shilpaa jadhav

Drama Tragedy

2.9  

shilpaa jadhav

Drama Tragedy

नलिनी

नलिनी

30 mins
7.0K


आज खूपच उशीर झाला ...नलिनी स्वतःशीच बोलत घाई गडबडीने निघाली होती. प्रयत्न करून देखील व्हायचा तो उशीर झालाच. तसं तिला कामाचं टेन्शन नव्हतं. कामाचा तिचा उरक फार होता. पटापट कामे हातावेगळी करण्यात ती तरबेज होती. पण टेन्शनच कारण वेगळंच होतं. उशीर झाल्यामुळे आता तिला मालकाला सामोरे जावे लागणार होते आणि तेच ती टाळायचा प्रयत्न करत असे. उशिरा आली म्हणून समजावण्याच्या निमित्ताने मालक उगाच लगट करायचा. तिच्या खांद्यावर हात ठेवायचा, डोक्यावरून हात फिरवायचा, शिरशिरी यायची तिला. वाटायचं सोडून द्यावं हे काम. पण सध्या तरी तिला दुसरा पर्याय दिसत नव्हता. म्हणून नाईलाजाने का होईना नलिनी तिथेच काम करत होती.

नलिनी...चारचौघीत उठून दिसेल अशी, गोरीगोमटी, जणू ब्राम्हणघरची वाटावी अशी. रेखीव डोळे असे जणू अथांग सागर, तिच्या डोळ्यात एक वेगळीच जादू होती. तिने नुसती नजर रोखून पाहिली तरी समोरचा अगदी गर्भगळीत होऊन जायचा, अशी धार होती तिच्या नजरेला. पण तितकेच खोल आत कुठे तरी रहस्य दडवून ठेवल्यासारखे वाटायचे. सागराची अथांगता जणू तिच्या त्या डोळ्यात सामावलेली असावी. चेहऱ्यावर नेहमी स्मितहास्य. तिच्या वागणुकीत एक प्रकारची शालिनता होती. साधारण तिशीच्या आसपास वय पण भारदस्त व्यक्तिमत्व. साधीच साडी पण स्वच्छ अन नीटनेटकी नेसलेली. लांब केसांची एक वेणी जी नेहमी खांद्याच्या एका बाजूला असायची. बोलण्यात अतिशय लाघवी. सर्वांशी आपुलकीने वागायची. तसं तिला या गावी येऊन फारफार तर सहा महिने झाले असतील पण या सहा महिन्यात तिने बरीच माणसं आपल्या स्वभावाने आपलीशी केली होती. शेजारच्या सगळ्या बाया हिला आवर्जून आपल्याकडे काही ना काही कामाकरिता बोलावीत असत. तिलाही ते समजायचे पण इलाज नव्हता. एकट्या बाईने जर समाजात सुरक्षित राहायचे असेल तर असा शेजाऱ्यांना धरूनच राहावे लागेल. या सर्वात एक जिवाभावाची मैत्रीण होती तिची आसावरी.. खरंतर असावारीनेच नलूला तिच्या सोबत या गावात आणले होते. नलूला पण तिच्या शिवाय कुणाचा आसरा नव्हता.

नलिनी अन आसावरी एकाच शाळेत शिकायला होत्या. बालपणीच्या मैत्रिणी या. अगदी जीवश्च कंठश्च अशा. सोबत खेळून शिकून मोठ्या झाल्या. नलूची आई ती लहान असतानाच वारली. त्यामुळे आसूची आई तिलादेखील आपल्या लेकीसारखीच वागवत असे. सावत्र आई त्रास देईल म्हणून नलूच्या वडिलांनी दुसरा लग्न केलं नाही. तिला फार जपायचे ते, अगदी आईच्या मायने वाढवले होते त्यांनी तिला. तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायचा नेहमी प्रयत्न करायचे तिचे बाबा. नलूची घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. वडील जे काही कमवायचे ते दोघांना पुरे पडत होते. थोडीफार शेती होती पण वडिलोपार्जित असल्यामुळे इतर काकांचा देखील त्यात वाटा होता. त्यावरून कित्येकदा भांडणे देखील झाली होती. नलूचे बाबा तसे फारच सज्जन होते. त्यामुळे त्यांनी शेतीवरील आपला हक्क सोडून दिला आणि भांडणे थांबली.

दिवस तसे आनंदात जात होते. दोघीही मोठ्या होत होत्या. आशूचं लग्न ठरलं. तिच्या आत्याच्या नात्यातला मुलगा होता. शिकलेला,सरकारी नोकरी तसेच घरची शेती होती. सगळे फार आनंदात होते पण नलू मात्र उदास होती. आपली एकुलती एक मैत्रीण आता आपल्याला सोडून जाणार या विचाराने ती फारच अस्वस्थ होती. बाबानी समजावलं तिला.."अगं..रीतच आहे बाळा तशी उद्या तू पण जाणार दुसऱ्याच्या घरी मला सोडून." "नाही हा बाबा...मी तुला सोडून कुठेच जाणार नाहीये." तोंड फुगवून नलू म्हणाली अन मग बाबा हसायला लागले." बरं बाई .. आता हे रडणं थांबव अन आशुसोबत वेळ घालावं ,जा पळ." नलूलाही ते पटले आणि असंही आशूच्या नवऱ्याचे गाव काही फार दूर नव्हते. बाबाला सांगून ती आशूला भेटायला जाऊ शकत होती. खूप मज्जा केली दोघींनी. धुमधडाक्यात लग्न झालं आशूचं. अन ती गेली आपल्या सासरी. जाताना दोघी एकमेकांना बिलगून खूप रडल्या. असं वाटत होतं पुन्हा कधी भेट होईल काय माहित. पण नियतीच्या मनात काय होते हे कुणालाच माहित नव्हते. आशु सासरी गेल्यापासून नलू उदास राहू लागली होती. पण तिने लवकरच स्वतःला सांभाळले. त्यात तिचे बाबा वरचेवर आजारी पडू लागले. डॉक्टर म्हणाले कसली तरी चिंता त्यांना सतावतेय. ते नलूला सांगायचे, बाबांची काळजी घे, त्यांना म्हणावं चिंता करू नका. बाबा मात्र हसायचे, नलूने विचारले बाबांना, "इतकी कसली हो चिंता तुम्हाला बाबा..??" "तुला नाही कळायचे ते बाळा." नलूला कळत होते बाबाला कसली चिंता आहे ते. तिचे देखील लग्नाचे वय झाले होते. तिचं लग्न याच वर्षी करायला हवं, याच चिंतेत बाबा असायचे.

एकदा बाबांना भेटायला त्यांची एक लांबची बहीण आली. बाबाला म्हणाली नलूची काळजी नको करुस, खरंतर मी त्याचसाठी आले आहे. तिच्यासाठी आपल्या नणंदेच्या मुलाचं स्थळ आणलं होता तिने. शिकलेला आहे, शहरात नोकरी करतो, घरंदाज लोक आहेत. पण बाबाने नाही म्हटलं तिला. कारण त्यांना नलू त्यांच्या नजरेसमोरच हवी होती. तिची आत्या रागाने निघून गेली.

