STORYMIRROR

Komal Patil

Tragedy Classics Fantasy

2  

Komal Patil

Tragedy Classics Fantasy

येसा (प्रेमकथा)

येसा (प्रेमकथा)

6 mins
66

  काही महिन्यांपूर्वीच त्याने एकदा तिला गडावर पाहिले आणि पाहता क्षणी त्याला ती खूप आवडली. त्याने पहिल्यांदा तिला पाहिले ते तिच्या काही सख्यांसोबत गडावरच्या तळ्याकाठी. त्यासर्वजणी मध्ये ती एकटी अगदीच उठून दिसत होती. गोरी पान, हनुवटीवर शोभणारं लहानसं गोंदण, टपोरे डोळे, हसरा चेहरा तिचे हे देखणे रूप त्याला भाळले तर होतेच, पण हळूहळू तिचे आणखी एक रूप उलगडत गेले. हे रूप तर आणखीच साजरे होते. तिच्या मनाचा मोठेपणा..! कुणाच्याही मदतीला चटकन धाऊन जाण्याचा तिचा स्वभाव यामुळे तो तिच्या प्रेमात पडला. त्याने तर मनोमन तिला आपली सहचारिणी मानले सुध्दा. 

त्याच्या मनातले तिच्यासमोर व्यक्त करायचे त्याने अनेकदा ठरवले पण तिला आवडेल की नाही ह्या भीतीने त्याने तिला कधीच काहीच सांगितले नाही. त्याने तिला दुरूनच पाहिले तरी त्याला खूप समाधान वाटायचे. ओठावर स्मित आणि चेहऱ्यावर वेगळीच चमक यायची. तिला बघितले की त्याचा संपूर्ण दिवस चांगला जायचा. तो दुरूनच तिला पाहायचा. पण तिने कधीच त्याच्याकडे पाहिले नाही. त्यामुळे तिच्या मनात नेमके काय आहे हेच त्याला कळत नव्हते. एकतर त्याला तिच्याबद्दल काहीच माहीत नव्हते. तिच्या सोबतच्या दास्या, सख्या तिला तारा म्हणून हाक मारायच्या यावरून तिचं नाव त्याला समजलं होतं इतकंच. 


हा न तो बहाणा करून तो सारखा मुदपाकखाण्यात यायचा;

कारण ती बऱ्याचदा त्याला तिथेच दिसायची. त्या दिवशी त्याला ती मुदपाकखाण्यात दिसली नाही. तिला पाहण्यासाठी तो तरसला. ती गडावर जिथे जिथे त्याला दिसायची तिथे तिथे तिला तो शोधू लागला. चालता चालता तो आऊसाहेबांच्या दालनाबाहेर आला. 

तितक्यात तिथे एक शिलेदार आले.


"काय रं..... हीथं कशापायी उभा राहिलास ? राजं येणार हायेत इथून माहीत नाही व्हय रं तुला ? चल बाजुला हो...." शिलेदार

"व्हय जी..." 

असं म्हणून तो बाजूला जाऊन उभा राहिला.

"अं..... आरं अं लेका..... आता हीथुन तिथं जाऊन उभा राहिलास व्हय रं, तालमीला जायचं सोडून.... हिथं अन् कुनास्नी शोधतोय सा ?" 

"न्हाई जी..... मी ते सहजच.... ते... हे.... गड.... गड बघाया आलो जी."

त्याचे हे असे अडखळत बोलणे ऐकल्यावर ते शिलेदार रागात म्हणाले,

"गड बघाया ? काय रं ? येडं समजतोस व्हय रं मला.... रोज हीथं येतोस मग कधी गड बघितला न्हाई व्हय रं तू ?"

"न्हाई जी...... म्हणजे व्हय जी पण_ "

तो भीतीने पुन्हा अडखळतच बोलला. 

तितक्यात त्याचे वाक्य अर्ध्यावर तोडत ते शिलेदार त्याला म्हणाले,

"अय न्हाई जी अन् व्हय जी..... सगळं ठाव हाय मला..... तू इथं कशापायी आला हायेस ते...." ते शिलेदार असे म्हणाल्यावर तो घाबरला. त्याचे अंग थरथरू लागले. तो त्यांच्यापुढे हात जोडून माफी मागू लागला.

