नवरी नटली
नवरी नटली
" आम्ही कुठे हुंडा मागतोय ? लग्न नीट करून द्या एवढीपण अपेक्षा करू नये का आता मुलाकडच्यांनी?" विराजच्या वडिलांनी सानिकाच्या वडिलांना विचारलं .
विराज आणि सानिका दोघेही इंजिनिअर , कमवणारे . प्रॉपर कांदेपोह्यांचा कार्यक्रम पार पडला . सगळ्याच गोष्टी पूरक असल्याने नाही म्हणायचा तसा प्रश्न नव्हता .
विराज आणि सानिका भेटले तेव्हा सानिकाने स्पष्ट केलं , " मी तुझ्याएवढं शिकलेली आणि कमावती आहे , हुंड्याचा तर प्रश्नच येत नाही पण लग्नाचा खर्च पण अर्धा अर्धा करायचा ही तयारी असेल तर पुढे जाऊ.... " विराजला वाटलं त्यात काय एवढं ? त्याने घरी निरोप दिला .
आज फॉर्मल बोलणी करायला आणि पुढचं ठरवायला सगळे एकत्र जमले होते . तेव्हा विराजच्या आईने तुम्ही हे कार्यालय बुक करा , तमुक केटरर्स ना ऑर्डर द्या असं सुरू केल्यावर सानिकाच्या लक्षात आलं की ह्याचा अर्थ सगळं कार्य तुम्ही करा असं म्हणणं आहे ह्यांचं , मग तीच म्हणाली " हो, आपण दोन्ही घरचे अर्धा अर्धा खर्च उचलणार आहोत तर दोघांच्या सहमतीनेच सगळं ठरवू , नाही का ? "
विराजच्या वडिलांना वाटत होतं , मुली म्हणतातच असं काही , आई वडील समजुतदार असतात तेव्हा हुंडा नाही तर कार्य तर नक्कीच करून देतील म्हणून त्यांनी सानिकाच्या वडिलांकडे मोर्चा वळवला होता .
सानिकाचे बाबा म्हणाले , " तिची तशी अट आहे , तिने फार काही मुलाबद्दल अपेक्षा ठेवल्या नाहीत , शहरातील , विभक्त कुटुंब , स्वतःचा बंगला किंवा गाडी वैगेरे ती काही मागत नाही मग ही माफक अपेक्षा पूर्ण करणारा नवरा शोधून देणं आणि तिच्या अपेक्षेला मान देणं आम्ही कर्तव्य समजतो..."
" असं कुठे असतं का पण ? मान्य आहे मुलगी शिकलेली , नोकरी करणारी आहे म्हणून हुंडा नको पण हे लग्नाचा खर्च पण निम्मा हे अती होतंय.... " विराजची आई म्हणाली . " मुलगा मुलगी पसंत आहेत एकमेकांना , कशाला अडून बसायचं ? काही एखाद दुसरा दागिना घालू आम्ही extra "
" अच्छा , काकु हा काय भाजीचा भाव आहे का ? कमी जास्त करायला ? बरं मग मी पण एक ऑफर देते , लग्नाचा सगळा खर्च आम्ही करतो , थोडा हुंडाही देतो पण ....... लग्न झाल्यानंतरही माझा पूर्ण पगार मी माहेरी देणार , चालेल ? " सानिकानेच सडेतोड उत्तर दिलं ,नाही ऑफर दिली .
" असं कुठे असतं का ? आम्ही काही जुन्या विचारसरणीचे नाही . सणावाराला कौतुक कर , लागलं सवरलं मदत कर , पण पूर्ण पगार कसा माहेरी देणार ? " विराजच्या आईचे उत्तर . विराजला सानिकाच्या मागणीची पूर्ण कल्पना होती म्हणून तो मात्र शांत होता .
" हा कोणता व्यवहार ? मला शिकवण्यासाठी पोटाला चिमटा काढून आई वडिलांनी पैसे बाजूला टाकले ते मी बघितलेच आहे, आता पै पै करून साठवलेला बँक बॅलन्स लाखोंने माझ्या लग्नात उधळायचा आणि शिवाय गरज पडल्यासच त्यांना मी मदत करायची, असं का ? मला माहित आहे माझ्या संसाराला मला पैसे लागणार त्यामुळे मी उठसुठ मदत त्यांना करणारच नाही. तुझं माझं करण्याचा प्रश्न नाही पण त्यांनी जमवलेली म्हातारपणाची पुंजी माझ्या लग्नावर त्यांनी खर्च करावी आणि मग माझ्याकडे त्यांच्या आजारपणात किंवा कुठल्या टूरसाठी जायला पैसे मागावे हे काही पटत नाही कारण ते मागण्यापेक्षा मग ती गोष्ट ते कॅन्सल करतील . हा प्रस्ताव नुसती सोय नसून ह्यातून मुलाकडच्या लोकांची विचारसरणी सुद्धा मला कळून येते . बोला मग एकतर लग्नाचा खर्च निम्मा निम्मा करा किंवा लग्नानंतर त्यांनी लग्नात जेवढा खर्च केलाय तेवढा खर्च भरून निघेपर्यंत तरी मी पूर्ण पगार माहेरी देणार नाहीतर रजिस्टर लग्न करू, आहे कबूल ? " सानिकाची रणरागिणी झाली होती .
थोडी आवडलेली सानिका विराजला आता खूप आवडली, मी फक्त सानिकाशीच लग्न करेल , पुढचं काय ते तुम्ही ठरवा असं सांगून त्याने सानिकाला सपोर्ट केला .
विराजच्या आई वडिलांना दोन दिवसांचा वेळ घेऊन सांगा असं म्हणून विराज सानिका हनिमूनचे प्लॅनिंग करायला निघून गेले .
लग्नावर आईवडिलांचा होणारा वारेमाप खर्च ह्या खटकणाऱ्या गोष्टीवरचा सानिकाचा तोडगा कसा वाटला मग तुम्हाला ?
