मुग्धा ..
मुग्धा ..
मधली सुट्टी संपल्यानंतर आलेला आळस तासातासाप्रमाणे कमी होऊन गेला होता. भुगोलाचा तास संपतच आलेला होता. घड्याळाचे काटे जसे जसे पुढे पळत होते तस तशी आमच्या चेहऱ्यावर प्रसन्नता वाढत चाललेली होती. प्रत्येकाला घरी जायची ओढ लागलेली होती. इतरांप्रमाणे मी ही त्या घड्याळाकडे डोळे लावून होतो. काटा पुढे पुढे सरकत होता आणि माझ्या ह्रदयाचे ठोके तस तसे पळत होते.
देव पावला आणि घंटा वाजली. नेहमीप्रमाणे शर्यत लागलेली कोण पहिले स्डँडवर पोहचणार. गुर मेंढर कशी पळावी तसे वर्गावर्गातून लोंढे पळत होते आणि त्या लोंढ्यांमधे आम्ही मुल गुरांसारख पळत होतो. पळता पळता स्डँड गाठले. इथून तिथून सायकल नी गाड्यांची रांग, ज्या शाळेत शिस्तिचे धडे गिरवले जात होते त्याच शाळेच्या बाहेरच शिस्तीची नेहमी प्रमाणे ऐशी तैशी झाली होती. इतरांप्रमाणे मला ही बाहेर पडायची खुप घाई झाली होती. कसेबसे वाट काढत ठोकत ठाकत मी सायकल बाहेर काढली.
(मागून आवाज आला)
“अरे थांब की, मलापण येऊ दे”
मी ऐकून न ऐकल्यासारखे केले आणि सायकल पळवत पळवत मी नाक्यावर आलो. ब्रेक मारला आणि झाडाखाली सायकल थांबवली. घड्याळाकडे पाहिले उशीर नव्हता झालेला. रेल्वेच इंजिन जसं धडधडाव तसं ह्रदय धडधडत होतं, अंग घामानं भिजलं होत. ठोके जोर जोरात छातीवर धडधडत होते. तेवढ्यात मिहीर आला.
(सायकल पळवून पळवून मिहिर दमून गेला होता त्यालाही माझ्यासारखाच श्वास लागला होता.)
“अरे किती आवाज दिले, तू काय ऐकले नाही का?”
“ऐकले रे”
“उशीर झाला का?”
(मी घड्याळाकडे पाहून)
“नाही”
आम्ही दोघ सायकल स्डँडवर लाऊन सीटवर तिथे बसलेलो होतो. मी शर्टाला घाम पुसला आणि बॅगमधून कंगवा काढून डोक्यावरचे केस निट केले.
सुर्य मावळतीवर होता. समोरच्या झाडांना चिरून ती मावळतीची किरणंं आमच्या अंगावर येत होती. त्यांच्यात आम्हाला पकडण्यासाठी कदाचित ओढ लागलेली असावी. पाट जवळ असल्याने गारवाही जाणवत होता. तो सुर्य हळूहळू पाटामधे उतरत होता आणि तो जस जसा खाली उतरत होता तस तशी धुकं पाटावर पसरत चालली होती. पाटावरच्या छोट्या पुलावरून पोर आपापल्या घरी जात होती. जवळच दोन शाळा असल्याने पुलावर शाळेतल्या मुलामुलींची गर्दी होती आणि त्या गर्दीत माझी भिरभिरणारी नजर मात्र तिला शोधत होती.
ती म्हणजे एक गोड सकाळच, कोणालाही न कळलेलं माझ एक गोड स्वप्नच. असे क्वचितच दिवस असायचे जेव्हा तिची आठवण येत नसे. तिचंं ते हळू आवाजात बोलण कानात मात्र मोठा स्पर्श करून जायचे. तिला गर्दीत मी कसाही शोधू शकत होतो. तिने डोक्यावर लावलेल्या त्या दोन लाल रिबन तिला खुप शोभुन दिसत. त्या रिबन पाहिल्या की मला छकूलीच्या कंपासपेटी वरची मिनी माऊसच आठवत. तिचं ते जांभळी झबलं. थोडा मोठा होता पण पाहून पाहून मला सवय झाली होती. मिहीर एकदा त्या झबल्याकडं पाहून हसला होता. तेव्हा त्याच्या डोक्यात असा काही खवडा दिला कि परत त्याने तिच्याकडं पाहिलच नाही. तिचे डोळे जाम भारी होते. ते म्हणजे अगदी आपल्या सोबत बोलायचे त्यांच्याकडं एकटक पाहत रहाव असंच. त्या डोळ्यात पाहिल की जोशी बाईंनी सांगितलेल ब्रम्हांड आठवत. कॅमलच्या वहिवर पाहिलेल ते ब्रम्हांड अगदी मला तिच्या डोळ्यातच दिसतं. त्यात तिचंं टोचलेल नाक आणि त्या टोचलेल्या नाकात ती बारिक तार तिला जाम भारी शोभत होती आणि तिची एक बट वाऱ्याने नुसती तिच्या गालावर यायची आणि ती त्या बटेला हाताने सावरायची आणि पुन्हा हवेने उडून तिच्या चेहऱ्यावर यायची हा खेळ चालूच असायचा. तिचा कधी कधी संताप व्हायचा मला मात्र ते पाहताना खुप आनंद व्हयचा. तिला तस नकळत लपून पाहताना खूप वेगळंं वाटायच.
