मोहिनी
मोहिनी
सकाळच्या लगबगीतही आलेला फोन मोहिनीने उचलला, बोल गं वैशु, काय झालं..?
वैशु म्हणाली, अगं,प्रशांतचा अपघात झालाय, गंभीर आहे तो.... डॉक्टरने त्याला 24 तासांची मुदत दिलीय..!
तिला धक्काच बसला ती मटकन खाली बसली. मुलगा म्हणाला, आई काय झालं? चक्कर येतीय का?"
ती "हो"म्हणाली. मुलाने आणून दिलेलं पाणी प्याली आणि निघाली.
मोहिनी नावाप्रमाणेच सुंदर... वय 38 वर्ष. तिला एक तेरा-चौदा वर्षांचा मुलगा. पण जणू वयासोबत तिचं सौंदर्यही वाढू लागलं होतं. ती शाळेत निघाली होती.
तिला लग्नातली प्रशांतची पहिली भेट आठवली. उंच, गोरापान, देखणा... मोहिनीची मोहिनीच पडली होती त्याला.. सारखं तिच्या मागं फिरत होता अन ती त्याचा राग करत होती.
खूप प्रयत्न करून शेवटी त्याने तिला गाठलंच. तो एक दिवस कॉलेजसमोर हजर.. तिने पाहून न पाहिल्यासारखं केलं तर जवळ येऊन म्हणाला, मोहिनी ss एक मिनिट प्लिज!
ती थांबली. तो म्हणाला, मोहिनी.. तू आवडलीयेस खूप.. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.. मला लग्न करायचंय तुझ्याशी!
ती शांतपणे त्याला म्हणाली, प्रशांत, मला असल्या फंदात पडायचं नाही. तू माझा नाद सोड.
ती निघून गेली.. हा मोठ्याने म्हणाला, मी वाट पाहतोय तुझी!
ती दुर्लक्ष करे.. त्याची दिवानगी वाढत चालली होती.. एक दिवस एक छोटा मुलगा तिच्याजवळ आला नि म्हणाला, ताई, प्रशांत दादाने तुझं नाव कोरलंय हातावर..!
ती म्हणाली, कशाने?
तो, गरम चाकूने...
ती स्तब्ध झाली नि मुलाला सांगितलं, तुझ्या दादाला मंदिरात यायला सांग.
तो लगेच आला. एकदम शांत खाली मान घालून तिच्या समोर उभा राहिला. ती म्हणाली, प्रशांत, मी हे काय ऐकतीय?
तिच्या तोंडून स्वतःचं नाव ऐकून तो मोहरला. त्याने हात लपवला. ती जवळ येताच त्याची धडधड वाढली. ती म्हणाली, प्रशांत, हात दाखव.
त्याने हात पुढे केला. तिने हातात हात घेऊन पाहिलं, खरंच.. रक्ताळलेला काळ्या निळ्या अक्षरात त्याच्या हातावर आपलं नाव पाहून तिच्या डोळ्यात अश्रू आले.. त्याची कॉलर पकडली दोन्ही हाताने नि रडक्या आवाजात म्हणाली, वेडा आहेस का तू? असं का केलंस?
असं केल्याने तू माझ्या एवढी जवळ येणार असशील तर मला मरणही आवडेल तुझ्या सान्निध्यात, तो म्हणाला.
खरंच असं वागू नको रे. मला त्रास होतो.
तू माझ्यावर प्रेम करत नाहीस पण मला तुझ्यावर प्रेम करण्यापासून तू पण थांबवू शकत नाहीस, तो म्हणाला.
तिनं त्या जखमेवर ओठ टेकले. तो म्हणाला, वेदना पळून जातील आता. तो निघून गेला. सगळीकडे या गोष्टीची चर्चा सुरु झाली. त्याच्या घरी त्याच्या बाबांनी त्याला धमकावलं, त्या गरीब पोरीचा नाद सोड.
पण काही फरक पडला नाही. तिला विसरणं त्याला शक्यच नव्हतं. तो तिच्या बाबांना भेटला, पण ते म्हणाले, तुझ्या आई बाबांना घेऊन ये, मग आपण बोलू.
