माझी कबुली
माझी कबुली
तो वार रविवार, सप्ताहाचा शेवटचा वार असल्याने त्या दिवशी सर्व दुकाने बंदच होती. रस्त्यावर वर्दळ तशी कमी होती. कारण घनदाट भरून आलेल्या आभाळाच्या ढगांनी सूर्याला आपल्यात झाकून घेऊन जमिनीवर असह्यपणे तो सरी कोसळत चालला होता. जणू तो जमिनीवर त्या दिवशी रागच काढत होता. माझे काम लवकर आटपून मी त्या पावसापासून वाचण्यासाठी बसस्टॉपचा आधार घेतला होता. तेव्हातरी तिथे तोच मला एक आधार होता; कारण पंचवटीकडे जाणारी बस ही त्या थांब्यावर थांबूनच जाणार होती.
एखाद्या मुलाने भूक लागल्यावर जेवणाची वाट पहावी तशी मी त्या बसची वाट पाहत होतो. ढगातून गडगडाट वाढत चालला होता आणि जसा जसा गडगडाट वाढत होता पाऊस त्याच्या धारा त्याच वेगाने जमिनीवर कोसळत चालला होता. जणू तो जमिनीला दाखवून देत होता की तू कितीही प्रयत्न केले तरी तुला माझ्या छत्रछायेखालीच वावरावे लागेल.
कोण जाणे मनात चित्र-विचित्र कल्पना येत होत्या आणि तेवढ्यात स्वत:ची ओढणी सावरत एक तरुणी स्टॉपवर आली. माझे मन त्या बसची चातकाप्रमाणे वाट पाहत होते. मी त्या विचारात खूप मग्न होऊन गेलो होतो आणि मग पावसाचा वेग पुन्हा वाढत होता. ढग फुटावे अशी कल्पना मनात यावी असा तो जमिनीवर बरसत होता.
रस्त्यावर पडणाऱ्या पावसाच्या धारा आता माझ्या पायांना स्पर्श करू लागल्या होत्या आणि त्या पाण्यातील गारवा मला जणू थंड पाण्यात मी हळू हळू पाय टाकावा असा भ्रम करून देत होता.
पाण्याच्या धारा मात्र वाढत चालल्या होत्या आणि माझ्या बाजूला असणारी तरुणीसुद्धा माझ्याप्रमाणेच चिंतेने घायाळ झालेली दिसत होती. पाण्याची धार जशी वाढत होती तशी तिची भीती ही वाढत होती आणि त्यात ती स्वत:ला कसेबसे सावरत होती. तिची ही चाललेली कसरत मी स्वतःला सावरत पाहत होतो. अश्या परस्त्रीबद्दल कुतूहल होते, पण मी हताश होतो. मी तिला मागे होण्यास सांगितले. तिचा चेहरा मी अजून पाहिलेला नव्हता आणि तिने सुद्धा माझा चेहरा पाहिलेला नव्हता.
पाऊस मात्र आता हळूहळू कमी होत चालला होता आणि तो काही काळानंतर तो थांबूनच गेला. ढगसुद्धा पुढे सरकत चाललेले होते आणि पडद्याआड लपून जसे कुतूहलाने पहावे तसे सूर्य त्या ढगांमधून पाहत होता आणि झाडांमधून वाट सावरून जशी जंगलात किरणे धरतीला आलिंगन देण्यासाठी धाव घेत असतात, तशी ती किरणे जमिनीवर पडत होती.
निसर्गाचा एक वेगळा अवतार मी त्या दिवशी अनुभवत होतो आणि तो दृष्टीहीन करण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. अचानक वाऱ्याने वेग धरला आणि तो एका पतंगासारखा सैरावैरा धावू लागला. समोर जे काही येईल त्याला तो चिरून पुढे पळत चालला होता. तेवढ्यात धाडकन आवाज आला आणि त्या वाऱ्याने आमचे डोक्यावरील छप्पर स्वतःमध्ये विलीन करून घेतले आणि जांभूळ खाऊन त्याची बी कशी फेकावी तसे ते छत वाऱ्याने फेकून दिले.
