पहिल्या नजरेतलं अपूर्ण प्रेम
पहिल्या नजरेतलं अपूर्ण प्रेम
आज आईने पुन्हा एकदा लग्नाचा विषय काढला "खुप सुंदर मुलीचं स्थळ आलयं. आता तरी हो म्हण. नाकारण्यासारखे मुलीत काही नाही, शिकलेली तर आहेच तसेच तुला शोभेल अशी आहे. मला तर आवडली, आता तू लवकर निर्णय घे. किती दिवस अजूनही तुझा लग्नाला नकार आहे? नीट विचार कर, हा फोटो इथे टेबलावर ठेवतेय बघून घे." फोटो व बायोडेटा ठेवून आई निघून गेली.
अन मी भूतकाळात हरवलो. का मी त्या दिवशी तिथे गेलो? तिला बघताच क्षणी तिच्या प्रेमात पडलो. माझ पहिलं प्रेम... नंदिनी...!
**भूतकाळ
त्या दिवशी कॉलेजच्या स्नेहसंमेलनासाठी मुख्य अतिथी म्हणून गेलो होतो. प्रिन्सिपल सरांच्या आग्रहाखातर अतिशय महत्वाची मिटींग पुढे ढकलून गेलेलो. जायला जरा उशीर झालेला म्हणून कार्यक्रम माझ्या पोहोचण्याआधीच चालू करण्यास सांगितले होते. परफॉर्मन्स चालू असताना मी घाईत आत प्रवेश केला.
कार्यक्रम सुरू झाला होता, एक परफॉर्मन्सही झाला होता आणि निवेदकाने पुढच्या परफॉर्मन्सची घोषणा केली. आपला ड्रेस सावरत स्टेजवर तिच्या येण्याने तिच्या पायात असलेल्या पैंजणांचा मंद मंद आवाज येऊ लागला, हळूहळू ती स्टेजवर आली. पायात बांधलेल्या घुंगरांचा आवाज संपूर्ण हॉलभर फिरत होता. स्पॉट लाईट तिच्यावर पडली अन मोबाईलमध्ये बघत असताना तिच्या घुंगरांच्या आवाजाच्या दिशेने मी वर पाहिले अन एकटक पाहतच राहिलो. अतिशय छान रितीने नटून ती समोर आली होती. नाकात नथ, केसात माळलेला गजरा, मृगनयनी डोळे, त्यात भरलेले काजळ, गुलाबाच्या पाकळीसारखे नाजुक ओठ, त्या नाजुक ओठांवर लावलेली गुलाबी रंगाची लाली, मनमोहक असे तिचे रूप, डान्स करतानाचे तिचे नयनरम्य हावभाव पाहण्यात मी हरवून गेलो होतो. मग्न होवून, भान हरपून ती नाचत होती.
टाळ्यांचा आवाज ऐकून मी शुद्धीवर आलो, पाहिले तर तिचा डान्स परफॉर्मन्स संपला होता. अजून काही दोन चार परफॉर्मन्स झाले पण माझं त्यांच्याकडे लक्षच नव्हते. कधी कार्यक्रम संपेल अन तिला पुन्हा भेटू असंं झाले होते. बक्षीस वितरण चालू झाले. डान्ससाठी तिला प्रथम पुरस्कार मिळाल्याची घोषणा झाली आणि ती स्टेजवर आली. तिला बघताच माझ्या चेहर्यावर हसू उमटले. आत्ता तिला जरा जवळुन पाहिले. परफॉर्मन्सची खास वेशभूषा बदलून साधासा ड्रेस घालून आली होती, त्यातही तिची नितळ गोरी कांती सुंदर दिसत होती.
बक्षीस घेताना तिचा, "थँक यु सर" असे बोलतानाचा मनमोहक आवाज कानी पडला आणि तोही खूप मधुर वाटला. तेव्हाच तिला बाजूला घेऊन तिच्याविषयी सर्व विचारावे वाटले पण तसे करता नाही आले. ती बक्षीस घेऊन निघूनही गेली आणि मी बक्षीस घेताना तिच्या हाताचा माझ्या हाताला झालेला ओझरता स्पर्श, तिचं बोलणं ह्या विचारात हरवलो. कार्यक्रम आटोपल्यावर तिला भेटायला धावतच बाहेर गेलो पण ती तिच्या मैत्रिणीसोबत निघून गेली होती. धूसर होत जाणार्या तिच्या पाठमोर्या आकृतीकडे बघत हताश झालो. प्रिन्सिपल सरांकडे नंतर नक्कीच तिच्याविषयी काही माहिती मिळेल, हा विचार करत मी खुश होवुन घरी जाण्यासाठी निघालो. संपूर्ण रस्त्यात घरी पोहचेपर्यंत सर्वस्वी तिचेच विचार डोक्यात होते. तिचं दिसणं, बोलणं, डान्स, मनमोहक अदाकारी बघून कधी तिची पुन्हा भेट होईल असे बरेच विचार डोक्यात चालू होते. कधी कोणात अडकायचे नाही असा विचार करायचो, हजारो मुली आसपास फिरल्या तरी प्रेम काय असते हे मला माहित नव्हते अश्या हर्षवर्धन कपूरला तिने मोहित केले होते.
तिचे नाव ओठांवर आले, नंदिनी! माझी नंदूss तिच्या विचारात आनंदी होतो, एकटाच हसत होतो.
