Vaibhav Coolkarni

Drama Others

4.8  

Vaibhav Coolkarni

Drama Others

महापुरात सापडलेली ज्योत

महापुरात सापडलेली ज्योत

11 mins
1.0K


संततधार पाऊस! ओलचिंब वातावरण!

बंगल्याच्या आतही!! हॉलची खिडकी चुकून उघडी राहिल्याने हॉल ओला. पायाखालची पोती ओली. तीन दिवस वाळत घातलेले कपडे ओले. पाय ओले. पायाची बोटे ओली. पाय पुसायला घेतलेला टॉवेल ओला. सोफा कोरडा असूनही ओला असल्यासारखा थंडगार! खिडकीतून बाहेर दिसणारी झाडे पाऊस पडला की इतर वेळी सुंदर दिसत; त्यांचाही ओलेपणा अक्षम्य वाटणारा. मनही काहिसं तसंच! तरी नशीब माझे डोळे कोरडे होते... 

थोडावेळ ज्ञानेश्वरी वाचावी म्हटलं, तर ती हातात घेण्याची कृती करण्यासाठीही मन एकाग्र होईना. इतकं मन हरवलेलं! या अलिप्तपणामुळे की एकाकीपणा दाटून आलेपणामुळे कुणास ठाऊक! 

मग एकाग्रतेची गरज नसलेली, आणि सहज शक्य असलेली गोष्ट म्हणजे टीव्ही पाहणे. रिमोटचं लाल बटन दाबलं तर टीव्हीवर फक्त निळा रंग. म्हणजे केबल बंद. अशा वेळीच केबलला काय होतं कुणास ठाऊक! मग माझ्या लगेच लक्षात आलं, की हे केवळ स्वतःवरच चिडणं आहे.व 

अशा सुन्न, खायला उठणाऱ्या वेळीच पुरुष सिगारेट ओढत असावेत. दारू पीत असावेत. हे बरं आहे समाजाचं! पुरुषांना फक्त भावना असतात आणि बायकांना नसतात वाटतं? पण आपण का आपल्या तत्वात न बसणाऱ्या सिगारेट आणि दारूच्या बाजूने विचार करतोय? काही उद्योग नाही म्हणून असले विचार डोक्यात येतायत. 

तेवढ्यात डोक्यावर एक नकोसा वाटणारा थेंब पडला. वर बघितलं, स्लॅब झिरपत होता. मग खुर्ची बाजूला ओढली. एक पातेलं आणून तिथे ठेवलं. सात वाजत आले होते. बातम्या बघाव्यात म्हणून रेडिओ लावला. धरणातून 50000 घनफूट प्रति सेकंद पाणी सोडण्यात आल्याची बातमी. नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा. नदीच्या धोका पातळीपासून पाणी अवघ्या एक फूट खाली. काहीही झालं तरी आपल्या बंगल्यापर्यंत पाणी यायचं नाही. 

पण छकुलीच्या घरी येईल का पाणी? नदीकाठचं गाव त्यांचं! फोन करून चौकशी करावी... पण आता ‘छकुली’ म्हणून चालणार नाही. लग्न झालंय तिचं! ‘सुषमा’च म्हणायचं असं ठरवून फोन केला. त्यांनाही घरात पाणी येईल असं वाटत नाही. पण गल्लीत जाणार्‍या रस्त्यावर पाणी आलंय म्हणे…! 