बाबांची तब्बेत हल्ली जास्तच बिघडत चालली होती. जिवंत असेपर्यंत नलूचे लग्न व्हावे असं ते सारखं म्हणत असायचे. त्यांची ती अवस्था पाहून नलू रडत असे. त्या दिवशी तिचे काका बाबांना बघायला घरी आले. बराच वेळ दोघे बोलत होते. नलूने काकाला चहा दिला. चहा पिऊन काका निघून गेले. तिच्या बाबांच्या चेहऱ्यावर हसू पाहून नलू गोंधळून गेली होती. असं कसं झालं ?? आजपर्यंत जेव्हा पण काका यायचे वाद व्हायचा आणि आज चक्क बाबा हसत होते. तिने बाबाला विचारले.."काय झालं बाबा..?? तुम्ही हसताय का..? असं काय सांगून गेले काका ?" " तो जे पण बोलून गेलाय ते पटलंय मला. अन आता असं झोपून नही चालणार कामाला लागायला हवं मला." असे बोलून बाबा उठू लागले. नलूला काहीच समजत नव्हते अन बाबा तर सारखे हसत होते. बाबानी मग तिला सांगितले की काकाने तुझ्यासाठी स्थळ आणले आहे. मुलगा त्याच गावातला होता. नलू त्यांच्या नजरेसमोरच राहणार होती. म्हणून बाबाने लगेच होकार दिला. नलूला मात्र थोडं वाईट वाटलं. बाबांना सोडून जावे लागणार म्हणून ती जरा नाराज होती. पण मग आशूच्या लग्नाचे ते दिवस तिला आठवले. कित्ती छान दिसत होती आशु नवरीच्या वेशात. मलाही तसेच आता छान दागिने अन साडी नेसायला मिळणार. मी पण मिरवणार. सगळे कित्ती कौतुक करतील माझे. मला हवं नको ते सगळं सगळं बघतील. नलू पार हरखून गेली होती. आपल्या होणाऱ्या नवऱ्याच्या विचाराने लाजून जात होती. आपला नवरा कसा दिसत असेल..त्यांच्या घरची माणसे कशी असतील..कोण कोण असतील सासरी...आपण त्याला काय म्हणून हाक मारायची..तो आपल्याला काय म्हणेल..?? आणि ते लग्नात नाव बदलतात ..आपण नाही बदलायचं आपलं नाव ..सांगायचं मला हेच नाव आवडतं .. बाबाने दिलेलं... नलिनी.. असे हजारो प्रश्न पडू लागले होते आता नलूला..

बाबा लग्नाच्या तयारीला लागला. मुलाकडील लोक घरी येऊन बाबाला भेटून गेले. सगळी बोलणी झाली. देणं घेणं ठरलं. बाबाकडे तसं फार काही नव्हतं. थोडीफार शिल्लक आणि राहतं घर. ते त्यांनी नलूच्या नावे करून द्यायचं ठरवलं होता. घाई गडबडीत अगदी साध्या पद्धतीने नलूच लग्न झालं. आशूला बोलवायची तिची फार इच्छा होती पण तितका वेळच नाही मिळाला. आशुचे आई -बाबा आले होते लग्नाला. बाबांना म्हणत होते खूप घाई केलीत लग्नाची. एकदा आम्हाला तरी सांगायचे होते. काय म्हणून या मुलाला तुम्ही पसंत केले नलूसाठी..?? आपली नलू कुठे अन हा कुठे. बरं घरचं तरी नीट असायला हवं होतं, तर तेही नाही. तुम्ही चार लोकांकडे चौकशी तरी करायची होती मुलाबद्दल आणि त्याच्या घरच्यांबद्दल.. हे सर्व ऐकून बाबा कोसळलाच .."अरे देवा ..हे काय घडून गेले माझ्या हातून..??" त्याने काकाला बोलावून घेतले. "मला फसवलास ..वाटोळं केलंस माझ्या पोरीचं " काका बोलला, तुला वाटत तसं नाहीये. नलू सुखात राहील तिथे. काळजी नको करुस मी आहे" " आताच्या आता हे लग्न थांबवा" बाबा जोरात ओरडला पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. खूप रडले तिचे बाबा. नलूला सासरी पाठवायला तयार नव्हता. सरपंच मधे पडले आणि नलूची पाठवणी झाली. खरंतर नलूचे सासर जवळ होते. आपल्याला तिला रोजच पाहता येईल, या एका गोष्टीमुळेच बाबानी या स्थळाला होकार दिला होता. नलूची सासरी पाठवणी झाली. नलू फारच घाबरलेली होती. नक्की काय घडलं हे तिला समजलेच नाही. तसं तिला तिचा नवरा आवडला होता. उंचपुरा, रंग सावळा, व्यायामाने कमावलेलं शरीर. शिकलेला पण होता थोडाफार त्यामुळे शहरातील लोकांसारखे पॅन्ट शर्ट घालायचा. सासरचे पण तसे तिला सगळे चांगलेच वाटले. घरात सासू-सासरे , दोन नणंदा आणि लहान दीर असा परिवार होता.

नलू मोठी सून म्हणून या घरात आली. आशूची आई आली होती पाठवणी करायला. ती म्हणाली .." सगळ्यांना आपलंस करून घे, मग सगळे तुझ्याशी छान वागतील, आणि हो काहीही झालं तरी आम्ही आहोत तुझ्या पाठीशी हे विसरू नकोस. काही लागलं तर हाक मार". नलूने हळूच मान डोलावली अन त्या निघून गेल्या. त्या गेल्या गेल्या नलूची सासू आली.. "काय ग ..ती भवानी काय शिकवत होती तुला ?" नलूने घाबरत घाबरत सांगितलं त्या काय बोलल्या ते. यावर फणकाऱ्याने "आली मोठी सांगणारी" असं बोलून बाहेर निघून गेली. रात्री नलूचा नवरा सदाशिव उशिरा घरी आला, मित्रांसोबत लग्नाची पार्टी करून. तो दारू प्यायला होता खूपच घाणेरडा वास येत होता. नलूसाठी हे सगळं नवीनच होता. तिचे बाबा कधीच दारू प्यायले नाहीत आणि तसं कोणाला ते घरी देखील कधी घेऊन आले नव्हते. नलू घाबरून पलंगाच्या एका कोपऱ्याला उभी होती. सदाने तिला खसकन जवळ ओढली अन एखाद्या जनावरासारखा तिच्यावर तुटून पडला. नलूसाठी हा अनुभव खूप वेगळा होता. आशु लग्नानंतर पाच परतवण्यासाठी जेव्हा माहेरी आली होती तेव्हा तिने आपल्या बालमैत्रिणीला लग्नाच्या पहिल्या रात्रीचे छान किस्से सांगितले होते. पण इथे तर असा काहीच घडलं नव्हता. नलू रडायला लागली. सदाने फाडकन तिच्या थोबाडात मारली आणि पुन्हा तो तिला ओरबाडू लागलं. रात्रभर नलू त्याचा त्रास सहन करून थकून गेली होती. हे असा तर तिने अपेक्षिला नव्हता. किती छान स्वप्ने पहिली होती तिने या रात्रीची. पण प्रत्यक्षात मात्र वेगळंच घडलं होतं. पहाटे कधीतरी नलूचा डोळा लागला. अचानक सासूच्या आवाजाने तिला जाग आली. " ओ महाराणी..उठा आता. घरातील कामे काय तुमचा बाबा येऊन करणार आहे का??" नलू धडपडत उठली. रात्रीच्या प्रकरणाने तिचं सर्व शरीर ठणकत होतं. उठायचे त्राणच नव्हते तिच्यात. पुन्हा सासूचा आवाज आला आणि नलू कशीबशी उठून बाहेर आली. गरम गरम पाण्याने आंघोळ केल्यावर तिला जरा बरं वाटलं. सासूचं तोंड सुरूच होतं. नलू समोर चहाचा कप आदळून ती म्हणाली, "आज आयता चहा ढोस पण उद्यापासून लवकर उठून हे सगळं तूच करायचं. आता कामाला लागा जरा चहा पिऊन." चहा पिऊन नलू कामाला लागली. एकदा सासूला नीट सगळं विचारून घेतलं. काय काय आणि कसं करायचं, सगळ्यांच्या आवडी निवडी विचारून नलू स्वयंपाकाला लागली. तिचा कामाचा उरक पाहून सासू पण बघत बसली. दिवस असाच कामात निघून गेला. जसजशी रात्र होऊ लागली नलूचे काळीज धडधडू लागले. सगळ्यांची जेवणे आटपली, बाकीचे आवरून नलू घाबरत घाबरत तिच्या खोलीत गेली. सदा खुशीत होता. त्याने नलूला जवळ ओढली अन एक छानसा गजरा तिच्या केसात माळला. नवऱ्याचे ते प्रेम पाहून नलूला खूप छान वाटले. पण हा आनंद काही क्षणापुरताच राहिला. सदाने पुन्हा कालचाच कित्ता गिरवला. त्याला कसे आवरावे हे नलूला समजतच नव्हते. वाघाच्या तावडीत सापडलेल्या एका हरिणीसारखी अवस्था झाली होती तिची. नवरा असल्यामुळे ती त्याला प्रतिकारदेखील करू शकत नव्हती. रोजच असं घडत होते. सदा आज नाही तर उद्या सुधारेल याच अपेक्षेत होती नलू. दिवसभर घरकाम आणि रात्री हे असं. अगदी असह्य झालं होतं.