खरं तर तिला पाहण्यासाठी माझा जीव किती कासाविस होत असे हे तिलाही माहित नाही.
मी वाट पाहत होतो गर्दी कमी झाली होती. सुर्य ही आता नाहीसा होत होता, पण ती काही दिसत नव्हती. तिला शोधण्यात माझ्या धुंदीत मग्न मी, बाजूला असलेला मिहीर कधी निघून गेला मला कळलेही नव्हते. मला काही कळेना, मी सायकल काढली घरी गेलो. घरी जातानाही ती मात्र विचारातून गेली नव्हती. मी हातपाय धुतले दिवा लावला आणि तिच्या क्लासवर गेलो. क्लास सुटेपर्यंत बाहेरच्या कट्ट्यावर बसून राहिलो. क्लास सुटला पोर घरी चालली होती. तिथेही ती काही दिसली नाही. मन नाराज झाल. मी सायकल काढली आणि बोळीतून वाट काढत घरच्या रस्त्याला निघालो बोळीतून बाहेर निघताच बोळीतल्या अंधारातून आवाज आला आणि मी सायकल थांबवली.
“यथार्थऽऽ”
मी लगेचच थांबलो, अंधारातून एक चेहरा उजेडाच्या दिशेने हलके पाऊल टाकत आला, तो चेहरा मृण्मयीचा होता. तिने काही न बोलचा एक चिठ्ठी माझ्या हातात ठेवली व ती बोळीतून तिच्या दिशेला गेली.
मी सायकल काढली चिठ्ठी हातातच होती. मी घरी आलो चिठ्ठी खिशात टाकली. घरात विज नसल्याने अंधारच होता. मी दिवा घेऊन मोरीत गेलो. दिव्याच्या उजेडात मी चिठ्ठी उघडली आणि वाचू लागलो.
प्रिय यथार्थ
मला तूला आज भेटायचे होते पण मला ते जमलेच नाही. मी खुप प्रयत्नही केले पण घरात भरुपूर काही आवरायचे होते. वाहिनीही भाऊबीजमुळे तिच्या माहेरी गेली होती आणि आईलासुद्धा लवकर शाळेत जायचे होते. ती माझ्याकडे काम सोपवून शाळेत गेली आणि मला इथे मदत करायला कोणी नव्हते. त्यामुळे कामामुळे माझा वेळ कसा गेला कळलाच नाही.
आज आम्ही माझ्या साताऱ्याच्या मामाकडे जाणार आहोत, मी खूप वर्षांनी तिकडे जाणार आहे. जास्त दिवस नाही शाळा सुरू व्हायच्या एक दोन दिवस आधी येऊन जाऊ. तुझी आठवण येईल पण मी थोड्याच दिवसात परत येईन तेव्हा आपण मस्त मज्जा करू. ए पण तू मला विसरू नको हं! मी तुझ्यासाठी तिकडून नक्की काहीतरी आणेन. काळजी घे.
मुग्धा
शेवटचा तास संपतच आला होता तेवढ्यात बबन मामांनी सर्व मुलांना व शिक्षकांना मैदानात यायला सांगितले, उद्या शाळेला सुट्टी की काय या आशेने आम्ही लवकर दप्तर आवरलं आणि मैदानात आलो. आम्ही आमच्या वर्गाच्या रांगेत उभे होतो. नेहमीप्रमाणे आमची मस्तीच चालू होती. स्पिकरचा आवाज आला सर ओरडले सर्व मुले शांत झाली. सर माईकमधून बोलू लागले.
“उपस्थित शिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांनो आपल्या सोसायटीच्या सावित्रीबाई कन्या विद्यालयातील शिक्षिका मोहिनी सदावर्ते व त्यांची कन्या मुग्धा सदावर्ते यांचे काल रात्री अपघाती निधन झाले तरी आपण सर्वांनी दोन मिनीटे शांत बसून त्यांना श्रद्धांजली वाहू.”
ते ऐकताच माझ्या पायाखालची जमिन सरकून गेली. काही क्षणासाठी मी सुन्न होऊन गेलो. बांध तोडून पाणी बाहेर पडावं तसं डोळ्यातल्या पापण्यातून पाणी बाहेर पडत होतं. श्रद्धांजली वाहून मुलं घरी निघाली. तिकडून पळत पळत मिहिर आला, त्याने माझ्याकडे पाहिले, मिठी मारली. डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. खांद्याला डोळे पुसून पुसून तो खांदाही ओला झाला होता. कसेबसे मी स्वत:ला सावरले आम्ही पुन्हा पाटाजवळ गेलो, झाडाखाली थांबलो. रोज स्पर्श करणारी किरणे आज नव्हती, ढगांमधे ती कुठेतरी हरवून गेली होती. सभोवताली नेहमीप्रमाणे गजबज होती. पण मला सर्व शांतता जाणवत होती. पाटावरच्या पाण्याला धुक्यांनी आपल्यात एक करून टाकले होते. मी चिठ्ठी काढली तिचे शब्द कानावर येऊ लागले. मी लवकर परत येईन ती म्हणाली होती.
आज २० वर्षे झाली मी रोज पाटावर येऊन तिची वाट पाहत असतो,
पण ती मात्र येतच नाही.