त्यानंतर बराच वेळ छकुलीच्या लग्नाच्या आठवणी येत राहिल्या... छकुलीचं बापाच्या छायेशिवाय मोठं होणं... प्रभाकरच्या तिरस्कारानं, रागानं तडफडणार्‍या मला तिनं आधार देणं... तिचा अकाली पोक्तपणा... तिचं लग्नाचं वय होणं... तिच्या लग्नाचा विषय... मग तिने मलाच लग्न करण्याचा सल्ला देणं... माझ्या काळजात कर्कश्यपणे झंकारणारी एक तार... नंतर तिचं लग्न ठरणं... प्रभाकरला माहितही नसताना... प्रभाकरनं मध्यस्थामार्फत लग्नाला येण्याची परवानगी मागणं... स्वतःच्या मुलीच्या लग्नाला! मी ती कठोरपणे नाकारणं... आपल्यासारख्या मृदू स्वभावाच्या व्यक्तीला इतका कठोर निर्णय कधी घ्यावा लागेल असं कधीही वाटलं नव्हतं... ही अशीच आठवणींची शृंखला वीज खंडित झाल्यामुळे थोडी खंडित झाली. 

अजून थोडं दिसतय. लगेच उठून मेणबत्ती लावायची गरज नाही असं वाटतंय. खरं म्हणजे हे कारण झालं; माणसाचं मन असं भूतकाळात घिरट्या घालायला लागलं, की असा निरुत्साह येतोच. पण भूतकाळापेक्षाही या निरूत्साहाचा संबंध आहे एकांताशी. का? आणि कशासाठी? हे दोन प्रश्न समोर उभे असले की माणसात उत्साह राहत नाही. काहीही असो. मी बसून राहिले. पाऊस सुरूच आहे. ज्ञानेश्वरी वाचण्यावरून जे द्वंद्व मनात सुरू होतं, ते आता अंधार पडल्यामुळे संपलं, म्हणून थोडं रिलॅक्स वाटलं. एक नि:श्वास सोडला आणि मान मागे टेकली. अंधारातही स्लॅब झिरपताना दिसला. डोळे मिटले. छकुली भाजी चिरत बसली असेल किंवा टीव्हीवरच्या बातम्या बघत... नवऱ्याबरोबर गप्पा मारत...  

प्रभाकर बसला असेल सिगारेट ओढत मित्रांबरोबर हसत-खिदळत... व्यवस्थित माणसासारखा राहिला असता, तर आत्ता सिगारेट ओढण्याऐवजी व्हायोलिन वाजवत असता... वातावरणच वेगळ असतं... मी उठून मेणबत्ती लावली असती... प्रभाकरच्या व्हायोलिनच्या सुरावर मेणबत्तीची ज्योतही लयबद्ध हलायची! मी कित्येकदा पाहिलय... मलाही मेणबत्तीची ज्योत व्हावसं वाटे, पण लाईट आली आणि प्रभाकरनं मेणबत्ती फुंकली असं वाटलं म्हणून मी डोळे उघडले... अंधारच होता... 

‘डराव डराव’ असं बेडूक ओरडत होता. चला… उठावं... मेणबत्ती लावावी... उठले. पाठीतून कळ आली. अंधारात चाचपडत मेणबत्ती, काडेपेटी शोधून काढली. मला तर काळ्याकुट्ट भूतकाळातच चाचपडल्यासारखं वाटलं... मेणबत्ती लावली. उगीचच सोफ्यावर बघितलं. कोणी नव्हतं. कोण असणार होतं? कोणी नाही! मीच पुन्हा बसले. 

