मनी प्रीत जागे..
मनी प्रीत जागे..
आजचा दिवस हा विराजसाठी कधीही न विसरता येण्यासारखा आहे. कारण आज एक वर्षापूर्वी त्याने त्याचं प्रेम गमावलं होतं. त्याला ह्या जन्मी प्रियाला परत मिळवण्याची शक्यता खूप कमी वाटत होती, पण त्या दोघांमध्ये नव्याने आणि तीच्या नकळत झालेली मैत्री त्याला कायम टीकऊन ठेवायची होती.
विराजला आज ऑफिसला जायची तयारी करत असताना सारखे ते जुने दिवस आठवत होते.
...
त्या दिवशी ऑफिस मधून आईने लवकर घरी बोलावून घेतले. तेव्हा घरी येताना राहून राहून सारखे मनात विचार येत होते. आजच लवकर घरी का बोलावले असेल? घरच्यांचे माझ्याकडे इतके काय महत्त्वाचे काम असेल. माझ्यासाठी काही ' सरप्राइज ' तर नसेल? आणि मग घराच्या खूप जवळ आल्यावर वाटले की आजपर्यंत माझ्या लग्नाचा विषय घरच्यांनी कधीच माझ्या समोर काढला नाही. पण आता मी स्वतःच्या पायावर उभा राहिलो, कमावता झालो म्हणून घरचे माझ्या लग्नाचा विचार तर करत नाहीये?
मी घरी आल्यावर आत जाण्याआधी दरवाजा थोडा उघडून आत काय वातावरण ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो. तेव्हढ्यात आईने मला आत डोकावताना पाहिले.
"अरे विराज..... असा बाहेरच काय उभा राहिलास.... आत ये."
आई असं म्हणाल्यावर सर्वांची नजर माझ्याकडे वळली. मी आत आल्यावर पाहिले तर राजू मामा आणि मामी आलेल्या होत्या. मी त्यांची विचारपूस करून 'फ्रेश ' होण्यासाठी बेडरूम मध्ये जात होतो., तेव्हा प्रिया मला सर्वांसाठी चहा घेऊन जातांना दिसली. किती वर्षांनंतर तिला बघत होतो. लहानपणी तिच्यासोबत भातुकली खेळायचो. पण जसजसा मोठा होत गेलो तसतसे मामाच्या गावी जाणे कमी होत गेले. तिचा विसर पडू लागला होता आणि आज अशी अचानक भेट झाली.
मी फ्रेश होऊन आल्यानंतर सर्वांसोबत येऊन बसलो. गप्पा मारत असतांना मधून मधून मामी माझी चेष्टा करत होत्या. मामांनी अचानक विषय बदलला.
"काय रे विराज....मी तर ऐकले खूप व्यस्त असतोस तू हल्ली.... इतका की आमची आठवण काढायला सुद्धा तुला वेळ नसतो."
"मामा अहो... तस काही नाही."
मी तुटक शब्दातच बोललो. कारण मी खरंच कामात इतका व्यस्त असायचो की कुणाची आठवण काढायला सुद्धा मला वेळ नसायचा.
"विराज प्रियाला जरा बाहेर बागेत फिरायला घेऊन जा. केव्हापासून कंटाळली असेल."
आई म्हणाली.
"प्रियाला सांभाळा..... एकुलती एक मुलगी आहे आमची."
आम्ही बागेत जायला निघालो तोच मामी म्हणाल्या. सर्वजण हसू लागले.
मामींच्या बोलण्याचा अर्थ प्रियाला जरी समजला नसला तरी मला बरोबर समजला होता.
आम्ही बागेत गेल्यानंतर खूप गप्पा मारल्या. विषयामाघून विषय निघू लागले. मी मध्येच विनोद करायचो, हसतांना किती छान दिसत होती ती. तिच्याकडे बघत रहावस वाटत होतं. तेव्हढ्यात मला ऑफिसमधून एक कॉल आला.
"सॉरी प्रिया.... मला आत्ताच्या आत्ता ऑफिसमध्ये जावं लागेल. एक खूप महत्त्वाचं काम आहे."
"विराज मला तुझ्याशी थोडं बोलायचं होत. तुझा थोडा वेळ देशील मला?"
"सो सॉरी प्रिया.... पण खूप अर्जंट काम आहे. नाहीतर मी"
"अरे.... इट्स ओके.... तू जा. आपण बोलू नंतर."
माझं वाक्य अर्ध्यावर तोडत एखाद्या समजदार मुलीसारखं प्रिया म्हणाली. तिचा निरोप घेऊन मी ऑफिसला जायला निघालो. ती मात्र मी तिथून दिसेनासा होईपर्यंत तिथेच उभी राहिली.
संध्याकाळी ऑफिस मधून थकून घरी आलो. सोफ्यावर निवांत बसलो. तेव्हढ्यात प्रिया माझ्यासाठी पाणी घेऊन आली.
"प्रिया तू..... मामा, मामी कुठंय?"
"आई बाबा दुपारीच घरी गेले."
"अरे विराज मीच म्हणाले तिला की अनायासे आली आहेस तशी काही दिवस रहा."
आई म्हणाली.
प्रिया काही दिवस इथे राहणार हे माझ्यासाठी अनपेक्षितच होते. पण का कुणास ठाऊक मनोमन सुखवलोही होतो.
रोज माझा सकाळचा आणि संध्याकाळचा काही वेळ तिच्या छान सहवासात जाऊ लागला. सकाळी तिच्यासोबत गप्पा मारताना ऑफिसला जवेसेच वाटेना. ऑफिसमध्ये असलो की घरी कधी जाईल असं व्हायचं. तिची सवयच झाली होती जणू. या सगळ्यात मात्र माझे कामाकडे दुर्लक्ष होऊ लागले. मन तिच्याकडे धाव घेत होते. पण बुध्दीला हे पटत नव्हते. आणि अखेर ह्या बुध्दीच्या आणि मनाच्या खेळात मात्र बुधीचाच विजय झाला. मी तिच्याशी खूप कमी बोलू लागलो. तिच्याकडे दुर्लक्ष करू लागलो. हे तिच्याही लक्षात आले होते. तिला कदाचित हे सहन झाले नाही.
"विराज..... अ... अरे तू असं... मला तुझ्याशी...."
"प्रिया बोल ना पटकन उशीर होतोय मला."
"तू.... आज रजा घेऊ शकतो?"
"नाही अगं.... तुझ काही काम असेल तर बाबांना सांग."
मी तिच्याकडे न बघता बोललो. ती काहीही न बोलता तिथून निघून गेली. मी तिच्याकडे दुर्लक्ष करून ऑफिसला निघून गेलो.
संध्याकाळी घरी आल्यानंतर बऱ्याच दिवसांनी प्रियाऐवजी आई माझ्यासाठी पाणी घेऊन आली.
"आई.... प्रिया कुठं गेली गं."
"अरे ती दुपारीच गावी गेली. तुझे बाबा गेले होते तिला सोडायला. तिने सकाळी सांगितले नाही का तूला?"
आईच्या ह्या प्रतीत्युराने मी खूप अस्वस्थ झालो. इतका की माझे चेहऱ्यावरचे भाव समोरचा पाहताक्षणी ओळखू शकेल आणि तसे झालेही.
"काय रे विराज? कुठे हरवलास?"
"अ... नाही..... काही नाही आई."
असं म्हणून मी बेडरूममध्ये निघून गेलो.
आयुष्यात पहिल्यांदाच कुणाचीतरी उणीव भासत होती. ती अशी न सांगता निघून गेली ह्या गोष्टीचे खूप वाईट वाटत होते. तिची खूप आठवण येत होती. रात्री झोपही नीट आली नाही. डोळ्यासमोर सारखा तिचाच चेहरा यायचा.
दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला जायला निघालो.
"थांब विराज.... तुझ्याशी थोडं बोलायचं होतं.... ये इथे बस."
बाबा म्हणाले.
"मला उशीर होईल. मी ऑफिस मधून आल्यावर बोलू आपण."
"उशीर......? अरे उशीर होऊ नये म्हणूनच तर आज थांबवतोय तुला."
"बाबा तुम्ही काय बोलताय मला काहीच समजत नाहीये."