"माफ करा जी.... फकस्त एक.... एक डाव माफ करा.... पुन्हा न्हाई असं होणार जी...." तो असा का वागतोय हे त्या शिलेदाराला कळेना. पण, त्याच्याकडे पाहून शिलेदराला त्याची दया आली. ते त्याला समजावत शांतपणे म्हणाले,

"आरं.... आरं अं लेका.... बस..बस कर.... ठाव हाय मला.... राजांचं दर्शन घ्यायचं हाय ना तुला.... आरं लेका ते आता सवराज्याचे छत्रपती होणार हायेत. लई जबाबदाऱ्या हायेत त्यांच्यावर. आपण त्यांना असा सारखा सारखा तरास देणं बरं न्हाई." शिलेदारांचे असे बोलणे त्याला अनपेक्षितच होते. त्याला वाटले की तो ताराला पाहतो ते त्यांना कळले. म्हणून तो घाबरला होता. पण शिलेदारांचे नंतरचे बोलणे ऐकून त्याची धाकधूक बंद झाली. पण महाराज इथे येणार आहेत हे ऐकल्यावर तो तिला विसरला आणि त्या क्षणी त्याला महाराजांना पहायची इच्छा झाली. 

तो शिलेदारांना विनवणी करू लागला. 

"मला एकदा दर्शन घ्यायचं हाय त्यांचं. पाहिजे तर मी दुरूनच पहिल त्यास्नी.... पाया पडतो तुमच्या फकस्त एक डाव...." तो विनंती करू लागला.

"असं म्हणतोस व्हय.... बरं ठीक हाय. त्या तिथं कोपऱ्यात तो खांब दिसतोय न्हव का.... तिथं जाऊन उभा रहा...."

"लई उपकार झालं जी...."

असं म्हणून तो त्या खांबाकडे जायला निघाला तितक्यात ते शिलेदार म्हणाले,

"आरं अं लेका.... तुझं नाव तर सांग...."

"जी म्या येसा.... येसा कंक."

"आरं वा.... झाक हाय की नाव तुझं ! येसा.... येसाजी कंक."

असं म्हणून ते शिलेदार तिथून निघून गेले.

तो कोपऱ्यातल्या खांबाशेजारी जाऊन उभा राहिला. काही अवधीत त्याला तिथून महाराजांचे आऊसाहेबांच्या दालनात जातांना दर्शन झाले. तो महाराजांना पहिल्यांदाच पाहत होता. प्रत्यक्ष महाराजांना इतक्या जवळून पाहून त्याच्या चेहऱ्यावर चमक आली, प्रसन्नतेचे भाव आले. महाराज तिथून गेल्यावर तो धावत गेला आणि महाराजांच्या पायाचा स्पर्श झालेल्या त्या ठिकाणी त्याने आपला माथा टेकवला आणि लगेच तालमीला निघून गेला. 


     दुसऱ्या दिवशी सवयीप्रमाणे तो तालमीला जायच्या आधी पुन्हा मुदपाकखाण्यात आला. पण आजही त्याला तारा दिसली नाही. तो हताश होऊन तिथून निघून गेला.

दिवसामागून दिवस जाऊ लागले. त्याच्या मनात नको नको ते विचार येऊ लागले. त्याने तिला गडावर सगळीकडे शोधले, पण ती कुठेच दिसली नाही. तो अस्वस्थ झाला. त्याला तिची खूप आठवण येऊ लागली. तिचा तो निरागस हसरा चेहरा सारखा त्याच्या डोळ्यांसमोर येत असे. जिथे त्याने तिला पहिल्यांदा पाहिले होते त्या तळ्याकाठी तो तासन् तास जाऊन बसत असे. त्या दिवशी सारखीच आजही ती इथे नक्की दिसेल अशी वेडी आशा त्याला होती. तेव्हा नकळत त्याच्याही चेहऱ्यावर स्मित उमटायचे, तर कधी तिच्या आठवणीत अचानक डोळ्यात अश्रू जमा व्हायचे. त्याला ह्या अवस्थेत कुणी बघितले तर खूप प्रश्न विचारले जायचे. त्यामुळे तो नेहमी आपल्या चेहऱ्यावरचे भाव लपवायचा प्रयत्न करत असे. ह्या प्रश्नांची उत्तरे त्याला तिच्याशिवाय कुणालाच द्यायचे नव्हते. त्याला हे सर्व तिला सांगायचे होते. तिच्याविना त्याच्या मनाची होणारी घालमेल तिच्यापर्यंत पोहोचवायची होती; तिच्याकडे व्यक्त व्हायचे होते. यासाठी तो फक्त एका संधीची वाट पाहत होता. 


    या सगळ्यात अनेक महिने/वर्ष उलटले. पण तो तिला विसरला नव्हता. कुठेतरी त्याच्या मनाच्या कोपऱ्यात ती होतीच. अजूनही जर कधी आठवण आली तर कुठलाही बहाणा करून तो मुदपाकखाण्यात येऊन जायचा. 


  येसा आधीपासूनच बुध्दीमान, प्रामाणिक आणि मेहनती तर होताच पण आता पहिल्यापेक्षा शरीराने आणखी बलदंड झाला होता. एकदा मदांध हत्ती त्याने एकट्याने लोळवला होता. महाराज आता स्वराज्याचे छत्रपती झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात त्याने पाऊल ठेवले आणि येसा चा खऱ्या अर्थाने येसाजी झाला. त्याला गनिमी काव्याचे तंत्र अवगत झाले. त्याने कमी अवधीतच त्याच्या पराक्रमाने महाराजांचे मन जिंकले. आता तो महाराजांचा विश्वासू सहकारी झाला होता.