या सर्व प्रकारामुळे ती तरुणी खूपच घाबरून गेली होती. तिचे अंग थरथरत होते. तेवढ्यात कानाजवळ जोरात कोणी ढोल वाजवावा असा कानाला भिन्न करणारा आवाज आला आणि पाहतो तर काय, समोरच्या झाडावर वीज कोसळली. तो आवाज इतका जबरदस्त होता की एका सर्पाने आपले भक्ष कसे सेकंदात पकडावे तसे त्या तरुणीने मला त्या आवाजाच्या भीतीने घट्ट मिठीत घेतले. तिची ती मिठी एवढी घट्ट होती की तिच्या हातातले कंगण माझ्या पाठीत रुतून गेले होते. ती खूप थरथरत होती आणि मी ते जाणवू शकत होतो. आमच्या डोक्यावरचे छप्पर उडून गेले होते.
सूर्याची किरणे आमच्यावर एखाद्या धबधब्याच्या झऱ्यासारखी ओसरत होती. पाऊस पुन्हा सुरु झाला होता. तो मंद गतीने आमच्यावर बरसत होता आणि या सर्वात त्या तरुणीला आपल्यापासून कसे लांब करावे हे मला उमजत नव्हते. तरीही मी मनाशी निष्ठा केली आणि सावरण्यासाठी मी तिच्या खांद्यांवर हात ठेवले आणि तिला हळुवारपणे लांब करण्याचा मानस केला.
तिला सावरताना नकळत माझी नजर तिच्या त्या निरागस चेहऱ्याकडे गेली. एखाद्या उमलणाऱ्या गुलाबावर उगवणाऱ्या सूर्याने कशी उष्णतेची पाझर सोडावी तशी त्या ढगांना भेदून ती सुवर्णकिरणे तिच्या चेहऱ्यावर पडत होती आणि त्या किरणांमुळे ती अगदी सकाळच्या सुर्योदयात फुले कशी न्हाऊन निघतात तशी ती न्हाऊन निघाली होती. तिच्या चेहऱ्यावरचे ते दवबिंदू एखाद्या संथ नदीवर पडणारे सूर्यकिरण जसे त्या शांत पाण्यावर मोती तयार करतात आणि ते मोती त्या पात्राची शोभा वाढवतात तशी ते तिच्या निरागस चेहऱ्याची शोभा वाढवत होते. तिचे डोळे जसे माजवून निघालेला समुद्र जसा शांत झाल्यावर चमकत असतो तसे ते पाणीदार डोळे चमकत होते आणि त्या शांत सागरात सूर्यराज कसा तेजोमय दिसतो तसे ते तिचे बुबुळ तेजोमय दिसत होते.
त्या डोळ्यांची शोभा वाढवावी तशी तिच्या भुवया होत्या. त्या इतक्या सुरेख होत्या की इंद्र देवाने जसा त्याचा सप्तरंगी धनुष्य पृथ्वीतलावर सोडावा तश्या त्या अर्धवर्तुळाकार. त्या भुवया आणि तिचे ओठ जसे नुकतेच तरुण वयात आलेला गुलाब जसा गुलाबी असतो तसे ते कोमल होते आणि ते ओठ जेव्हा बंद होत असे वाटे की सूर्य आणि जमिनीचे मिलन होत आहे.
त्या निरागस चेहऱ्यात एवढी शक्ती होती, की मी माझ्या डोळ्यांना तिच्या चेहऱ्यापासून सावरू शकत नव्हतो. माझी तेव्हा त्यांना सावरण्याची इच्छा पण नव्हती. तेवढ्यात एका शांत पाण्यात कोणी दगड मारून शांतता भंग करावी अश्या तिच्या आवाजाने माझ्या मनातल्या फुलपाखराला छेडले आणि मला सत्य परिस्थितीत आणले. ती जास्त काही न बोलता सॉरी म्हणून माझ्या पासून थोडी लांब झाली. मी तिच्याकडे जाणार तेवढ्यात आईचा आवाज आला उठऽऽ रे उठऽऽ किती झोपतोसऽऽ उठऽऽ गॅस संपलाय नंबर लावून दे उठ! आणि अशा स्वप्नाचा त्या दिवशी असा निर्दयी अंत झाला. !!