varsha sagdeo

Drama

3  

varsha sagdeo

Drama

मृत्यु शाप की वरदान

मृत्यु शाप की वरदान

3 mins
724


सकाळी वॉर्डात पोहोचताच छाती बडवून मोठ्या मोठ्याने रडणार्‍या विमलच्या आई-बाबांनी मला गाठले, असे कसे झाले हो मॅडम! आमची विमल गेली हो! त्या दोघांनाही काही तरी खरमरीत उत्तर द्यायची ऊर्मी दाबून, दोन मिनीटे त्यांचे सांत्वन केले. आणि वॉर्डात शिरले, सगळ्या औपचारिकता पूर्ण करून विमलची डेड बाॅडी सुपूर्द करायला सांगितले. 


विमल माझ्या मनातून जात नव्हती. पहिल्यावेळी माझ्या ओ.पी.डीत आली होती तो दिवस मला आठवला. साधारण पंचवीसीची चुणचुणीत नाकी डोळी नीटस अशी तिच्या आईबाबांबरोबर आली होती. तिच्या डाव्या स्तनात गाठ होती. कॅन्सर असण्याचे सर्व लक्षणे दिसत होती. मी तिला तशी शक्यता बोलून दाखविली. तिची प्रतिक्रिया मी आजही विसरले नाही. तिचा चेहरा उजळला, टाळ्या वाजवत म्हणाली चला, सुटले एकदाचे! कॅन्सरचे निदान आनंदाची बाब आणि मृत्युची चाहुल सुटकेची नांदी असावी, यापेक्षा मोठा विरोधाभास जीवनात काय असेल!


मी विमलच्या आई बाबांना सांगितले की विमलला भरती करावे लागेल आणि तिचे ऑपरेशन करावे लागेल. त्यांनी नकार दिला. जावईबापूला न सांगता आम्ही तिला दवाखान्यात आणले आहे. मी त्यांना समजावून सांगितले की, तुम्ही विमलला भरती करा आणि जावयाला बोलावून घ्या. पण ते काही ऐकायला तयार नव्हते. मी परोपरीने त्याना समजावण्याचा प्रयत्न केला. तुम्ही विमलच्या जीवाशी खेळतायत. आता ऑपरेशन करणे शक्य आहे, उशीर झाला तर तिचा कॅन्सर पसरेल आणि मग तिला वाचवणे कठीण जाईल. पण त्यांचा हेका कायम. पुढच्या आठवड्यात येतो म्हणून निघून गेले. विमलचा रडवेला चेहरा मला बधवत नव्हता. 


विमल सरळ एक वर्षानंतर आली. तिची सगळी रयाच गेली होती. तिचा कॅन्सर पूर्ण शरीरात पसरला होता. मी तिला भरती करून घेतले, आणि तिच्या आई-वडिलांना चांगलेच फैलावर घेतले. त्यांचे म्हणणे जावईबापूंनी ऑपरेशन करण्यास नकार दिला. मला तशी अर्धवट बायको नको. तुम्ही तिला नेहमी करीता तुमच्या घरी घेऊन जा. पोरीला सासरच्यांनी हाकलून दिले तर केवढा बोभाटा झाला असता. आमच्या इभ्रतीची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली असती.


मला काय बोलावे कळेना? पोटच्या पोरीच्या जीवापेक्षा यांना आपल्या इभ्रतीची चिंता होती. कसली इभ्रत आणि कसले काय? मिथ्याभिमान नुसता.. पण त्यात बिचाऱ्या विमलचा हकनाक बळी गेला.


