पैसा झाला मोठा, पाऊस झाला खोटा
पैसा झाला मोठा, पाऊस झाला खोटा
'सक्षम' संस्थेच्या कमला ताईंना महिला दिनी 'राष्ट्रभूषण' पुरस्कार जाहीर झाला आणि एकच जल्लोष झाला.
तिथल्या महिलांनी कमला ताईंना औक्षण केले. त्यांची सेक्रेटरी म्हणाली, "ताई, आम्हाला सगळ्यांनाच उत्सुकता आहे तुमचा प्रवास जाणून घेण्याची. ह्या संस्थेची निर्मिती करावी असं का वाटलं तुम्हाला?"
तिचा प्रश्न ऐकताच कमलाताई ४० वर्षं भूतकाळात गेल्या. " ह्याला कारण किंवा निमित्त म्हणूया, आहे पाऊस....वादळी पाऊस ! मी तेव्हा होते सोळा-सतरा वर्षांची, तारुण्यात नुकतंच पाऊल ठेवलेली. दिसायला साधारणच होते. पावसाळ्याचे दिवस होते पण म्हणावा तसा मुसळधार पाऊस अजुन पडला नव्हता, नुसती तुरळक रिमझिम...त्यामुळे आम्ही सारे चिंतेत होतो.
शेतावरलं काम संपवून मी आणि आई घरी निघालो. आईला म्हंटलं, तू हो पुढं, मी पुष्पाला भेटून येते. कॉलेज सुरू झालं होतं पण फी साठी पैसे नसल्याने ह्यावर्षी पासून शिक्षण बंद करायचं असं ठरलं होतं घरी. मला ते नको होतं, म्हणूनच पुष्पाला भेटून शिष्यवृत्ती बद्दल माहिती मिळवायची होती मला कारण ती दुसऱ्या दिवशी तालुक्याला जाणार होती. पाऊस वादळाची चिन्ह दिसतात, लवकर ये म्हणून आईने सांगितलं. मैत्रिणीला भेटून झपझप चालत निघाले... अंधारून आलेलं, ढग कडकड वाजत होते आणि अचानक सोसाट्याचा वारा सुरू झाला, मी घाबरले. वीज चमकली, मुसळधार पाऊस सुरू झाला, रस्त्यातले दिवे गेले, मला काही उमजेना. एक झोपडी दिसली, आत शिरले. कोणीच नव्हतं, थोडा वेळ इथेच थांबून पाऊस कमी झाला की जाऊ असा विचार केला. तुफान पाऊस सुरू झाला पण मी सुरक्षित होते.
अचानक चारचाकी गाडी थांबण्याचा आवाज आला. गावातल्या खासदारांचा पोरगा, रोहित गाडीतून उतरून झोपडीत आला. मला बघून म्हणाला, 'कमले, तू हितं काय करती गं? माही गाडी चालं ना, गारा पडायल्यात, म्होरं काही दिसं ना म्हून थांबलो तर तू हितं, फसलीस की आता! ' म्हणत त्याने घाणेरडे हावभाव केले. माझ्या अंगावर त्याची किळसवाणी नजर फिरली आणि मला संकटाची चाहूल लागली. मी निसटायचा प्रयत्न केला पण मला ते जमलं नाही. बाहेरच्या पावसात कुणाला माझा आक्रोश ऐकू गेला नाही आणि त्याने मला लुटलं. काही वेळात वादळ , पाऊस कमी झाल्यावर तो निघून गेला पण मी वादळाने बहरलेलं झाड उन्मळून पडावं तशी मी कोलमडून पडले होते.
शुद्धीवर आल्यावर घरी येऊन आई वडिलांना सांगितलं, तर ते म्हणाले, गप बसायचं आता ! कुणाला काही म्हणलं तर तुझं लग्न नाही व्हायचं. मी म्हंटलं, आपण पोलिसात जाऊ, ते नाही म्हणाले, खासदाराचं पोरगं, गावात कोण राहू दिल का आपल्याला? पण मी ऐकलं नाही... सरळ पोलीस स्टेशनात गेले...
पोलीस तक्रार घेई ना. त्यांनी रोहितच्या घरी निरोप धाडला, त्याचे वडील आले, येताना माझ्या वडिलांना घेऊन.... 'तेरी भी चूप, मेरी भी चूप' करायचं, पैसे देतो ते गप गुमान घ्यायचे नाहीतर तुझ्या कुटुंबाचं काही खरं नाही म्हणाले. बाबांनी समजावलं मला, सोडून दे, विषय मिटवून टाक म्हणून पण कसं सोडून द्यायचं? असे कितीतरी रोहित तयार करायला? अशा कितीतरी कमला जगून मरायला? त्या दिवशी 'पैसा झाला मोठा आणि पाऊस ठरला होता खोटा....' मी ठरवलं होतं, मागे हटायचं नाही...! बाहेर पडणाऱ्या पावसाबरोबर माझंही मन कोसळत होतं आणि मी तडक, एवढ्या पावसात तालुक्याच्या गावाला येऊन तक्रार नोंदवली. माझी आणि रोहितची तपासणी झाली. केस क्लिअर कट होती.
