्यात पाणी आले. थोडे पुढे गेल्यावर आम्हाला एक व्यक्ती भेटली. त्यांची दहा-बारा वर्षांची मुलगी रात्री शाळेत अडकली होती. तिला घेण्यासाठी ते त्यांची कार घेऊन आले होते. त्यांनी आम्हाला त्यांच्या गाडीतून घाटकोपर पर्यंत सोडतो असे सांगितले. आम्हाला बरे वाटले. आम्ही त्यांच्या गाडीतून घाटकोपर स्टेशन पर्यंत आलो. आता पुढे काय? असा विचार करत असतानाच उद्घोषणा झाली की लोकल सेवा हळूहळू पूर्ववत होत आहे आणि ठाण्यासाठी एक लोकल लवकरच स्टेशनमध्ये येत आहे. आणि खरंच! पाच मिनिटात एक लोकल स्टेशनमध्ये आली. आम्ही चढलो आणि अर्ध्या तासात ठाण्याला आलो सुद्धा! तिथून रिक्षा करून मी घरी आले. अशा तऱ्हेने 23 तारखेला दुपारी तीन वाजता सुरू झालेला माझा प्रवास मजल दरमजल करत 24 तारखेला सकाळी बारा वाजता संपला हे जेमतेम 35- 40 किलोमीटर अंतर कापायला मला जवळजवळ 21 तास लागले. प्रवासाची कुठलीही साधने वापरायचे आम्ही सोडले नाही. टेम्पो, ट्रक, बस, लोकल, कार, रिक्षा एवढेच काय पायी सुद्धा चाललो. पण हा प्रवासाचा अनुभव आम्हाला समृद्ध करून गेला. अजूनही माणुसकी जिवंत आहे याचा प्रत्यय आला. एक व्यक्ती म्हणून तसेच एक स्त्री म्हणून कुठेही जराही वाईट अनुभव आला नाही. उलट या संकटकाळी असंख्य अनोळखी मदतीचे हात पुढे आले. आपल्या टेम्पोतून आम्हाला भायखळाच्या ऑफिसमध्ये नेणारे अनोळखी लोक, आमच्यासाठी चहा बिस्किटांची व्यवस्था करणारे आणि आम्हाला जेवण देता येत नाही म्हणून वाईट वाटून घेणारे त्या कंपनीचे मालक, आमच्यासाठी निरनिराळ्या हॉटेल्समध्ये, दुकानांमध्ये जाऊन काहीतरी खायला मिळते का हे बघणारे पुरुष आम्हाला भेटले. बस बंद पडली आहे हे बघितल्यानंतर आम्हाला स्वतःच्या ट्रक मधून पुढे घेऊन येणारा ट्रक ड्रायव्हर, काहीही ओळख नसताना स्वतःच्या कारमधून आम्हाला घाटकोपर पर्यंत सोडणारे दादा, पायी चालत असताना आम्हाला चहापाणी आणि खायला देणारे असंख्य अनोळखी हात……या व्यक्ती आम्हाला पूर्वी कधीही भेटल्या नव्हत्या आणि त्यानंतरही कधीही भेटल्या नाहीत. त्यांचे नाव गावही मला माहित नाही. परंतु त्यांनी केलेली मदत मात्र कायमची स्मरणात राहील. या साऱ्यांच्या रूपात परमेश्वरच आम्हाला पावलोपावली मदत करत होता हे निश्चित. "जेथे जातो तेथे तू माझा सांगाती" या संत तुकारामांच्या उक्तीची आठवण यावी असेच हे सर्व घडले. अहो, प्रवासाने आपले अनुभवविश्व समृद्ध होते असे म्हणतात. पण हा प्रवास करण्यासाठी कुठे लांबवर जावे असे थोडेच आहे? अगदी रोजच्या प्रवासात मुंबई ते ठाणे एवढ्याशा अंतरामध्ये मला हा समृद्ध करणारा जीवनानुभव मिळाला. माणसाच्या चांगुलपणावरचा तसेच परमेश्वराच्या अस्तित्वावरचा विश्वास दृढ करणारे काही प्रसंग आपल्या आयुष्यात घडतात. हा प्रवास म्हणजे तसाच एक प्रसंग होता हे निश्चित!
