निजरूप तुझे
निजरूप तुझे
'सांज खुलणे' हे निसर्गाच्या अनेक लोभस रूपांपैकी एक रूप. आनंद, प्रसन्नता, मंगलमय, शांत आणि तरीही तेजस्वी असे हे रूप मनाला नेहमीच भुरळ घालत आलं आहे.
त्यादिवशीही अशीच सांज खुलली आणि थेट माणुसकीच्या कोलाहलातून बाहेर पडलो. शांत अशा निर्जन स्थळी जाऊन थांबलो. निसर्गाच्या या रूपाचा आनंद मनमुराद घेण्यासाठी.
काळ आणि वेळेच्या पाशातून मन विचलित होऊन परतताना असंच एक प्रगल्भ, सुंदर आणि मनमोहक स्त्रीरूप दिसलं आणि मन अजूनच उल्हसीत झालं.
लोकलज्जेचं भान न ठेवता थेट मागणी घालावी इतकं प्रेम निर्माण झालं. मंगल्याच्या या मूर्त रुपात आपल्याला न्हाता येईल याचा मनस्वी आनंद झाला.
नि तत्क्षणी सौदामिनी कडाडावी असा साक्षात्कार झाला. बालपणी गायलेल्या सायं प्रार्थनेच्या ओळी आठवल्या, 'ज्या ज्या स्थळीये मन जाय माझे, त्या त्या स्थळीये निजरूप तुझे'.
माझं प्राक्तन तर कधीच भरून गेले आहे, याची जाणीव झाली. अशी प्रेममय रुपं तर मला पदोपदी मिळणार आहेत. मग मी एका रूपात कसा स्वतःला सामावून घेणार?
म्हणून त्या अनंताच्या रुपाचं स्मरण करत, तिन्हीसांजेची कृतज्ञता व्यक्त करून परत निघालो.