घरच्यांनी, माझ्या माणसांनी संबंध तोडले. मला खूप धमक्या रोज मिळत होत्या, पूर्ण गावाने गावाचं नाव खराब होऊ नये म्हणून केस मागे घेण्यासाठी दबाव टाकला, कोर्ट-कचेऱ्या ह्यात माझा सगळा वेळ जात होता मग रोहितने लग्न करण्याचीही तयारी दाखवली. मी कशालाच जुमानत नाही म्हणल्यावर मला जीवे मारण्याचाही प्रयत्न झाला पण मी खंबीर होते, माझ्या आयुष्यात आलेलं वादळ दुसऱ्या मुलींच्या आयुष्यात येऊ नये म्हणून रोहितला शिक्षा देण्याचा माझा निर्णय पक्का होता. माझ्या नशिबाने एक पोलीस इन्स्पेक्टर माझ्या बाजूने होते. त्यांच्यावरही हल्ला झाला, निलंबनाची कारवाई झाली पण तरीही ते माझ्या पाठीशी उभे राहिले. वेळप्रसंगी उपाशी राहून, कोर्टात पायी जाऊनही मी माझ्या न्यायासाठी झगडत होते. आमच्या प्रयत्नांना यश आलं आणि झुंज देऊन मी रोहितला शिक्षा घडवलीच.
ह्या सगळ्यात माझी दोन तीन वर्ष गेली, कॉलेज, मैत्रिणी, घर सुटलं. वादळी पावसात झालेलं नुकसान नंतर दिसून येतं तसं माझं झालं. पण मी हरले नव्हते तर नवीन ध्यासाने झपाटले होते. मी माझा गाव सोडून शहरात आले, धुणं भांडी करत कॉलेज शिकले. येणारा प्रत्येक पाऊस मला अस्वस्थ करायचा, काहीतरी केलं पाहिजे हे पक्के ठरले होते म्हणूनच शिकत असताना वेगवेगळ्या NGO शी ओळख वाढवत गेले. लग्न मला करायचंच नव्हतं पण माझं लक्ष्य मला गाठायचं होतं. काही वर्षे नोकरी केल्यावर, थोडे पैसे जमल्यावर साधारण वीस वर्षांपूर्वी मी सुधाला आपलंसं केलं, हो, सक्षम संस्थेची सर्वेसर्वा, सुधा, तीही एक बलात्कारिता!
जीव द्यायला निघालेल्या सुधाला मी माझी कहाणी सांगितली. आपण लढा देऊ हा आत्मविश्वास दिला. एका खोलीत सुरू झालेला आमचा संसार हळूहळू वाढत गेला. 'ज्योत से ज्योत लगाते चलो' ह्या उक्तीप्रमाणे आम्ही आमच्यासारख्या पीडित महिलांना आमच्याबरोबर, आमच्या परिवारात सामील तर करूनच घेत होतो शिवाय त्यांना नराधमाला अटक करण्यात, शिक्षा देण्यातही त्यांची मदत करत होतो. ह्या कामात आम्हाला खूप अडथळे आले, आर्थिक चणचण तर होतीच शिवाय राजकीय दबाव, सामाजिक नकार आणि मानसिक अशांतता ह्या सगळ्याला तोंड देत धैयाच्या मातीत रोवलेलं न्यायाचं बीज हळूहळू फोफावू लागलं.
ह्यातूनच 'सक्षम' च्या वटवृक्षाची निर्मिती झाली. आज इथल्या तुम्ही सगळ्या महिला ह्या शारीरिक अत्याचार सहन करून इथे आलेल्या आहात पण त्यापेक्षा महत्वाचं आहे तो अत्याचार करणाऱ्यांना आपण प्रत्येकीने धडा शिकवला आहे. हा लढा इथून पुढेही असाच चालू राहील जोवर प्रत्येक स्त्री सक्षम होत नाही तोवर....!
काही वादळं पेल्यातली असतात, लगेच शमणारी पण माझ्या आयुष्यात आलेलं वादळ मला घडवून गेलं...!
'ते वादळ त्याला गारवा देऊन गेलं...
पण माझ्या मनात मात्र सुडाचा वणवा पेटवून गेलं...!'
आपली सक्षम संस्था कोणत्याही वादळाला न डगमगता मुळं घट्ट रोवून उभी रहाणार आहे. कितीतरी महिला अजुनही लज्जेस्तव, घाबरून, गरिबीमुळे अन्यायाविरुद्ध वाचा फोडत नाहीत, मला वचन द्या, तुम्ही सगळ्या त्या प्रत्येक स्त्रीची ढाल बनाल...!"
कमला ताईंचे प्रेरणादायी शब्द ऐकून सक्षम मधील साऱ्याच महिला निःशब्द झाल्या......!
लेख आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा आणि फॉलो पण नक्की करा..... धन्यवाद