विमलचा नवरा एकदाही दवाखान्यात आला नाही, कुठलीही मदत केली नाही. आम्हीच तिच्या किमोथेरपी रेडियोथेरपी आणि बाकीच्या औषधांची व्यवस्था केली. मधल्या काळात तिच्याशी संवाद साधला. आणि तिची करुण कहाणी कळली. विमल नागपूरात वाढलेली, बारावी झालेली अतिशय चुणचुणीत हुशार मुलगी. हुंड्या अभावी बाबानी एका खेडेगावात जेमतेम दहावी झालेल्या मुलाशी तिचे लग्न लावून दिले. तिचे सासर अतिशय रुढीचुस्त आतल्या खोलीतच रहायचे, कैक दिवस सूर्यप्रकाशचे दर्शन नाही. भरभरुन जगण्याचे स्वप्न डोळ्यातच विरले. दिवस आणि रात्र कामानी पिचून जायची. जेवणाचीही मारामार, पोटभर जेवण मिळाले तोची दिवाळी-दसरा. नवरा अतिशय रुक्ष आडदांड प्राणी, रात्री हिंस्रपशुसारखा तुटून पडायचा . लग्ना नंतरच्या ह्या छळाने ती पार कोलमडली होती. तशातच स्तनाच्या कॅन्सरचे निदान झाले. आता ऑपरेशन करून एक स्तन काढून टाकावे लागणार. हे कळल्यावर नवरा पिसाटला. तिला हाकलून देण्याची धमकीच दिली त्याने आणि तिचे आई बाबा ढेपाळले. तिला सासरी सोडून परतले.


विमलचा कॅन्सर पूर्ण शरीरात पसरला होता. ती आता फार जगणार नव्हती. मला वाटले जीवनाने एवढे छळले. निदान मृत्यू तरी शांतपणे यावा, म्हणून मी तिच्या कडून आर्ट ऑफ लिविंगचा कोर्स करुन घेतला. शेवटच्या दिवसी डांसिग मेडिटेशनमध्ये खूप नाचली ती. मला म्हणाली काय नाचला आहे जीव! आज माझे एक स्वप्न पूर्ण झाले. आता मी आनंदाने मरणाला सामोरी जायला तयार आहे. वयाच्या तिशीच्या आत तिचे आयुष्य संपले. एक कोवळी कळी उमलता उमलता कोमेजली. विमलला वाचवणे शक्य होते, निदान काही वर्षे तरी! विमलच्या मृत्यूला कोण जवाबदार? रुढार्थाने विमल हुंडाबळी नव्हती. तरीही ती हुंडा बळी नव्हती का? तिच्यासारख्या कैक विमल या ना त्या कारणानी मृत्यूमुखी पडताय. हुंडाबळी ठरताय. अत्याचारी सासरी मुलींना परत पाठविणारे आई-बाप ही तेवढेच दोषी नाहीत का? 


स्तन कॅन्सर आणि भावनिक ताणतणाव या "शोध प्रकल्पानी" माझ्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. उच्चभ्रू शिक्षित स्त्रीयांच्या वाट्याला अशी त्रासदी येत नाही हा गैरसमज ही दूर झाला. स्त्री ही स्त्रीच असते, सटवाइने तिचे नशीब एकाच काळ्या शाईने लिहिले असते. याची प्रचिती मला वारंवार यायला लागली. कोण म्हणतंय सीतामाई धरणीत सामावली! आजही असंख्य भूमीकन्या वनवास भोगताय. त्यांची वेदना निराळी आहे. त्याचा तथाकथित रामच त्यांचा आयुष्याचा रावण झाला आहे. मग त्यांच्या सुटके साठी यमराजालाच नाना अवतार धारण करावे लागतात. कधी कॅन्सर, कधी स्टोव भडकणे, कधी अपघात, तर कधी गळफास असे अवतार धारण करुन यमराजाला यावे लागते आणि या वेदनामय शापित जीवनातून त्यांची सुटका करावी लागते. जिवंतपणी मरण यातना सोसणाऱ्या या स्त्रीयांना म्हणूनच "मृत्यू वरदानच" वाटतो. इथे सुरेश भटांची ओळ आठवते.

"जगण्याने छळले मला मृत्युने तारले."


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama