Dr. Gaurangi Gujar- Mehta

Tragedy Others

3  

Dr. Gaurangi Gujar- Mehta

Tragedy Others

मधुमालती

मधुमालती

10 mins
424


“मी पण असंच आयुष्य काढले गं बयो!” लग्नाला ११ वर्ष झाली होती गार्गीच्या, पण आजवर आजे-सासूने कधीच स्वतःच्या अवघड आयुष्या बद्दल एकही उद्गार काढला नव्हता तिच्या समोर. आज भाचीच्या नवऱ्याला देवाज्ञा झाली आणि तिचा असा अर्ध्यात मोडलेला संसार पाहून यमुना आजींना पूर्वीचे दिवस आठवले. गार्गीने आजीकडे आश्चर्याने पाहिलं, पण त्यांची नजर भुतकाळात कुठेतरी हरवली होती.

“यमुना, ए यमुना! यमु, अगं चल ना लवकर”. आले गं राधे. माँ वेण्या घाल ना गं पटकन, ती राधी गेली तर सगळी मधुमालतीची फुलं एकटीच वेचेल, मला एकही ठेवणार नाही.” यमु वैतागून बोलली. माँ नुसती गालातल्या गालात हसली. ६ वर्षाची यमु, माँची लाडकी होती, तिच्या लांब सडक काळ्याभोर दाट केसांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेण्या घालणं मॉचं आवडतं काम होतं. यमुच्या केसांत माँ सगळ्या कामाचा थकवा विसरायची. “माँ अगं बांध ना लवकर केस, मला मधुमालतीची फुलं माळायची आहेत, त्या राधीनी सगळी फुलं स्वतःच्या केसांत माळली, तर माझ्या वेण्या कशा दिसतील?” माँ हसत बोलली “अगं मग तुझ्या केसात आपण चमेलीचा गजरा माळू!”

“चमेलीचा?” यमु नाक वाकडं करत बोलली, “छे, ती काय फुलं- पांढरी फटक, आणि येवढी येवढीशी, हातात पण येत नाहीत, तुला काय आवडतात ती एवढी?” “बरं बरं, झाल्या तुझ्या वेण्या, पळ आता!” यमू उड्या मारत बाहेर पळाली. माँला माहित होतं, परत येईल, तर दोन्ही वेण्या मधुमालतीच्या फुलांनी नटलेल्या गुलाबी दिसतील. कोपऱ्यात उभी असलेली त्यांची विधवा नणंद पण हसत बोलली “वहिनी, काय हो ते आपल्या यमुला ह्या मधुमालतीचं वेड! सोयरीक करताना मधुमालतीचा वेल अंगणात आहे का ते बघूनच करा हो”. माँ कसंनुसं हसली, नणंदेला कधीच केसात फुलं माळता यायची नाहीत, ही खंत क्षणभर माँला लपवता आली नाही!

