मराठी राज्यभाषा दिन
मराठी राज्यभाषा दिन
"महाराष्ट्र आमचा धर्म आणि
मराठी आमची जात आहे...
मरणालाही जुमानत नाही,
शिव शंभूचा माथी हात आहे...
पोलादी छाती आणि
ताट आमचा कणा आहे...
मोडेल पण वाकणार नाही ,
महाराष्ट्राचा बाणा आहे".
सुमारे बाराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी जी भाषा रुजवली..
संत नामदेव, संत तुकाराम ,संत गोरोबा, कुंभार, संत सावता माळी, संत नरहरी सोनार, यासारख्या संतांनी जी भाषा जागवली ..
आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जी भाषा परकीय आक्रमणापासून वाचवली.. अन् कुसुमाग्रज मंगेश पाडगावकर पु .ल. देशपांडे , प्र.के अत्रे अशा साहित्यिकांनी भाषा वाढवली..
त्या मराठी भाषेचा गौरव दिन आज आपण साजरा करत असताना..
माझी मराठी भाषेविषयीची आत्मीयता, टिकवण्याची अस्मिता, मी माझ्या विचारातून जागवण्याचा प्रयत्न करीत आहे...
"माय मराठी, साद मराठी ,
भाषांचा भावार्थ मराठी,
बोल मराठी,चाल मराठी,
जगण्याला या अर्थ मराठी" ...
मराठी भाषा केवळ आपल्यासाठी एक भाषा नसून ममतेचे, वात्सल्याचे आणि संस्काराचे बोल आहेत.या संतांच्या महाराष्ट्रात माय मराठी ने आपल्यासाठी संस्कृती क्षेत्र उभारले आहे .आपल्याला व्यक्त होण्यासाठी शब्दांची उत्तम आरास आहे. या जगात स्वत:ला सिद्ध करून दाखवण्याची ताकत या मराठी भाषेत आहे.
महाराष्ट्रातील मराठी भाषा ही भारतातील अधिकृत भाषा 22भाषांपैकी भारतात जास्तीत जास्त बोलली जाणारी तिसऱ्या क्रमांकाची आहे.
आपले कवी कुसुमाग्रज म्हणजे विष्णू मामा शिरवाडकर यांचा आज 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो. कवी कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यात खूप मोठे योगदान आहे. ते कवी, लेखक, नाटककार ,ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहेत. कवी कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला ज्ञानभाषा बनवण्यासाठी अथक परिश्रम घेतल्यामुळे त्यांच्या कविता तरुण पिढीमध्ये स्फूर्ती निर्माण करतात.
अशा या मराठी साहित्यिकांच्या प्रतिभासंपन्न लेखणीने मराठी भाषा समृद्ध व संपन्न झाली असे आपले कवी कुसुमाग्रज यांच्यासाठी ही काव्यपंक्ती...
करून गेले मायबोलीला,
आमच्या अंतर्यामी होते.
मराठी मातीतील कुसुमाग्रज
शब्दसृष्टीचे स्वामी होते.
झालेत बहु आहेत ,बहु होतील बहु,
सारस्वत दिग्गज, नभोमंडपी तळपत राहील...
अजिंक्यतारा कुसुमाग्रज...
महापुरा सारखी नैसर्गिक आपत्तीओढवली असताना, अशा तरुणांना उभारी देण्यासाठी मार्मिक हृदय स्पर्शी ओळ मला आठवते...
मोडून पडला संसार,
तरी मोडला नाही कणा...
पाठीवरती हात ठेवून,
नुसतं लढ म्हणा...
अशी लढण्याची ऊर्मी देणारे कुसुमाग्रज मराठी माणसाच्या मनात कायम वसलेले आहेत.
तर आपली मराठी भाषा अनेक संतांच्या कीर्तनांनी, भारुडांनी, ओव्यांनी, भजनांनी अलंकृत झाली आहे.
थोर संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की,
"माझा मराठीची बोलू कौतुके
परी अमृतेही पैजासी जिंके
ऐसी अक्षरे रसिके मेळविन"!
मराठी भाषा अमृताला पैजेने जिंकणारी आहे. तीचा गोडवा अमृता पेक्षाही अधिक आहे.
"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी! जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म पंथ जात एक जाणतो मराठी !
एवढ्या जगात काय माय मानतो मराठी!"
प्राचीन काळी जेव्हा भाषेचा अविष्कार नव्हता, तेव्हा माणूस प्राणी व पशु-पक्षी सुद्धा सांकेतिक भाषेत आपले विचार एकमेकांना पोचवत होतो. तसं कालांतराने भाषेचा विकास झाला, वेगवेगळे अंतर पास करून वेगळ्या बोलीची भाषा बोलू लागलो. जिथे भाषा विकसित होते, तिथे सभ्यता व संस्कृतीचा इतिहास घडतो.
"माझ्या मराठी मातीचा लावा ललाटासी टिळा!
हिच्या संगे जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा!
रत्नजडित अभंग ओवी अमृताची सखी, सारी वर्णनातून फिरे सरस्वतीची पालखी!"
मराठी भाषा हा संस्कृतीचा वाहक आहे. परंपरेचा भाग आहे. ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होते .अर्थात आपली मराठी महाराष्ट्राची अस्मिता आपली जन्मभूमी स्वर्गाहून प्रिय असते. भाषेच्या
मराठी गोड या सर्व हजारो कलांनी नटलेला आपला महाराष्ट्र या ओळींना मानाचा मुजरा करतो..
लावणतल्या मस्तीची ..
पोवाड्यात पेटत्या वातीची..
अभंग ,ओवी, फटाक्याच्या गझलेची..
रंगल्या रातीची..
कवितेची, साहित्याची, लोककलांची जातीची...
माय मराठी आहे आमची,
आम्ही मुलं मराठी मातीची...
हिंदी भाषेचा योग्य तो मान राखून ,
इंग्रजी भाषा आत्मसात करून,
आपण मराठी भाषेचे झेंडा रोवायला हवा.
जर भाषा टिकली तर संस्कृती टिकते.. संस्कृती टिकली तर प्रगती होते..
तर आपली मायबोली टिकली तर दूरचित्रवाहिन्या, साहित्य, नाटक, चित्रपट संगीत यांना श्रोते व वाचक-प्रेक्षक लाभतील.
आजच्या या मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने आपण सर्व मराठी बांधव संकल्प करूयात...
मराठीतूनच बोलूयात...
मराठी पुस्तक वाचूयात...
मराठीतून लिहूयात...
मुलांना मराठी भाषा शिकवूयात ...
अन माय मराठीची पांग फेडूयात..
मराठी ची फक्त आपली भाषा नाही, तर मराठी आपली एक मात्र आशा आहे...
!जय हिंद जय महाराष्ट्र!
