STORYMIRROR

Triveni Sable

Romance Inspirational

3  

Triveni Sable

Romance Inspirational

फॅनगर्ल

फॅनगर्ल

12 mins
230

"ह्या वर्षीचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळत आहे अश्या अभिनेत्याला ज्याने त्यांच्या कारकिर्दीत यशाच्या शिखरावर स्वतःची जागा कायम ठेवली तरीही आपले पाय जमिनीवरच रोवून ठेवले आहेत. अपयश आले तरी त्याला मागे सारून पुन्हा नव्याने चालत राहिले आणि यश संपादन करत राहिले. मेहनत केली कि फळ मिळते हे सरांच्या कारकिर्दीकडे बघून कळत. कधीही आपल्या कारकिर्दीला तिळायेवढाही डाग लागू दिला नाही. सोबतच आपल्या सहकार्यांना नेहमीच आपुलकीने प्रेमाने वागणूक दिली मग ती सहअभिनेत्री असो की चित्रीकरणादरम्यान असणारे त्यांचे मदतनीस! त्यांनी प्रत्येकाला सांभाळून घेतलं असे सगळ्यांचे लाडके अभिनेते श्री. सारंग देवधर. मी श्री सारंग देवधर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं आणि हा सन्मान स्वीकारावा. कृपया सगळ्यांनी त्यांच्याप्रति असलेलं प्रेम टाळ्यांच्या गडगडाटाने व्यक्त करा" निवेदकाने असे सांगितल्यावर सारंग उभा राहिला तसे पूर्ण सभागृह फक्त टाळ्या आणि सारंग ह्यांच्या नावाच्या जल्लोशाने भरले.


टाळ्यांच्या गडगडाटच्या आवाजाने आणि प्रेक्षकांचं प्रेम बघून त्यांना काही आठवलं "सारंग भविष्यात तुम्ही जेव्हा केव्हा पुरस्कार घ्याल तेव्हा पूर्ण सभागृह टाळ्यांनी गजबजलेलं असेल आणि तो क्षण सगळ्यात अविस्मरणीय असेल."


सारंग गालात हसतच प्रेक्षकांकडे बघत कमरेत वाकून त्यांना नमस्कार करुन व्यासपीठावर आले.


व्यासपीठावर उभ्या असलेल्या मान्यवरांचे आशीर्वाद घेऊन सारंगने मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. टाळ्यांचा आवाज काही केल्या थांबत नव्हता, त्यांना काही क्षण काय बोलाव कसं व्यक्त व्हावं काहीच कळेना ते पूर्णपणे भावनाशून्य झाले. ते कितीतरी वेळ त्या हातातील पुरस्काराकडे बघत राहिले.


"सारंग देवधर.. सारंग देवधर.." प्रेक्षकांचा आवाज आला तसा तो भानावर आला.


"तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद! तुमच्याशिवाय हे सगळं अपूर्णच आहे. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद नसते तरं माझ्याकडून हे झालंच नसतं आणि आज एका खास व्यक्तीचेही आभार मानायचे आहेत. माझ्या आयुष्यातील अशी व्यक्ती ती जर माझ्या आयुष्यात नसती तरं, तुम्ही म्हटल्याप्रमाणे (निवेदकाकडे बघत) मी जमिनीवर पाय ठेवून राहिलोच नसतो, कुठेतरी बसलो असतो, समजून जा (तो हसतच म्हणाला, तसं पूर्ण सभागृहात हास्याची खसखस पिकली). प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते आणि माझ्या यशाचे श्रेयही फक्त माझ्या फॅनगर्ललाच जाते. तिच्या प्रेमामुळे आणि तिच्या सोबतीमुळे मी आज इथं आहे.. आणि हो हा जो बाजूला उभा आहे ना माझा निर्माता त्याचेही खुप खुप आभार. परत एकदा तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद! तुमचे प्रेम असेच राहुद्या" येवढ बोलून सारंग देवधर खाली आले पण सभागृहात अजूनही टाळ्या वाजतच होत्या.


समारंभ संपला सगळ्यांनी त्याचे अभिनंदन केले आणि आपआपल्या मार्गाने घरी निघाले. सारंगने त्यांची फोर्ड गाडी आणली होती, त्यात बसून ते घरी निघाले. मागच्या सीटवर बसून समाधानाने डोळे मिटले अन ते भूतकाळात हरवले.


साधारण वीसवर्षांपूर्वी..


"सारंग एक मॅनेजर ठेव रे, जो तुझं सगळं काम बघेल. मला नाही जमत रे तुझं ऑफिस आणि तुझ्या चित्रीकरणाच्या वेळा सांभाळणं" प्रतिक साने जो सारंगचा मित्र होता, तो आलिशान अश्या पलंगावर झोपलेल्या सारंगला आवाज देत म्हणाला.


"मला कुणी प्रोफेशनल मॅनेजर नको, जो मला मशीन बनवेल, साधा कुणी ठेव" सारंगने आळस देत येवढंच उत्तर दिलं.


"बरं मी निघतो आणि जमलं तरं ऑफिसला ये थोडं काम आहे आणि हो तुझे खूप सारे पत्र आले आहेत तुझ्या चाहत्यांनी पाठवले आहेत ते वाचून घे" प्रतिकने सारंगला सांगितलं आणि तो ऑफिसला निघून गेला. 


सारंग उठून त्याच आवरून बसला होता, आज कुठे चित्रीकरण नव्हतं म्हणून तो निवांत होता. मागील तीन महिन्यांपासून बिना सुट्टी घेता तो प्रतिकच्या मदतीने एकट्याचा सगळा दिनक्रम बघत होता. हातात कॉफ़ीचा कप घेऊन तिथल्या टेबलवर असलेली पत्र त्याने चाळली.


थोड्यावेळाने सारंग त्याच्या ऑफिसला पोहोचला प्रतिकला आवाज देणार तरं त्याच्या केबिनमध्ये एक गुलाबी रंगाचा पंजाबी सूट घातलेली, छान लांब केसांची हलकीशी वेणी आणि त्यावर अबोलीच्या फुलांचा गजरा घातलेली मुलगी खुर्चीवर बसली होती. तिचे डोळे झाकलेलं होते, एका हातात कागद आणि दुसऱ्या हातात पेन्सिल होती. ती कसला तरी विचार करतच बडबड करत होती. सारंग तिच्या ओठांची हालचाल टिपत हळूच तिच्या समोरच्या खुर्चीवर जाऊन बसला आणि तिला पाहतच राहिला. उभ्या चेहऱ्याची सावळ्या रंगाची, रेखीव भुवयांची, ओठांना लिपस्टिक नव्हती ना दुसरा काही मेकअप तरीही ती सुंदर दिसत होती. तो तिला पाहतच राहिला. तिला काहीतरी आठवलं तसे तिने तिचे डोळे उघडले तर समोर सारंगला बघून घाबरली, पण तिने तसं दाखवलं नाही.


त्या मुलीने सारंगला मारण्यासाठी टेबलवर असलेली फाईल उचलली, "ओ मिस्टर तुम्ही असे कसे विनापरवानगी आत आलात? ही प्रतिकसरांची केबिन आहे तुम्ही निघा इथून" ती आवाज वाढवून म्हणाली पण सारंग तर तसाच तिच्याकडे एकटक पाहत राहिला. 


मीरा सारंगला मारायला फाईल उचलणार तोच "अगं मीरा थांब काय करते?" प्रतिकचा आवाज आला तशी ती थांबली.


"सर हे गृहस्थ इथे अचानक येऊन बसले आणि काहीच बोलत नाहीत, ही तुमची केबिन आहे ना मग कुणालाही मी कस बसू देऊ?" मीरा थोडं घाबरून म्हणाली. तिच्या अश्या बोलण्यावर प्रतिक आणि सारंग दोघांनीही एकमेकांना हसतच टाळी दिली, मीराचा मात्र गोंधळ उडाला होता.


"अगं मीरा ही केबिन माझी नाही. ज्याची केबिन आहे तू त्यालाच मारतेय, हा माझा मित्र, सुप्रसिद्ध अभिनेता सारंग देवधर आणि हे जे ऑफिस आहे ना हे त्याचेच आहे, त्याला चित्रपटातून वेळ मिळत नाही म्हणून मीं सांभाळत आहे" प्रतिक मीराला म्हणाला.


"ओह सॉरी सर मला माहित नव्हतं" मीरा थोडं ओशाळुन म्हणाली.


"असू द्या, तुम्ही सिनेमा नाही का पाहत?" सारंगने विचारलं 


"नाही सर, मला विशेष आवड नाही" मीरा म्हणाली. 


"प्रतिक, तू माझी ओळख करून दिलीस पण ह्यांची ओळख नाही सांगितलीस?" सारंगने टेबलच्या कोपऱ्यावर बसत विचारलं. 


"अरे ही मीरा देसाई, माझी असिस्टंट खूप छान काम सांभाळते. नवीनच आहे म्हणजे दोन महिने झाले आहेत. हीच सगळं काम एकदम नीट टापटीप असतं" प्रतिक मीराची तारीफ करत म्हणाला.


"धन्यवाद सर" मीरा गालात हसतच म्हणाली.


"मग एक काम कर हिला आजपासून माझी असिस्टंट बनव, मला खरचं गरज आहे एका असिस्टंटची असं तू म्हणाला होतास ना मग हिलाच बनव माझी असिस्टंट, मिस मीरा तुम्ही कुठे राहता?" सारंगने विचारलं.


"मी प्रभादेवीला राहते." मीराने सांगितलं 


"अरे वाह मस्तच मी शिवाजी पार्कमध्ये म्हणजे तुम्हाला जवळच आहे. तुम्ही उद्या सकाळी प्रतिकसोबत घरी या. तो सुरुवातीला तुम्हाला नक्की काय काम करायचं सांगेल नंतर तुम्ही छान मॅनेज कराल ह्याची खात्री आहे" सारंग बोलला, प्रतिकला काही बोलता येत नव्हते कारण हे सारंगचेच तर ऑफिस होते.


"ठिक आहे, प्रतिक सर म्हणतील तसं?" मीरा म्हणाली


"माझीही काही हरकत नाही. तू सकाळी आठ वाजता सिद्धिविनायक मंदिराजवळ भेट. मी तुला याच्या घरी घेऊन जातो. पण जरा सांभाळून, हा खुप आळशी माणूस आहे, सगळं हातात द्यावं लागेल आणि ह्याच्याकडून काम करवून घ्यावी लागतील तुला" प्रतिक हसतच म्हणाला.


सारंगने एक रागीट कटाक्ष टाकताच "अरे गंम्मत करत होतो तू काय चिडतो?" प्रतिक सारवा सारव करत म्हणाला.


"चला मी निघतोय, प्रतिक हिला वेळापत्रक सांग नीट आणि पगार पण वाढवून दे" सारंग येवढ बोलून निघून गेला.


मीराला घराच्या जवळ आणि पगार वाढवून मिळणार होता म्हणून ती ही हे काम करायला तैयार झाली.


मीरा ऑफिस सुटल्यावर तिची महत्वाची काम संपवून घरी गेली.


दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे मीरा आणि प्रतिक सारंगच्या घरी पोहोचले तर सारंग झोपला होता. मीरा खालीच हॉलमध्ये थांबली होती.


"उठा साहेब आज शूटिंगला जायचं आहे" प्रतिकने त्याच्या अंगावरील ब्लॅंकेट ओढत म्हणलं.


"चल उठ दहा वाजताची शिफ्ट आहे गोरेगाव फिल्मसिटीमध्ये आणि नंतर सहा वाजता एका दुकानाच्या उदघाटन सोहळ्याला जायचं आहे." प्रतिकने सारंगला त्याचा आजचा दिनक्रम सांगितला आणि सारंग घड्याळ बघून उठून ब्रश करायला गेला.


"आणि आता मीरा आली आहे तुझं सगळं काम सांभाळायला तरं ती सांगेल तसं कर. तसंही तिला तुझ्यावर ओरडायची, तुला दम देण्याची पूर्ण परवानगी मी दिली आहे" प्रतिक हसतच म्हणाला तसं सारंगने कोलगेटचा डबा त्याला फेकून मारला, प्रतिक सावधच होता म्हणून सारंगचा निशाणा चुकला.