तो त्याच्या व
डिलांना घेऊन परत आला नाही. दरम्यान, मोहिनीच्या वडिलांनी तिचं लग्न ठरवलं. लग्नाच्या आदल्या दिवशी प्रशांतने विष घेतलं होतं आणि तो दवाखान्यात होता. ती मनात हळहळत राहिली. तो वाचला होता.
बऱ्याच वर्षांनी तिच्या नवऱ्याची बदली याच शहरात झाली. ती इथे राहायला आली, नोकरी करू लागली. प्रशांत मोठा बिल्डर झाला होता, पण अविवाहित आहे.. हे तिला समजलं.. तिने वैशुकडून त्याचा नंबर घेतला नि तिच्याच नावे सेव केला. त्याला कधी कॉल केला नाही पण एकदा योगायोगाने वैशुला म्हणून फोन लावला नि म्हणाली, अगं वैशु, तू ये ना माझ्या घरी.. आपण मिळुन जाऊया मार्केटला..
तिकडे शांतता..
ये ss दातखीळ बसली का.. सांग नं!
तिकडून आवाज आला, मोहिनी, हा वैशुचा नंबर नाही!
आणि फोन कट. तो आवाज दोघेही विसरले नव्हते. त्याचा recall.
तुझा आवाज अजिबात बदलला नाही, अगदी तसाच आहे.
ती, तुझाही.. तसाच आहे.
तो, छान वाटलं तुझा आवाज ऐकून. माझा नंबर कुठून मिळाला?
वैशुकडून नं! काळजी करू नको त्रास देणार नाही तुला. तुझी इच्छा झाली तर बोलत जा.
त्याने फोन ठेवून दिला. त्यानंतर थोडासा मैत्रीपूर्ण संवाद होऊ लागला. तुझा संसार सांभाळ, असं तो म्हणायचा.
अचानक तिला मंदिरात पाहून चेहऱ्यावर आनंद झाला. जुजबी बोलणं झालं.
ती म्हणाली, लग्न का केलं नाहीस?
तो, तू भेटली नाहीस नं!
दुसऱ्या माझ्यापेक्षा सुंदर मुली होत्या की, ती म्हणाली.
तो, दुसरीचा विचार कधी कोणी केलाय. असो. सोड विषय. अजूनही सुंदर दिसतेस की!
ती हसली नि म्हणाली, तू पण हँडसम दिसतोस रे..!
दोघेही हसले नि निघून गेले.
तिचा वाढदिवस होता. ती तयार होऊन शाळेत आली तर शाळेसमोर तो हजर..! ती म्हणाली, तू इथे?
हो, तुला गिफ्ट द्यायला आलो तुझा वाढदिवस नं.!
तिनं ते घेतलं नि ठेवून दिलं पर्समध्ये. संध्याकाळी ती घरी आल्यावर पाहिलं तर त्यात सुंदर लाल रंगाची साडी होती. त्यावर एक चिट्ठी..
तू ही साडी नेसलेला फोटो काढून मला पाठव. तुला कधीच काही मागणार नाही..!
तिने छान तयार होऊन फोटो काढून त्याला पाठवला. त्याने उत्तर दिलं, डोळ्याचं पारणं फिटलं!
हे सर्व काल घडलं नि आज सकाळीच हे काय घडलं?
तिला का अपराधी वाटत होतं..? ती गेली त्याला भेटायला दवाखान्यात.. तो बेशुद्ध होता ती त्याच्या जवळ गेली, प्रशांत.. प्रशांत.. अरे का असा जीवावर उदार होतोस.. उठसुठ..! माझ्या वाढदिवासाचं असं गिफ्ट देणारेस का मला..? नकोय हे.. तू आधीसारख्याच attitude मध्ये हवा आहेस..
असं म्हणत असताना तिच्या डोळ्यात पाणी, आवाजात प्रेम.. ओत:प्रोत भरलं होतं. तिनं जवळ जाऊन त्याच्या कपाळावर ओठ टेकले नि अचानक तो शुद्धीवर येऊन तिच्याकडे पाहू लागला. तिला आनंद झाला तिने त्याचा हात हातात घेतला.त्याला जीवन 'मोहिनी' घालत होतं.