पहिल्या प्रेमाची दुसरी गोष्ट...
पहिल्या प्रेमाची दुसरी गोष्ट...
प्रेमात असलेल्या व प्रेमात पडण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येकासाठी...
अर्पण पत्रिका
प्रेम, राग, द्वेष, हास्य..
दगड, माती, वाळू, रेती..
पाला पाचोळा, फळ, फुलं..
लिंबू, कोथिंबीर, मिरची..
तू, ती, ते.. असो..
या सर्वांना समर्पित..
—
सारांश
ही कथा पुर्णत: काल्पनिक असून, हिचा कोणत्याही घटनेशी अथवा वास्तवाशी काही संबंध नाही, तसा आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा..
तसंही अशा गोष्टी योगायोगानेच जुळतात..
—
आयुष्याच्या प्रवासात खूप गोष्टी घडतात, सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत अनेकजण भेटतात..
खूप जण आपल्याजवळ येतात आणि दुरावतातही आणि सोबत असतात त्या फक्त आणि फक्त आठवणी..
ही गोष्ट आहे माझ्या प्रेमाची, सदैव सोबत असल्याची जाणीव करून देणारी... पाहताच क्षणी कोणीतरी पटकन आवडणं म्हणजे आकर्षण, आकर्षणाचं रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात.. तर प्रेमाचं रूपांतर श्रद्धेत झालं की त्या प्रेमाचं नातं कायमस्वरूपी टिकणार असतं. Phone हा त्यांच्यामधील महत्वाचा दुवा बनला. प्रत्येकाचं स्वतःवर प्रचंड प्रेम असतं. पण मी यावर विश्वास ठेवत नाही किंवा माझे विचार वेगळे आहेत. कारण ती माझ्या आयुष्यात आल्यावर तिने मला दाखवून दिलं की मी चुकीचा आहे. कारण माझ्यापेक्षाही जास्त प्रेम तिने माझ्यावर केलं. तिचा मंजुळ आवाज ऐकू येईल आणि तो टिपण्यासाठी माझे कान आसुसलेले होते. अगदी हळुवारपणे श्वास घेत होतो, जणू प्रत्येक श्वासाआधी तिचीच आठवण काढत होतो.
चार महिन्यांपूर्वी..
नेहमीचंच ऑफिस, नेहमीचीच कामं करत होतो.. कुठून तरी ओळखीच्या आवाजाचा सुगावा लागतो तशी माझी नजर भिरभिरली आणि तिच्यावर गेली. नवीन चेहरा दिसला, म्हणजे माझ्यासाठी काही नवीन नव्हतं. ऑफिससाठी हे नवीन होतं.. अर्थात तिचा पहिला दिवस होता.. ते म्हणतात ना गाठी स्वर्गातच बांधलेल्या असतात.. आज मला पुन्हा स्वर्ग दिसू लागला होता.. आजचा दिवसच काही और होता. तिच्या नवीन मैत्रिणींबरोबर बोलण्यात एवढी हरवली होती की तिला मी पाहतोय हे कदाचित तिला दिसत नसावं, कदाचित असं फक्त मला वाटत असेल..
तिला बघून.. पुन्हा कॉलेज कट्टा आठवला.. चारोळ्यांची मैफिल आठवली.. आणि अचानक मनात..
"भिडे काजळ हे नयनी त्या..
रंग रूप आज सजले..
पाहून चंद्र तिच्याच मैफिलीत..
हृदयाचे ठोकेच चुकले.."
स्वतःला सावरलं आणि मागे फिरकलो..
"अरे थांब..!" निघत असताना तिने हाक मारली आणि हसून विचारले,
"तुला जायचं आहे का पुढे.. sorry मी मधेच उभे राहिले.."
"नाही नाही नाही नाही.." माझ्या तोंडून एवढंच निघू शकलं..
मला अजूनही नाही कळालं की असं का व्हावं माझ्याकडून.. नेमकं ज्या व्यक्तीशी खूप बोलावंसं वाटतं तिच्याच समोर आपण मुके का होऊन जातो? हे मुकेपणाचं ढोंग असतं की आजार.. की आजही तसंच होतंय जसं पहिल्या वेळेला तिला पाहिल्यावर झालं होतं..
आणि आठवल्या त्या मैफिली..
आम्ही सगळे मित्र कॉलेज कॅम्पसमध्ये कविता करण्यात फेमस होतो.. अर्थात त्या वेळेचं गॅदरिंग काव्यमय करण्यात आमचाच हात होता.. कट्ट्यावर बसलो की चालू व्हायच्या त्या मैफिली.. ऐन पावसाळ्याचे ते दिवस. त्यादिवशीच अशीच चारोळी ऐकवत होतो..