प्रभाकरला शिंगं आहेत, असा चेहरा डोळ्यासमोर आला. आपलं आयुष्य एखाद्या फालतू माणसासाठी आपण का वाया घालवतो? असं वाटून एक पश्चात्तापाची वीज हृदयात कडाडून गेली. पुन्हा आठवणींचा अतिरेकी पाऊस बरसत राहिला. कॉलेजचं गॅदरिंग... प्रभाकरचं गाणं... आपलं सहज त्याच्या घराजवळ थांबणं... वडिलांचं त्याला उडाणटप्पूपणावरून भाषण... आपलं त्याच्यासाठी डबा घेऊन जाणं... एकत्र डबा खाणं... आपलं त्याच्या घरी लग्नाबद्दल विचारणं... त्याच्या वडिलांचं आनंदित होणं... आपल्या घरी विचारण्याचं त्याचं धाडस न होणं... आपलं स्वतःच विचारणं... घरी आकांत-तांडव... आपली बंडखोरी... राम मंदिरात लग्न... गोरापान प्रभाकर... निळ्या डोळ्यांचा... प्रभाकर खूप हॅन्डसम होता. होता म्हणजे असेल अजून. तो म्हातारा होण्यातला नाही... त्याचं व्हायोलिन वाजवणं... माझं ऐकत राहणं... त्याचं बंबात पाणी तापवणं... त्याच्या सायकलवर डबलसीट बसून इंटरव्यूला जाणं... त्याचं घर लावायला मदत करणं... त्याचं इतर मुलींशी बोलणं... माझं चिडणं... आपलं नोकरी करणं... त्याचं व्हायोलिन वाजवणं... मुलींना शिकवणं... आपण नोकरी करणं... त्यानं बसून खाणं... आपण पैसे कमवणं, त्यानं खर्च करणं... आपण कष्ट करणं, त्यानं चैनी करणं... 

बसण्याचेही कष्ट नको वाटायला लागले. चला, जेवून झोपावं. दहा वाजले, पण काहीच केलेलं नाही. जाऊदे! नाहीतरी पद्धत म्हणूनच जेवायचं. इथेही बंडखोरी केली तर काय बिघडणार आहे? कोण विचारणारे आपल्याला? तिथेच सोफ्यावर आडवी झाले. ‘आss! आई गंss!’ ...प्रभाकर... त्याचं नाव राक्षस का ठेवलं नाही त्याच्या घरच्यांनी? पाळण्यात त्यांना शिंग दिसली नसतील... 

जाग आली तेव्हा उजाडलेलं होतं. आठ वाजले! अरे बापरे!! कळलच नाही! पण आज कुठे ऑफिसला जायचंय? ऑफिस तर बंदच आहे पावसामुळं. पाऊस अजूनही झिरपतोच आहे... सगळं आवरलं. पाऊस थांबलाय. सगळं शां...त आहे. एवढी शांतता! सन्नाटा!! एखादं पाखरू सुद्धा ओरडत नाही! उभ्या जन्मात कधी एवढी शांतता ऐकली नाही. ऐकली नाही! शांतता ऐकली नाही? खिडकीतुन बाहेर बघीतलं. सगळीकडे पाणीच पाणी दिसतय!! आता तर ही शांतता कर्कश्य वाटायला लागलीय! 

दरवाजा उघडून बाहेर बघितलं. अंगणात पाणी! आपल्या अंगणात पुराचं पाणी! शेवटच्या पायरीपर्यंत! अरे बापरे! असंच घरात पाणी आलं तर!! दार लावून घेतलं. काय करावं... घरात पाणी आलं तर सोफ्यावर बसावं. सोफा पाण्याखाली गेला तर? तर टेरेसवरच जाण्याशिवाय पर्याय नाही. की जावं... दादाकडे? लहानपणी नाला ओलांडताना आपल्याला उचलून पलीकडे ठेवणारा दादा... गेले तर घेईल का घरात? ...घेईल. तसा तो प्रेमळ आहे. पण आपणच लग्न झाल्यापासून गेलो नाही. आता जायचं? पण जायचं तरी कसं जायचं? पाण्यातून! शक्यच नाही. आणि... दादाचं घर तर... खरं म्हणजे पाण्याखाली गेलं असेल! हाल झाले असतील बिचाऱ्याचे... फोन तरी करावा... पण फोन तर कालपासूनच बंद आहे... बहुदा सगळीकडेच बंद असावेत. 

टीव्ही उचलून कपाटावर ठेवावा... म्हणून उचलायला गेले, पुन्हा पाठीतून एक जोरदार कळ आली. अगदी तशीच! पंधरा वर्षांपूर्वीचं आठवलंच! भांडणात प्रभाकरनं मला उचलून घेतलं आणि... अक्षरशः असं खाली टाकलं!... बुडूदे टीव्ही बुडला तर!... हुंदकाच आला एक... 