जवळपास पंधरा दिवस झाले असतील अन एक दिवस नलूचे बाबा तिला भेटायला आले. फार खुश झाली नलू त्यांना पाहून. तिचा बाबा या पंधरा दिवसात अजूनच खंगून गेला होता. नलूचे सासरे अन सदा बाबांसोबत बाहेरच्या पडवीत बोलत बसले होते. नलू आत चहा करत होती. अचानक बाहेरून मोठ्यामोठ्याने बोलण्याचे आवाज येऊ लागले.नलू घाबरतच बाहेर आली. तुम्ही ते घर नलूच्या नावे न करता सदाच्या नावे करा, असे तिचे सासरे बाबाना सांगत होते. पण बाबा ते ऐकायला तयार नव्हते. यावर " तुम्हाला जर आमचे ऐकायचे नसेल तर आत्ताच्या आत्ता तुमच्या मुलीला घेऊन जाऊ शकता." सदा बोलला. काय करायचे ते मी बघून घेईन असे बोलून बाबा नलूला न भेटताच निघून गेला. बाबा तडक काकांच्या घरी गेला आणि त्याला सगळं सांगितलं. "मी जिवंत असेपर्यंत ते घर मी त्यांच्या घश्यात घालणार नाही. माझ्या नलूचा तोच आधार आहे." यावर काका बोलला, "ते जर म्हणतायत तर करून टाक ना सदाच्या नावे घर. असं पण जर ते घर तू नलूच्या नावे केलंस तरी आज ना उद्या सदा ते आपल्या नावे करणारच. नलू आता त्या घरची सून आहे त्यामुळे ते जे काही बोलतील ते तिला ऐकावेच लागेल." बाबा रागारागाने तिथून बाहेर पडला. त्याला समजून चुकले की आता आपण काहीच करू शकणार नाही. नलूच्या चिंतेने बाबा पूर्णपणे ढासळला तो पुन्हा उठलाच नाही. बाबा गेल्याच जेव्हा नलूला समजले ती पार कोसळून गेली. एकच तर आधार होता तिला, देवाने तो पण तिच्या पासून हिरावून घेतला. बाबांच्या आठवणीने नलू सतत रडत होती. तिला कसलेच भान उरले नव्हते. ती एकटीच घराच्या एका कोपऱ्यात बसून असे. आशूची आई मधेमधे येऊन तिला बळेबळेच काही ना काही खायला लावायची. बाबांचे तेराव्याचे कार्य झाल्यावर सदा तिला पुन्हा घरी घेऊन आला. पुन्हा नेहमीचंच रहाटगाडा सुरु झाला. हळूहळू नलू घरकामात स्वतःला जास्तच गुरफटवून घेऊ लागली. सासूला ते बरेच होते. तिला काहीच करावे लागत नव्हते. असेच दिवस जात होते ,एक दिवशी सदा कसलेसे कागद घेऊन आला आणि त्यावर त्याने नलूला सही करायला लावली. त्यावर काय लिहिलंय हे वाचू द्या म्हणायची खोटी, सदाने तिला तुडवायला सुरुवात केली. माझ्यावर संशय घेतेस का?? थांब तुला दाखवतोच असा म्हणत तिला लाथा बुक्क्यांनी हाणू लागला. बऱ्या बोलाने सही कर नाही तर गाठ माझ्याशी आहे. नलूने घाबरून सही केली. ते तिच्या घराचे कागद होते. सदाने ते घर विकून टाकले होते. नलूचा एकमेव आधार असलेलं ते घरदेखील आता तिचं राहिलं नव्हतं.

दिवस असेच जात होते आणि अचानक ती गोड बातमी समजली. तिला दिवस गेले होते. आई होणार होती ती. येणाऱ्या बाळाच्या जाणिवेने नलूचे आयुष्यच बदलून गेले. घरचे वातावरण देखील निवळले. वंशाला दिवा देणार म्हटल्यावर तिची सासू देखील तिची काळजी घेऊ लागली. सदा पण जरा जपून वागू लागला होता. गोपाळचा जन्म झाला आणि सगळं घरच जणू नलूसाठी एक सुखस्वप्नं वाटू लागले. गोऱ्यागोमट्या, गोंडस गोपाळकडे बघून, त्याचे ते निरागस हसणे पाहून तिचा थकवा कुठच्या कुठे निघून जात असे. वंशाला दिवा दिला म्हणून सासू पण जरा खुश होत्या. तसाही आताशा नलूला कसल्याच गोष्टींचा जाच वाटेनासा झाला होता. आला दिवस ती ढकलत होती अन आता तर काय तिला जगण्याचे छान असा निम्मित मिळालं होतं. घरातली कामे अन गोपाळच करण्यात नलूचा दिवस जात होता. रात्र मात्र तशीच होती... त्रासदायक.. त्यात बदल झाला नव्हता.

गोपाळच्या बाळलिलेत नलू रमून गेली होती. दोन वर्षे कशी भुरर्कन निघून गेली. नलूला पुन्हा दिवस गेले. नाजूक चणीची अन घाऱ्या डोळ्यांची गोंडस मुलगी झाली. 'जान्हवी' असे नाव ठेवले तिचे. दरम्यान नणंदेचे अन दिराचे लग्न झाले. आता मदतीला दिराची बायको असेल आणि आपलं काम थोड्या प्रमाणात कमी होईल असा नलूला वाटले पण लग्न झाला अन दीर लगेच बायकोला घेऊन वेगळा झाला. त्याला घरची परिस्थिती माहित होती. आपल्या बायकोला त्रास नको म्हणून तो वेगळं बिऱ्हाड करून राहू लागला. नलूचा सासुरवास काही संपायला तयार नव्हता. सदा आणखीनच आक्रमक झाला होता आणि ही गोष्ट ती कुणाजवळ बोलून दाखवूही शकत नव्हती. सगळा तोंड दाबून बुक्क्याचा मार. रोज वेगवेगळ्या तऱ्हेने तो नलूला त्रास देत होता. तिने जर कधी नकार दिलाच आर तो तिला मारझोड करत असे. जीव अगदी मेटाकुटीला आला होता तिचा. अश्यातच तिला तिसरा मुलगा झाला. महेश नाव ठेवलं त्याचं.

जन्मपासूनच महेश खूप अशक्त होता. सतत आजारी पडायचा. दवाखाना, देव-देवस्की असले सगळे प्रकार सुरु होते. या सगळ्याला कारणीभूत नलूच असेच तिच्या सासू बोलत असत. खरंतर यात नलूचा काय दोष..?? लहान वयात लग्न, एका पाठोपाठ बाळंतपणे, जोडीला सदाचा त्रास अन मारझोड. ती स्वतःच कमजोर होती त्यात महेश जन्माला आला तोच आजारपण घेऊन. सगळे नलूलाच दोष देत होते. तरी नलू सर्व काही नीट सांभाळत होती. तीन मुलांचे संगोपन, सदाचा आक्रस्ताळेपणा, त्याची मारझोड, सासूची बोलणी, सगळं सगळं सहन करून नलू जगत होती ती फक्त मुलांकडे पाहून. गोपाळ पाच वर्षाचा झाला त्याला शाळेत घातलं सदाने. पाच वर्षाचा गोपाळ वयाच्या मानाने खूप समजूतदार होता. आपला बाबा आईला विनाकारण मारझोड करतो हे त्याला अजिबात नाही आवडायचे. कित्येक वेळेस नलू मार खात असताना गोपाळ तिला बिलगायचा. त्यालादेखील रट्टे बसायचे सदाचे. घरकामात तो नलूला मदत करायला यायचा. दे आई मी भांडी घासतो..ते निरागस बोलणे ऐकून नलूचा ऊर भरून यायचा.