"प्रेमाच्या त्या ढगांनी..
आज तुझ्यावरच बरसावं.."
पुढे काही सुचेनासच झालं.. समोर दिसणारी ती फक्त स्पष्ट दिसत होती.. अचानक आलेल्या पावसाने डोक्यावर रुमाल घेऊन धावत आडोसा शोधणारी तिच दिसत होती.. मी भारावून गेलो होतो.. सगळीकडे जणू धुकं आणि आम्ही दोघेच त्या थेंबांचा आस्वाद घेतोय असं वाटत होतं.. अचानक मित्राच्या हाकेने भानावर आलो.. "अरे ऐकवतोय ना पुढे..?"
मग जे आपसूक निघालं ते तिच्याकडे पाहूनच..
"प्रेमाच्या त्या ढगांनी..
आज तुझ्यावरच बरसावं..
आणि त्याचवेळी मी नेमकं..
तुझ्यासोबत भिजावं.."
बाजूने टाळ्यांचा आणि वरून ढगांचा गडगडाट एकाचवेळी झाला.. सगळे आता मोठा पाऊस येणार यावर चर्चा करयाला लागले.. माझं मन मात्र बेभान सुटलेल्या वाऱ्यासोबत तिच्याकडेच जात होतं.. कोण होती ती..? कोणाला विचारावं तर ती चर्चा धो धो पावसाप्रमाणे पूर्ण कॉलेजभर झाली असती.. कोण असेल ती, हा प्रश्न उत्तराशिवाय मनातच राहिला.. त्यानंतर पावसाळा आणि चारोळी चालूच होत्या.. यानंतरच्या चारोळ्यात तीच डोकावत होती.. ते कॉलेजचं लास्ट इयर होतं..
पावसाळा निघून गेला होता.. मी तिला अजूनही माझ्या मनातलं सांगू शकत नव्हतो.. त्यानंतर हिवाळाही निघून गेला, परीक्षेसोबत गर्मीचे दिवस चालू झाले होते.. अभ्यास करता करता कित्येकदा तिला बघावंसं वाटायचं पण जबाबदारीने ते टाळलं जात होतं.. शेवटचा पेपर आणि आता भेटायचं हा पक्का निर्णय केला होता.. ते पेपरचे दोन तास खूप धडकी भरली होती.. परीक्षेच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर बिनचूक येत होती, तरीही भीती होती ती मनात पडलेल्या प्रश्नांची, तिला भेटण्याची.. आणि शेवटी बेल वाजलीच.. मी तडक पेपर देऊन कट्टा न गाठता गेटवर गेलो.. सगळे बाहेर पडत होते.. कोणी कसा पेपर लिहिला कोणाचं काय उत्तर आलं यावरच सगळ्यांचं बोलणं चालू होतं.. माझा पेपर खरंतर आता सुरु झाला होता.. गेटवरून बाहेर जाण्याची गर्दी हळूहळू संपत चालली होती.. मी मात्र अपेक्षेने तिची वाटत पाहत होतो.. नजर इकडे तिकडे फिरवली.. इतक्यात अचानक मागून मुलीच्या आवाजात हाक आली..
"अरे तू इथे काय करतोय, सगळे कट्ट्यावर बसलेत.. फिरायला जायचं प्लॅनिंग करतायत.. मी सुद्धा आज त्याला प्रपोझ करणार आहे हे फुल जरा पकडशील..?"
असं म्हणत तिने ते फुल मला दिलं आणि ती शू लेस बांधायला खाली बसली.. मला जिची अपेक्षा होती ती काही आलीच नव्हती उलट मला दुसऱ्याच बागेतली फुल सांभाळावी लागत होती..
आमच्याच ग्रुपमधली मैत्रीण होती ती.. तिचे सूतसुद्धा आज जुळणार होते.. मीच काय तो वर्षभर होतो तसा राहणार होतो.. वाटलं हिला विचारावं तिच्याबद्दल, पण पुन्हा तेच ठरण्याआधी हे लोक अक्षता टाकून मोकळे होतील.. ती सुद्धा लेस बांधून झाल्यावर निघून गेली.. मी मात्र अजूनही तिची वाट बघत होतो.. ती काही आलीच नाही.. कायमचीच..
"मावळतीचा सूर्य पाहून,
खूप काही जाणवलं..
तिच्या नावाचाच चंद्र आहे,
हे त्याक्षणी उमगलं.."
- To Be Continued..