बाबांच्या बोलण्याचा अर्थ मला बरोबर समजला होता पण न समजल्यासारख मी म्हणालो.
"तुला सर्व काही बरोबर समजतंय पण उमजून मात्र काहीच घ्यायचं नाही."
आई म्हणाली.
"आई तू पण..."
"अरे आई वडील आहोत आम्ही तुझे. तुझ्या मनातल आम्ही नाही ओळखायचं तर मग कुणी?"
आई असं बोलल्यावर मी थांबलो. ते दोघे जे बोलतील ते शांतपणे ऐकत राहिलो. मी प्रियासोबत लग्न करावं अशी त्यांची इच्छा होती. आई बाबांनी पहिल्यांदाच माझ्याकडे काहीतरी मागितले होते., त्यामुळे मलाही नकार देता आला नाही. विषय राहिला होता तो प्रियाचा. ती इथे असताना मी तिच्यासोबत काही दिवस चांगलं वागत,बोलत नव्हतो. त्यामुळे ती मला नकार देईल असे वाटत होते, पण तिने कुठलीही अट न ठेवता लग्नाला चटकन होकार दिला.
काही महिन्यांनी आमचे लग्न झाले. आता तर ती माझीच झाली होती. ती आहे, ती इथेच आहे, ती इथेच असेल. असं समजून मी तिला गृहीत धरू लागलो. तिचा नवरा असूनही मी तिचा कधीच विचार केला नाही. सारखा ऑफिसच्या कामात व्यस्त असायचो. छोट्या छोट्या कारणांवरून तिला रागवायचो. चार शब्द कधी तिच्याशी सुखाचे मी बोललो नाही पण ती मात्र नेहमी माझाच विचार करायची. मी तिच्याशी कसाही वागलो तरीही ती माझ्याशी चांगलच वागायची. कधी मी चिडलो, रागावलो तर शांतपणे ऐकून घ्यायची. कुठलीच तक्रार तिने केली नाही. नेहमी समोरच्याला समजून घ्यायची. आपलं दुःख विसरून घरातलं वातावरण आनंदी ठेवायची.
तिचा हाच समंजसपणा, निस्वार्थीपणा मनी प्रीत जागवू लागला होता. मी तिच्या प्रेमात पडलो होतो पण तिला हे सांगताही येत नव्हते. कारण तिला माझ्या ह्या अश्या वागण्याची सवय झाली होती.
एक दिवस थोडा वेळ काढून तिच्याजवळ व्यक्त व्हायचे ठरवले. त्या दिवशी सकाळी मी ऑफिसच्या काही फाईल्स वाचत होतो. ती माझ्यासाठी चहा घेऊन आली आणि तिच्याकडून चहा माझ्या फाईल्सवर सांडला. मग मी तिला नाही नाही ते बोललो. त्या वेळी मला तिच्यापेक्षा माझ्या साफाईल्स महत्त्वाच्या वाटल्या. तिला काय वाटेल याचा मी एकदाही विचार केला नाही. मी तिला इतके बोलत होतो तरीही ती सहन करत होती. मला तिच्या डोळ्यांतले अश्रू पाहून सुध्दा तिची दया आली नाही. त्या दिवशी माझी खूप चिडचिड झाली. जेवणाचा डबाही घरीच विसरलो. दुपारी जेवणाची वेळ झाल्यावर हे लक्षात आले. तेव्हढ्यात आईचा कॉल आला. तेव्हा मी कुणाशीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतो. मी आईचा कॉल कट केला. मग तिने काही वेळाने पुन्हा कॉल केला. तो मी घेतला मी काही बोलायच्या आत तिकून रडण्याचा आवाज आला.
"हॅलो.... आई ..... आई.... तू का रडतीये..... काय झालं?"
"विराज आपली..... आपली प्रिया......"
आईने रडतांना अचानक प्रियाचे नाव घेतल्याने मी घाबरलो.
"प्रिया....! प्रियाला काय झालं.... बोल ना आई... तू काही बोलत का नाहीस?"
माझे डोळे भरून आले. इतक्यात बाबांनी आईकडून फोन घेतला.
"हॅलो विराज.... तू आत्ता जिथे असशील तिथून लगेच सिनर्जी हॉस्पिटलमध्ये ये."
असं म्हणून बाबांनी कॉल कट केला. मी मात्र विचारात पडलो. मी सकाळी तिच्यावर चिडलो, रागावलो म्हणून तिने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न तर केला नसेल? एकतर आधीच माझ्यामुळे ती खूप सहन करत होती ह्या सगळ्याला कंटाळून तिने हा मार्ग तर निवडला नसेल? ह्या विचाराने मी चिंतेत पडलो होतो.
ऑफिसमध्ये कुणालाही न विचारता धावपळ करत सिनर्जी हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. आई. सी. ओ. समोर बाबा आईला सावरतांना दिसले. मी धावत त्यांच्या जवळ गेलो. त्या दोघांना सावरत असतांना माझे आय. सी. ओ. मध्ये लक्ष गेले. तेव्हा तिथे प्रियाला रक्तबंबाळ झालेले पाहून माझे डोळे फिरले आणि मी जमिनीवर कोसळलो.
शुध्दीवर आल्यानंतर बेडवरून उठायचा प्रयत्न करत होतो तेव्हा बाबांनी रोखले.
"बाबा जाऊद्या मला..... मला प्रियाकडे जायचय...."
"विराज शांत हो..... अरे तूच जर असा खचून गेलास तर आम्ही कुणाकडे पहायचं."
"पण बाबा.... हे कसं झालं बाबा.... प्रियाचे ही अवस्था कशी झाली."
"तुला ऐकायचय ना.... की तिची ही अवस्था कशी झाली तर मग ऐक....
तू सकाळी चिडचिड करून ऑफिसला निघून गेलास आणि तुझ्या जेवणाचा डबा घरीच विसरलास. म्हणून मी तुझ्यासाठी जेवणाचा डबा घेऊन तुझ्या ऑफिसमध्ये निघालो. तेव्हा प्रिया म्हणाली की मी जाते डबा घेऊन. म्हणजे विराजची माफीही मागता येईल. मी तिला म्हणालो की त्याची काहीही गरज नाहीये. मीच जातो आणि चांगले कान उपटतो त्याचे, पण तिने काही माझे ऐकले नाही. ती स्वतः तुझ्यासाठी डबा घेऊन गेली. ती घरातून बाहेर पडल्यावर काही वेळाने मला तिने कॉल केला.
"हॅलो मामा मला घरी यायला कदाचीत थोडा उशीरच होईल. तुम्ही आणि आत्या जेवण करून घ्या."
इतकंच बोलली आणि कॉल कट केला.
काही वेळानंतर पुन्हा मला तिच्या नंबरवरून कॉल आला.
"अगं प्रिया किती काळजी करशील...... बघ आत्ताच झालं आमचं जेवण."
मला वाटलं तिने आमचं जेवण झालं की नाही हे विचारायला कॉल केला असेल. म्हणून मी कॉल घेतल्या घेतल्या म्हणालो.
"हॅलो....हॅलो.."
तिच्या फोनवरून एका माणसाचा आवाज येत होता.
"हॅलो आपण कोण बोलताय?"
"ते महत्त्वाचं नाही. इथे एक अपघात झाला आहे. ज्यांचा अपघात झाला आहे त्यांच्या फोनमध्ये पहिल्यांदाच मला हा नंबर दिसला. म्हणून मी तुम्हाला कॉल केला."
नंतर त्या माणसाने मला पत्ता दिला. ह्या सगळ्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. पण प्रियाची खूप काळजी वाटत होती. म्हणून त्या माणसाने दिलेल्या पत्त्यावर मी तुझ्या आईला घेऊन पोहोचलो.
रस्त्यावर खूप गर्दी जमली होती. ती बाजुला करत आम्ही तिथे गेलो. आणि पाहिले तर रस्त्यावर रक्तबंबाळ होऊन पडलेली आपली प्रियाच होती. तिला ह्या अवस्थेत पाहून तुझ्या आईने खूप आरडा-ओरडा केला. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आजूबाजूला उभे असलेले लोक फक्त बघत होते. कुणीही आमच्या मदतीला आले नाही. मग ज्या माणसाने आम्हाला कॉल करून बोलावले होते तो देवासारखा तिथे अँब्युलन्स घेऊन आला. आम्ही प्रियाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना तुला कॉल केला होता.
हॉस्पिटलमध्ये आल्यावर तो माणूस तिथून निघून गेला. काही वेळाने तू तिथे आला आणि प्रियाला पाहून तू बेशुद्ध झालास आणि आत्ता शुध्दीवर आला आहेस."
बाबांनी घडलेला सर्व प्रसंग सांगितला.
"बाबा..... आई कुठे दिसत नाही?"
"ती प्रियाजवळ थांबलीय."
"आता कशी आहे प्रिया? डॉक्टर काय म्हणाले?"
"डॉक्टर म्हणाले की प्रिया जर लवकरात लवकर शुध्दीवर आली नाही तर..."
"तर....? तर काय बाबा? नाही..... काहीच होणार नाही माझ्या प्रियाला.... प्रिया.... प्रिया..."
भावनेच्या भरात मी हाताला लावलेले स्लाइन काढून
प्रियाला हाक मारत बाहेर धाव घेऊ लागलो. सर्व मला रोखण्याचा प्रयत्न करत होते पण मला कसलेही भान नव्हते. मी धावत आय. सी. ओ. पर्यंत आलो. तिथे मला हताश झालेली आई दिसली. मी तिथे गेलो आणि तिला मिठी मारली. दोघेही खूप रडत होतो. इतक्यात तिथे राजू मामा आणि मामी आल्या. ते बिचारे स्वतःचे दुःख विसरून आम्हाला सावरत होते. तेव्हा मला खूप अपराध्यासारखे वाटत होते.
काही वेळाने आय. सी. ओ. मधून एक नर्स डॉक्टरांना हाक मारत धावत बाहेर येत होती. आम्ही खूप घाबरलो. तिने डॉक्टरांना बोलावून आणले आणि आत जाऊन डॉक्टर काही वेळातच परत बाहेर आले.
"काय झालं डॉक्टर? म्हणजे घाबरण्यासारखं नाही ना काही?"
मामांनी शांतपणे विचारले.
"नाही... उलट त्या शुध्दीवर आल्या आहेत."
डॉक्टर असं म्हणाल्यानंतर आमच्या जीवात जीव आला.
"आम्ही भेटू शकतो का तिला?"
"हो नक्कीच. पण एक अडचण आहे. त्या आता पूर्णपणे बऱ्याही होतील पण त्यांच्या डोक्याच्या मार लागल्यामुळे बराच वेळ मेंदूची एक नस बंद पडली होती. त्यामुळे त्यांना काही आठवेल असं वाटत नाही. म्हणजे त्या तुमच्यापैकी कुणालाही ओळखतील असं वाटत नाही.खरतर त्या इतक्या मोठ्या धोक्यातून वाचल्या हेच खूप आहे. एक्स्युज मी."
असं म्हणून डॉक्टर तिथून निघून गेले. आम्ही सर्व जण प्रियाकडे गेलो. पण आमच्यापैकी तिने कुणालाही ओळखले नाही. आम्ही तिला बोलते करण्याचा खूप प्रयत्न केला पण ती मात्र अनोळख्यासारखं आमच्याकडे बघत होती.
काही दिवस प्रिया हॉस्पिटलमधेच होती. तिच्याजवळ कधी आई, बाबा तर कधी मामा, मामी थांबायचे. मी रोज ऑफिसला जाताना आणि तिकुन येतांना तिला भेटायला जायचो. कधी कधी ऑफिसला रजा घेऊन मी तिच्या जवळ थांबायचो. जेवण करतांना तिला स्वतःच्या हाताने भरवायचो. तिच्या ह्या शांत राहण्याने आणि अनोळख्या सारखं माझ्याकडे बघितल्याने मला खूप त्रास व्हायचा. पण हळू हळू सवय झाली होती. मी तिला बोलते करण्याचा प्रयत्न करायचो. ती कधी कधी एखादा शब्द जरी माझ्याशी बोलली तरी मला खूप आनंद व्हायचा मग हाच आनंद चेहऱ्यावर घेऊन मी ऑफिसला जायचो. तिच्या सोबत असल्यावर तिला पुस्तक वाचून दाखवायचो. दिवसभर तिची करमणूक करायचो. रात्री तिच्या बेड शेजारच्या बाकावर झोपायचो.