"आणि अजून एक ती खुप डेंजर आहे, त्यादिवशी सावंतकाकांना खुप ओरडली कारण काय तरं ते त्यांचं काम सोडून इतरांशी गप्पा मारत बसले होते आणि पण तिच्या कर्तव्यदक्षतेमुळे हातातील एक टेंडर आणि ऑर्डर जाता जाता राहीली" प्रतिकने तिची कामाबद्दल असलेली तिची निष्ठा सांगितली.


तिथे टेबलवर काही पत्र आणि बऱ्याच गोष्टीं पडल्या होत्या, प्रतिकने जाऊन त्या उचलून पहिल्या.


"काल आले का तिचे पत्र?" प्रतिकने उत्साहात विचारले 


"नाही! ही जुनीच आहेत ती परत वाचतोय तिच्या आठवणीत. कुठे असेल रे ती?" सारंग थोडा नाराज होत म्हणाला.


"ती ना तुझ्या हृदयात आहे?" प्रतिक त्याला चिडवत म्हणाला तसं सारंगने प्रतिकच्या पोटात एक बुक्का मारला.


"आई ग लागलं ना?" प्रतिक कळवळत म्हणाला तसा सारंग जोरात हसला.


"तुला कळलं का हे कुठून पाठवत आहे ते? म्हणजे कोण आहे तिचं नाव गाव वैगरे काही" प्रतिकने विचारलं.


"नाही ना, मी पोस्टात जाऊन चौकशी केली पण दरवेळी वेगवेगळ्या ठिकाणाहून ती पत्र पोस्टात टाकते. फक्त एवढं समजलं ती इथलीच म्हणजे मुंबईची आहे कारण सगळी पत्र मुंबईच्या आवरातूनच आलेली आहे आणि ती माझ्यावर नजर ठेवून आहे, तिला माझ्या बारीक हालचाली माहित आहेत" तिथलं एक पत्र हातात घेत सारंग म्हणाला.


"ओह.. तरं ही मुलगी एक जासूस आहे" प्रतिक त्याला चिडवत म्हणाला


"प्रतिक तुला माहित आहे, मी माझ्या आयुष्यात कशाचीच एवढी वाट पाहिली नसेल जेवढी मी दर आठवड्याला तिच्या पत्रांची पाहतो, पण एक महिना झाला ती पत्रच पाठवतं नाहीये. खुप अस्वस्थ वाटतं आहे रे मला. का कोण जाने तिच्याविषयी ओढ वाढत चालली आहे? कधी एकदा ती समोर येते आणि मी तिला पाहतोय असं झालंय" सारंग तिच्या पत्राकडे एकटक पाहत म्हणाला.


"ओ...हो.. साहेब प्रेमात पडले आहेत तरं तिच्या?" प्रतिकने त्याला चिडवलं.


"काय माहित पण ती कशी असेल रे? माझ्या सारख्या बिघडलेल्या दारूच्या मागे लागलेल्या माणसाला तिने पुन्हा माणसात आणून जगायला शिकवलं. एका चित्रपटाच्या अपयशाने खचलो होतो, त्यात प्रेमातही हरलो होतो. पण तिच्या येणाऱ्या पत्रांना वाचून मी पुन्हा जगू लागलो आणि त्यानंतर मी हरलोच नाही, आज जे काही आहे ते फक्त तिच्यामुळे आहे. ती कशी असेल कोण असेल काही माहित नाही तरीही ती आजूबाजूला असल्याचा भास मला होतो. मी तर तिच्याबरोबर कल्पनेच्या जगात वावरू लागलोय हल्ली. माझी फॅनगर्ल कधी माझ्यासमोर येईल रे?" सारंग उठून त्याच्या बाल्कनीतल्या त्या गुलाबाच्या रोपाकडे बघत हसतच बोलला, तिने पत्रात म्हणलं होतं फुलांना पाहुन टवटवीत वाटते म्हणून त्यानेही वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे घराभोवती सजवली होती आणि तितक्यात दरवाजावर थाप पडली, दोघांनीही आवाजाच्या दिशेने पाहिलं तरं समोर मीरा उभी होती.


सफेद रंगाचा चुडीदार, सप्तरंगी बांगड्या, लाल रंगाची छोटी टिकली आणि लांब केसांत आज चाफ्याचं फुल होतं, सारंग तरं भान हरपून तिला पाहत राहिला.


पुन्हा थाप पडली तसा तो भानावर आला "सर उशीर होत आहे ना? तुम्ही म्हणाला होता दहा वाजताची शिफ्ट आहे, आता साडे आठ वाजलेत" मीराने आठवण करुन दिली.


"अरे हो तू थांब खाली. मी आलोच आवरून" सारंग मीराला म्हणाला.


"प्रतिक येवढ उचलून माझ्या बॅगेत ठेव" सारंग प्रतिकला सूचना देऊन अंघोळीला निघून गेला.


प्रतिक खाली आला त्याने मीराला सारंगचा पूर्ण दिनक्रम सांगितला सोबत त्याच्या खाण्यापिण्याच्या वेळा सगळं सांगितलं. सारंगला दारू आणि सिगारेटच व्यसन होत. पण तो कामाच्यावेळी आणि कुणी महिला सोबत असेल तर तो व्यसन करत नाही हेही सांगितलं.


प्रतिक मीराशी बोलून निघून गेला, सारंग येईपर्यंत मीरा त्याचं घर पाहत होती. एक दुमजली बंगला होता पण घरात फक्त तो एकटाच राहायचा. त्याचे आईवडील कोकणात रहायचे, त्यांना शहरी वातावरण अजिबात सहन व्हायचं नाही त्यामुळे त्यांनी तिथेच राहणे पसंद केले.


मीरा भिंतीवर असलेला त्याचा नवीन फोटो पाहत होती, त्याच्याकडे सगळं होतं पण तरीही त्याच्या डोळयात एकटेपणा वाटला, नंतर बाजूला एका हातात एक करंडक घेतलेला फोटो पहिला.


"तो मी कॉलेजमध्ये असताना अभिनयात प्रथम पारितोषिक मिळालेलं तेव्हाचा फोटो आहे" सारंग मागून येत म्हणाला.


"गुडमॉर्निंग सर, खुप छान फोटो आहेत" मीरा म्हणाली.


"थँक यू, काही खायचं असेल तरं काकांना सांगत जा ते देतील बनवून" सारंग सोफ्यावर बसत म्हणाला.


"धन्यवाद.. नक्कीच सांगत जाईल" मीरा म्हणाली आणि ती पण त्याच्या समोरच्या सोफ्यावर बसली.


तिथे जेवण बनवणाऱ्या काकांनी त्याला कॉफ़ीचा कप हातात दिला.


"काका मी निघतोय आता, जेवणाचा डबा दुपारी पाठवून दया" सारंग काकांना म्हणाला.


"बाबा काहीतरी खाऊन घ्या अस उपाशी पोटी नका जावू. एकतर रात्री पण जेवला नाहीत, अस नका करू" ते काका म्हणाले.


"काका भूक नाही" सारंग म्हणाला 


"अस कसं जमेल बाबा, अस उपाशी राहून काही होत नाही मी आलोच पोहे केलेत ते तुम्ही खाऊन जावा" काका सांगून स्वयंपाकघरात गेले.


"काका.." सारंग आवाज देत होता पण काका तोपर्यंत आत गेले होते.


"सर! काका बरोबर बोलत आहेत अस उपाशी पोटी राहू नये, अश्याने लक्ष्मी रुसते" मीरा हे बोलली आणि त्याला पत्रातील फॅनगर्लच वाक्य आठवलं. "उपाशी राहील की आपली चिडचिड होते आणि घरातील चिडचिडपणामुळे घरातील शांती कमी होते आणि लक्ष्मी रुसते"


एक महिना झाला त्या मुलीची पत्र आली नाही म्हणून तो थोडा नाराज झाला होता त्यामुळे त्याच कशात मन लागत नव्हतं. दोघांच्या आग्रहामुळे त्याने नाश्ता केला आणि चित्रीकरणासाठी निघून गेला.


असेच काही महिने निघून गेले, मीरा सारंगच काम छान सांभाळत होती. सारंग त्याच्या अभिनयाने सगळ्यांचं मन जिंकत होता त्याने वर्षभरात केलेले दोनीही चित्रपट यशस्वी ठरले होते. एवढं यश समोर असतानाही त्याला नेहमी ती आठवायची पण तिच्या पर्यत पोहचण्याचा काहीच मार्ग मिळत नव्हता. 