त्यापेक्षा खालच्या कप्प्यातली पुस्तक वरती टाकावीत... आतल्या कपाटापाशी गेले. पण एवढ्या पुस्तकांना तरी कुठे वरच्या कप्प्यात जागा मिळणार आहे! दोन-तीन भेटलेली पुस्तकं वर ठेवली. फायलींचा गठ्ठा काढला... लाईट बिल, फोन बिल ची फाईल... बुडूदे. इन्शुरन्सच्या पावत्यांची फाईल... भिरकावली कपाटावर. हिशोबाची डायरी... बुडूदे. पत्ते, फोननंबरची वही खालीच पडू दिली. पेपर मधल्या कसल्याशा कात्रणांची फाईल, बुडूदे. पत्रांची फाईल, बुडू... नको, त्यात प्रभाकरची पत्र असतील... फाईल भिरकावली कपाटावर. दोन-तीन पत्रं खाली पडली... प्रभाकरचं अक्षर... ‘...मी चित्रकार असतो, तर कोजागिरी चांदणं पिताना तुझं चित्र काढलं असतं…’ कोजागिरीचं चांदणं कसं प्यायचं? त्याचं त्यालाच माहिती. दोन-तीन पत्रं फाईल मध्ये व्यवस्थित ठेवली. टेप रेकॉर्डर बुडूदेत. ड्रॉवरमधल्या कॅसेट्स - उस्ताद बिस्मिल्ला खां, पंडित भीमसेन जोशी, लता, रफी... बुडूदेत. ब्लँक कॅसेट? ब्लँक नाही... त्यात प्रभाकरचं व्हायोलिन वादन रेकॉर्ड केलं होतं. असू देत कधीतरी पुढे ऐकून बघता येईल. कपाटावर टाकलं. ज्वेलरी बॉक्स... बुडूदेत. अल्बम- छकुलीचे फोटो... प्रभाकरचे नी आपले ब्लॅक अँड व्हाईट फोटो... चंद्रबींद्र काय, धनुष्यबाण काय… इश्श्य! फोटो अल्बम लॉप्टवर भिरकावला. साड्या- चार-दोन चांगल्या साड्या वरच्या कप्प्यात ठेवल्या. कोर्टाच्या पेपरची फाईल... बुडूदेत. 

असं आणखी बरंच काही. 

इतर वेळी ह्या वस्तूंच्या असणाऱ्या किमती आज अचानक बदलल्यात. 

पाणी बघायला दार उघडून गेले. खालच्या पायरीला पाणी धडका देतय... समुद्राच्या लाटांसारखं वाटतय... पाणी परतण्याचं काही चिन्ह नाही. आजूबाजूच्या घरांमध्ये कोणी नाही. सरपोतदारांचं कुत्रं भुंकत नाही. गुलमोहराच्या झाडावर पाणकोंबडा, कोकिळा जाऊदे; चिमण्याही नाहीत. शिंदे यांच्या मुलांचा चिवचिवाट नाही. पाववाल्याची आरोळी नाही. देशमुखांच्या मुलाच्या गाडीचा गगनभेदी आवाज नाही... काही कळत नाही. आज पेपरवाला पण आला नाही. पेपरवाला? आपला मेंदू ठीक चाललाय ना? गेटपाशी मेलेली घूस तरंगत आलेली दिसतेय. गेली निघून पुढे. लॉनच्या ठिकाणी कुठलातरी उकिरडा वाहत येऊन थांबलाय... साप! पाण्यातून एक साप सळसळत पायरीकडेच येत होता बहुतेक! मी पटकन आत आले. दार लावलं. सोफ्यावर बसले. आणखी काय काय बुडू शकतं याचा विचार करत करत पाय वर घेतले.

