निःशब्द प्रेम...
निःशब्द प्रेम...
इविनिंग वॉक वरून परतताना मोहनरावांचे लक्ष सहजच चौकात बसलेल्या आजीबाईंकडे गेले..त्यांच्या पुढ्यात गुलाब, मोगरा, कुंदा, निशिगंध अशी काही फुले ठेवलेली होती आणि ते त्या विकायला बसलेल्या होत्या...
मोहनराव निशिगंध पाहून थबकले...त्या आजीबाईजवळ जाऊन त्यांनी ती निशिगंधाची फुले विकत घेतली..समोरच असलेल्या बाकावर जरावेळ जाऊन बसले आणि स्वतःशी पुटपुटले," सहजीवनाच्या ५० वर्षात मला तुला कधी "प्रपोज" करण्याची गरजच पडली नाही..चला घरी आज हिला प्रपोज करूनच टाकतो..
घरी येऊन मोहनराव हार घातलेल्या पत्नी देवकीच्या फोटो समोर उभे राहिले...निशिगंध ओंजळीत घेऊन फोटो समोर ओंजळ रिकामी करत म्हणाले," देवकी कित्ती आवडायचा ना तुला हा निशिगंध...तू सोबत असताना कधी बोललोच नाही तुला पण आज तुला प्रपोज करतोय..तू माझ्या आयुष्याची ५० वर्षे ह्या निशिगंधा सारखीच दरवळत ठेवलीस..पुढचे सात जन्म तूच हवी देवू मला माझे आयुष्य सुगंधित करण्यासाठी...देशील ना मला साथ?"
फोटोसमोरील निशिगंधाचा दरवळ घरभर पसरला होता...