गोपाळची शाळा सुरु झाली. तो नियमित अभ्यास करत असे आणि आपल्या लहान भावंडाना देखील सांभाळायला आईला मदत करत असे. शाळेत अभ्यासात हुशार म्हणून सगळेच शिक्षक त्याचे लाड करत असत. जान्हवीला पण त्याच शाळेत घातले. दोघे बहीण भाऊ सोबत जात येत असत. गोपाळ जानूला सांभाळून घरी आणत असे. त्याचा खूप जीव होता आपल्या बहिणीवर. अभ्यासात दोघेही हुशार होते. दिवस जात होते. महेश देखील आता शाळेत जाऊ लागला होता. महेश तसा गोपाळ आणि जानूच्या मानाने अभ्यासात कमीच होता पण सदाचा मात्र तो आवडता होता. बाबा बाबा करत सतत त्याच्या मागे पुढे करायचा महेश. गोपाळ आणि जानू बाबाच्या जास्त जवळ जात नसत. त्यांना त्याची भीती वाटत असे. नलूला मारताना पाहिल्यापासून तर दोघेही सदाच्या सावलीला पण येत नसत. पण महेश सतत जवळ असे म्हणून सदाचा तो लाडका होता. महेश त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा. गोपाळ दादा आणि जान्हवी ताईची नेहमी तक्रार करायचा तो बाबांकडे. बाबा मग त्यांना फटके देई. तसं तिन्ही भावंडांचे एकमेकांवर प्रेम होते. सदाने महेशला दिलेला खाऊ तो दादा आणि ताईला दिल्याशिवाय खात नसे.

गोपाळ दहा वर्षाचा झाला तरी नलूचा त्रास काही कमी नाही झाला. रोज रोज शुल्लक कारणावरून मारझोड तर ठरलेलंच असे, पण हल्ली सदा तिला रात्रीचा त्रास देत नसे. सुरुवातीला नलूला बरे वाटले. वाटे चला सुटलो या जाचातून पण हळूहळू भलतंच तिच्या कानावर येऊ लागला होता. शेजारच्या बायका आडून आडून बोलत असत, सदाने गावात कुणी बाई ठेवलीये म्हणे. कामावरून तो सरळ तिच्याकडेच जात असे. कधी कधी तर तो रात्रीचा पण तिच्याकडेच असे. नलूने एकदा भीतभीत सदाला याबद्दल विचारले, तर आधी नेहमीप्रमाणे तिला मार खावा लागला. " मी हवं ते करेन, मला विचारायची तुझी हिम्मत कशी झाली??" " मी तुमची बायको आहे, तुमच्या मुलांची आई आहे, मला विचारायचा अधिकार आहे." सदा तिच्याकडे पाहतच राहिला. आज पहिल्यांदा नलूने त्याला उलट उत्तर दिले होते. तो अजून चिडला आणि हातात जे येईल त्याने तो तिला मारू लागला." भिकाऱ्याची पोर तू...मी तुला आसरा दिला..नाही तर काय होतं तुझ्या बापाकडे..??" " माझ्या बाबाकडे घर होतं..तेच बघून तुम्ही लग्न केला ना माझ्याशी.?" सदाचा पार अजून चढला. तो शिव्या देऊ लागला , वाट्टेल ते आरोप करू लागला नलूवर. तिला मारू लागला. नलू पार अर्धमेली झाली, तिचा हात पकडून सदाने तिला खेचत बाहेर पडवीत आणले. चालती हो असा म्हणत घराबाहेर काढले. गोपाळ, जानू रडत रडत नलूच्या मागे निघाले तर सदाने त्या दोघांना खेचून आणले आणि खोलीत बंद केले. जानू अन महेशची रडारड सुरु होती, पण गोपाळ रागाने नुसता धगधगत होता. काय करू अन काय नको असा त्याला झाले होते. नलूला सदाने घराबाहेर काढले याचं तिला अजिबात दुःख नव्हतं पण तिची मुले तिच्यापासून त्याने हिरावून घेतली याने ती खचून गेली होती. ती सारखी रडून रडून हेच बोलत होती की तुम्हाला हवं ते करा पण माझी मुले मला द्या. सदा तिचे काहीच ऐकत नव्हता. तिच्या पुढे आता एकच मार्ग शिल्लक होता...जीव देणे..!! कारण पुन्हा तो जाच सहन करण्याची तिची सहनशक्ती नव्हती. पण तिला तिच्या बाबाचे शब्द आठवले.. काही जरी झाले तरी परिस्थितीला घाबरून पळून जायचे नाही, अशी शिकवण दिली होती त्यांनी नलूला. जीव देण्याइतकी नलू कमकुवत देखील नव्हती. तिने परिस्थितीशी झगडण्याचा निर्णय घेतला. आज नाही तर उद्या आपली मुले आपल्या जवळच येतील या निर्धाराने ती तिथून निघाली.

चालत चालत नलू गावाच्या वेशीपर्यंत आली. इथून पुढे काय ..?? तिला काहीच समजत नव्हते. इतक्यात समोरून एक एस टी आली. धुळीमुळे त्यावरची पाटी नीट दिसत नव्हती. नलूने ठरवले की आता ही एस टी जिथे जाईल तिथे जायचं आणि ती त्यात बसली. बस कंडक्टरने कुठे जायचं म्हणून विचारले तर शेवटचा स्टॉप असे तिने सांगितले कारण ही बस नक्की कुठे जाते हे तिला माहित नव्हते तर ती काय सांगणार होती. तिकीट घेऊन नलू खिडकी जवळ जाऊन बसली. तिचं गाव, तिचं घर, तिची मुले हळूहळू सगळे नजरेआड होत होते. नलूला हुंदका दाटून आला. ती मनसोक्त रडली. आज तिला बाबांची खूप आठवण येत होती. तिच्यामुळेच बाबा गेले असं तिला वाटत होतं. रडता रडता तिचा कधी डोळा लागला कळलंच नाही.

शेवटचा स्टॉप... कंडक्टरच्या आवाजाने नलू जागी झाली. आता इथे उतरावेच लागणार म्हणून ती खाली उतरली. एस टी स्टॅन्डवर तिने त्या गावच्या नावाची पाटी पहिली. तिला ते नाव ओळखीचे वाटले. कुठे बरं ऐकलंय हे नाव..?? अरे ही तर आशूची सासुरवाडी..!! आता काय करायचं..?? अशा परिस्थितीत तिच्या सासरी जाणे योग्य की अयोग्य या संभ्रमात पडली. नलूने स्टॅण्डवर दुसरी एखादी बस आहे का बाहेर जाणारी याची चौकशी केली पण तिच्या दुर्दैवाने म्हणा किंवा सुदैवाने दुसरी बस पहाटे जाणारी होती. तिला रात्र आता तिथेच काढावी लागणार होती म्हणून टी स्टँडच्या आत एका बाकड्यावर जाऊन बसली. बऱ्यापैकी अंधार दाटून आला होता. इतक्यात आणखीन एक बस स्टॅन्ड मध्ये आली. बस मधील प्रवाशी हळूहळू खाली उतरत होते. आशु तिच्या नवऱ्यासोबत खाली उतरली. बोलत बोलत दोघे बाहेर पडत होते. इतक्यात आशुचे लक्ष स्टँडच्या आत बाकड्यावर अंगाचं मुटकुळं करून बसलेल्या एका बाईवर गेले. अशा यावेळी इथे असा कोण बसलंय म्हणून ती काय झालं म्हणून तो तिला विचारू लागला तो पर्यंत आशु नलू जवळ जाऊन पोचली देखील. तिने नलूला हाक दिली. मान वर करून नलूने आशूला पहिले अन तिच्या गळ्यात पडून ओक्सबोक्शी रडू लागली. आशुने तिला रडू दिले. काही वेळाने नलू शांत झाली. शेजारचे सगळे लोक त्यांच्याकडेच पाहत होते. आशुचा नवरा.. सुनिल म्हणाला ..आपण घरी जाऊयात का..?? हो हो.. असे म्हणून आशु उभी राहिली आणि तिने नलूचा हात धरून तिला उठवायचा प्रयत्न केला. नलूने आपला हात सोडवून घेतला आणि म्हणाली, " नाही गं, मी तुझ्यासोबत नाही येऊ शकत. माझ्यामुळे तुला त्रास झालेला मला नाही आवडणार." " अरे वा !! बरंच बोलायला यायला लागला गं तुला, ते काही नाही. तू आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत यायचं आहे". नलूचा नाईलाज झाला. ती आशुसोबत तिच्या घरी निघाली.