यमू चंद्रकले सारखी दिवसा गणिक वाढत होती. यमू बारा वर्षाची असताना एकदा रडत रडतच घरी आली. डोक्यात मधुमलतीचं एक ही फूल दिसेना. माँ ला कळेना काय झालं असावं! उशीत तोंड खुपसून रडत राहिली. माँ विचारुन थकली, पण पोर नुसती रडत राहिली. आत्या त्या आली, तीने विचरलं, तरी बोलायला तयार नाही. मग बाबा आले, त्यांच्या गळ्यात पडून यमु अजूनच जोरात रडू लागली! “मी नाही जाणार, मी कुठेच नाही जाणार”. बाबांना काहीच कळेना. त्यांनी मग यमुच्या पाठीवर हात फिरवत विचारलं ” यमु, नीट सांग राणी, कुठे जायचं नाहिये तुला? अग कोणी कुठेही पाठवत नाहिये तुला.” यमु बोलली “खोटं बोलता तुम्ही, राधीला पण असचं म्हणायचे तीचे बाबा, पण तिची आई आज आम्हाला म्हटली की आता राधीशी खेळणं कमी करा, ती आता मोठी झाली. पुढच्या वर्षी सासरी जाईल,” आणि यमु पुन्हा हुंदके देऊन देऊन रडू लागली, तसं माँनी पदरात तोंड खुपसलं. खुदुखुदु हसण्याचा आवाज ऐकून यमुने माँ कडे पाहिलं, पलीकडे आत्या पण हळुच हसताना दिसली. तसं यमु बाबांना म्हणाली “बघा बाबा, या कश्या हसतात दोघी! मला पण सासरी पाठवायचीच वाट बघतायत” आणि यमु पुन्हा रडू लागली. मग माँनी हसणं आवरत घेतलं आणि यमुला जवळ घेऊन समजावलं. “यमु, जगाची रीत आहे ती, मी पण आले न माझ्या आई बाबांना सोडून. तसं तु मोठी झालीस की तुला पण जावं लागेल सासरी! सासरी जाऊन छान राहिलीस, नवऱ्याचं, घरातल्या मोठ्यांचं सगळं ऐकलंस तर सगळे माझं आणि बाबांचं खूपच कौतुक करतील, म्हणतील किती छान शिकवून पाठवलंय आई वडिलांनी. आणि हो यमु, तुला माझी जोडवी आवडतात ना, लग्न झालं की तुला पण रोज घालायला मिळतील.” हे ऐकून यमुची कळी खुलली. “जोडवी? रोज? मझी स्वतःची? ह्म्म, आता कळलं मला, लबाड आहे ती राधी, एवढे दिवस म्हणायची मी लग्न नाही करणार, आता जोडवी मिळाली असतील म्हणून तयार झाली लगेच.” आणि यमु रडणं विसरून बाहेर पळाली. पण जाताना तीने माँ आणि बाबांच्या डोळ्यात आलेले दोन अश्रु नाही पाहिले. माँनी आज पहिल्यांदा आपल्या लाडक्या लेकीला फसवलं होतं!

राधी यमु पेक्षा २ वर्षं मोठी होती, चौदा वर्षाची राधी लग्नायोग्य झाली आणि तिला स्थळे येऊ लागली. जवळच्या गावातल्या पाटिलांच्या घरात देण्या-घेण्याच्या गोष्टी ठरल्या आणि राधी च्या लग्नाची तारीख ठरली. राधीचा लग्नाचा शालू, तीचे दागिने, मेंदीने फासलेले तीचे हात, यमू सगळं डोळे भरून पाहत होती. लग्नाच्या दिवशी पहाटे उठून यमुने मधुमालतीची सर्व फुलं वेचली, त्याची सुंदर अशी वेणी गुंफली, आणि गुलाबी शालू नेसलेल्या राधीच्या आंबाड्यात स्वतःच्या हाताने ती वेणी खोचली. यमुकडे बघत राधी आश्चर्याने बोलली “का गं यमुना, तू नाही आज मधुमालती माळलीस तुझ्या केसात?” त्यावर यमु म्हणाली “अंहं, आज सगळी तुलाच दिली, उद्या पासून सगळी फुलं माझीच, तू कुठे असणार आहेस माझ्याशी भांडायला?” हे वाक्य बोलता बोलता यमुला कळलं की आपली जीवाभावाची मैत्रीण आपल्या पासून खूप लांब जातेय. दोघी एकमेकींच्या गळ्यात पडून हमसून हमसून रडू लागल्या!