‘हां.’ ‘ए इकडं इकडं. ह्या घरात.’ ‘नाही तिथं कोणी नसणार.’ ‘नही नही, ऐसा नही कर सकते। देख के आगे जायेंगे। चलो अंदर…’ 

बापरे! अचानक हे आवाज! कोणी नाही असं बघून घर लुटायला तर कोणी…  

तेवढ्यात दारावर टक टक! टक टक! 

काय व्हायचं ते होऊदे! 

दार उघडलं! 

मिलिटरी! 

‘चलो मॅडम जलदी बाहर निकलो! डॅमसे एक लाख दस हजार क्युसेक पानी छोडा गया है।’ 

‘चला! विचार कसला करता बाई? बोटीत बसा! तुमच्या गेटपर्यंत बोट आलीय!’  

‘अहो असं कसं अचानक… ? काही सामान बरोबर घेतलं पाहिजे.’ 

‘सामान को छोडो मॅडम, पहले अपनी जान बचाओ!’ 

‘जान तो अभी भी बची हुई है, लेकिन क्या फायदा? कुछ यादे साथ मे लुंगी तो जीने की वजह तो रहेगी…’  

‘देखो मॅडम आपकी फिलॉसॉफी सुनने के वास्ते टाइम नही है!’ 

‘सीर सलामत तो पगडी पचास!’ 

यावर मी काय बोलणार? फक्त हसले. उपहासानं.  

‘हमारी बात सुनो, हम पर विश्वास करो, हम कोई चोर या आतंकवादी नही है। हम आर्मी वाले है। कम से कम इनको तो पहचानो, ये आपके यहां के कॉर्पोरेटर है…’  

‘नमस्कार! चंद्रकांत शेळके.’  

चंद्रकांत शेळके! प्रभाकरचा पूर्वीचा मित्र. प्रभाकरला दिशाहीन करायला हाच कारणीभूत असणार…  

‘तुम्ही जनगावला का जात नाही? नदीकाठचं गाव आहे. तिथं लोकांचे खूप हाल होत असणार. माझी छकुली तिथेच आहे ना…’  

‘तिकडे पण मिलिटरी तैनात करण्यात आलीय. तिकडच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं सुद्धा!’ 

‘प्र... प्रभाकर कुठे आहे?’ 

‘प्रभाकर?’ 

‘प्रभाकर सामंत.’ 

‘हां! प्रभू! अच्छा म्हणजे तुम्ही… ओ हो हो. तो नाही दिसला कुठं! तो जिथं रहात होता तिथं तर रात्रीच पाणी आलय!! तिथल्या लोकांना चांदवडीच्या शाळेत हलवलय. तिकडे पण मी भेट देऊन आलो, पण तिथेही कुठे दिसला नाही प्रभू!’ 

‘नाही?’ 

‘कुठतरी मदत कार्यात असणार. तसा तो गप्प बसणारा नाही.’ 

‘मॅडम आप आ रही है की नही? कोई और होता तो जबरदस्ती उठाके ले जाते हम। लेकिन आप तो पढी लिखी समझदार लगती है इसलिये… चलो!’ 

‘नही मै कुछ सामान साथ मे लेना चाहती हूँ।’ 

‘अच्छा ठीक है चलो। ले लो। चलो, तब तक हम आगे जा के आते है। तयार रहो हम आते है।’ 

गेले निघून. त्यांचा बोलण्याचा आवाज कमी कमी होत अश्राव्य झाला. पुन्हा सन्नाटा पसरला. आणि खूप तासात काहीच ऐकलं नव्हतं म्हणून त्यांचे शब्द अकारणच पुन्हा पुन्हा मनात घुमत राहिले. मी सोफ्यावर विचार करत बसले. काय काय घ्यावं बरोबर? छकुलीचा लहानपणीचा फोटो, लॅमिनेशन केलेला. फोटोंचा अल्बम, पत्रांची फाईल, प्रभाकरचं व्हायोलिन वादन रेकॉर्ड केलेली कॅसेट, छकुलीच्या लग्नाचे फोटो…  

छकुलीच्या लग्नाला प्रभाकर आला होता. अपराध्यासारखा. पण व्यवस्थित वागला. शहाण्यासारखा. तिथे नाईलाजास्तव त्याच्याशी बोलावं लागायचं तेव्हा किती अवघडल्यासारखं वाटायचं! त्याने लग्नात दिलेली ती गुलाबी साडी घ्यावी का बरोबर?..  