ड्रायव्हरने घरी पोहचल्याचं म्हणलं आणि तो भानावर आला. आज वीस वर्षे उलटली होती त्या घटनेला तरीही तो काळ अजूनही तसाच आठवत होता.


आपल्या ब्लेझरचे बटन सैल करत तो आत आला.


"मिसेस देवधर! कुठे आहात तुम्ही?" त्याने हॉल मधूनच आवाज दिला. 


"मला कशाला आवाज देताय? तुम्हाला तर आजही तुमची फॅनगर्ल आठवतेय ना? तिच्याकडेच जायचं." मिसेस देवधर नाक मुरडत म्हणाल्या.


"मीरा अजूनही तू तिच्यावर जळतेस?" सारंगने हसत म्हणलं आणि ती गालात हसली.


"मग कोणती बायको आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात दुसरी स्त्री खपवून घेईल?" मीरा


"आणि ती दुसरी स्त्रीही खुद्द तीच असेल तर?" त्याने भुवया उंचावुन म्हणलं आणि ती हसु लागली.


"मी बायको बनुन तुमच्यावर एवढं प्रेम केलं तरी तुम्हाला फॅनगर्लच का आवडते?" मीरा


"कारण तू माझी असिस्टंट आणि नंतर बायको झालीस. पण माझ्या आयुष्यात तर तू फॅनगर्ल बनुन आधीच आली होतीस. माझं पहिलं प्रेम आहे फॅनगर्ल!" त्याने तिच्या डोक्यावर टपली मारत म्हणलं आणि दोघेही हसतच पुन्हा भुतकाळात हरवले.


भुतकाळात


सारंग आपलं आयुष्य तर जगत होता पण असा एकही दिवस नव्हता जेव्हा त्याला फॅनगर्लची आठवण येत नव्हती. मीरानेही त्याच्या आयुष्यात एक खास जागा घेतली होती पण प्रेम फक्त फॅनगर्लवर जडले होते. अश्यातच मीराने एक दिवस त्याच्यासमोर राजीनामा ठेवला. 


"मीरा, तू काम का सोडतेय?" सारंग


"बाबांनी, गावी मामाच्या मुलासोबत लग्न जमवलंय" तिने डोळ्यातलं पाणी पुसत म्हणलं.


"अग मग रडतेय का? ही तर चांगली गोष्ट आहे ना?" सारंग


"तुम्हाला नाही समजणार" तिने मान खाली घालून म्हणलं आणि त्याच्याकडे एक नजर टाकून ती जाऊ लागली. आज तिची नजर खूप वेगळी वाटली त्याला जणू काही सांगू पाहत होती पण त्याला ते समजत नव्हतं. ती रडत रडतच बाहेर पडली, त्याला समजेना तिला नक्की कशाचं एवढं दुःख झालंय?


त्याने तिच्या राजीनाम्यावर सहज नजर टाकली आणि त्याला धक्का बसला. त्याने पळतच जावुन आपल्या कपाटातली फॅनगर्लची सगळी पत्र बाहेर काढली. तो प्रत्येक पत्र उघडून पाहत होता आणि सगळ्या पत्रातल अक्षर हे राजीनाम्यावर लिहिलेल्या अक्षराशी जुळत होतं.


"मीराsss माझी फॅनगर्ल!" आनंदाने तो खालीच बसला. का नेहमी पत्रात लिहिलेले वाक्य आणि मीराने बोललेलं सारखं वाटायचं, का नेहमी मीराच्या केसात फुल असायचं त्याच्या लक्षात आलं आणि तो धावतच बाहेर आला.


मीरा निघून गेली होती. त्याने आपली गाडी काढली आणि तिला शोधायला बाहेर पडला. आज त्याची फॅनगर्ल सापडली होती, आता तो तिला सहज जाऊ देणार नव्हता. तिला सांगायचं होतं किती प्रेम करतो आपण तिच्यावर म्हणून तो तिला वेड्यागत शोधत होता. अखेरीस ती त्याच्या घराजवळ असलेल्या एका पार्कमध्ये बाकड्यावर बसून रडताना दिसली आणि तो गाडीतून उतरून धावतच तिच्या जवळ गेला.


"फॅनगर्ल" तो इतकंच म्हणाला आणि तिने मान वर करून पाहिलं. त्याच्या डोळ्यातही पाणी होतं. 


"तूच माझी फॅनगर्ल आहे ना?" त्याने विचारलं आणि तिने होकारात मान हलवली. पुढच्याच क्षणी ती त्याच्या मिठीत होती.


"आय लव यु... खूप प्रेम करतो तुझ्यावर" तो तिला मिठीत घेऊन बडबडत होता आणि ती हातपाय गोठल्या प्रमाणे स्तब्ध झाली होती.


"फॅनगर्ल, तू कायम माझ्याजवळ होतीस तर का नाही मला तुझी ओळख सांगितली?" तिला थोडं दूर करत त्याने विचारलं पण ती मात्र फक्त रडत होती.


लोक जमू लागले, गर्दी वाढू लागली म्हणून तो तिला घेऊन घरी परत आला. 


"मीरा! मला सगळं जाणून घ्यायचं आहे" सारंग


"मी एकदा तुम्हाला टीव्हीवर पाहिलं आणि तुमच्या अभिनयाच्या प्रेमात पडले, पण एकदा पेपरमध्ये तुम्ही कसे दारूच्या आहारी गेले आहे हे वाचलं. तुमच्या पर्यत पोहचण्याचा एकच मार्ग होता ते म्हणजे पत्र म्हणून मग तुम्हाला पत्र लिहिलं. ते तुमच्या पर्यत पोहचत होते की नाही माहीत नाही पण मी पत्र लिहिणे थांबवलं नाही आणि सहा एक महिन्यात तुमच्यात फरक दिसून आला. हळूहळू मी सतत तुमचा विचार करू लागले होते, तुमची पेपरमध्ये आलेली कात्रण, फोटो मी जपून ठेवली आहेत, टीव्हीला तुमचे सगळे चित्रपट पाहिले. मी प्रेमात पडले होते तुमच्या पण तुम्ही आणि मी कधीच एकत्र होऊ शकत नाही हेही मला माहित होतं. 


काही महिन्यापूर्वी बाबांना हार्ट अटॅक आला आणि माझ्यावर घराची जबाबदारी आली. कल्पनेतून वास्तविकतेत येऊन मी नोकरी करू लागले, तुम्हाला पत्र पाठवणेही बंद केले आणि अचानक तुम्ही समोर आला. कधी याचा विचारही केला नव्हता म्हणून तुम्ही समोर होता तरी मी तुम्हाला ओळखले नाही. पण नंतर माझ्या तोंडुन सत्य बाहेर पडेल म्हणून मी तुमचे चित्रपट पाहत नाही म्हणलं.


तुमच्यापासून दूर जायचा विचार करत होते पण नशिबाने अजून जवळ आले. इतक्या जवळ येऊन माझ्या मनात तुमच्या बद्दल असलेल्या भावना लपवणे शक्य होत नव्हते मला. पण तुम्ही माझ्या सारख्या मुलीला का म्हणून स्वीकाराल विचार करून कधी सांगताच आलं नाही मनातलं आणि त्यादिवशी तुमच्या आईवडिलांच्या तोंडुन तुमच्या लग्नाबद्दल ऐकलं आणि मला ते सहन झालं नाही" ती एवढ बोलून शांत झाली.


"वेडी आहेस तू.. आज मी जे काही आहे ते फक्त तुझ्यामुळे आहे. लग्न करशील माझ्यासोबत?" त्याने विचारलं आणि तिने होकारात मान हलवली.


***


मम्मा प्रतिक अंकल नवीन फिल्म डायरेक्ट करत आहेत आणि त्यात ते लीड रोल मला देणार म्हणाले आणि फिल्मचं नाव काय आहे माहितीये का? "फॅनगर्ल" अनन्या दोघांची मुलगी आत येत ओरडली तसे दोघेही हसु लागले.


समाप्त



Rate this content
Log in

More marathi story from Triveni Sable

Similar marathi story from Romance