राधी सासरी चांगलीच रुळली, कधी माहेरी आली की यमुना तिला भेटायला जाई, तेव्हा ओंजळभर मधुमालतीची फुलं घेऊन जाई! राधीचं सासर तोलामोलाचं होतं, राधीचे ‘अहो’ तिचे खूप लाड करायचे, दागिन्यांनी मढलेली राधी, पण ह्या मधुमालतीची फुलं डोळे भरून पाहायला आसुसलेली असायची. तिच्या आणि यमुच्या मैत्रीतील दुवा होती ही ओंजळभर फुलं! लग्नानंतर दीड वर्षात राधी पहिल्या बाळंतपणा साठी माहेरी आली, तिचं होणारं कोडकौतुक बघुन यमु हुरळून जायची. हळुहळू तिलाही आता वाटू लागलं होतं की हे सर्व सुख आपल्याला पण मिळावं. कधी काळी लग्न हा विषय ऐकला की रडणारी यमुना, आता लाजु लागली. पुढच्या सहा महिन्यातच, शेजारच्या गावातल्या सदानंद भोसलेचं स्थळ यमु साठी तिचे मामा घेऊन आले. सगळी बोलणी सुरळीत पार पडल्यावर पुढच्याच महिन्यातल्या सोळा तारखेला यमुचं लग्न सदाशी झालं. गोरीपान नाजुक कुडीची यमु लाल शालुमधे फारच दिसत होती. माँनी स्वतःच्या हातानी यमुच्या केसांचा नारळा एवढा आं बाडा बंधला, आणि त्यात चमेलीच्या फुलांची वेणी गुंफली. यमुला खर तर मधुमलतीची फूलं हवी होती, पण ऐन वेळेला फूलं आणायला कोणालाच वेळ नव्हता. म्हणून मग यमु गप्प बसली. राधीचं बाळ लहान म्हणून तीही लग्नाला येऊ शकली नाही, विधवा आत्याला तर शुभ कार्यात यायची मुभाच नव्हती. माँ नंतर माँच्या जागी असलेली आत्या, जीवभावाची लाडकी मैत्रीण आणि तिची जीव की प्राण असलेली मधुमालती कोणीच तिच्या सोबत नव्हतं, त्यामूळे तीला फार चुकल्या चुकल्या सारखं वाटत होतं! लग्न लागलं आणि पाठवणीची वेळ आली. जवळ जवळ डोळ्यां पर्यंत आलेला डोक्यावरच्या पदरा आडून यमु चे डोळे अत्याला शोधत होते! पण आत्या बाहेर कुठेही येणार नाही हे तिला माहित होतं. भरलेल्या डोळ्यांनी यमुना माँ बाबांच्या पाया पडली, घरतल्या इतर मोठ्यांचे आशीर्वाद घेतले, तिच्या सगळ्या लहान बहिण- भावांच्या गळ्यात पडून रडली. तिच्या पाठच्या बहिणीला माँ बाबांची काळजी घ्यायला बजावलं आणि सोबत तिच्या लाडक्या मधुमालतीच्या वेलाला पण सांभाळायची ताकीद देऊन शेवटी यमुना, सौ. सुखदा सदानंद भोसले म्हणून सासरी जायला बैलगाडित बसली!

नव्या नवलाईचे नऊ दिवस भर्रकन उडून गेले. हळूहळू यमुना सासरी रुळू लागली. तिला माँचे बोल आठवायचे, सगळ्यांचं ऐकलं तर माँ बाबांचं कौतुक होईल सासरी. ती मग सासू बाई, चुलत सासु बाई सांगतील तसं वागायचा प्रयत्न करायची. सासू फार प्रेमळ होती यमुची. यमु त्यांना सासू बाई म्हणे, तेव्हा त्या तिले दटावत “बाळ सुखदा, सदा नंतर अनंत झाला आणि त्यानंतर माझी कूस भरलीच नाही ग पुन्हा. फार वाटायचे कि एक तरी मुलगी असावी, पण माझ्या नशिबी नव्हतं. पण आता तू आलीयेस ना, तूच माझी मुलगी. मला सासू बाई नको ग म्हणत जाऊ, आई च म्हण तू मला.” यमु ला थोडा वेळ लागला पण हळू हळू सासूबाईंच अहो आई मध्ये रूपांतर झालं. आईंच्या हाताखाली यमु घरातल्या रीती भाती शिकत होती, पण सासूला पण कळायचं एवढ्या कोवळ्या वयात लग्न झालंय पोरीचं. मग कामं आटोपत आली कि तिला त्या बाहेर बाकी मुलींसोबत खेळायला पाठवायच्या. सदा ची आजी होती घरात, तिला खटकायचं हे थोडं, पण मग आई त्यांना त्यांच्या लहानपणीची आठवण करून द्यायच्या. मग त्याही काही बोलायच्या नाहीत. जणू दोघी त्यांचं हरवलेले बालपण यमु च्या खेळण्यात शोधत होत्या. यमुला सासरी सगळंच आवडायचं, पण घराच्या अंगणात किंवा इतर कुठे जवळ मधुमालतीच एक ही वेल नव्हता. ती न्हाली कि आई तिच्या केसात तेल लावून छान अंबाडा बांधून सोन चाफ्याची फुलं माळ्याच्या. चाफ्याचा वास तिला खूप आवडे. आणि त्या पांढऱ्या फटक चमेली पेक्षा तो सोनेरी रंग तिला थोडं समाधान देई. पण मधुमालती काही तिच्या मनातून गेली नाही. लग्नाला वर्ष झालं आणि हळूहळू तिचा इतर मुलींशी खेळण्यातलं लक्ष थोडं कमी होऊ लागलं. सदानंद सतरा वर्षाचा होता. तो वडिलांसोबत शेतात काम करे. तिला आता सदानंद दिसले, तिच्याशी २ शब्द बोलले कि हरखून जायला होई. त्यांच्या कडे बघावं, त्यांच्याशी बोलावं असा तिला सारखं वाटे. त्या काळातल ते खरंखुरं प्रेम असंच असायचं. शब्द आणि स्पर्श दोन्ही चा वापर ना करता केलेलं. लग्नानंतर २ वर्षांनी यमुला दिवस गेले. आई, आजी-सासू यमु चे सगळे डोहाळे पुरवायला सज्ज झाल्या. तिला कुठे ठेऊ आणि कुठे नको असा सदा ला वाटू लागलं. एकदा रात्री दोघंच खोलीत असताना सदानी यमु ला विचारले, “सुखदा, तुला काही हवं असेल तर मला सांग, मी लगेच आणून देईन. चिंच, कैऱ्या… जे खवास वाटेल ते सांग.” यमु म्हणाली “ते सगळं मला आई देतात. पण मला ना एक मधुमालतीचं रोप हवय, माझ्या माहेरी होतं, मला त्याची फुलं खूप आवडायची.” सदा म्हणाला “अग एवढंच ना, मग आधी का नाही बोललीस मला तू हे? कधीच आणला असता मी एक वेल. आता उद्याच शोधून आणतो बघ!” ते ऐकून यमु अगदी खुशीत झोपली त्या रात्री. दुसऱ्या दिवशी शेतातून येताना सदानि कुठून तरी मधुमालतीच एक छोटं रोप मिळवलं आणि अंगणात रुजवलं सुद्धा. आता यमु पोटातल्या बाळासोबत त्या मधुमालतीच्या फुलण्याचीही वाट बघू लागली.

तिला सातवा महिना लागला आणि भटजींना विचारून एका चांगल्या मुहूर्ताला तीच डोहाळे जेवण करायचं ठरलं. हिरवा कंच शालू सासर्यांनी शहरातून आणला होता. हिरवा चुडा भरलेली, गरोदरपणाचा तेज आलेली यमु त्या हिरव्या शालूत फारच छान दिसत होती. गावातल्या सगळ्या बायकांना आमंत्रण दिलं होतं आईंनी. छान फुलांचे दागिने, मुकुट बनवला होता सगळ्यांनी मिळून. ते सगळं यमुला घातलं, पानांनी सजवलेल्या पाळण्यावर बसवलं आणि गाणी म्हणली. गाणी म्हणण्यात सदाच्या आजीला आज फार हुरूप आला होता. पणजी होण्यात वेगळाच आनंद आहे असं त्या सारख्या सारख्या सगळ्यांना सांगत होत्या. सर्व बायकांसाठी नाश्त्याची सोय केली होती. डोहाळे जेवणाचा कार्यक्रम अगदी दिमाखात पार पडला. दोन दिवसांनी बाबा यमुला घ्यायला आले. पहिले बाळंतपण माहेरी ह्या रितीनुसार यमु बाबांसोबत माहेरी आली. माहेरी यमुचे काय कोडकौतुक झाले हे सांगायलाच नको. ती आल्या आल्या तिच्या बहिणीने तिच्या समोर तिच्या आवडत्या मधुमालतीची फुलं आणून टाकली. ती बघूनच यामूच्या चेहऱ्यावर अगदी मंद असं हास्य उमटलं. मनापासून खुश झाली यमु. नऊ महिने भारताचं, यमुने एक गोजिरवाण्या मुलीला जन्म दिला. छान गुटगुटीत गोरी पान मुलगी अगदी यमु वरच गेलीये असेच सगळे बघायला येणारे म्हणायचे. बाराव्या दिवशी मुलीचं बारसं झालं. नाव ठेवलं होतं सुरेखा. सुरेखा ३ महिन्याची होत आली आणि सदा दोघींना घ्यायला आले. सासरी परत येताच, यमु ने तिच्या मधुमालतीच्या वेला कडे धाव घेतली. वेल आता चांगलाच उंच उंच गेला होता. त्याला आता लवकरच गुलबक्षी काळ्या लागणार होत्या. यमु सुखावली. तान्ह्या सुरेखाला घेऊन परत एकदा सासरी रुळली.

असेच दिवस भर भर जाऊ लागले. छोट्याश्या सुरेखाच्या पैंजणांनी घर दुमदुमू लागलं. सगळेच तिच्या बाळ लीलात रमत होते, तिचे बोबडे बोल सगळ्यांच्या गप्पांचा विषय झाले. बघता बघता सुरेखा ३.५ वर्षाची झाली. सोबत यमुचा मधुमालतीचा वेल पण बहरला होता. पुन्हा एकदा यामूच्या लांब सडक केसात मधुमालतीची फुलं दिसू लागली. सुख वेचू तितकं यमुला मिळत होतं. आणि तितक्यात पुन्हा एकदा यमुला गोड़ बातमी मिळाली. परत एकदा तेच कोडकौतुक, तेच लाड. यमु अगदी सुखाच्या परमोच्य शिखरावर होती. ९ महिने कौतुकात न्हाऊन निघाल्यावर, यमुने पुन्हा एकदा छोट्याशा गुटगुटीत मुलीला जन्म दिला. या वेळी बाळाचं कौतुक थोडं कमी झालं, पहिली मुलगी झाली तेव्हा आता दुसरा मुलगा असावा असं सगळ्यांना वाटत होतं. पण मुलीच्या गोड़ चेहऱ्याकडे बघून सगळे पटकन सावरले. छोटीचं नाव ठेवलं श्रीलता. श्रीलता साधारण महिन्याची झाली होती. सव्वा महिना अजून झाला नसल्या मुळे यमुला बाळंतिणीच्या खोलीतून बाहेर येता येत नव्हते. ती श्रीलता ला घेऊन खोलीत निजली होती. तोच आईंचा जोरात ओरडण्याचा आवाज तिच्या कानावर पडला. तिला वाटले आईंना काहीतरी झाले. मागोमाग, आजीनी हंबरडा फोडला. आता यमुच्या काळजात धस्स झालं. नक्कीच काहीतरी अभद्र घडलं होतं. ती दाराच्या आत आडोश्या ला उभी राहून चाहूल घेऊ लागली. अर्धा पाऊण तास ती तशीच उभी राहिली. कोणी तिच्या खोलीकडे आलंच नाही, पण बाहेर मात्र बरंच काही घडत असलेलं तिला जाणवत होतं. थोड्या वेळानी तिच्या चुलत सासू बाई तिच्या खोलीत आल्या. त्या रडत होत्या. “छोट्या सासू बाई काय झालं? काय चाललंय बाहेर? तुम्ही का रडताय?” त्या मटकन दारातच बसल्या. काही बोलताच येईना त्यांना. बोलायला लागल्या तर हुंदका आवरेना. यमु आता पूर्ती घाबरली. तिचा संयमाचा बांध सुटत चालला होता. तेवढयात चुलत सासू बाईंनी हंबरडा फोडला “आपला सदा… गेला ग.” यमुला काही कळेनाच. काय बोलल्या ह्या? त्यांचा आवाज ऐकून झोपलेली श्रीलता दचकून उठली आणि तिने टाहो फोडला. पण यमूच्या कानावर त्या निष्पाप जीवाचं रडणं पोचत नव्हतं. तिच्या कानात ते चार शब्द घुमत होते. “आपला सदा… गेला ग!” तेवढयात गावातल्या २-३ बायका खोलीत आल्या. त्यांनी तिच्या हातातल्या बांगड्या एकमेकांवर आपटून फोडल्या. तीच कुंकू पुसलं. कोणीतरी श्रीलता ला उचलून घेतलं असावं बहुतेक. कारण तिचं रडणं बंद झालं होतं. नंतरचा पूर्ण दिवस यमुनि अर्ध्या शुद्धीत काढला. कोणीतरी तिला गार पाण्यानी अंघोळ घातली. सकाळ पर्यांतची ओली बाळंतीण आता विधवा होती. काल पर्यंत तेल पाण्यानी अंघोळ घालणाऱ्या आज तिच्या अंगावर थंड पाण्याचे घडे निष्काळजीपणे ओतत होत्या. मग तिला पांढरी शुभ्र साडी नेसवली. न्हाव्याला बोलवून, कधीही कात्री ना लागलेल्या तिच्या लांबसडक केसांना वस्तऱ्यानी सहज कोरत होता. पण हे सगळं होईपर्यंत तिच्या डोळ्यातून एक थेंब नाही पडला. तिचे केस तिच्या पायाशी पडत होते. पण ती स्तब्ध पणे त्यांच्या कडे बघत होती, जणू हे तिचे केस नाहीतच! क्षणभर तिनी डोळे वर केले आणि तिला समोर तिची लाडकी मधुमालती दिसली. पुन्हा तिनी खाली नजर टाकली. तिच्या कापलेल्या केसांवर स्थिर झालेली तिची नजर, त्या केसात मधुमालती शोधत राहिली! आणि त्या क्षणी यमुला कळलं कि तिची मधुमालती पण तिला सोडून गेली होती… कायमची!!! यमुचा त्यानंतरचा आक्रोश असह्य होता!

“मी पण असंच आयुष्य काढलंय ग बयो!” असं म्हणत आज पहिल्यांदा यमु नी तिच्या कायमच्या हरवलेल्या मधुमालती ची गोष्ट सांगितली. नातसून समंजस होती म्हणून त्यांना तिला सांगावस वाटलं? की तिलाही मधुमालती ची फुल आवडायची म्हणून त्यांनी तिला सांगितलं? ते तर गार्गीला ही नाही माहित. पण कधीही कोणालाही ना सांगितलेली त्यांची गोष्ट आज यमु आजींनी गार्गी ला सांगून, पुन्हा एकदा त्यांच्या मधुमालतीच्या स्मृती जाग्या केल्या होत्या हे नक्की.



Rate this content
Log in