तेवढ्यात दारावर टकटक झाली. 

आले वाटतं मिलिटरीवाले! बापरे! अजून सामान भरलं नाही आपण! दारच उघडायला नको एवढ्यात. बॅग भरली की उघडावं. पण काय काय म्हणून घ्यायचं! हे घर पण बरोबर घेऊन जावं असं वाटतंय… त्यापेक्षा न गेलेलच बरं. दारच उघडायचं नाही.  

पुन्हा टकटक टकटक! 

नाहीच दार उघडायचं! 

आता जोरात- ठोक ठोक ठोक ठोक! दार तोडून तर आत येणार नाहीत ना? देखो मै नही आऊंगी तुम जाव मुझे अकेला छोडके। मै नही आऊंगी। मुझे मरने दो मेरे घर मे। मेरी यादो मे।…’ 

‘हे बघ तुला काहीही होणार नाही! दोन मिनिट दार तरी उघड! माझं म्हणणं तरी ऐकून घे!’

हा आवाज!! 

दार उघडलं! 

प्रभाकर!!! 

‘तू?’ 

‘ऐक, हे बघ दोन मिनिटं फक्त. बाकीचं सगळं विसरून जा. आत्ता ह्या परिस्थितीत मला तुझ्याबरोबर राहिलं पाहिजे. तू एकटी धीरानं राहू शकत नाहीस मला माहितीय. चारेक दिवसांसाठी आपला भूतकाळ विसरून जा. पुन्हा पूर ओसरल्यानंतर तुला वाटलं, तु जा म्हणालीस तर मी निघून जाणारच आहे. पण आत्ता मी तुला एकटीला सोडून जाऊ शकत नाही. तू जा म्हणालीस तरी!... मला आत येऊ दे…’ 

मी बाजूला सरकले. तो आत आला.  

काय बोलायचं काहीच कळेना.  

आतूनच एकत असंबद्ध शब्दांची लाट आल्यासारखी झाली.  

‘मग तू व्हायलिन का नाही आणलंस?’ 

‘बारा वर्षांपूर्वी मी माझं व्हायोलिन इथेच सोडून गेलो होतो.’  

‘पण ते तर आता हरवलय!’ 

‘हो. मीही नंतर कधी वाजवलं नाही. आता तर मी पूर्ण विसरून गेलोय. मला वाजवताच येणार नाही.’ 

‘मग तू इथे थांबून काय करणार?’ 

त्यानं खिशात हात घातला. ‘माउथ ऑर्गन आणलय मी. हल्ली तेच वाजवतो.’ 

‘अरे पण तू पूर्ण भिजलायस! आधी कपडे तर बदलून घे!’ 

‘बदलण्यासाठी कपडे नकोत का?’ 

‘अं… आहेत. तुझा तो स्काय ब्लू शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट अजून आहे इस्त्री करून ठेवलेली.’  

‘तो ड्रेस सतरा-अठरा वर्षांपूर्वीचा! आता बसेल तरी का मला?’ 

‘हो बसेल. तुझ्यात काहीच बदल झालेला नाही. फक्त टक्कल पडलय एवढच! ड्रेस बसेल.’  

प्रभाकर स्काय ब्लु शर्ट आणि ती ब्लॅक पॅंट घालून आला. अप्रतिम शांततेमध्ये त्याच्या माऊथ ऑर्गनचे सूर हृदयामध्ये सुगंध निर्माण करत राहिले. माझं मनही मेणबत्तीच्या ज्योतीप्रमाणे लयबद्ध हालचाली करत राहिलं. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama