मुका आकांत
मुका आकांत


अमावस्येची भयाण रात्र होती. स्मशानात जाणाऱ्या त्या वाटेने यमाचे दूतही जायला घाबरायचे. रात्री तिथल्या मंतरलेल्या काजव्यांमधून चूकलेली पाऊलवाट धुंडाळताना "जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपिस तिहू लोग उजागर" या ओळी नास्तिक मनुष्याच्या मुखातूनही आपोआप बाहेर पडत असे. त्या स्मशानाच्या बाजूलाच साऱ्या गावाचा आणि शहराचा केरकचरा जमा होत होता. पाषाणाचं काळीज धारण करून मला जन्म देणारी माझी माय अमास्येला या स्मशानवाटेनं का आली आणि मला कचरा समजून कचऱ्यात का फेकलं? इतर अनाथांप्रमाणे अशाप्रकारच्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा मुर्खपणा मीही केला होता. कचरा ते अनाथाश्रम आणि अनाथाश्रम ते वसतिगृह असा माझा तो
जीवनाच्या विविध वळणांतून झालेला वीस वर्षांचा असामान्य प्रवास होता. आणि मी वसतिगृहातून बाहेर पडण्याचा विचार पक्का केला.
मी वसतिगृहातून बाहेर पडलो. पोट भरण्यासाठी जो रस्ता दिसेल त्या रस्त्याने चालत गेलो आणि एका निंबोणीच्या झाडाखाली थांबलो. तिथे भूत असतो म्हणे, लोकं भीतात हो भूताला परंतू माझ्या मनात भूताशी मैत्री करण्याचा विचार सारखा उड्या मारत होता. भूताशी मैत्री करायची ठरलेलं असताना निंबोणीच्या झाडाशी माझी मैत्री झाली, अंतिम श्वासापर्यंत चिरंतन टिकणारी. झिंगलेल्या बेधुंद शहरापासून दूर फक्त मी आणि माझं निंबोणीचं झाड़ होतं. आम्ही दोघांनी मिळून जगावेगळा संसार थाटला. त्या नैसर्गिक संपदेच्या सान्निध्यात एका सुताराकडे उदरनिर्वाहासाठी मी एक काम शोधलं. मेहनतीने शरीर झिजवून त्या सुताराकडे दिवसभर लाकूड तोडायचो. ऊस जसा रसयंत्रामध्ये पिळल्या जातो माझ्यासोबतही असेच व्हायचे, जगण्याच्या यंत्राने रोज माझा संपूर्ण स्वेदरूपी रस बाहेर पडताना तनमनाचं तंत्र बिघडून जायचं आणि थकल्याची जाणीव व्हायची. थकून भागून विसाव्याजवळ येताना निंबोणीच
्या झाडाला घट्ट आलिंगन करून निंबोणीच्या झाडाच्या कुशीत निजायचो. निंबोणीच्या झाडाच्या कुशीतच मी कितीदा पौर्णिमेचा चंद्र निरखला होता. सारं काही सुरळीत चालू होतं. परंतू एके दिवशी विपरीतच घडलं. सुताराने माझ्यापुढे टाकलेले माझ्या निंबोणीच्या झाडाचे फांदीरूपी खोडरूपी अवयव पाहून माझा कंठ दाटून आला.
त्या अत्यंत विषण्ण वातावरणात जमिनीवर पडलेलं माझं निंबोणीचं झाड़ मला आर्ततेने म्हणालं, “माझ्यावर जेव्हा कुऱ्हाडीचा सपासप वार होत होता कुठे होतास रे तेव्हा तू, किती असह्य पीड़ा होत होती रे मला, तू त्या दु:खाची कल्पनाही करू शकत नाहीस. तुला त्या असह्य पीडेची जाण होण्यासाठी त्यावेळी तू माझ्याजवळ का नव्हता? जगण्यासाठी मी खुप मुका आकांत केला होता. आता वेळ निघून गेली रे, मला मरण आलेलं आहे. मिठी मारण्यासाठी, कुशीत निजण्यासाठी, मायेच्या विसाव्यासाठी आता तुला दुसरं निंबोणीचं झाड शोधावं लागेल रे सख्या, माझा शेवटचा निरोप घे."
एवढं बोलून माझं निंबोणीचं झाड़ लाकडात रूपांतरित झालं होतं. आणि त्याच्या झाडरूपी देहाचे तुकडे एका ट्रॉलीत भरले जात होते. हे चित्र पाहून माझ्या काळजाला रक्ताश्रूंच्या धारा लागल्या होत्या. जगणे निरर्थक वाटायला लागले होते. रडून रडून अश्रूंच्या माध्यमातून पाण्याचा प्रत्येक अणू शरीराच्या बाहेर पडला होता. आता उरली होती फक्त माझी ही देहरूपी नापीक जमीन.
माझ्या पावलांनी स्मशानाची वाट धरली. आता ही अशी वेळ होती की, मला पाहून अमावस्येच्या रात्री स्मशानातले मंतरलेले काजवेही थरथरायला लागले. जणू मीच त्या स्मशानातला भूत होतो. स्मशानातून जाणारी ती वाट साठवलेल्या शहरी कचऱ्याजवळ संपली. आणि आता मीच स्वत:ला कचऱ्यात फेकून दिले होते, एकाच उद्देशाने की, यमदूत येईल आणि मला या भौतिक विश्वातून उचलून घेऊन जाईल.