आशुचे सासर तसे सधन कुटुंब होतं. सासू-सासरे आणि हे दोघे. आशूच्या लग्नाला चांगली बारा वर्षे झाली होती पण तिला मुलबाळ नव्हते आणि यावरून तिला तिच्या सासरच्यांनी किंवा सुनीलने कधीच दोष दिला नव्हता. सुनिल शिकलेला असल्यामुळे तो सगळं समजून होता. याकरिताच ते दोघे शहरात डॉक्टरकडे गेले होते आणि येताना स्टॅण्डवर नलू भेटली अगदी योगायोगानेच.

घरी आल्यावर छान गरम पाण्याने अंघोळ करून आशुने दिलेली साडी नेसून नलू बाहेर आली. आशूच्या सासूने सगळ्यांना जेवायला वाढले. जेवण झाल्यावर आशुने नलूचे आपल्या शेजारीच अंथरूण घातले. काहीही न बोलता सुनिल दुसऱ्या खोलीत झोपायला निघून गेला. आशूला सर्व काही सांगावे म्हणून नलू सरसावून बसली पण आशुने तिला काहीच बोलू दिले नाही. " दमली असशील, झोप आता, उद्या निवांत बोलू.." नलू अंथरुणावर पडली पण तिला झोप काही येत नव्हती. राहून राहून गोपाळ, जानू अन महेशचा चेहरा आठवत होता. जेवताना देखील तिचा घास गळ्याखाली उतरत नव्हता. बळेबळेच जेवली होती ती आशूच्या आग्रहाखातर. मुले नीट जेवली असतील की नाही. काय करत असतील. कसले कसले विचार डोक्यात येत होते. कुठे होतो आपण कुठे येऊन पडलोय..?? लहानपणीच आई गेली, बाबाने आई होऊन तिचा सांभाळ केला. कधीच काही कमी पडू दिले नाही. लग्नाची, संसाराची किती स्वप्ने पहिली होती नलूने. पण कसलं काय सगळं उलट घडलं होतं आणि आता तर काय, निर्वासितांसारखी दुसऱ्यांच्या दारात येऊन पडलोय. ते काही नाही.. आशु आपली बालमैत्रीण असली म्हणून काय झाले असं नुसतं तिच्याकडे नाही राहायचं. आपण आपला काहीतरी कामधंदा करायचा. तिच्यावर आपला ओझं नाही पडू द्यायचं. या विचाराने नलूला जरा हलके वाटू लागले आणि ती झोपी गेली.

पहाटे सवयीप्रमाणे तिला जाग आली. आशूच्या घरातील सगळे अजून झोपलेलेच होते. नलूने आधी स्वतःचं आवरलं आणि घरातला तसेच अंगणातला केर काढला. स्वयंपाक खोलीत जाऊन सगळ्यांसाठी पोहे आणि चहा केला. इतक्यात आशूच्या सासू उठल्या. त्यांनी हे सगळं पहिलं आणि नुसत्याच हसल्या." बाईचा जन्म.. आपलं घर काय अन दुसऱ्याच घर काय.. कामे ही करावीच लागतात." असंच काहीतरी पुटपुटत त्या आत गेल्या. आशु उठली अन तिने पाहिलं नलूने आधीच चहा नाश्ता बनवून ठेवलाय ते. तशीच ती तोंड फुगवून नलूच्या समोर उभी राहिली. लहानपणापासून अशीच होती ती, तिला जर काही नाही आवडले तर अशीच ती तोंड फुगवून उभी राहायची. नलूला ते आठवले आणि हसायला आले. आशुपण हसू लागली. तिला घेऊन आपल्या खोलीत गेली. "सांग आता काय झालंय ते.." नलूने तिला सर्व काही सांगितलं अगदी काहीही न लपवता. सदाच वागणं, मारझोड करणं, घरातला जाच, बाबांचं घर चलाखीने विकणं आणि कळस म्हणून की काय दुसऱ्या बाई सोबत राहणं. आशु शांतपणे सगळं ऐकत होती. तिला सदाचा भयंकर राग येत होता. "माझ्यासोबत जे झाले त्याचे मला काही वाटत नाही आशु, पण माझी मुले त्यांनी माझ्यापासून हिरावून घेतलीत ग." "काळजी नको करुस नलू. मुले अजून लहान आहेत. त्यांना नाही समजत काही. आपण त्यांना पण घेऊन येऊ इथे. मी बोलते तसं सुनिलबरोबर." आशुचे ऐकून नलूला फार बरे वाटले. आपली मुले आता आपल्याला भेटतील हे ऐकून तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.

दिवसभर नलू आशूला घरकामात मदत करत होती. मदत कसली सगळं तीच करत होती. आशु तिला तसं बोलली सुद्धा .." हे काय गं नलू.. तू तर सगळंच करत बसलीयेस. जरा आराम तरी कर". " अगं तू केलं काय अन मी केलं काय सारखंच नाही का..??" आशूची सासू हे ऐकत होत्या. त्यांच्या कपाळावर आठी उमटली. दिवसभर नलू सारखी आत बाहेर करत होती. जसजसा दिवस ढळू लागला मुलांना भेटायची आतुरता वाढत होती तिची. संध्याकाळी सुनील घरी आला. एकटाच. चेहरा उतरलेला होता त्याचा. काहीच न बोलता हात पाय धुवून तो पडवीतल्या खुर्चीवर बसला. आशुने चहा आणून दिला. नलू जवळच भिंतीला टेकून उभी होती, सुनील काय बोलतोय हे ऐकायला. सुनीलचा पडलेला चेहरा पाहून खरंतर नलू समजून चुकली होती काय झाला असेल ते. सदाला पुरेपूर ओळखून होती ना ती. पण आशूला काही स्वस्थ बसवेना. चहा पिऊन होताच तिने सुनीलला विचारले.." काय झालं ? सदा भावोजी काय म्हणाले ? मुलं कशी आहेत ?" भराभर प्रश्ने विचारू लागली. सुनीलने एकदा नलूकडे पहिले आणि घडलेला सगळा वृत्तांत सांगायला सुरुवात केली.

सुनील नलूच्या घरी गेला तेव्हा सदा घरी नव्हता. त्याच्या आईने म्हणजे नलूच्या सासूने दारातूनच कोण आहे आणि काय काम आहे असे विचारले. सुनीलने आपली ओळख करून दिली अन सांगितलं की नलू त्यांच्या घरी आहे आणि तो मुलांना घ्यायला आलाय. गोपाळ पडवीत अभ्यास करत होता, त्याने ते ऐकले आणि धावतच तो दाराजवळ आला. " कशी आहे आई ? बरी आहे ना ? आम्हाला घ्यायला पाठवला आहे का तिने ?" गोपाळचा दंड पकडून आज्जीने त्याला आत ओढले आणि दार लावून घेतले. सुनीलला काय करावे काही सुचत नव्हते. तो तसाच थोडावेळ दाराजवळ थांबून राहिला. इतक्यात सदा आला. "कोण तुम्ही?" सदाने येताच प्रश्न केला. सुनीलने त्याला आपली ओळख सांगितली. सदा आल्याचे पाहून त्याच्या आईने दार उघडले. सदा सुनीलला घेऊन आत आला. सदाची आई त्याला म्हणाली, नलू यांच्या घरी आहे आणि तिने मुलांना आणायला पाठवलाय. सदा रागाने लालबुंद झाला. " तू कोण माझी मुले घेऊन जाणारा ? तुझं पण लफडं आहे का तिच्यासोबत ? की ठेवलीयेस तू तिला ? मला वाटलंच होता, ही गावभवानी अशीच दिवे लावत फिरणार आणि घरादाराच्या अब्रूचे धिंडवडे काढणार गावभर. आत्ताच्या आत्ता चालता हो माझ्या घरातून नाही तर परत जायला पाय शाबूत नाही राहणार तुझे." तोंडाला येईल ते सदा बोलत होता. सुनील आणि नलूवर वाट्टेल ते आरोप करत होता. सुनीलला ते सगळं ऐकवत नव्हतं. निघाला तो तिथून. सरपंचांकडे गेला. त्यांना मध्यस्थी करायला सांगितली. पण सरपंच सदाला ओळखत होते आणि त्याच्या नादी कोण लागेल. असाही हा त्यांचा घरगुती प्रश्न आहे. आपण त्यात न पडलेलंच बरं. त्यांनी सुनीलची माफी मागितली आणि म्हणाले तुम्हीसुद्धा यात पडू नका, तो तुम्हाला पण नाही सोडणार. आता पुढे काय बोलणार. सुनील परत माघारी फिरला.