हळू हळू आमच्यात एक छान मैत्रीचं नातं तयार झालं.
काही दिवसांनी डॉक्टरांनी प्रियाला घरी घेऊन जाण्याची परवानगी दिली. मग ह्याच मैत्रीच्या विश्वासावर मी तिला घरी घेऊन आलो. ती आता पूर्णपणे बरी झाली ह्या समाधानाने काही दिवसांनी मामा मामी गावी परतले.
मी ऑफिसला निघाल्यावर प्रिया रोज त्याच बागेपर्यंत माझ्या सोबत यायची आणि मी तिथून दिसेनासा होईपर्यंत तिथेच उभी राहायची.
...
आज बरोबर एक वर्ष झाले. ती सर्व विसरली पण तो कधीच विसरू शकत नाही. तिलाही आणि आजचा हा दिवसही. आजही ती ऑफिसला जाताना बगेपर्यंत त्याच्या सोबत आली.
"विराज मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. तुझा थोडा वेळ देशील मला?"
आज पुन्हा तिने तोच प्रश्न केला जेव्हा ते दोघे लग्नाआधी पहिल्यांदा ह्या बागेत आले होते आणि विराज तिचे काहीही न ऐकता तिथून निघून गेला होता. त्याला ती चूक पुन्हा करायची नव्हती.
"अगं असं विचारतेस काय... बोल ना.."
तो सहजच म्हणाला.
"मी हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा कधी कधी तू माझ्या जवळ थांबायचा. दिवसभर माझी काळजी घ्यायचा आणि रात्री माझ्या बेडजवळच्या बाकावर झोपायचा. तेव्हा एकदा तू झोपेत बोलला होता."
"काय? अगं पण मी कधीच झोपेत बडबडत नाही. हा तेव्हा थकलो असेल म्हणून असं झालं असेल...... काय बोललो होतो गं मी झोपेत?"
"तू झोपेत तुझ्या मनातलं सगळं बोलला होतास. आता ते मनातलं म्हणजे नक्की काय हे तुला चांगलच माहितीये वीराज."
विराज झोपेत जे बोलला होता तेच त्याने जागेपणी बोलावं, व्यक्त व्हावं म्हणून प्रिया प्रयत्न करत होती.
" काही पण हं प्रिया..... माझ्या मनात नाहीय काहीच."
विराज म्हणाला.
खरतर त्याला खूप बोलायचय तिच्याशी पण तिच्यासमोर काहीच बोलता येत नव्हतं.
" विराज प्लीज...... ठीक आहे... तुला नसेल सांगायचं तर नको सांगू पण मला तुझ्याशी खूप बोलायचय. खूप दिवसांपासून तुला काहीतरी सांगायचंय पण कसं सांगावं हेच कळत नव्हतं."
"अगं असं काय करतेस. आपल्यात इतकी घट्ट मैत्री आहे बिनधास्त बोलयला हवं."
" विराज आपलं लग्न झालं होतं ही गोष्ट आजपर्यंत मला खूप जणांनी सांगून झाली, पण मला अजूनही काहीच आठवत नाही., पण अरे तुला एखाद्या दिवशी जरी ऑफिसवरून यायला उशीर झाला तरी जीव वरखाली होतो माझा. ही फक्त मैत्री नाही असू शकत रे."
"म्हणजे....?"
"मी फक्त एक वर्षापासून तुझ्या सहवासात आहे,पण मला तुझा हा सहवास आयुष्यभरासाठी हवाय. विराज मी...... मी प्रेमात पडलेय तुझ्या."
प्रियाने विराजला मिठी मारली. मग तोही व्यक्त झाला. तिचे आनंदाश्रु त्याच्या खांद्यावर ओघळले. ती बाग, रंगबिरंगी फुले, फुलपाखरे जणू त्यांच्यात सहभागी झाले होते. विराजने त्याचं गमवलेल प्रेम त्याला परत मिळालं होतं कारण प्रियाच्या मनी पुन्हा प्रीत जागली होती.
!!समाप्त!!