रेडिओवर माझ्या मनस्थितीला साजेसं गाणं लागलं होतं, ते ऐकतच घरी आलो. घरी पोहोचायला उशीर होणार असल्याचे आईला आधीच कळवल्याने आई झोपली होती. एकदा आईच्या खोली जवळ जावुन आईला बघुन स्वत:च्या रुमकडे निघून आलो. फ्रेश होऊन नंदिनीच्या विचारातच माझी उशिरा झोप लागली.
सकाळी लवकरच उठून मी रोजच्या नित्य कामात व्यस्त झालो पण तेव्हाच मला नंदिनीची आठवण आली. नंदिनी विषयी काही माहिती मिळावी म्हणून मी माझ्या माणसांना कामाला लावले आणि पुन्हा माझ्या रुटीन कामांना लागलो. काहीच वेळात एक मिटिंग संपवून घाईत केबिनमध्ये आलो, कारण माझ्या माणसांनी नंदिनीची सगळी माहिती काढून माझ्या टेबलवर ठेवली होती.
आत येऊन टेबलावर असलेला लिफाफा उघडला आणि आतील मजकूर वाचून मला धक्का बसला कारण नंदिनीचे लग्न झाले होते. असं कसं शक्य आहे? असा विचार करून मी अजून काही कागद तपासले तर त्यात तिचा आणि तिच्या नवऱ्याचा फोटोही होता. लग्नाआधी तिची घरची परिस्थिती एवढी ठीक नव्हती, आई आजारी असायची, त्या गेल्यावर नंदिनी एकटी या जगात कशी राहणार? बाहेरचे जग खराब आहे, एकटी मुलगी खुली तिजोरी असते. "तुझ्या मामाच्या मुलासोबत लग्न करून मामाची सुन हो" आईने जाताना तिच्याकडून वचन घेतले होते. जास्त विचार न करता नंदिनी आईसाठी लग्नाला तयार झाली. तसेही मामा तिचा लाडका होता, त्यांचा मुलगा रवी सुद्धा स्वभावाने छान आणि दिसायलाही देखणा होता अन तिलाही आवडतच होता पण लग्न तिला शिक्षण पूर्ण करूनच करायचे होते. आईची गंभीर परिस्थिती बघून मामांनी बहीणीची शेवटीची इच्छा पूर्ण करायचे ठरवलं आणि घाईघाईने लग्न रितीरिवाजानुसार पार पडलं. तिच्या आईने आपल्या मुलीला नवरीच्या रूपात पाहिले. ती आता आपल्याच भावाकडे सुखरूप असेल, तिला काही त्रास होणार नाही म्हणून निश्चित होत त्यांनी प्राण सोडले. थोड्या दिवसानंतर रवीने नंदिनीला पुन्हा ऍडमिशन करवून दिले. नंदिनी तिचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी कॉलेजला येऊ लागली.
कार्यक्रम होता म्हणून त्या दिवशी तिच्या गळ्यात मंगळसुत्र नव्हते. सर्व माहिती वाचून माझ्या डोळयात कधी पाणी आले मला समजलेच नाही. पहिल्यांदा मला हवी तशी मुलगी नंदिनीच्या रूपात मिळाली होती पण ती माझी कधीच होणार नव्हती.
**वर्तमानकाळ
आज आईने लग्नाचा विषय काढला आणि पुन्हा जुन्या जखमेवरून खपली निघाली. जखम नव्हतीच तसे बघायला गेले तर, एका दिवसाचे माझे एकतर्फी प्रेम होते ते. आता आईचे बोलणेही बरोबरच आहे, मी तिचा एकुलता एक मुलगा आहे, माझ्या लग्नाची किती स्वप्न असतील ह्या विचारात मला अस्वस्थ वाटू लागलं.
शेवटी मी शांतता मिळवण्यासाठी माझ्या आवडत्या ठिकाणी निघालो.. समुद्र! अशी जागा जिथे बसून मी नंदिनीला आठवायचो.
सुर्य मावळतीला आला होता. लाटांचा खळखळाट सोडला तर बाकी वातावरण शांत होते. तिथेच किनाऱ्यावर बसून पुन्हा तो लिफाफा उघडला आणि नंदिनीचा फोटो पाहू लागलो.
"नंदिनी तू माझ्या आयुष्यात नकळत आली आणि पाहताच क्षणी नजरेतुन हृदयात घर करून गेलीस.
किती निरागस भाव होते तुझे, तुझ्यामुळे मला प्रेमाची अनुभूती झाली. तू माझं पहिलं प्रेम पण ते तुझ्यासमोर व्यक्तही करता आले नाही. तू जर माझी होणारच नव्हती तर मग का देवाने तुला माझ्या आयुष्यात आणले?"
आज खुप रडलो पण शेवटचं कारण मला झालेलं प्रेम माझं नाही झालं तरी ती मात्र तिच्या आयुष्यात आनंदी असावी हेच महत्वाचे आहे. असेही प्रेम म्हणजेच त्याग, समर्पण व आपल्या प्रेमाच्या आनंदात आपला आनंद मानून जगणं.
पहिल्या नजरेतलं माझं पहिलं प्रेम जरी माझं झालं नसलं तरीही मी खुश राहणार. आईसाठी असे भूतकाळात अडकून राहणे योग्य नाही. नंदिनीच्या सर्व आठवणी मनाच्या कोपर्यात कायमच्या दडवून आयुष्यात पुढे जावेच लागेल. पहिले प्रेम अपूर्ण राहिले म्हणुन दुःख होत असले तरी नवीन सुरुवात करून आपल्या आयुष्यात येणार्या व्यक्तीला स्विकारून आनंदाने जगेल.