"कसला नीच माणूस आहे हा." आशु चिडून बोलत होती.." असं कसं करू शकतो तो. ते काही नाही, आपण पोलिसात तक्रार करू. त्याला चांगलाच धडा शिकवू. मुलांचा ताबा नलूलाच मिळायला हवा." " पोलीस यात काहीच नाही करू शकत. ते सरळ कोर्टात जा म्हणतील" सुनील नलू शांत उभी होती. हे सगळं आशूची सासू पण ऐकत होती. त्या बाहेर आल्या आणि म्हणाल्या.." बरंच झालं नाही पाठवलं मुलांना ते. अगं हिचाच राहायचा पत्ता नाही आणि वर पोरांना घेऊन काय करणार होती ही. त्यांना खायला काय घालणार.. त्यांच्या शिक्षणाचे काय ?? स्वतःबरोबर त्यांची पण फरफट करणार होती का?" " आई ,काय बोलतायत तुम्ही " आशु. " योग्य तेच बोलतेय. काही दिवस ठीक आहे पण आयुष्यभर हिचं आणि हिच्या मुलांचा सांभाळ करणं जमलं असता का तुम्हाला? आणि उद्या लोक काय म्हणतील याचा विचार केलाय का तुम्ही ? तुला मूल होत नाही म्हणून सुनीलने सरळ मुलांसकट बाई आणून ठेवलीये घरात असं बोलायला देखील कमी करणार नाहीत लोक आणि त्यावर हिचा तो नवरा... त्याला कळलंय की तुम्ही हिला इथे आसरा दिलाय तर इथे येऊन तमाशे करायला तो कमी करणार नाही. सुनीलला नाही नाही ते बोललोय तो. इथे येऊन पण असाच काही बोलायला लागला तर त्याचं तोंड धरणार कोण? ते काही नाही. नलू तू तुझी सोय कर बाई दुसरीकडे कुठे तरी. आम्हाला हे नाही झेपणार. आम्ही साधी सरळ जगणारी आहोत तुझ्या नवऱ्यासारखा आम्हाला नाही बाई भांडता येणार." असं बोलून त्या आत निघून गेल्या. आशूला काय बोलावे सुचत नव्हते. ती नुसती नलूकडे पाहत होती. काहीशी तीच परिस्थिती सुनीलची पण होती. आशु नलूजवळ आली. " नलू तू आईचं बोलणं मनावर नको घेऊस. मी बोलते त्यांच्याशी" " नाही आशु त्या बरोबर बोलतायत. अगदी योग्य तेच बोलल्या. मला देखील असं आश्रितासारखं तुझ्या घरी राहायला नाही आवडणार. सदाला मी ओळखते, तो इथे येऊन तमाशा करायला कमी करणार नाही माझ्यामुळे तुला किंवा तुझ्या परिवाराला त्रास झालेला मला नाही आवडणार गं. तेव्हा मला आता माझ्या मार्गाने जाऊ दे." सुनील हे सगळं शांतपणे ऐकत होता." मी तुम्हाला बहीण मानलीये त्यामुळे तुम्हाला असं वाऱ्यावर नाही सोडणार. तुम्हाला स्वावलंबी व्हायचंय हे ऐकून खरंतर तुमच्या बद्दलचा आदर वाढलाय. अशा परिस्थितीत खचून न जात तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहायचं धाडस दाखवताय, त्यात मी तुमची मदत करेन. आता या विषयावर आपण उद्या बोलूयात." असे बोलून सुनील आत निघून गेला आशु त्याच्या मागेमागे गेली. नलू एकटीच कधीची भिंतीला टेकून उभी होती ती खाली बसली आणि इतकावेळ थांबवलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

काही दिवस असेच गेले. एका दुपारी सुनील जेवत असताना नलूने विचारले.." भावोजी, काय ठरवलंय तुम्ही माझ्याबद्दल..?" " तुम्हाला काय वाटतं ? काय करायला हवे ? तुम्ही माझ्यासाठी एखादं काम शोधा. राहायला एखादी खोली पाहून द्या." नलूने सुचवले.

दोन तीन दिवसातच सुनीलने तिचा राहायचा प्रश्न सोडवला. त्यांच्या शेताजवळ असलेली खोली त्याने नीट-नेटकी करून घेतली आणि नलूची राहायची सोय केली. जेणेकरून त्यांचे लक्ष राहील आणि नलूला जर काही मदत लागली तर लगेच पुरवता येईल. आता राहिला प्रश्न नोकरीचा. नलूचे शिक्षण सातवीपर्यंत झाले होते आणि तशीही ती फार हुशार होती. मुलांचा शाळेचा अभ्यास नलूच घेत असे. गावात एक मसाल्याचा कारखाना होता. सुनीलने तिला तिथे काम मिळवून दिला. त्या कारखान्यात दळण, कांडप करायला बायका येत असत. त्यांच्याकडून कामे करून घ्यायची आणि संध्याकाळी जाताना प्रत्येकाचा हिशेब करून तो वहीत मांडून ठेवायचा. महिना भरला की त्याप्रमाणे त्यांना पैसे मिळणार होते. आपण आता कुणावर आश्रित नाहीत या भावनेने नलूला खूप बरे वाटू लागले.

नलू रोज घरातले आवरून सकाळी लवकर कारखान्यात जात असे. या कारखान्याचे दोन मालक होते, सबनीस आणि भालेराव. सबनीस कधीतरीच येत असत. भालेराव रोज येऊन सगळं कारभार बघत असे. दिवसभर ते काय काम चाललंय, कामे नीट होतायत की नाही, किती माल गेला-आला, या सगळ्यावर देखरेख ठेवत असे. सुनीलने त्यांना नलूची कहाणी सांगितली आणि तिला कामाची किती गरज आहे हे पटवून दिले आणि भालेरावने तिला कामावर ठेऊन घेतले. नवऱ्याने टाकलेली बिचारी बाई, एकटी, त्यात दिसायला सुंदर, नोकरीची गरज असलेली. तिला बघून भालेरावची लाळ गळायला लागली. तसाही तो जरा बायकांच्या बाबतीत बदनामच होता. पण पैसेवाला म्हणून कुणी त्याच्या विरुद्ध बोलत नसत. सुरुवातीला नीट होता तो. नंतर मात्र काही ना काही कारणाने नलूला आपल्या खोलीत बोलवत असे. वहीतील हिशोब तपासायचा निमित्ताने तिच्या अगदी जवळ बसत असे, हाताला जाणून बुजून स्पर्श करत असे. नलूला हे अजिबात आवडत नसे पण सध्या तिला पर्याय नव्हता. तरी ती शक्य तेवढा त्याला टाळायचा प्रयत्न करत असे. आज मात्र तिने ठरवलं होतं, जर का भालेरावने काही अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला तर त्याला नीटच उत्तर द्यायचे. नलू लगबगीने कारखान्यात शिरली. नेहमीप्रमाणे बायका आपआपली कामे करत होत्या. भालेराव कुठेच दिसत नव्हता. नलूला जरा बरे वाटले ती आपल्या टेबलजवळ जाऊन बसली. इतक्यात भालेराव आला आणि त्याने तिला आपल्या खोलीत यायला सांगितले. नलू भालेरावच्या खोलीत त्याच्या टेबलासमोर उभी राहिली. "अगं अशी उभी का, बस ना तिथे खुर्चीत." भालेराव म्हणाला. " नको..मी अशीच बरीये." नलूने उत्तर दिले. यावर भालेराव उठून तिच्या जवळ आला." अगं किती दमलीयेस तू, बस ..जरा आराम कर." असे बोलून त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. तितक्यातच नलूने त्याचा हात झटकला आणि म्हणाली "काय असेल ते नीट बोला, अंगाला हात लावायची गरज नाही." "अगं अशी चिडतेस काय..? बाकी चिडल्यावर तू आणखीनच सुंदर दिसतेस. घाबरू नकोस मी तुला काहीही करणार नाही,बस. तुझी काळजी वाटली म्हणून बोललो ". खरंतर नलूचे डोळे पाहून भालेरावदेखील मनातल्यामनात जरा चरकलाच होता पण चेहऱ्यावर उसने हसू आणून लोचटसारखा बोलत होता तो. " हे बघ नलू, तू एकटी बाई, नवऱ्याने टाकलेली, अजून तरुण आहेस, सुंदर आहेस अशी एकटी किती दिवस राहणार? माझं ऐक, ही किल्ली घे. कारखान्याच्या मागे खोली आहे. संध्याकाळी तुझी कामे आटोपली की तिथे जाऊन बस मी येतोच मागून. मग आपण निवांत बसून बोलूयात. कसं ??" नलूने त्याच्यावर एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि ती ताडताड पावले उचलत बाहेर आली. आपल्या जागेवर बसून कामे करू लागली. तिचे कामात मात्र लक्षच लागत नव्हते. मुलांची आठवण येत होती. एकदा त्यांना जाऊन बघून तरी यावे असे तिला राहून राहून वाटत होते. पण तिला माहित होते सदा तिला मुलांना भेटू देणार नाही. सदाच्या विचाराने ती हिरमुसली होती. त्यात आज भालेरावने कहरच केला होता. सरळ सरळ मागच्या खोलीची किल्ली देऊन रात्री यायला सांगत होता. काय करावे तिला सुचत नव्हते.

दुपारी सुनील नलूला भेटायला कारखान्यावर आला. उगाच कुणी काही वेगळा अर्थ काढायला नको म्हणून तो तिच्या खोलीवर एकटा असताना जात नसे. आशु जेव्हा सोबत असे तेव्हाच तो तिकडे जाई अन्यथा इथेच कारखान्यावर यिऊन तिची खुशाली विचारत असे. तिला काही हवे नको बघायला तो अधून मधून येत असे. तो समोर येऊन उभा राहिला तरी नलूचे त्याकडे लक्ष नव्हते. ती आपल्याच विचारात गुंग होती. सुनीलने टेबलावर टकटक केली.." नलू ताई कोणत्या विचारात गुंग आहात ?" सुनीलच्या आवाजाने नलू भानावर आली." अरे भावोजी तुम्ही कधी आलात? या ना बसा" चेहऱ्यावर बळेबळेच हसू आणायचा तिचा प्रयत्न सुनीलच्या नजरेतून सुटला नाही. त्याला कळले की काही तरी बिनसलंय नक्की. जास्त काही न विचारता जुजबी चौकशी करून निघून गेला. जाताना सांगून गेला, आशु आज संध्याकाळी तुम्हाला भेटायला घरी येणार आहे. हे ऐकून नलूला जरा बरे वाटले. पटपट कामे उरकून ती लवकरच घरी निघाली. भालेराव तिला जाताना पाहत होता पण तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि निघाली घरी. बऱ्याच दिवसांनी आज दोघी भेटणार होत्या. घरी आल्याआल्या नलूने आवरायला सुरुवात केली. आशूच्या आवडीचा गोड शिरा केला तिने आणि वाट बघत बसली. बऱ्याच वेळाने आशु आली. मग काय गप्पांना नुसता ऊत आला होता. नलू आपल्या कारखान्याच्या गमती जमती सांगत होती. दोघीही खूप हसत होत्या. नलू तर कित्येक दिवसांनी अशी हसत होती. शिरा खात अन गप्पा मारत असताना आशुने विचारले.." नलू तुला काही सांगायचे आहे का मला ?" "नाही , असं का वाटतंय तुला." " मी काय आज ओळखतेय होय तुला ? दुपारी सुनील तुला भेटून घरी आले तेव्हा त्याने मला सांगितलं तुझ्याशी बोल म्हणून." आशु. " तसं काही नाहीये ग" नलू म्हणाली. " हे बघ माझ्यापासून काही लपवायचा प्रयत्न करू नकोस, तुला नाही जमणार ते." आशुचे असे बोलणे ऐकून मग मात्र नलूला राहवले नाही आणि तिने भालेरावबद्दल सगळे सांगितले. तो कसं बोलतो, कसं वागतो आणि आज तर त्याने चक्क तिला रात्री खोलीवर ये असा सांगितलं. हे सगळं ऐकून आशूला खूप राग आला. "इतकी हिम्मत त्याची..? थांब त्याला चांगलाच धडा शिकवूया." " अगं नको ग सुनील भाऊने इतकं केलंय माझ्यासाठी आता पुन्हा माझ्यामुळे त्यांना त्रास नको." नलूचे हे बोलणे ऐकून आशु अजूनच चिडली." म्हणे त्रास...उलट हे सगळं समजल्यावर तर सुनील तुला अजिबात तिथे काम करू देणार नाहीत. तसंही तेच योग्य आहे. नलू, उद्यापासून तिथे कामाला जायची गरज नाही. मी सांगते सुनीलला. तो तुझी दुसरी काही तरी सोय करेल." असे बोलून आशु घरी परत गेली. दुसऱ्या दिवशी सुनील सकाळीच नलूकडे आला. " ताई माझंच चुकलं, मी कोणताही शहानिशा न करता तुम्हाला तिथे नोकरी करा म्हणून सांगितलं." अहो तुमची काय चूक त्यात भावोजी ? माझंच नशीब फुटकं, जिथे जाईन तिथे माझी पाठ सोडत नाही." " असं नका म्हणू ताई. आम्ही आहोत तुमच्यासोबत. काही काळजी करू नका. सगळं नीट होईल. मी आजच त्या भालेराव विरुद्ध तक्रार देतो पोलिसात आणि तुमच्या कामाची पण दुसरी काहीतरी व्यवस्था करतो." असे बोलून सुनील निघून गेला. आता पुढे आणखीन काय वाढून ठेवलंय नलू याच विचारात होती. कामाची दुसरी सोय करतो असे बोलून सुनील तिथून निघाला खरा पण आता त्यालाच सुचत नव्हते काय करावे. भालेराव विरुद्ध पोलिसात तक्रार देऊन सुनील घरी आला. दुपारी जेवत असताना तो अन आशु नलू बद्दलच बोलत होते. दोघांना काहीच सुचत नव्हते. त्यांचे तसा चेहरा पाहून सुनीलच्या आईने काय झाले म्हणून विचारले, आशुने झाला प्रकार सांगितला. " बाईचा जन्मच असा. रांधा वाढा उष्टी काढा. मान वर केली तर समाजाचा त्रास. हे असंच सुरु राहणार आपण तरी काय करणार म्हणा" असे बोलून त्या परत आत गेल्या. सुनील आईचे ऐकत होता आणि अचानक त्याला एक कल्पना सुचली. "आशु, आपण असं केलं तर ?" " कसं..?" आशुने विचारले. " मागे एकदा तू म्हणाली होतीस नलूताई स्वयंपाक खूप छान करतात." " हो पण त्याच काय..?" " मला एक कल्पना सुचलीये. एस टी स्टँडला उसाच्या रसाचं एक दुकान आहे. त्याच्या शेजारी जर एक छोटेसे हॉटेल टाकून दिले नलू ताईला तर..?" सुनील." कल्पना तशी चांगली आहे पण हे सगळं करणार कसं..? एस टी स्टॅन्डला हॉटेल टाकायचे म्हणजे खर्च आला. शिवाय त्यासाठी कसल्या कसल्या परवानग्या देखील काढाव्या लागतील ना??" " ते सगळं तू माझ्यावर सोपव तू फक्त नलूताईला तयार कर यासाठी." असे बोलून सुनील लगेच बाहेर पडला.

पुढच्या आठवड्याभरातच सुनीलने सगळे सोपस्कार पार पाडून नलूला एक छोटेसे हॉटेल काढून दिले. गावातल्या पतपेढीतून त्याने कर्ज काढले होते. ते सगळं पाहून नलुच्या डोळ्यात पाणी आले. तिने दोघांचे आभार मानले." सख्खा भाऊ देखील करणार नाही इतकं केलंय सुनील भावोजी तुम्ही माझ्यासाठी." " अहो यात आभार कसले. बहीण मानलंय मी तुम्हाला हे तर माझं कर्तव्य आहे." इथून सुरु झाला आता नलूच्या आयुष्याचा दुसरा अध्याय.

दिवस जात होते. सगळं काही सुरळीत सुरु होतं. पण कुठे तरी काही तरी खुपत होते. या दरम्यान सदा दोनदा नलूच्या हॉटेलवर येऊन गेला. नेहमीप्रमाणे तिला शिवीगाळ करून, तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून गेला. नलूने पोलीसात रीतसर तक्रार दिली. नलूच्या आसपास जरी दिसलास तरी तुला जेलमधे टाकेन असा दम इन्स्पेक्टर ने दिला. तसं तुला बघून घेईन असं म्हणून सदा गेला.

हॉटेलचं सगळं आवरण्यात नलूचा दिवस जात होता. पण रात्र मात्र खायला उठायची. मुले आता मोठी झाली असणार, काय करत असतील, माझी आठवण येत असेल का त्यांना..?? याच विचारात तिची रात्र सरत असे.

जवळपास पाच वर्षे अशीच निघून गेली आणि एक दिवस अचानक गोपाळ आला नलूला भेटायला. मोठा झाला होता गोपाळ आता. छान मिसरूड फुटलं होते त्याला. त्याला समोर पाहून नलूला कोण आनंद झाला होता. तिने त्याला जवळ घेतले, डोक्यावरून, चेहऱ्यावरून हात फिरवला. खायला दिले. लहानपणी किती गोंडस दिसायचा माझा गोपाळ आणि आता किती मोठा दिसत होता. लहान वयात खूप मोठा झाला होता गोपाळ. सगळ्यांची ख्याली खुशाली सांगून जेव्हा गोपाळ जायला निघाला तेव्हा तो नलूला म्हणाला " आई आम्ही तुझ्याकडे येऊ का ?" " अरे बाळा म्हशीला तिची शिंगे जड असतात होय ? मी तर कधीपासून याच दिवसाच्या प्रतीक्षेत जगत होते. कधीही या." नलूने गोपाळला आश्वस्त केले. " आई मला सगळं माहित आहे. बाबा तुला किती त्रास देत होता ते. तो सगळ्यांना सांगतो तू आम्हाला सोडून गेलीस पण मला माहितेय बाबानेच तुला घराबाहेर काढला होतं. तू गेल्यावर तो आमचा देखील छळ करत होता. दुसरी बायको केलीये त्याने. मला ती अजिबात नाही आवडत. बाबा नसला कि ती पण आम्हाला खूप त्रास देते. बाबा आल्यावर खोटं खोटं सांगून आम्हाला मार खायला लावते. आम्ही नाही राहणार आता तिथे." लवकरच कायमचा परत येतोय असा बोलून गोपाळ निघून गेला.

नलू फारच खुशीत होती. आपली मुले आता आपल्याकडे येणार या विचाराने ती आनंदी होती. तिने आशु आणि सुनीलला पण सांगितले गोपाळ येऊन गेल्याचे आणि तो आता कायम इथेच राहणार. आशूला थोडी चिंता होती. सदाचा स्वभाव सगळ्यांनाच माहित होता. गोपाळ बोलला खरं आम्ही येतोय म्हणून पण मग सदा त्यांना येऊ देईल का..?

इकडे घरी आल्यावर गोपाळने जान्हवी आणि महेशला आपण आईला भेटून आल्याचे सांगितले आणि "आता आपण सगळे तिच्या कडे कायम राहायला जायचं आहे तेव्हा तयारीत राहा." त्याचे हे बोलणे ऐकून जानू अन महेश घाबरले. "अरे दादा बाबाला जर हे कळले तर काय होईल ?" त्याच्या माराला घाबरत होती ती. महेश म्हणाला ," मला काहीच हरकत नाही. मला आईकडे पण चालेल अन बाबाकडे पण." "ठरलं तर मग. मी सगळी व्यवस्था करतो. इथल्या पोलीस चौकीत एक अर्ज दिला की झालं. मग बाबा आपल्याला नाही अडवू शकणार. आणि तो जेव्हा बाहेर गेला असेल तेव्हा आपण गपचूप निघून जाऊ." जान्हवी खूपच घाबरली होती. " दादा तुला वाटते इतके हे सोप्पे आहे का ?" " आता सोप्पं असो की नसो इथून तर निघायचंच. आता माघार नाही आणि आता तर आईपण आपल्या सोबत आहे. तुला आठवतंय बाबा नेहमी बोलायचा, तुमच्या आईला तुम्ही नको होतात म्हणून ती तुम्हाला सोडून निघून गेली. पण खरं तर बाबाने आपल्याला आई पासून वेगळं केलं. तेव्हा आता ठरलं, आपण आईकडे जायचं."

ठरल्याप्रमाणे सगळ्यांनी गुपचूप आपले आपले सामान हळूहळू आपल्या मित्रमैत्रिणींकडे हलवले आणि एक दिवशी त्या तिघांनी ते घर सोडले. पोलीस चौकीत जाऊन गोपाळने अर्ज दिला. आम्ही आमच्या मर्जीने आईकडे चाललोय आणि बाबा आम्हाला त्रास देतो म्हणून त्याच्याकडे नाही राहायचं. एस टी पकडून तिघेही नलूकडे पोचले. सुनीलने देखील इथल्या पोलीस स्टेशनला अर्ज दिला होता जेणेकरून जर सदा आलाच तर तो या सगळ्यांना त्रास नाही देऊ शकणार. मुले आल्याचं पाहून नलूला खूप आनंद झाला. जानू गळ्यात पडून खूप रडली. महेश पण रडला. " बाळांनो आता रडायचं नाही. आपण सगळे सोबत आहोत ना. मग सगळं नीट होईल. काळजी करू नका." नलू देखील रडत होती. मनातून देवाचे आभार मानत होती.

छान चालले होते दिवस. गोपाळ नलूला हॉटेलच्या कामात मदत करत असे, जानू घर सांभाळण्यात मदत करे. तिघांचा अभ्यास व्यवस्तीत सुरु होता. नलू आपल्यापरीने मुलांचे सर्व काही करत होती. सगळे आनंदाने राहात होते.

नलू खूप सुखात आहे आज. गोपाळ इंजिनिअर झाला होता. एका चांगल्या कंपनीत कामाला लागला. जानूचे तिच्याच पसंतीच्या मुलासोबत लग्न लावून दिले होते. महेश मोठा ऑफिसर झाला होता. आता त्या दोघांची लग्ने लावून दिली की नलू मुक्त होणार होती. सगळं तिला हवं तसं घडत होतं. परंतु हे सगळं इथपर्यंत आणताना नलूने जे भोगलं त्याला तोड नाही. प्रतिकूल परिस्थितीत तिने जे धैर्य दाखवले ते खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. स्वतः इतक्या त्रासातून दिवस काढूनही तिने आज आपल्या मुलांना योग्य शिकवण देऊन स्वतःचे अस्तित्व घडवायला मदत केली. नियतीने कितीही कठोर घाव केले तरी ते घाव सहन करून जो उभारून येतो तोच अस्सल हिरा असतो.


Rate this content
Log in

More marathi story from shilpaa jadhav

Similar marathi story from Drama