STORYMIRROR

Shilpa Joshi

Others

3  

Shilpa Joshi

Others

पण मला काही त्रासच नाही ना....

पण मला काही त्रासच नाही ना....

3 mins
207

"स्मिता , बरं झालं तू आलीस आज इथे गार्डनमध्ये. अगं , चाळीशी उलटून गेली तरी तू रुटीन चेक अपसाठी स्त्री रोग तज्ज्ञाकडे अजुन जात नाहीस म्हणून आमचे हे खूपच मागे लागलेत . तुला फोनच करणार होते मी आज . " सरला , नर्स असलेल्या स्मिताला म्हणाली .


  " हो , बरोबर बोलतात की मग ते . उद्या येतेस माझ्याबरोबर दवाखान्यात? येतांना ये कॅब करून. " स्मिता म्हणाली .


 " छे , छे, काहीतरीच काय , हे उगाच घाबरतात, विशेषतः कॅन्सरला . आता कम्पनीच्या मार्फत दरवर्षी ब्लड टेस्ट होतात , तीन चार वर्षांपूर्वी सोनोग्राफी पण केली होती मी . गेले असते स्त्री रोग तज्ज्ञाकडे पण मला काही त्रासच नाही ना , मग कशाला जाऊ ? मला बाई लाज वाटते. हे बघ , कॅन्सर असला तर काहीतरी त्रास होईलच ना ? " सरला मात्र ठाम होती .


" तुला स्क्रिनिंग टेस्ट ( screening tests ) म्हणजे काय माहित आहे का ? " स्मिताने विचारलं.


" अं , म्हणजे ते कॅन्सरचं निदान करण्यासाठी असतात असं काहीतरी आहे म्हणे पण तेच ना , मला काही त्रासच नाही ना..... " सरला आपलं पालुपद सोडत नव्हती.


" बरं असू दे. माझ्या दोन प्रश्नांची उत्तरं दे , समजा, तू अशा सोसायटीत राहतेस जिथे कधीतरी दोन तीन महिन्यातून एकदा पण सांगू शकत नाही कधी, पाणी जातं तर तू काय करशील ? "


" माहित नसेल कधी पाणी जाणार ते तर निदान माठ आणि सांडायला एक बादली पाणी भरून ठेवणारच गं मी ! सगळ्याजणी हेच करणार आणि " सरला ने उत्तर दिलं.


" बरोबर , समजा, अशा सोसायटीत राहतेस जिथे आठवड्यातून न सांगता तीन चार वेळा पाणी जाणार, मग काय करणार ? " स्मिताने दुसरा प्रश्न विचारला.


" अरे देवा, मग थोडं जादा म्हणजे माठाबरोबर पिंप आणि एखादी टाकी भरावी लागेल , तरच भागेल. पण हे काय नवीनच ? " सरला बुचकळ्यात पडली होती.


 " तर , सखे , घरात कॅन्सर असा , न सांगता कधीतरी येतो, पहिल्या सोसायटीसारखा. त्यावेळी स्क्रिनिंग टेस्ट ह्या माठासारख्या कमीतकमी तरी कराव्या. थोडक्यात , लक्षणे नसली तरी सामान्य ,कोणताही त्रास नसलेल्या स्त्रियांमध्ये कॅन्सर असल्यास तो पटकन लक्षात यावा म्हणून स्क्रिनिंग टेस्टस असतात. लक्षणे येऊन मग निदान होइपर्यंत तो पुढच्या स्टेजला जातो , कळलं का? " स्मिताने विचारलं.


 " अच्छा , म्हणजे सगळ्यांनीच स्क्रिनिंग टेस्टस कराव्या. पण मग ते दुसरं उदाहरण का दिलंस? "


" हं , ज्यांच्या घरात कॅन्सरची history आहे किंवा कॅन्सर होण्यासाठी त्या धोक्याच्या यादीत आहेत म्हणजे उदा. अतिस्थूलपणा , एका पेक्षा अधिक व्यक्तींशी लैंगिक संबंध असणे , मुलबाळ नसणे इत्यादी त्यांना जास्त टेस्टस कराव्या लागतात जसं दुसऱ्या सोसायटीत पाणी खूप वेळा जातं म्हणून तू जास्त साठा करायचं म्हणतेस, अगदी तसंच ! दरवर्षी रक्ताच्या तपासण्या होतात त्या पूर्ण वेगळ्या असतात, त्यातून स्त्रियांच्या ह्या कॅन्सरची कल्पना येत नाही " स्मिताने समजावलं.


" अग्गो बाई , खरंच की , छान सांगितलं तू, कळलं मला. नेमक्या कोणत्या स्क्रिनिंग टेस्टस करतात बायकांमध्ये ? " सरलाने आता सकारात्मक प्रश्न विचारला. 


 " हे बघ , ते तुझ्या डॉक्टर मॅडम तुला तपासल्यावर सांगतीलच पण ढोबळ मानाने , स्तनांच्या कॅन्सरसाठी ३० वर्षानंतर स्वतः स्वतःचे स्तन तपासणे ह्याबरोबरच ४० वर्षानंतर दरवर्षी मॅमोग्राफी करावी. पिशवीच्या तोंडाच्या म्हणजेच सर्विक्स ( cervix ) कॅन्सरसाठी जगभरातून २१ व्या वर्षीपासून सांगितलंय पण भारतीय महिलांमध्ये वयाच्या ३०व्या वर्षांपासून दरवर्षी PAP smear ही तपासणी करावी, ती सलग काही वर्षे negative आली तर डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे नंतर तीन वर्षांनी केली तरी चालते. अंडाशयाच्या कॅन्सरसाठी सोनोग्राफी सांगतात पण शक्यतो high risk केसेस मध्ये. बघ , अगदी दोन तीन तपासण्या तेही वर्षातून एकदा आपलं जीवनमान सुधारू शकतात, मग का लाजायचं ? मुख्य म्हणजे हे लक्षात घ्यायचं की त्रास नसतानाच स्क्रिनिंग टेस्टस असतात, त्रास झाल्यावरच्या निदानाच्या वेगळ्या.... " स्मिताने समजावलं.


 " हो गं, किती दुर्लक्ष करतो ना आपण बायका तब्येतीकडे. आता नाही करणार मी, खरंच जाणार डॉक्टर कडे.... " सरला म्हणाली.


" सरले , उद्या तुझा वाढदिवस , माझ्या लक्षात आहे. वाढदिवशी , तू तुला स्वतः ला निरामय जीवनाची भेट दे, ह्याच नाही तर दर वाढदिवशी ! तुझा हा आदर्श आपल्या सगळ्या सोसायटीतल्या बायका घेतील आणि ही निरामयतेची एक ज्योत पुढे जाऊन अनेक ज्योती पेटवेल, हो ना ? वाढदिवसासाठी आणि समाजकल्याणाच्या कामाला तुला खूप शुभेच्छा..... "


  काय मग , तुम्ही पण देणार ना स्वतःला अनोखं birthday gift ?


Rate this content
Log in