    एकदा एका मोहिमेला जातांना एका गावात त्याचा मुक्काम झाला. गावी पोहोचताच बरीच रात्र झाली होती त्यामुळे सर्वजण लगेचच झोपले. पहाटे निघायचे ठरले. ठरल्याप्रमाणे पहाटे उठल्यावर ते निघाले. गावातून निघाल्यावर सर्व सैन्य नदी पार करत होते; तोच त्याला तिथे तारा दिसली. दुरूनच त्याने तिला ओळखले. त्या क्षणी त्याने ठरवलं की, काहीही झाले तरी आज तिला मनातलं सांगणार. तेव्हासारखेच आजही तिचे लक्ष त्याच्याकडे नव्हते. ती तिच्या तिच्या कामात व्यस्त होती. तो घोड्यावरून खाली उतरला आणि तिच्याकडे धाव घेऊ लागला. तेव्हा त्याचा चेहरा अगदी आनंदलेला होता. पण, काही क्षणांतच त्या आनंदाची जागा निराशेने घेतली. 

तिच्याजवळ पोहोचण्याआधीच तो थांबला आणि लगेच मागे फिरला. कारण त्याने तिचे मळवट भरलेले कपाळ पाहिले होते. तेव्हा त्याने तिच्यासाठी मनात असलेला तो कोपरा सुध्दा फक्त स्वराज्याच्या नावे केला; आणि मरेपर्यंत येसा फक्त स्वराज्याचा राहिला.


समाप्त...


"येसाजी कंक" यांच्या खऱ्या इतिहासात "तारा" नावाचे कुठलेच पात्र नाही. ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे. 

कृपया खालील लेख नक्की वाचा...


     खरतर अश्या अनेक ऐतिहासिक कथा आपल्या वाचनात आल्या असतील. तसेच अनेक ऐतिहासिक चित्रपट, नाट्य, मालिका ह्या आपण बघितल्या असतील. पण ते काहींच्या अर्धवट लक्षात राहतात. खरंतर त्या पूर्णपणे ऐतिहासिक असतातच असं नाही. त्या फक्त काही ऐतिहासिक धागे दोरे हाती घेऊन केलेल्या असतात. आणि असे असल्यास त्यांनी ते स्पष्टपणे त्यात नमूद केलेले असते.

जर आपण ते चित्रपट, नाटकं, मालिका पाहिल्या असतील किंवा ऐतिहासिक कथा, कादंबऱ्या वाचल्या असतील तर निदान ते काल्पनिक आहे की सत्य हे आधी बघावे. बऱ्याचदा काय होते की, आपल्याला असे वाटते की हे जे दाखवत आहेत ते सर्व खरे आहे आणि हाच आपला इतिहास आहे असे आपण समजतो. मग सुरू होते मोठ्या मोठ्या शुर वीरांची बदनामी.

या सगळ्यात सर्वात जास्त बदनामी ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची झाली आहे. 

स्पष्टच सांगायचे तर अनेक लोक त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवताना आजही दिसतात. त्यांच्यावरून चर्चा करतांना अनेक लोक मला दिसतात. 'संभाजी महाराज व्यसनी होते.' इतकंच काय तर 'त्यांना नको नको ते नाद होते.' असं म्हणणाऱ्या लोकांची अक्षरशः चीड येते. अहो ज्यांनी आपल्यासाठी स्वतःचे प्राण पणाला लावले, इतक्या भयानक मृत्युला ते सामोरे गेले. अशा संभाजी महाराजांबद्दल असे बोलवते तरी कसे ह्यांना.

खरा इतिहास काय आहे हे माहीत करून न घेता केवळ अर्धवट माहिती घेऊन हे असे बोलतात.

खरतर एकही लढाई न हरणारे अजिंक्य योद्धा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. ते निर्व्यसनी होते आणि त्यांच्या आयुष्यात येसूबाई राणीसाहेब ह्या त्यांच्या पत्नी सोडल्या तर एकही स्त्री नाही. ते अत्यंत चारित्र्यसंपन्न होते.

इथे मी माझे व्यक्तिगत मत मांडले आहे. परंतु, मी हे ठामपणे सांगू शकते की, मी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जे सांगितले ते अगदीच खरे आहे. बऱ्याच जणांचे त्यांच्या चारित्र्यावरून अनेक गैरसमज झाले आहेत. ह्या लेखाद्वारे ते दूर करण्याचा माझा प्रयत्न होता..... तरीही माझ्या कडून कळत नकळत काही चूक झाली असेल तर......       क्षमस्व.....




Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy